#लॉक डाऊन मधील परिसर अभ्यास - भाग ४
जलउभारी वनस्पती... गच्ची बागेत गेलो होतो. खूप म्हणजे खूपच दिवसांनी. सेवकांनी पाणी दिल्यानं बरीच बाग तग धरून होती. काही संपली होती. संपली होती??? शब्द चुकतोय का माझा? आम्ही लावलेली काही रोपंं मेली होती हे खरंंच. पण आम्ही न लावलेल्या अनेक गोष्टी उगवूनही आल्या होत्या; हे त्याहून खरंं. अगदी प्रत्येक कुंडी हिरवीगार होती त्यांच्यामुळंं. किती ते प्रकार. हा... हा घटक होईल का परिसर अभ्यासाचा? (एक मन) यडा आहेस का रे? काहीही काय? (दुसरं मन) ए गपा रे तुम्ही. हाच विषय घेऊ. (मी) अरे गवत काय गवत? नाव तरी बरंं शोध जरा. (दुसरंं मन) हं. करतो विचार. (मी) पावसळ्यात उगवून येणाऱ्या वनस्पती. बरं नाव सुचलं होतं 'मी'ला. विषय थोडा अवघडच. कोणाची मदत घ्यायची समजेना. परत एकदा संजीव नलावडे सरांची आठवण काढली. परत एकदा सरांचा तत्पर प्रतिसाद आला. सरांनी पाठवलेल्या क्रमांकावर संपर्क केला. "ताई, मी अमुक अमुक,,, माझंं काम तमुक तमुक..." "ठीक आहे सर. आवडेल तुम्हाला मदत करायला. पण तुम्ही ज्याला गवत म्हणता ते सगळंं गवत नाही. आमची ग्रासची व्याख्या वेगळी आहे." ...