कीटक??? ही तर रंगांची दुनिया...
कीटक??? ही तर रंगांची दुनिया...
“अरे सर हिलीए मत|”
भर जंगलात याला
नेमकं काय दिसलं म्हणून हा हालू नको सांगतोय पोटाशी जरा गोळाच आला.
“क्या है भाई?”
शरीर एकदम स्थिर ठेवून फक्त तोंडाची हालचाल करत मी विचारलं.
“अरे सर आपके
जुते पर बटरफ्लाय है|”
एक फुलपाखरू –
चोकलेट पेन्सी बुटावरच येऊन बसलं होतं. छान पंख उघडून. चॉकलेटी रंग. पंखांना
खालच्या बाजूला ४\५ छोटे गोलाकार डॉटस. पंखावर पंखाच्याच आकाराचं शेडींग. (फोटो
बघा म्हणजे मला काय म्हणायचं ते समजेल.) बाकीच्यांनी माझ्याजवळ येऊन पटापट फोटो
काढले. मला हलायला परवानगी नव्हती.
“अरे भाई मुझे भी
व्हाट्सअप करो पक्का|” माझं महाराष्ट्रीयन
हिंदी.
तर मंडळी निमित्त
होतं छत्तीसगड राज्यातील भोरमदेव अभयारण्यातील तितली संमेलनाचं! पाच राज्यातील ५८ जणांचा
सहभाग होता. पुण्यातून गेलेला मी एकटा होतो. एका ग्रुपवर या ‘बटरफ्लाय मीट’चा
फ्लायर येऊन धडकला होता. रजिस्ट्रेशन करून ठेवलं होतं. जितका सविस्तर परिचय देता
येईल तितका दिला होता. निवड व्हायला हवी होती ना. काही दिवसात एक ग्रुप जॉईन
करण्याचा मेसेज आला. भोरमदेव अभयारण्यातील तितली संमेलनासाठी माझी निवड झाली होती.
त्याहून योगायोग म्हणजे हे संमेलन २८ ते ३० सप्टेंबरमध्ये होणार होतं आणि माझ्या संस्थेच्या एका
कामानिमित्त मी २७ तारखेला जबलपूरमध्ये
असणार होतो. जबलपूर ते कवर्धा (तितलि संमेलनाचं ठिकाण) हे अंतर होतं २०० किलोमीटर. एका रात्रीचा प्रवास केवळ.
जबलपूर वरून
रात्री दहाची गाडी पकडली. ती पहाटे चार वाजता पोहोचणार होती. त्या जंगलातील
आडवाटेवरच्या त्या गावात चार वाजता पोहोचल्यावर पुढे काय करायचं असा एक मोठा
प्रश्न होता माझ्यासमोर. त्या ग्रुपवरील एकेका
अॅडमिनला फोन लावत बसलो. पहिल्याने उचलला नाही. दुसऱ्याने उचलला नाही. तिसऱ्याने
फोन घेतला. मी माझी कथा (व्यथा) त्याला सांगितली. त्यांचं नाव होतं गौरव. “सर आप
चिंता मत किजीए हम आपको लेने आयेंगे| बस तीन बजे कॉल करके जगा देना|” वा देवच पावला
होता मला. गाडी एक तास उशिरा पोहोचली. पण गौरवजी चार पासून माझी वाट बघत थांबले
होते. भेट झाल्यावर लक्षात आलं की हे तिशीतील एक तरुण व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्यासोबत गेस्ट
हाऊसवर गेलो. छान गप्पा झाल्या. गप्पातून समजलं की हे आहेत गौरव निहलानी.
फुलपाखरांचे गाढे अभ्यासक! गाढे म्हणजे यांची ४ पुस्तकं प्रकाशित आहेत आणि पाचवं पुस्तक
या संमेलनात प्रकाशित होणार आहे. मला फारच संकोचल्यासारखं झालं.
“अरे सर आपने
क्यू कष्ट उठाया? किसी और को भेज देते|”
“शिवराज जी आप इतना
दूर से आए है तो हमारा भी कुछ फर्ज बनता है| आप हमारे मेहमान हो|”
छान मैत्रीच झाली
आमची त्या रात्रीतील उरलेल्या दोन तासात. झोप अशी झालीच नाही. संमेलनाचं उद्घाटन अकरा
वाजता होतं. त्यामुळे गेस्ट हाऊस बाहेर गौरवसोबत फेरफटका मारला. त्या तासाभरात ५/६
प्रकारची फुलपाखरे त्यांनं दाखवली. इतकच नाही तर अंडी अवस्था वगळता फुलपाखराची सर्व
जीवनक्रम त्यांनं प्रत्यक्ष झाडावरच दाखवला. म्हणजे अळी अवस्था, कोष अवस्था, एक फाटलेला
कोश म्हणजे ज्यातून फुलपाखरू उडून गेलं आहे आणि...
‘अरे सर जल्दी आओ|”.
पळतच गौरव ज्या
झाडापाशी होता तिथे गेलो. एक फुलपाखरू कोशाला लटकलेलं होतं.
“यह देखो यह अभी-अभी
प्युपा से बाहर आया है| इसके पंख गीले है| पंख सुखने
के बाद यह तुरंत उड जाएगा|”
माझा जंगल ट्रेल
आत्ताच सुरू झाला होता. त्या दिवशी नावनोंदणी उद्घाटन वगैरे झाल्यावर कवर्धापासून
जवळच असणाऱ्या सरोधादादर हॉटेलमध्ये आमची
मुक्कामाची व्यवस्था होती. राहण्याच्या आणि खानपानाच्या व्यवस्था उत्कृष्ट होत्या.
तक्रारीला कुठे जागाच नव्हती. तसंही जंगल भटकंतीला आल्यावर तक्रार करायचीच नसते
म्हणा.
अखेर ती सकाळ
उजाडली. ठीक सात वाजता सगळं आवरून नाश्ता करून आपापले कॅमेरे, दुर्बिन घेऊन सगळे
सज्ज होते. आमचे एकूण ६ गट करण्यात आले होते. प्रत्येक गट दोन वेगवेगळ्या मार्गावर
जाणार होता. माझ्या गटात मी वगळता आणखी फक्त सहा जण होते. आमची ठिकाणं होती
केरपानी, चुहरी नाला. साधारण तासाभराच्या प्रवासानंतर आम्हाला बसमधून उतरवण्यात आलं.
आमच्या सोबत होते फॉरेस्ट गार्ड अमित कुमार आणि स्थानिक गावकरी प्रेमचंद. हातात
कुऱ्हाड घेऊनच प्रेमचंद आले होते.
आदल्या दिवशी
ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे सगळ्यांनाच आजच्या वातावरणाची धास्ती होती. पाऊस पडला
तर सगळाच कार्यक्रम आटोपणार होता. पण देवाची कृपा होती या संमेलानावर. आज आभाळ
स्वच्छ होतं. ऊनही लख्ख होतं. जंगलातल्या पायवाटेवर चालायला सुरुवात केली नाही
तोवरच विविध प्रकारची फुलपाखरं दिसायला लागली. आम्ही सात जण आठ दिशांना विभागलो गेलो.
एकेका फुलपाखराचा पाठलाग करायचा, ते स्थिर व्हायची वाट बघायची आणि मग सावकाश
त्याच्या जवळ जाऊन फोटो काढायचा प्रयत्न करायचा. आमच्यातील एकाकडेच डीएस्एल्आर
होता. त्याचं काम सोपं होतं. फुलपाखराला सुगावा लागू न देता लांबूनच फोटो काढता
येत होता त्याला. आम्हाला मात्र भरपूर तपश्चर्या करावी लागत होती. हालचाल हळू करायची, श्वासावर नियंत्रण ठेवायचं
आणि मग स्थिर थांबून फोटो काढायचा. त्यात या फुलपाखरांच्या नाना कळा. कुणी फुलावर बसल्यासारखं
करणार आणि लगेच उडणार. कोणी स्थिर बसणार पण पंखच उघडणार नाही. तर कोणी अगदी
बिनधास्तपणे आपल्याला जवळ येऊ देणार तर कोणी अगदी तुमच्या हातावरही येऊन बसणार.
पावसाच्या
शक्यतेने मी हॉटेल मालकाकडून छत्री घेतली होती. भलताच उपयोग झाला तिचा, पाऊस पडला
नाही तरी. तिचा आधार घेऊन पटकन खाली वाकून, बसून फोटो काढता आले मला. मनासारखा फोटो
घेऊन झाला की दुसऱ्या फुलपाखराच्या मागे लागायचो.
दोन तास होऊन गेले होते. ग्रेट एगफ्लाय, कमांडर, इमिग्रंट, बार्नेट, क्लीपर, ग्रास यलो इत्यादी इत्यादी प्रकारची एकावर एक सुंदर फुलपाखरे बघता आली होती. सगळ्यात मागे मीच असायचो. कुणाशी बोलणेच नको म्हणालो. जंगलातून चालताना जंगलाचा आवाज ऐकणं महत्त्वाचं. चहुबाजूने जंगल बोलत असतं. काहीबाही दाखवत असतं. तोंड बंद असेल तर नजर अधिक तीक्ष्ण होते आपली. अचानक माझ्या एका बाजूला थोडी हालचाल दिसली मला. चार वानरं दिसली. पण रंगाने पांढरट राखाडी. तोंड मात्र काळं आणि हातात आणि पायात जणू मोजे घातले आहेत असे वाटावे असा काळा रंग. दुसऱ्या बाजूलाही हालचाल जाणवली. तिकडेही वानरांची एक टोळी माझ्याकडे नजर रोखून होती. मी लांबवर मागे पुढे एकदा नजर टाकली. माझ्या नजरेच्या टप्प्यात माझ्या गटातील कोणीच दिसलं नाही. पुढे जाण्याची हिंमत झाली नाही माझी. माझ्या मागे प्रेमचंद होता हे माहित होतं मला. मग पीछे मूड करणंच पसंत केलं मी. प्रेमचंद दिसल्यावर हायसं वाटलं. “बाबा तिकडे आठ-दहा माकडं आहेत.” चुकून मराठीतच बोलून गेलो. ‘क्या सरजी?” प्रेमचंदचा प्रश्न. “अरे भाई वानर है उधर. आठ दस है|” “अरे सर जी घबराइए मत| वे हनुमान लंगूर है| कुछ नही करते| इन्सान को देख के भाग जाते है|”
नाव छान वाटलं. हनुमान
लंगुर! प्रेमचंद सोबत जाताना परत एकदा त्यांचं दर्शन झालं. आता मनात भीती नव्हती
त्यामुळे छान न्याहाळता आलं त्यांना. खरंच सुंदर वाटली ती. एका पिलानं एका मोठ्या वानराच्या डोक्यावर हात ठेवून मारलेली उडी तर अजूनही डोळ्यांसमोर आहे. रामदास
स्वामींनी दोन प्रकारच्या मारुतींची स्थापना केली होती. दास मारुती आणि वीर मारुती.
ही दास मारुती वाटली तर सह्याद्रीमधील वीर प्रकारची. कधी काय हिसकावून घेतील काहीच
भरोसा नाही.
साधारण तास दोन
तास चालल्यानंतर माझ्या बाबतीत एक गंमत घडायला लागली. कुठेही थोडा स्थिर थांबलो की
फुलपाखरं चक्क माझ्या बुटांवर येऊन बसायला लागली. माझ्याच बुटांना काय सोनं लागलंय
असा विचार करत होतो तेव्हा लक्षात आलं वाटेत छोटे छोटे ओढे, नाले लागले. बूट ओले होऊ नये म्हणून लोकांनी लांब उड्या
टाकत ते ओलांडले आणि मी मात्र मस्त त्यांच्यात पाय टाकून आलो. त्यामुळे बूट ओले
झाले, त्यांना माती
लागली. आणि तेच तर हवं होतं फुलपाखरांना. फुलपाखरांचा फोटो घेणं खूपच सोप्प झालं
होतं माझ्यासाठी.
एके ठिकाणी
प्रेमचंद अचानक थांबला. जमिनीवर काहीतरी बघू लागला. "क्या दिखा भाई?" मी विचारलं. "सर जी ये देखिए..." असं म्हणून
त्यांनं मला जे दाखवलं... चिखलामध्ये एकदम ठळक आणि भलामोठ्ठा पंजा उमटला होता.
ज्याला जंगलातलं ओ का ठो कळत नसेल त्यांनही तो बघितल्या बघितल्या विचारलं असतं 'शेर का पंजा है ना?' त्या पाऊलवाटेवर जिथं जिथं चिखल होता तिथं तो पंजा आम्हाला
दिसत गेला. म्हणजे साधारण दहाबारा तासापूर्वी साहेबांची स्वारी तिथून गेली होती
तर. वानर बघून भीती वाटली पण तो पंजा बघून ‘तो’ दिसतो की काय अशी हुरहूर वाटू
लागली. कदाचित आत्ताही त्यांनं आम्हाला बघितलेलं असण्याची शक्यता होती. तो
सगळ्यांना बघत असतो. तो आपल्याला दिसायला मात्र मोठ पुण्य गाठीशी असावं लागत. मुळात
कवर्धाचं हे जंगल कान्हा आणि भोरमदेव ही दोन अभयारण्यं जोडण्याचंच काम करतं.
त्यामुळे या भागातून एका जंगलातून दुसऱ्या जंगलात वाघांची ये – जा सुरु असते
म्हणे.
एका ठिकाणी आमची
सगळी मंडळी गठ्ठ्यान थांबली होती. एका बाजूला खड्डा होता आणि सगळ्यांच्या नजरा
त्या खड्ड्याकडे होत्या. तिथं पोहचल्यावर मी जे दृश्य बघितलं... त्या खड्ड्यात
बऱ्यापैकी चिखल झाला होता. त्यामुळे फुलपाखरांचा मड पुडलिंग सुरू होतं. साधारणपणे
३\४ प्रकारची ५०-६०फुलपाखर एकाच ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली. फुलपाखरांना विविध
प्रकारच्या खनिजांची आवश्यकता असते आणि ही खनिज ते ओल्या मातीतून घेत असतात.
त्यामुळे चिखलाच्या ठिकाणी ती बराच वेळ बसून राहतात. मस्त फोटो मिळाले तिथे
फुलपाखरांचे.
जरा दम लागल्याने
एका ठिकाणी झाडाला टेकून थांबलो. सर्व बाजूंनी घाम निथळत होता. आणि बहुधा त्या
घामाच्याच आकर्षणानं एक फुलपाखरू चक्क हातावर येऊन बसलं. हळू आवाजात इतरांना
बोलावून फोटो काढायला सांगितले. फोटो काढून झाल्यावर जेव्हा मी तो झूम करून बघितला
तेव्हा असं लक्षात आलं की त्याचं वेळी माझ्या दुसऱ्या हातावरही फुलपाखरू बसलं होतं.
पण माझं सगळं लक्ष एकाच हातावर केंद्रित झालं असल्याने ते दुर्लक्षित राहिलं.
फुलपाखराला कॅमेरात पकडणं खूप जिकिरीचं असतं. इथे तर ते दोन्ही हातावर येऊन पोज
देत होतं. सुख, आनंद, समाधान या सगळ्या शब्दांचे अर्थ चेहऱ्यावर स्पष्ट दिसत
असतील माझ्या तेव्हा.
तीन तास होऊन
गेले होते. पाय बोलायला लागले होते. उजव्या पायाची कुठली तरी एक नस जाम दुखत होती.
एकेक पाउल टाकणं जीवावर आलं होतं. पाठीवरची सॅकही आता जड वाटायला लागली होती.
‘प्रेमचंद भाई, अभी
नही हो रहा यार|”
“सर जी मै क्या
सहायता करू आपकी?”
याच प्रश्नाची
वाट बघत होतो. एवढी सॅक पकडशील का बाबा; असा प्रश्न विचारल्यासारखा जणू केला आणि
देऊनच टाकली त्याला सॅक. त्यांनंही लगेच ती खांद्यावर अडकून टाकली. आता जरा हायसं
वाटलं. पण तरीही तो शेवटचा तास जडच गेला. तीन साडेतीन तासात सुमारे आठ किलोमीटर
चाललो होतो आम्ही. एकदाचे जंगलातील चौकीवर पोहचलो आम्ही. पॅक लंच आधीच आलेलं होतं.
नियोजन पक्कं होतं या लोकांचं. सगळ्यांनी पटापट आपली थाळी उचलली आणि इकडे तिकडे न
बघता न बोलता फस्तही केली. तेव्हा कुठे जीवात जीव आला.
थोडा वेळ पाठ
टेकली असेल नसेल तोवरच अमित कुमार जी म्हणाले, "चलो तयार हो जाओ| चुहरी नाला जाना है|" तोंडावर गार
पाण्याचा सपकारा मारला. चहाची तल्लफ आली. “चाय के लिये ये समय अच्छा है, अमित सर|”
माझ्या सुराला सगळ्यांनीच होकार भरला. “ब्लॅक टी चलेगी क्या?” “दौडेगी सर|” चुलीवरचा
कडकडीत चहा पिल्यावर चालायची ताकद आल्याचा अनुभव आला सगळ्यांना. लगेच पायात बूट घातले आणि दुसऱ्या दिशेने आम्ही
चालायला सुरुवातही केली. यावेळी थोड आभाळ भरून आलं होतं. त्यामुळे फुलपाखरांची
हालचाल मंदावली होती. क्वचितच कुठेतरी उडताना दिसत होतं. वाटेत एक छोटसं तळ लागलं.
त्या तळ्याजवळून जाताना प्रत्येक पावलागणीक काठावरच्या एकेजा बेडकानं पाण्यात
टपाटप उडी घेतली.
फुलपाखरं कमी
दिसली पण असं निवांत जंगलातून चालण्याचं जे सुख आहे ते अनुभवल्यावरच समजतं. रात्री
हॉटेलवर गेल्यावर कडकडीत पाण्यान आंघोळ केली अन् जणू शरीर पूर्ववत झालं. जेवणाच्या
वेळी कोणी काय काय बघितलं याचीच चर्चा होती. एक गट भलताच जोशात होता. त्यांना जे
दिसलं होतं ते अन्य कोणालाच दिसलं नव्हतं. त्यांनी orange oakleaf पाहिलं होतं.
आमच्या निवास ठिकाणापासून केवळ ६ किमी अंतरावर. वन अधिकारी अंकित पांडे सरांकडे
सगळ्यांनी ‘आम्हालाही ते पाहायचंय’ असा लकडा लावला. “ठीक है जो सुबह ७ बजे तय्यार
रहेंगे उन्हे ले चलेंगे|” या
आश्वासनामुळे दोन घास जास्तच गेले जरा. छान जेवणानंतर गाढ झोप लागली.
कालचा दहा
किलोमीटरचा पायी प्रवास झाला होता. नाही म्हटलं तरी पाय थोडे बोलत होते. पण आज ओढ
होती त्या orange oakleaf बटरफ्लायची. त्याच्यासाठी दोन किलोमीटर तरी चालावं लागणार होतं.
सकाळी दोन गाड्यातून आम्हाला एका ठिकाणी उतरवण्यात आलं. पंधरा एक जण होतो आम्ही.
आज मात्र डोळ्यांना झापडं लावली. बिलकुल इकडे तिकडे न बघता चालायचं ठरवलं. आज सोबत
होता रुपचंद. त्यांनही हातात कुऱ्हाड घेतली होती.
“ये हमेशा साथ
रखते हो क्या?”
“हा, ये तो हमारी साथी
है| जंगल मे जाते समय साथ रखते है|”
सगळ्यांनीच झप झप पावलं टाकायला सुरुवात केली होती. साधारण अर्ध्या तासानंतर एका ठिकाणी पोहचल्यावर रुपचंद म्हणाला, “कल यही दिखी थी|” सगळ्यांच्या नजरा आसपासच्या झाडांवर भिरभीरु लागल्या. एका झाडावर ते दिसलं. ज्याला फुलपाखरू म्हणून दाखवलं ते फुलपाखरू आहे यावर विश्वास ठेवणं खूपच अवघड होतं. वाळलेल्या पानाचा आकार आणि रंग! हुबेहूब वाळकं पान. पंखाची टोकेही पानाच्या टोकासारखी आणि देठासारखी. अहो इतकेच नाही तर पंखावर बुरशीसारखे ठिपकेही दिसतात. Camouflage चं एक उत्नितम उदाहरण. निसर्गाचा अद्भुत नमुना आम्ही सगळे पहात होतो. धडाधड डीएस्एल्आरचा क्लिकक्लीकाट झाला. बाकीच्यांची मोबाईलमध्ये त्याला पकडण्याची धडपड सुरू झाली. फोटो काढण्याच्या भानगडीत एकाचा पाय सटकला आणि धाडदिशी कॅमेरासकट तो पडला. या हालचालींनं ते फुलपाखरू उडालं. सगळ्यांचे डोळे विस्फारले. बाहेरून वाळकं पान वाटणाऱ्या फुलाच्या आतील रंग केवळ अविश्वसनीय होते. तो पडलेला इसमही उठण्याची घाई न करता आहे त्या अवस्थेत फुलपाखरू बघत राहिला. पंखांची टोके काळी, त्याखाली केशरी छटा तर त्या खाली गडद मिला- तांबडा रंग! अहाहा!!. दिवस सार्थकी लागला होता आमचा. जिथे ते बसेल तिथे जाऊन फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला मग आमचा. एकानं सेल्फीस्टीक आणली होती. म्हटलं “दोस्त, मेरे मोबाइल मे फोटो दे इससे|” त्यानंही आढेवेढे न घेता लगेच स्टीकला मोबाईल लावला आणि फोटोसाठी ब्लूटूथच्या भानगडीत न पडता व्हिडिओच काढून दिला... और क्या चाहिये भाई!

orange oakleaf
च्या दर्शनाने परतीची पायपीट जणू हवेतूनच झाली. मन उंच उंच आकाशात होतं, त्यामुळे
पाय जमिनीवर टेकतच नव्हते. दुसरं काहीही बघण्याची इच्छा राहिली नव्हती किंवा
कुठेही नजर असली तरी ‘त्याचंच’ दर्शन घडत होतं.
हॉटेल वर येऊन
पटकन आवाराआवर केली. परतीच बुकिंग आधीच केलं होतं. ती वेळ गाठण आवश्यक होतं. खोलीतील
खिडकीचा पडदा सारून समोरचं दृश्य परत एकदा मनात भरून घेतलं. मंडळी मध्य भारतातील
जंगल गर्द हिरवं आहे. म्हणजे डोंगरांवर हिरवा रंग बदाबदा ओतला आहे असं वाटावं इतकं
गर्द. या हिरवाईचा आणि तिच्यावर विहरणाऱ्या रंगीबीरंगी दुनियेचा निरोप घेण्याची
वेळ झाली होती...
शिवराज पिंपुडे
ज्ञान प्रबोधिनी, निगडी
निसर्ग सेवक मासिकातून...
|
|
सुंदर निरीक्षण आणि अप्रतिम लेखन.
ReplyDeleteफुलपाखरांविषयीचा अनुभव पहिल्यांदाच वाचला.
हा अनुभव दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.