
रंग रंगुली सान सानुली... अखेर तो योग आला होता. खुद्द डॉ. मंदार दातार सर इयत्ता नववी दहावीतील निवडक विद्यार्थ्यांशी संवाद करत होते. निवडक म्हणजे ज्यांना जीवशास्त्र विषय आवडतो असे विद्यार्थी. होय तेच डॉ. मंदार दातार ज्यांची ७ पुस्तके प्रकाशित आहेत. ७० पेक्षा अधिक शोधनिबंध ज्यांच्या नावावर आहेत. आणि सात नवीन वनस्पतींचा शोध ज्यांनी लावला आहे. या व्याख्यानापूर्वी दहाच दिवस आधी वणव्यानंतर फुलणाऱ्या वनस्पतींचा शोध मंदार सरांनी लावल्याची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे त्यांना बघण्याची, ऐकण्याची उत्सुकता मुलांना होती, शिक्षकांना होती. आजच्या व्याख्यानाचा विषय होता वनस्पतींचे निरीक्षण आणि रानफुले. हा योग जुळून यायला तीन वर्ष पाठपुरावा सुरू होता आमचा . व्याख्यान मस्तच झालं. मुलांनी बरंच काही टिपलं. शिक्षक म्हणून एक प्रसंग मला खूपच भावला. मंदार सरांचं बालपण दुर्गम भागातलं. एक-दोन डोंगर पार केल्यावरच त्यांना शाळेत पोहोचता येत होतं इतकं दुर्गम. त्यांच्या विज्ञानाच्या शिक्षकांनी छोट्या मंदारसमोर एक आव्हान ठेवलं. रोज शाळेत येताना एक नवी वनस्पती घेऊन येण्याचं आव्हान! हा उपक्रम...