
कातळातील सृजनाची कथा... एकदाचे कामशेत जवळील बेडसे लेणीत पोहोचलो. सुमारे ४३५ पायऱ्या असतील. (बसमध्ये असताना जे मोजता येईल ते सगळे मोजा, अशी सूचना मुलांना केली होती त्यामुळे काहींनी पायऱ्या मोजल्या होत्या.) २०- २५ मिनिटे लागली चढायला. सगळेच घोटभर पाणी प्यायले आणि सावली शोधून विसावले. तितक्यात चैत्यगृहातून प्रार्थनेचे स्वर ऐकू येऊ लागले. हे थोडे विशेष होते माझ्यासाठी. दोन-तीन वेळा येऊन गेलोय इथे मी. पण कधी प्रार्थना ऐकली नव्हती. उत्सुकतेने आत डोकावलो. स्तूपावर गौतम बुद्धांची छोटी मूर्ती ठेवली होती. स्तुपाच्या खाचातून दिवे लावले होते. फुले वाहिली होती. आणि चार जण बुद्ध वंदना करत होते. चैत्यगृहातील वातावरणामुळे ती प्रार्थना अधिकच धीरगंभीर वाटली. चटकन बाहेर आलो. "मुलांनो लगेच रांगा करून आत बसा." वातावरणच असे होते की मुलांना शांत बसा हे सांगायची गरजच लागली नाही. थोड्या वेळाने प्रार्थना थांबली. सहज संवाद सुरु झाला. " दर रविवारी करता का प्रार्थना ?" " अहो आज पौर्णिमा आहे. दर पौर्णिमेला कोणत्यातरी लेणीमध्ये जाऊन आम्ही...