काही आठवणी... विखुरलेल्या, विस्कळीत.
काही आठवणी... विखुरलेल्या काहीशा विस्कळीत. शाळेत असतानाच्या काही... इयत्ता पाचवीसाठी खुद्द भाऊ वर्गशिक्षक होते. इंग्रजी विषय शिकवायचे. इंग्रजीच्या तासाला पूर्णपणे इंग्रजीतून बोलणे करायचे. एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नाही तर फळ्यावर चित्र काढायचे पण मराठीतून बोलणे टाळायचे. कुठलातरी इंग्रजीचा प्रकल्प करायला दिला होता पाचवीत. आणि त्याचे वाढीव गुण तुम्हाला वार्षिक परीक्षेत मिळतील असं सांगितलं गेलं होतं. गुणपत्रिका हातात पडली तेव्हा भाऊंनी स्वहस्ताक्षरात प्रत्येकाच्या गुणपत्रकार वाढीव गुण दिल्याचे दिसले. त्यामुळे काहींचे गुण शंभरपेक्षा अधिक झाले. पण त्याला भाऊंची हरकत नव्हती. सायकलवरून शाळेत येत होतो. माझ्याकडे लेडीज सायकल होती; आईलासुद्धा वापरता यावी म्हणून. समोरून भाऊ येत होते. "अहो वीर तुमची सायकल द्या जरा." असं म्हणून सायकलवर स्वार होऊन स्वारी नजरेआड देखील झाली. सुरुवातीच्या काळात अशा कित्येक मुलांच्या सायकली घेऊन कित्येकांच्या गृहभेटी केल्या आहेत भाऊंनी. शाळेत शिकत असताना भाऊ भेटायला बोलवायचे. पण भीती वाटायची. नको वाटायचे जायला. त्यांच्या खोलीपर्यंत जायचो, खोलीबाहेरचा चपलांचा...