कातळातील सृजनाची कथा...











एकदाचे कामशेत जवळील बेडसे लेणीत पोहोचलो. सुमारे ४३५ पायऱ्या असतील. (बसमध्ये असताना जे मोजता येईल ते सगळे मोजा, अशी सूचना मुलांना केली होती त्यामुळे काहींनी पायऱ्या मोजल्या होत्या.) २०- २५ मिनिटे लागली चढायला. सगळेच घोटभर पाणी प्यायले आणि सावली शोधून विसावले. तितक्यात चैत्यगृहातून प्रार्थनेचे स्वर ऐकू येऊ लागले. हे थोडे विशेष होते माझ्यासाठी. दोन-तीन वेळा येऊन गेलोय इथे मी. पण कधी प्रार्थना ऐकली नव्हती. उत्सुकतेने आत डोकावलो. स्तूपावर गौतम बुद्धांची छोटी मूर्ती ठेवली होती. स्तुपाच्या खाचातून दिवे लावले होते. फुले वाहिली होती. आणि चार जण बुद्ध वंदना करत होते. चैत्यगृहातील वातावरणामुळे ती प्रार्थना अधिकच धीरगंभीर वाटली. चटकन बाहेर आलो. "मुलांनो लगेच रांगा करून आत बसा." वातावरणच असे होते की मुलांना शांत बसा हे सांगायची गरजच लागली नाही. थोड्या वेळाने प्रार्थना थांबली. सहज संवाद सुरु झाला. "दर रविवारी करता का प्रार्थना?" "अहो आज पौर्णिमा आहे. दर पौर्णिमेला कोणत्यातरी लेणीमध्ये जाऊन आम्ही प्रार्थना करत असतो." (वा! चांगल्या मुहूर्तावर आम्ही लेणी बघायला बाहेर पडलो होतो तर - माझे स्वगत) मुलांमधून प्रश्न आलाच"पौर्णिमेलाच का काका?" "मुलांनो वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. आणि याच दिवशी त्यांचे महानिर्वाण झाले होते. ती पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. म्हणून पौर्णिमा!" "तुमच्या मागून आम्हीही प्रार्थना म्हणून इच्छितो," मी इच्छा दर्शवली. मग एका मंत्राचे पठण सगळ्यांनी मिळून केले.

मुनी मुनी महामुनी

शाक्य मुनी साधू

(भावार्थ - सर्व मुनींमध्ये श्रेष्ठ असणारे, शाक्य कुळातील मुनी गौतम बुद्ध; आम्ही तुमच्या प्रमाणे होऊ इच्छितो.) सगळ्यांनाच खूप प्रसन्न वाटत होतं. या ठिकाणावरून आध्यामिक साधना कशी चालत असेल याचे छोटे प्रात्यक्षिकच मुलांना बघायला व अनुभवायला मिळाले होते. 

    तिथून बाहेर पडलो आणि शेजारच्या विहारामध्ये सगळेजण बसलो. ओशीन दादाने मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली. "मित्रांनो सह्याद्री किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहेच पण याच सह्याद्रीच्या डोंगररांगातून सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी पासून केवळ छिन्नी हातोडीचा वापर करून अनेक लेणी निर्माण करण्यात आली. भारतातील सुमारे १२०० लेणींपैकी ८०० लेणी एकट्या आपल्या महाराष्ट्रात आहेत...” मग सह्याद्रीमध्येच इतकी लेणी का आढळतात? कोणाच्या काळात ही लेणी कोरली गेली? त्यांचे प्रकार कोणते आहेत? एक लेणं खोदायला अंदाजे किती वर्ष लागतात? हा कालावधी कसा काढला जातो? लेणींची निर्मिती करणारे लोक कोण होते? त्यांना पैसा कसा उपलब्ध झाला? त्या काळात लोकांकडे इतका पैसा उपलब्ध होता याचे काय काय अर्थ होतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दादाच्या बोलण्यातून उलगडत गेली. एका प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याने माहिती पुरवली की, "गौतम बुद्धांच्या शिकवणुकीनुसार बौद्ध भिक्षुंनी वर्षभर धर्मप्रचारासाठी प्रवास करणे अपेक्षित होते. अपवाद होता पावसाळ्यातील चार महिन्यांचा. या काळात त्यांची एके ठिकाणी राहण्याची, साधनेची व्यवस्था व्हावी या हेतूने लेणींची निर्मिती झाली. थोडक्यात ही बौद्ध भिक्षुंसाठीची वर्षा निवासस्थाने होती." (‘वर्षा’ निवासस्थानाचे महत्त्व दोन हजार वर्षांपूर्वीपासूनचे आहे तर!)

दादाचे बोलणे संपल्यावर लगेचच मुलांचे पाच गट केले. “तुम्ही तुमच्या नजरेने लेणी आधी बघून घ्या. ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतील त्या नोंदवून ठेवा. बॅटरी सोबत ठेवा. इथले पावित्र्य, शांतता अबाधित ठेवा. आणि हो कुठेही भसकन हात-पाय घालू नका...” मी तोंडाचा पट्टा चालवला. तरी काळजी म्हणून प्रमोद सर व सुपे ताई यांना मुलांच्या मागावर पाठवले. मला जरा ओशीनशी गप्पा मारायला निवांत वेळ मिळाला.

ओशीन बंब मूळचा राजस्थानातील. पण ‘य’ वर्षां त्यापूर्वीच याचे घराणे वर्धा जिल्ह्यामध्ये स्थलांतरित झाले होते. लहानपणापासूनच त्याला आर्किऑलॉजी मध्ये काम करायचे होते. त्यामुळे डेक्कन कॉलेजमधून प्राचीन भारत इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व या विषयात त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर इतिहासातील 'सेट' तर आर्किऑलॉजी मधील 'नेट' परीक्षा उत्तीर्ण झाला. सध्या विदर्भातील जैन धर्म या विषयावर पीएचडी करत आहे. वय केवळ २४! महाराष्ट्रातील अनेक मंदिर, लेणी भटकलेला आहे. "अर्थ काय रे बाबा तुझ्या नावाचा?" "ज्याच्यावर ईश्वरीय शक्ती फुलांचा वर्षाव करते असा..." वा! म्हणजे ओशीनला नावाला जाग असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. ती जबाबदारी ईश्वराची आहे.

साधारण अर्ध्या तासाने परत एकदा सगळेजण एकत्र झाले. एकेक गट समोर येऊन आपली निरीक्षणे नोंदवू लागला. एकही मुद्दा पुन्हा सांगितला गेला नाही पाहिजे ही अट होती.









चैत्यगृहात २६ खांब आहेत पैकी २४ खांब अष्टकोनी आहेत. (मोजामोजी सुरु ठेवली होती तर मुलांनी...)

खिडक्यांना छिद्रेच नाहीत.

आरामाच्या १६ खोल्या आहेत.

विहारांमधील खिडक्यांचे डिझाईन अल्टरनेट आहे.

खोल्यांमध्ये अधिक थंड वाटले.

एका खोलीतील छत काळे आहे. तिथे बहुतेक स्वयंपाक होत असावा. (भन्नाट होते हे निरीक्षण आणि त्याचा काढलेला निष्कर्षही!)

एका खांबावर हत्ती आहे. पण त्याचे सुळे बहुधा पडले आहेत कारण त्याजागी छिद्र दिसत आहे. (वाह वा! आणखी एक विशेष निरीक्षण.)

जवळपास २०-२५ निरीक्षणे झाली सर्व गटांची मिळून. बरेच शोध लावले होते मुलांनी. ओशीनदादा खूश होता मुलांवर. म्हटलं चला आता निरीक्षणांप्रमाणे प्रश्नांचीही एक फेरी करा. निरीक्षण करताना काय काय प्रश्न पडले ते विचारून ठेवा. 

खोल्या छोट्या आहेत; त्यांना खिडक्या नाहीत तर श्वास घ्यायला त्रास होत नसेल का?

चैत्यगृहातील पाचच खांबांवर चिन्हे का कोरली आहेत?

चैत्यगृहाला दोन दारे का आहेत?

    दहा एक प्रश्न झाले. आता वेळ झाली होती ओशीन सोबत लेणी पाहत या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची. "मुलांनो डोरेमॉन बघता का?" (आम्ही नववीतील मुले. कार्टून बघण्याचे वय सरले आमचे. मुलांच्या चेहऱ्यावरचे आविर्भाव.) "आधी बघायचो दादा." "त्याची गॅजेट्स आठवतात ना? चला तर मग त्याच्या टाईम मशीन मध्ये बसुयात. आणि मागे जाऊयात. किती मागे... तब्बल दोन हजार वर्षे! आहात ना तयार?" "तय्यार." सगळी मुले एकसुरात.

एकेक गोष्ट उलगडून दाखवली जात होती. "लेणं एकसंध पाषाणात कोरलं जातं... वरून खाली असेच कोरण्याची पद्धत होती... तत्कालीन लाकडी बांधकाम डोळ्यासमोर ठेवून कोरीव काम केलं जायचं... चैत्यगृह, विहार, विविध प्रकारचे मंडप, पाण्याचे टाके, पूजेसाठीच्या जागा अशा गोष्टी आपल्याला लेणी बघताना आढळतात... या लेणीच्या रंगकामाच्या काही खाणाखुणाही तुम्हाला दिसतील... सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे विहार आणि मगाशी आपण जो चैत्यगृह बघितला त्याचा आकार सारखाच वाटतो ना; घोड्याच्या नालेसारखा. अन्य लेणीमधील विहार या आकारात नाही. मग याच ठिकाणचा का असेल? तर संशोधकांचे असे म्हणणे आहे की सुरुवातीला या ठिकाणी चैत्यगृह करायचे होते. पण येथील दगड खराब लागला म्हणून मग ही जागा विहाराची केली आणि चैत्यगृह दुसरीकडे कोरले... तुम्ही मगाशी विचारले ना त्या पाचच खांबांवर चिन्हे का कोरली आहेत; तर ते खांब विशेष आहेत. त्या खांबांमध्ये कोणाच्या तरी स्मृती जतन करून ठेवल्या आहेत. आणि तुमचे अजून एक निरीक्षण होते ना या हत्तींबाबत. या हत्तींचे सुळे पडलेले नाहीत तर पूर्वीच्या काळी या खोबण्यांमध्ये खरे हस्तिदंत रोवले जात असावेत असा लेणी तज्ञांचा कयास आहे..." एकावर एक धक्के देत होता ओशीन. याशिवाय स्तूपाचे चार मुख्य प्रकार... पिण्याच्या आणि वापरायच्या पाण्याच्या टाक्यातील फरक... केवळ थक्क व्हायला होत होते. एकेक गोष्ट बोलती केली होती ओशीनने. जवळपास दोन तास उलटून गेले होते. बहुतांश गोष्टी बघून झाल्या होत्या. आता सगळ्यांनाच भुकेची जाणीव झाली होती. लेणीच्या कुंपणाबाहेर येऊन पायऱ्यांवर सगळे जण जेवायला बसलो...

ओशिनच्या डब्यातील भाजी थोडी वेगळी दिसत होती. आमच्या प्रमोद सरांनी विचारलंच, “कसली आहे ही भाजी?” या प्रश्नामुळे भाजीचे नाव व तिची चवही (माइनमुळा लोणच्यासारखी) चाखायला मिळाली. (...म्हणून तरी प्रश्न कौशल्य शिका मुलानो.) केरसांगरी या कॅक्टसपासून बनवलेली ही भाजी म्हणे. नुसत्या तेलात परतली तर चांगली सात-आठ दिवस टिकते. राजस्थानमध्ये मारवाडी समाज प्रवासाला जाताना हीच भाजी करून सोबत नेत असतो. (गाव सोडलं असलं तरी संस्कृती टिकवून होता पठ्ठ्या!) केरसांगरी निमित्ते पदार्थ विज्ञानाचाही एक छोटा घटक मुलांचा शिकून झाला.

जेवण झालं होतं. मुलं आता काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे गटकार्य देण्याची वेळ झाली होती. पण तेवढ्यात सौरभने मला विचारलं, "दादा जरा या विहारातील आरामखोल्यांचा वापर करून बघितला पाहिजे; काय म्हणतोस?" त्याच्या बोलण्याचा रोख मी तत्काळ ओळखला. मनात म्हटले ‘नेकी और पुछ पुछ!’ "चला दिली १५ मिनिटे." ( दिली कसली; ती १५ मिनिटे मी मला घेतली होती.) माझ्यासकट सर्व मुलांनी पटापट आरामखोल्यातील दगडी खाटांचा आसरा घेत त्या काळात बौद्ध भिक्षु आराम कसे करत असतील याचाही अनुभव घेतला.

आता प्रमोद सरांनी पाचही गटांना ब्राह्मी व देवनागरी लिपीची बाराखडी असणारे कागद वाटले. या लेणीत तीन ठिकाणी शिलालेख आहेत. या कागदाच्या आधारे मुलांना या शिलालेखातील काही शब्द शोधायचे होते. त्या आधी लिपी-भाषा या संकल्पनांवर चर्चा झाली. मग दादाने ब्राह्मी व देवनागरी लिपीचे निरीक्षण करून एखादी विशेष गोष्ट लक्षात येते का असे विचारले. मृण्मयीच्या लगेच लक्षात आले. "दादा दोन्ही लिपीत ‘ढ’ हा एकसारखाच आहे. "अगदी बरोबर! म्हणूनच आपल्याकडे ‘ढ’ तर ‘ढ’च राहिला असे म्हणतात." (वा! ऐकावे ते नवलच.) मग गटांची विभागणी करून त्यांना शिलालेखांचे वाचन करण्यास पाठवले. अगदी काही मिनिटातच प्रत्येक गटाने त्यांची कामगिरी फत्ते केली. सांगितलेले शब्द अचूक शोधले होते सर्वांनी. उत्साही लोकांनी आणखीही काही शब्द वाचण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. नासिक, गोभूती, महाभोज हे ते तीन शब्द होते. प्रत्येकाची एक स्वतंत्र कथा होती. केवळ एक शब्द शोधला होता पण जणू काही ब्राह्मी लिपीच वाचता यायला लागल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मग दादाने या तिन्ही शिलालेखांची थोडक्यात माहिती दिली. नासिक शब्दाचा संदर्भ घेत पार्थने विचारले,  "याचा अर्थ नाशिक हे नाव व ते गाव दोन हजार वर्षांपूर्वींपासूनचे आहे तर!" "शाब्बास रे मित्रा," ओशीन जाम खूश पार्थवर.

एका शिलालेखात वर्णन केल्याप्रमाणे एक बौद्ध भिक्षु होता. एकाच पात्रात सगळं अन्न कालवून खायचा. आषाढमित्र नावाचा त्याचा एक शिष्य होता. त्या बौद्ध भिक्षूच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रती असणारा आदरभाव दर्शवण्यासाठी या शिष्याने हा शिलालेख कोरला. “मृत्यूनंतरही तो शिष्य त्याच्या गुरुप्रती असा आदर बाळगून होता. तुम्ही किमान शाळेमध्ये शिकताना तरी शिक्षकांना आदर दिला पाहिजे,” नैतिकतेचा पाठ देण्यास ओशीन विसरला नाही.

आमच्या नियोजनानुसार आता वेळ झाली होती लेणीचा नकाशा तयार करण्याची. सगळ्यांना कागद पेन्सिल काढण्यास सांगितले. लेणी जशी कोरली आहे तशी ती कागदावर आणायची होती. प्रमाण ढोबळ असले तरी चालणार होते. पण गोष्टी त्या त्या जागी असणे महत्त्वाचे होते. एक नमुना ओशीनदादाने दाखवला. मुलांना इंटरेस्टिंग वाटले हे प्रकरण. पुढचा सुमारे अर्धा तास काहींनी विहाराचा तर काहींनी चैत्यगृहाचा नकाशा तयार करण्याचा खूपच चांगला प्रयत्न केला. काहींनी नकाशापेक्षा स्तूपाचे चित्र रेखाटने पसंत केले. कमी वेळात खूपच चांगले रेखाटन केले मुलांनी.

एकीकडे हे चालू असताना दोघांना सोबत घेऊन मी चैत्यगृहाची मोजणी सुरू केली. प्रवेशद्वारापासून स्तूपापर्यंतचे अंतर, स्तूपाचा घेर इत्यादी गोष्टी मोजल्या. खांब अष्टकोनी होते. एक बाजू होती २ फूट. खांबाची उंची होती १२ फूट. त्या दोघांना विचारले, "आता याची पृष्ठफळ किती होईल रे?" चक्रावली पोरे. थोडा गणिताचा तास घेतला मग. हे आठ आयत आहेत असे माना म्हणजे सोपे जाईल. आता लिंक लागली मुलांना. 

खांबाची उंची मोजताना जरा गंमत झाली. मेजरिंग टेपमधील पट्टी खांबाला कितीही चिकटून वर चढवण्याचा प्रयत्न केला तरी ती खालीच पडत होती. एकदोनदा डोकीही वाचली आमची. आमची ही तारांबळ बघून शिडशिडीत बांध्याचा अनिकेत पुढे आला. 'काय येडे आहेत,' अशा प्रकारचा कटाक्ष त्याने टाकला. एक मिनिट टेप द्या म्हणाला.  मग त्याने टेपची जी पुढची बाजू आम्ही वर चढवत होतो ती त्याने पायात बोटाखाली धरली आणि मग पट्टी वर वर चढवण्यास सुरुवात केली. आमच्याबरोबर विरुद्ध कृती होती ही. कौतुक वाटले मला त्याचे. "तुला रे कसे माहिती?" "माझे वडील फॅब्रिकेशनची कामे करतात." निरीक्षणातून शिकला होता तर तो ही गोष्ट.

मुलांचा एक प्रश्न मी डोक्यात ठेवला होता. 'डाव्या लेणीच्या वर काही पायऱ्या खोदलेल्या दिसल्या तर वर काही आहे का'; हा तो प्रश्न होता. प्रश्नाच्या उत्तरासाठी मी संतोष दहिभातेचा हात धरला; अगदी शब्दश:! वरची वाट निसरडी आणि अगदीच अरुंद होती. त्यामुळे मुले आरेखनाच्या कामात गर्क आहेत हे बघून आम्ही दोघेच वर गेलो. साधारण १५*१५ फुटाचा मंडप असेल तो. संतोषच्या मते बौद्ध भिक्षुंखेरीज सामान्य नागरिक जेव्हा यायचे तेव्हा त्यांच्या चर्चेसाठी हा मंडप बांधलेला असावा. 'मटाप' असे त्याचे नाव म्हणे. पोरांनी मला वर गेलेलो बघायच्या आत खालीही उतरलोआम्ही.



संतोष दहिभाते... बेडसे मधीलच राहणारा. पुरातत्त्व विभागामार्फत २०१३ पासून इथे काम करतोय. एखादा इतिहासाचा शिक्षक काय माहिती देईल अशी माहिती संतोष देतो. आणि हो लोकांच्या सर्व क्रीयाकलापांवर संतोषचे बारीक लक्ष असते. जरा काही वावगे वर्तन झाले की संतोषची सूचना आलीच समजा. संतोष सोबतही मुलांच्या छान गप्पा झाल्या.  

चार वाजले होते. ठरवलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या होत्या. लेणी उतरण्याची वेळ झाली होती. ओशीनचे मनापासून आभार मानले आणि लेणी अभ्यासाचा ५-६ तास चाललेला तास आटोपता घेतला.

मी एकदा पावसाळी सहलीसाठी मुलांना बेडसे लेणीमध्ये घेऊन आलो होतो. लेणीत पोहचताच क्षणी जोरदार पाऊस सुरू झाला. आम्ही विहारात होतो. बघता बघता विहारात प्रवेश करण्याच्या जागेच्या वरील भागातून पाणी पडू लागले आणि पाण्याचा एक सुंदर पडदा तयार झाला. विलक्षण होतं ते दृश्य. त्या पाण्याच्या पडद्याआडुन आणि पावसाच्या पार्श्वसंगीताचा आधार घेत केलेली गायत्री मंत्राची उपासना आजही लख्ख आठवत आहे.

सहली नंतर मुलांनी लिहिलेले वृत्त वाचत होतो. त्यातील एक वाक्य होते, 'माझ्यासाठी बेडसे येथील लेण्यांची सहल अविस्मरणीय ठरली.' मग मुलांचा जरा मराठीचा तास घेतला. "मराठी भाषेत लेणं हे नाम नपुसकलिंगी एकवचनी आहे मुलांनो. याचे अनेकवचन लेणी होते. लेण्या हा चुकीचा शब्द आहे..." इतिहासाचा मराठीशीही समवाय साधला गेला होता.

ज्या दिवशी आम्ही सहलीला गेलो बघायला गेलो होतो त्याच दिवशी सोल्व्हाकीया देशातून दोघे जण आले होते; एका आयटी कंपनीच्या मीटिंग निमित्त. पण इथे आल्यावर काय काय बघायचं याच नियोजन पक्के होते त्यांचे. त्या नियोजनातीलच एक ठिकाण होते बेडसे लेणी. जवळपास चार-पाच तास तेही बारकाईने निरीक्षण करत होते. ओशीनकडून त्यांनीही बऱ्याच गोष्टी माहिती करून घेतल्या. मंडळी इतक्यात दुरून येऊन लोक आपला ऐतिहासिक वारसा बघून जातयेत. तुम्ही पाहणार ना? आणि तुमच्या मुलांनाही दाखवणार ना??  

............................................                                    शिवराज पिंपुडे

विभाग प्रमुख,
पूर्व माध्यमिक विभाग, ज्ञान प्रबोधिनी, निगडी                                                            

लेणी निरीक्षण सूची

Ø   लेणीचे ठिकाण. जिल्हा          गाव:

Øलेणी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहे का?

Ø लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे?

Ø लेणीमध्ये किती लेणींचा समूह आहे?

Ø लेणीमध्ये कोण कोणती शिल्पे (प्राणी, मनुष्य आकृती, चिन्हे इ.) कोणत्या ठिकाणी कोरली आहेत?

Ø लेणीमध्ये पाण्याची किती कुंडे आहेत?

Ø लेणीमध्ये किती विहार आहेत?

Ø चैत्यगृहाची रचना कशी आहे? (खांबांची संख्या, नक्षीकाम इत्यादी)

Ø लेणीमध्ये शिलालेख आहे का? कुठे?

Ø लेणीमध्ये किती खिडक्या आहेत? कुठे?

Ø लेणीत जाण्यासाठी किती पायऱ्या आहेत?

Ø 

सं    संदर्भ पुस्तके 

 लेणी महाराष्ट्राची - प्र. के. घाणेकर (स्नेहल प्रकाशन)

    महाराष्ट्रातील लेणी - प्रा. सु. ह. जोशी 

वे    वेरूळ लेणी - म. न. देशपांडे 


 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

मंतरलेली रात्र...!