ज्ञान  प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील इ. ७ वीच्या विद्यार्थ्यांचं ग्रामीण जीवन परिचय शिबिर नुकतंच पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील वेल्हा गावातील ज्ञान प्रबोधिनीच्या सुसज्ज वास्तूत  संपन्न झालं. चार दिवस झालेल्या या शिबिरातील एका दिवसाचं अनुभव कथन या लेखातून आपल्याला वाचायला मिळेल. शैक्षणिक सहलींप्रमाणे शिबिर हेही अनुभव शिक्षणाचं एक महत्त्वपूर्ण साधन कसं आहे; हे या लेखातून ठळकपणे लक्षात येतं.

.........................................................................................

एक दिवस निवासी शिबिरातील... 

सकाळी सातच्या सुमारास आमचे १३० विद्यार्थी ८ गटांमध्ये उभे राहतच होते तोवर आठ मॅक्स गाड्या शिबिर स्थळी येऊन थडकल्या. लगेचच एकेका गाडी एकेक गट 'बसवण्यात' आला. ‘थोडाच(या शब्दावर जोर देत) प्रवास आहे रे. ऍडजेस्ट(या शब्दावर आघात देत) करून घ्या.’ अशी 'प्रेमळ' सूचना समाधानदादा प्रत्येक गाडीतील गटाला देत होते. मुले बसताच गाडी आपल्या नियोजित गावासाठी प्रस्थान करत होती. पासली, नाळवट, जाधववाडी, बालवड अशी एकूण ८ गावे निश्चित करण्यात आली होती.  आमचं गाव होतं कुसारपेठ. वेल्ह्यापासून साधारण २५ किलोमीटर अंतरावरचं. आमच्यासोबत त्याच गावातील वेल्ह्याच्या ज्ञान प्रबोधनीच्या वसतीगृहात राहून अकरावीत शिकणारी दिपाली होती. तिची मैत्रीणही अनिताही सोबत आली होती. आमच्याही गाडीला ग्रीन सिग्नल मिळाला आणि आम्ही मार्गस्थ झालो. सकाळची वेळ असल्याने हवेत छान गारवा होता. रस्ताही वळणावळणाचा आणि एकदम गुळगुळीत होता. कोवळ्या उन्हात शेतं बघत आनंददायी प्रवास सुरू होता आमचा. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. वळणावळणाचा रस्ता काही जणांना बाधला. कोणी मळमळत आहे असं म्हटलं की मलाच डचमळू लागतं. "पटकन खाली उतर बाबा. तरी सांगत होता गाडीत खाऊगल्ली सुरू करू नका म्हणून..." मी माझा तोंडाचा पट्टा चालवला.

मागे पडणाऱ्या प्रत्येक गावासरशी रस्ता आपले रुपडे बदलू लागला होता. सुरुवातीला गुळगुळीत रस्त्यावर खड्डे लागायला लागले. आणखी थोड्या वेळानं  खड्ड्यातच रस्ता आहे असं वाटायला लागलं. आणखी थोड्या वेळानं डांबर नावाचा प्रकारच गायब झाला. चक्क पायवाट लागली. इथवरही ठीक होतं. आणखी थोड्यावेळानं अक्षरशः दगडवाट लागली. म्हणजे इतकी खडतर की एके ठिकाणी मुलं उतरवली ड्रायव्हरकाकांनी आणि मगच गाडी चढू शकली आमची. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही काही गावांच्या नशिबी अशी दगडवाट आहे मंडळी.

दीड एक तास होऊन गेला होता. "किती वेळ राहिला गं?" मी दिपालीला विचारलं. "पोहचू दादा लवकरच. दादा आपल्याला वाटेत नवीनच बांधलेला बंधारा डोंगरावरून बघता येईल. तिथं उतरायचं का आपण थोडा वेळ?" "हो हो उतरू ताई." माझ्या ऐवजी मुलांनीच उत्तर दिलं. थोड्याच वेळात वरून पाणी दिसायला लागलं. सगळे गाडीतून खाली उतरले. वेळवंडी नदीच्या उगमापाशी बांधलेला हा बंधारा. आजूबाजूच्या डोंगरांवरील हिरवा रंगाच्या नाना छटा पाण्यातही उतरल्या होत्या. "मुलांनो जोरात आवाज देऊन बघा. प्रतिध्वनी ऐकू येईल बघा." दिपालीनं सुचवलं. लागलीच पोरांनी एकेकाच्या नावानं आरोळ्या द्यायला सुरुवात केली. ध्वनी प्रतिध्वनीचा हा खेळ बराच वेळ चालला. परत एकदा गाडीतून प्रवास सुरू झाला. सकाळी प्रवास सुरू केल्यापासून साधारण दोन तासांनी आम्ही कुसारपेठ गावात पोहोचलो होतो. गावाच्या नावाची पाटी रस्त्यावर बघायला मिळाली. आमची गाडी बघून गावातल्या दोन आजीबाई भेटायला आल्या. त्यांच्यासोबत त्या पाटीखाली थांबून एक ग्रुप फोटो झाला. एक कुत्र पण आलं त्या ग्रुप फोटोत. त्याच्या मानेला चांभार चुका असलेला पट्टा लावलेला होता. “कदाचित इथे जंगली जनावरांचा वावर असू शकेल मुलांनो...” त्या वैशिष्ट्यपूर्ण पट्ट्याचं मी स्पष्टीकरण केलं.

"दादा, आपण सगळे प्रथम देवीचं दर्शन घेऊ. नंतर आम्ही गावात जाऊन पोहरा आणि हंडे घेऊन येतो. कुणाला तरी नाश्ता करायला सांगतो. पाणी भरून झालं की आपण नाश्ता करू.” दिपालीनं पुढचं नियोजन सांगून टाकलं. आम्ही होकार भरला. देवीच्या दर्शनासाठी गवतातून वाट काढत आमची वारी निघाली.गावाबाहेर एका झाडाच्या सावलीत तांदळा प्रकारातील देवी दिसली. तांदळा म्हणजे शेंदूर फासलेला देव उघड्यावर झाडाखाली असतो; मंदिर नसतं. "ही आमची काळुबाई." दिपालीनं देवीचा परिचय करून दिला. "आज पूजा केली नाही का कोणी?" एकानं अचूक निरीक्षण करत प्रश्न विचारला. "रोज नाही होत पूजा. सणाच्या, उत्सवाच्या दिवशी पूजा होते. नवरात्रीत मोठा उत्साह असतो." दिपालीनं माहिती पुरवली. शेंदूर फासलेली काळुबाई झाडाखाली विसावली होती. देवीच्या भोवती गोलाकार आकारातील गवत काढलेलं होत. त्या गोलाला दगडांचा परीघ होता. झाडाला दोन घंटा टांगल्या होत्या. समोर तीन समया होत्या. समोरील दगडावर काही नाणी होती. बहुधा दसऱ्याला घातलेला हार देवीच्या गळ्यात तसाच होता. ‘मुलांनो, इथेच उपासना करू,’ असं म्हणून मी चपला काढून दगडाचा परीघ ओलांडून देवीच्या हद्दीत जाऊन बसलो. वाऱ्याची झुळूक अनुभवत छान उपासना झाली आमची.

अर्धा तास होऊन गेला होता. तरी या दोघींचा पत्ता नव्हता. मग परत एकदा आम्ही वस्तीवर जायला निघालो. या कुठल्या घरात गेल्या आहेत तेच माहिती नव्हतं. पण गावात पुष्पाताईंना भेटा असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.पुष्पा ताई प्रबोधिनीच्या बचत गटाचं काम या गावात करतात. मग त्यांचं घर विचारत गेलो. त्याच घरात या दोघी पोहे करायला पुष्पाताईंना मदत करत होत्या.मुलांना शाळेच्या (शाळा म्हणजे केवळ एक खोली) ओट्यावर बसायला सांगितलं. दोघांनी पोह्याचं पातेलं उचलून तिथेच आणलं. मस्तच झाले होते पोहे. चांगलाच ताव मारला मुलांनी पोह्यावर. मोठ्यांसाठी चहाही करून आणला पुष्पाताईने. सगळ्यांना आता तरतरी आली.

“आली का ताकद आता. चला आता पाणी शेंदायला.” दिपालीनं नियोजननुसार पुढची ऑर्डर काढली. तीन हंडे, एक टॉवेल, पोहरा असा लवाजमा घेऊन ती आली होती. बहुदा दुपारच्या जेवणासाठी जितकं पाणी लागणार आहे तितकं पुष्पाताईला भरून द्यायचं असं काही तिच्या मनात असावं. एकेकानं एकेक वस्तू ताब्यात घेतली आणि आमची वारी आता विहिरीच्या दिशेनं निघाली. साधारण पंधरा मिनिटे लागली विहिरीवर जायला. "ताई रोज इतक्या दुरून पाणी आणता?"  सुरजने विचारलं." "हो. सकाळ झाली की पहिलं हेच काम. ऊन डोक्यावर यायच्या आत पाणी भरायचं." विहीर चांगलीच मोठी होती. वरून कचरा जाऊ नये म्हणून तिच्यावर जाळी बसवण्यात आली होती. एकाच लक्ष विहिरीला लावलेल्या पाटीवर गेलं. "अरे यावर ज्ञान प्रबोधिनी लिहिलंय." मग विहिरी बांधायच्या प्रबोधिनीच्या कामाबद्दल मुलांना थोडी माहिती दिली. म्हणजे वेल्हा परिसरात प्रचंड पाऊस होतो. अनेक धरणं येथील पावसावर भरतात. पण छोट्या वस्त्यांना या पाण्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे नवीन विहिरी बांधणे, असलेल्या विहिरी अधिक खोल करणे, विहिरीतील गाळ काढणे अशी कामे प्रबोधिनीमार्फत केली जातात. या कामासाठी त्या त्या गावातील लोकांचा सहभाग घेतला जातो. लोकवर्गणी आणि गावकऱ्यांचे श्रमदान प्रबोधिनी अत्यंत महत्त्वाचे मानते.  कुसारपेठ गावातील विहिरीचं रहाट गंजून खराब झाल होतं. त्यामुळे पोहरा थेट पाण्यातच टाकून पाणी कसं काढायचं याच प्रात्यक्षिक अनितानं दाखवलं. चार-पाच जण वगळता बाकी मुलांनी प्रथमच विहिरीतून पाणी काढण्याचा अनुभव घेतला. मज्जा आली मुलांना. हंडे आधी घासून दिले अंकिताने. आणि मग पाणी काढायच्या इथे दिपाली मुलांसोबत थांबली.त्या भर उन्हात चालून, विहिरीतील पाणी काढून दमल्यावर विहिरीचं थंडगार पाणी मुलांना भलतंच गोड लागलं. हंडे भरून झाल्यावर सोबत आणलेल्या टॉवेलची चुंबळ कशी करायची हे दिपालीनं दाखवलं. मग एकान  ती चुंबळ डोक्यावर चढवून तिच्यावर हंडा घेतला. काही मिनिटातच तो त्याच्या डोक्यावरून खांद्यावर आणि मग खांद्यावरून थेट जमिनीवरच आला. या काही मिनिटात त्या हंड्यातील किमान १/४ पाणी त्याच्या कपड्यावर आणि काही जमिनीवर सांडलं होतं. हंडा घेऊन तो धडपडला नाही हे आमचं नशीबच. कमरेवर हंडा घेणे सोपे जाईल असं अनिताला वाटलं. तिने त्याचं एक प्रात्यक्षिकही करून दाखवलं. त्यानंतर मुलांनी कंबर बाहेर काढून त्यावर हंडा घेण्याच्या ज्या काही शारीरिक कवायती करून दाखवल्या त्या बघून हसून हसून वाट लागली आमची. हे एकाचं काम नाही असं लक्षात आलं माझ्या. मग चार चार जण एका हंड्यासाठी नेमून दिले. दोघा दोघांनी एकावेळी हंडा उचलायचा. दमले की पुढच्या दोघांना द्यायचा. २० ते २५ मिनिटे लागली पुष्पाताईच्या घरात ते हांडे पोहोचवायला आम्हाला. दुर्गम भागातील खडतर जगण्याचा एक धडा मुलांनी गिरवला होता. मुलांनी प्रत्यक्षच अनुभव घेतला असल्यानं  पाणी बचतीचं कोणतही प्रबोधन करायला गेलो नाही मी.

आमचा पुढचा कार्यक्रम होता पुष्पाताईचं शेत बघणं. ताईंच्या घरापासून थोडंसं अंतर चालून गेल्यावर जे दृश्य दिसलं त्यावर एका पठ्ठ्याची प्रतिक्रिया होती, ‘अरे ही तर माझ्या स्वप्नातील दुनिया!’ अरे वा शेतबीत आहे की याच्या मनातल्या दुनियेत, मी मनातच प्रतिक्रिया दिली. कारण तो खरंच हरखून गेला होता. पण दृश्यच तसं खास होतं. डोंगर उतारावरची शेती. त्यामुळे हिरवागार डोंगर. मध्येमध्ये वाळलेली मोठी झाड. अधेमध्ये काटक्या खोवून त्यांना लावलेली रंगीत कापडं, एका कोपऱ्यात बांधलेला मचाण. नजर हलत नव्हती त्या दृश्यावरून.

मग शेतीची अवजारं बघितली. कुऱ्हाड आणि टिकाव यातला फरक समजून घेतला. पहारीची दोन टोके वेगळ्या प्रकारची का असतात याचं छोटसं  प्रात्यक्षिकच गावडे सरांनी करून दाखवलं.मग गोठा बघितला. वासरांच्या गळ्यात पडून झालं पोरांचं. आजूबाजूला बागडणार्‍या कोंबडीच्या पिलांना पकडून झालं. कोंबडी पकडण्याच्या तुलनेत हे फारच सोपं होतं. 

शिबिरात नेमकं काय काय करू दिलं पाहिजे, कुठे आडकाठी केली पाहिजे हे आम्ही शिक्षकही हळूहळू शिकत गेलो. मी शिक्षक म्हणून काम सुरू केल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळातलं एक शिबिर मला आठवतं. (सुमारे २० वर्षांपूर्वीचं)  आमच्या सोबत भाऊ (कै. वा. ना. अभ्यंकर – ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचे केंद्रप्रमुख)  होते. शिबिर ठिकाणाजवळच एक गोठा होता. एके सकाळी गोठा बघून या म्हणून भाऊंनी सुचवलं. पोरांना घेऊन गोठा दाखवून आलो.आल्यावर भाऊंनी त्यांच्या सवयीप्रमाणे मुलांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यातले काही प्रश्न होते, ‘दूध काढण्याचा अनुभव घेतला की नाही कोणी?’ ‘गाईला चारापाणी केलं की नाही?’ पोरं एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागली. भाऊ काय समजायचं ते समजले. ‘अरे मग काय गोठा बघितला तुम्ही.’ हा टोमणा अर्थातच आम्हा शिक्षकांसाठी होता. तेव्हापासून शिबिरात जिथे कुठे पंचेद्रियांना अनुभव देणं शक्य असतं (बेडकापासून ते अगदी खेकड्यापर्यंत आणि (शेतातील तण काढण्यापासून ते शेणाने सारवण्यापर्यंत)  तिथं मी आडकाठी करत नाही. (अर्थात निर्णय मुलांचा असतो.) धोका नसला पाहिजे आणि शिक्षकाचं पूर्ण लक्ष असलं पाहिजे; ही मुलांच्या कृतीरूप सहभागाची दोन सूत्रं लक्षात घेऊ काय करू द्यायचं आणि कशाला नकार द्यायचा ते ठरवता येतं.

आता भूक लागली होती सगळ्यांनाच. जेवणही तयार झालं होतं. दिपाली आणि अंकिताने भाकऱ्या थापायलाही मदत केली होती पुष्पाताईला. मस्त पिठलं भाकरीचा बेत होता. पुष्पाताईच्या घरात बसून पोटभर जेवण केलं मुलांनी. त्यानिमित्ताने गावातल्या घराचाही अनुभव घेता आला.

जेवण झाल्यावर गावडे सरांना चहाची तल्लफ आली. “पोरांनो चहा करा की जरा,” त्यांनी इच्छा दर्शवली. काही उत्साही मुलांनी लगेच पुष्पाताईच्या स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. “ए तिकडे कुठं चालला? अंगणात बनवा चहा.” मी आदेश काढला. “म्हणजे?”. “अरे चूल लावा इथं.” मी त्यांचं शंकासमाधान केलं. दिपालीनं लगेच तीन खडे घेऊन त्यांची रचना करून दाखवली. मग दगड शोधून चूल लावली मुलांनी. आता ती पेटवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. जाळ कमी आणि धूर जास्ती असंच बराच वेळ चाललं होतं. डोळे चोळत चोळत का होईना पण चूल पेटवण्यात मुलं यशस्वी झाली. (ग्रामीण जीवनातील आणखी एक प्रश्न मुलं प्रत्यक्ष अनुभवत होती.) चुलीवर चहाचं भांड चढवण्यात आलं. चूल केवळ पेटवून भागत नाही ती पेटतीही ठेवावी लागते असं लवकरच मुलांच्या लक्षात आलं. “दिपाली फुंकणी दे की आणून.” इति गावडेदादा. ‘मला गावाकडचा अनुभव आहे,’ असं म्हणणाऱ्या एकानं ती ताब्यात घेतली. आणि अशी काही फुंकली की खालची निम्मी राख त्या भांड्यात जाऊन पडली.“गावडे सर, तुम्हीच प्या बाबा आता हा चहा.” मी पुटपुटलो. एकदाची उकळी आली चहाला. मुलांचं मन राखण्यासाठी चेहऱ्यावर कौतुकाचे भाव आणत घोटभर चहा पिलो आम्ही. मग परत एकदा पुष्पाताईच्या घरात नेऊन चुलीची रचना समजावून सांगितली दीपालीनं.

चार वाजता आठ गावात गेलेल्या सर्व गटांनी केळद गावातील देवराईत एकत्र जमायचं होतं. त्यामुळे कुसारपेठ गावाचा निरोप घ्यायची वेळ झाली होती. केळद गावात काही मुलामुलींचे  पालक शिबिराला भेट द्यायला आले होते. येताना सगळ्यांसाठी सफरचंदाची पेटी आणली होती त्यांनी. दिपालीला सफरचंद देताना मी म्हणालो, “दिपाली दिवसभराच्या तुझ्या कष्टांचं फळ दिलं बघ देवानं.” खूप हसली यावर अनिता. बाकी देवराई दर्शन छान झालं. १०० वर्षांपूर्वीच फणसाचं  झाड आणि त्याची आख्यायिका  (१९७२ च्या दुष्काळात या झाडाच्या  फळांचा  गावकऱ्याना आधार झाला म्हणे!) चांगलीच स्मरणात राहिली.

दिवसाचा शेवट मढेघाटावर होणार होता. केळद देवराईतून सर्वजण मढेघाटावर गेलो. नरवीर तानाजी मालुसरे यांचं पार्थिव या घाटातून नेण्यात आलं होतं तेव्हापासून नाव पडलं मढेघाट. मुलांचं नशीब जोरावर होतं. त्या परिसरात असणारी कारवी फुलली होती यंदा. सात वर्षांनी फुलणाऱ्या कारवीची टपोरी निळसर जांभळी फुलं बघायला मिळाली. मढेघाटावरून सूर्यास्त बघायचा होता. सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या. ‘आवाज फक्त निसर्गाचा असेल तुमचा नको मी कडक आवाजात सूचना केली.’ पण  नंतर लक्षात आलं सूचना देण्याची काहीच आवश्यकता नव्हती. वातावरणच असं होतं की थोडा वेळ दिला असता तर मुलं नि:शब्द झाली असती. आमच्या डावीकडे लक्ष्मी धबधबा कोसळत होता. त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. समोर सूर्य पाहता पाहता त्याचे रंग बदलत होता. त्यानुसार आकाशाचेही रूप बदलत होते. पक्ष्यांची परतण्याची लगबग सुरू होती. एका क्षणी सूर्य पूर्ण लालेलाल झाला आणि पुढच्या काही सेकंदात गुडूप झाला.

तासाभरात सर्व गट शिबिराच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचले. व्यवस्थित भूक लागली होती सगळ्यांनाच. वाढप करणारा गट मात्र हातपाय धुवून एकेक पदार्थ घेऊन वाढायला तयार झाला. जेवायला कितीही उशीर झाला असला आणि कितीही भूक लागली असली तरी वाढण्याचं काम करायला आवडतंच मुलांना. कसं वाढायचं, किती वाढायचं, कुठे वाढायचं याचे धडे या गटाला मिळतात. आज वांग्याची भाजी होती. काहींच्या नावडीची होती भाजी पण पर्याय नव्हता. शिबिरात मुलं खानपानविषयीही बरंच शिकतात. लागेल तेवढंच अन्न ताटात घ्यायचं. सगळे खाद्यपदार्थ पूर्ण संपवायचे. आवडनिवड विसरून जे बनवलं असेल ते खायचं. जेवण झालं की ताट विसळायचं. जेवायला बसलेली जागा स्वच्छ करायची. रोज दूध प्यायचं. (ते आवडीने पिलं जावं म्हणून समाधान दादा प्रत्येक शिबिरात केशर मिश्रित मसाला आवर्जून सोबत घेतात.) इत्यादी. इत्यादी.

आता वेळ झाली होती रात्रीच्या चर्चा सत्राची. आठही गटांची थोडक्यात निवेदने झाली. गटानुसार मुलांनी घेतलेल्या अनुभवात खूपच वैविध्य असल्याचं ऐकताना जाणवलं. कोणी खेकड्याची शेती बघितली होती, खेकड्याला हातात धरून उलटे पालटे करून नर मादी ओळखण्याचा प्रयत्न केला होता. कोणी लोहाराच्या भात्याच्या ठिणगीचा अनुभव घेतला होता. कोणी पोलीस पाटलाची तर कोणी अंगणवाडी ताईंची मुलाखत घेतली होती. कोणी प्राथमिक आरोग्य केंद्र बघितलं होतं. कोणी कोल्हापुरी बंधाऱ्याची रचना समजून घेतली होती. कोणी जुना वाडा बघितला होता. कोणी भाकऱ्या थापटण्याचा प्रयत्न केला होता तर कोणी चक्क मिरचीचा खर्डा बनवला होता. आमच्याच गटाला कशी सगळ्यात जास्त मजा आली हे सांगण्याची नकळत स्पर्धाच सुरु होती म्हणा ना. पण सगळे खुश होते एकदम,

निवेदनाच्या शेवटी शिबिर प्रमुख धुमाळ सरांनी दिवसभरात नव्यानं माहिती झालेल्या शब्दांविषयी विचारलं. या प्रश्नाच्या उत्तरादाखल फळ्यावर मोठीच यादी तयार झाली की. चुंबळ, पोहरा, वेसण, मढं, कासरा, खळं.... ही कृती शिबिरात आम्ही प्रथमच करून घेतली. याची कल्पना सुचवली होती सुवर्णाताईनी. आता कोण या सुवर्णाताई हे विचारू नका. त्यासाठी मला स्वतंत्र लेख लिहावा लागेल.  सुवर्णाताई - प्रबोधिनीच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या विभाग प्रमुख; सध्या इतकाच एका ओळीचा परिचय.

एव्हाना मुलांच्या जांभया सुरु झाल्या होत्या. आज मुलांना झोपवावे लागणार नाही याचे समाधान दाटून आले आम्हा शिक्षकांना. कारण  शिबिरात मुलांना झोपवणं हा एक मोठा कार्यक्रम असतो. असे एकत्र राहण्याचे क्षण फारसे येत नसल्याने मुलं या मिळालेल्या क्षणांचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. तोंडावर पांघरून घेऊन बोलणे, बंकबेड असतील तर वरच्यावर एका बेडवरून दुसऱ्या बेडवर शिवणापाणी खेळणे, मुद्दाम टॉर्च सुरू करणे असे सगळे उद्योग चालू असतात. थोडा वेळ तरी या गोष्टींकडे दुर्लक्षच केलं पाहिजे. सहनिवासाचा हाही आनंद घेऊ दिला पाहिजे मुलांना. एक मात्र खरं की झोपायला कितीही उशीर केला तरी ठरलेल्या वेळी आवरून तयार असतातच पठ्ठी. 

मुलांचा दिवस संपला असला तरी शिक्षकांची एक बैठक बाकी होती अजून. ही बैठक झाल्याशिवाय शिक्षकांचा दिनक्रम संपत नाही. दिवसभराचा आढावा आणि दुसऱ्या दिवशीच्या दिनक्रमाची उजळणी बैठकीत झाली.. “मग आज कोणती मुलं नव्यानं समजली?” बैठकीच्या शेवटी मी विचारलं. “आयुषचा मित्रांवर खूपच प्रभाव जाणवला...” “तनिष्का तिला सांगितलेलं कोणतंही काम जबादारीने पूर्ण करते...” “आर्या सगळ्यांशी छान जुळवून घेते...” “चिन्मय अनोळखी लोकांशी पुढाकार घेऊन बोलतो...” उदाहरणासह शिक्षक चार भिंतींच्या बाहेर त्यांना नव्यानं समजलेल्या मुलांविषयी भरभरून सांगत होते.

खुपचं मोठा वाटला आजचा दिवस. वेळेच्या दृष्टीनं आणि शिकण्याच्या दृष्टीनंही.

अशा शिबिरांमुळे मुलं आईबाबांपासून लांब राहायला शिकतात. स्वावलंबन  शिकतात. परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकतात. नवीन लोकांशी ओळखी करायला शिकतात. आजवर केवळ चित्रातून पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात पाहतात. सहनिवासाची मजा अनुभवतात. सहभोजनाचा आनंद घेतात. ग्रामीण जीवन अनुभवतात.

पण खरं सांगायचं तर या निमित्तानं ग्रामीण जीवनातील समस्या मुलांना जाणवाव्यात आणि त्या सोडवण्याची स्वप्नं त्यांच्या मनात रुजावीत हे अशी शिबिरं योजण्यामागचं प्रबोधिनीचं एक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट!


 

शिवराज पिंपुडे

 शिक्षण विभाग प्रमुख

ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र

 

Comments

  1. मस्तच अनुभवकथन ...अगदी प्रवाही ...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog