रंग रंगुली सान सानुली...



अखेर तो योग आला होता. खुद्द डॉ. मंदार दातार सर इयत्ता नववी दहावीतील निवडक विद्यार्थ्यांशी संवाद करत होते. निवडक म्हणजे ज्यांना जीवशास्त्र विषय आवडतो असे विद्यार्थी. होय तेच डॉ. मंदार दातार ज्यांची ७ पुस्तके प्रकाशित आहेत. ७० पेक्षा अधिक शोधनिबंध ज्यांच्या नावावर आहेत. आणि सात नवीन वनस्पतींचा शोध ज्यांनी लावला आहे. या व्याख्यानापूर्वी दहाच दिवस आधी वणव्यानंतर फुलणाऱ्या वनस्पतींचा शोध मंदार सरांनी लावल्याची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे त्यांना बघण्याची, ऐकण्याची उत्सुकता मुलांना होती, शिक्षकांना होती. आजच्या व्याख्यानाचा विषय होता वनस्पतींचे निरीक्षण आणि रानफुले. हा योग जुळून यायला तीन वर्ष पाठपुरावा सुरू होता आमचा. व्याख्यान मस्तच झालं. मुलांनी बरंच काही टिपलं. शिक्षक म्हणून एक प्रसंग मला खूपच भावला. मंदार सरांचं बालपण दुर्गम भागातलं. एक-दोन डोंगर पार केल्यावरच त्यांना शाळेत पोहोचता येत होतं इतकं दुर्गम. त्यांच्या विज्ञानाच्या शिक्षकांनी छोट्या मंदारसमोर एक आव्हान ठेवलं. रोज शाळेत येताना एक नवी वनस्पती घेऊन येण्याचं आव्हान! हा उपक्रम भलताच आवडला मंदारला. अगदी काटेकोरपणे त्यानं शिक्षकांच्या आज्ञेचं पालन केलं. शिक्षकांना वनस्पती दाखवल्यावर त्या वनस्पतीचा नमुना एका वहीत चिकटवण्याचा उपक्रमही केला मंदारने. ती वही अजूनही जपून ठेवली असल्याचं त्यांनी सांगितलं. वनस्पतीशास्त्रज्ञ होण्यातील पहिली पायरी त्या शिक्षकांमुळे ते चढले होते.

व्याख्यानात रानफुलांचे दाखवलेले फोटो मुलांना फारच आवडले. नेहमीप्रमाणे व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे झाली. एकानं विचारलं, "लाजाळूची पानं स्पर्श झाल्यावर पटकन मिटण्याचा जो प्रतिसाद देतात तर इतकी एनर्जी ते झाड कुठून आणतं?" विशेष वाटला मला हा प्रश्न. शाळेच्या गच्ची बागेत लाजाळू आहे. जेव्हा केव्हा बागेत जातो तेव्हा त्याला हात लावतोच मी. पण एकदाही हा प्रश्न मला का पडला नाही असं झालं मला. 

 आता सर्वांनाच वेध लागले होते पुढील आठवड्यात जाणाऱ्या रानफुले अभ्यास सहलीचे! कास पठारावर सात वर्षांनी फुलणारी कारवी फुलल्याची बातमी व्हायरल झाली होती. पण आमचं ठिकाण होतं सज्जनगड रस्त्यावरील चाळकेवाडी. तरी एकदा मंदार सरांना विचारून ठिकाणाची खात्री करून घेतली. “नका जाऊ कासला. चाळकेवाडीत निवांतपणा मिळेल तुम्हाला. छान निरीक्षणे नोंदवता येतील.” या उत्तरानं मनातील द्विधा अवस्था संपली होती. रानफुले दाखवण्यासाठी येणार होते भूषण शिगवण. वनस्पती शास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेऊन Ph.D. प्रबंधही सादर करून झाला आहे यांचा. यांचे Ph.D चे मार्गदर्शक डॉ. मंदार दातार सरच. जंगल, पठारे, कड्यांवरील वनस्पती हे भूषण दादांचे अभ्यासाचे, आवडीचे विषय. १४ शोधनिबंध यांच्या नावावर आहेत. एका नवीन वनस्पती शोधातही यांचा सहभाग होता. थोडक्यात काय मंदार सरांचा शिष्य शोभेल असं आजवरचं कर्तृत्व!

रानफुले आली म्हणजे कीटक आलेच. त्यामुळे एक कीटक तज्ञही सोबत असावा असं खूप वाटत होतं. करोनाच्या काळात कीटकांविषयी ऑनलाईन संवाद साधलेल्या राहुल मराठे सरांना संपर्क केला. त्यांनी एक नाव सुचवलं - इशान पहाडे. केवळ २७ वर्षाचा युवक. कीटकशास्त्र हा त्याच्या पदवीचा विषय. फोरेन्सिक विज्ञान आणि कीटकशास्त्र यातील डिप्लोमाही केलाय यानं. एका संस्थेची स्थापना करून अनेकांना कीटकांचं वेड लावायचं काम करतो हा पठ्ठ्या.

“इशानजी येणार का सहलीला?”

“हो सर, आवडेल की.”

लगेच भूषणलाही कळवलं की ईशान पण येतोय म्हणून. त्याची काय प्रतिक्रिया असणार अशी जरा चिंताच होती. पण ‘अरे वा! आम्ही छान मित्र आहोत. आणि हो दोघेही मंदार सरांचेच विद्यार्थी आहोत.’ भूषणने msg करून कळवलं. मी निर्धास्त होतो आता.

जीवशास्त्र अभिरुचीच्या प्रमुख असणाऱ्या पद्मजाताई थिटे यांच्या नेतृत्वाखाली  दुसऱ्या दिवशी ठीक सात वाजता निघालो आम्ही. नववी-दहावीचे २९ विद्यार्थी, ४ अध्यापक आणि एक पालक प्रतिनिधी. नवले ब्रिजच्या इथून आमचे दोन तज्ञ गाडीत आले. दोन तज्ञांना सोबत घेऊन सहल काढण्याचा माझाही हा पहिलाच अनुभव होता. पद्मजाताईंनी गाडीत दोघांचाही परिचय करून दिला. मग एकेकाच्या गप्पा झाल्या मुलांशी. आपण काय काय पाहायचं आहे? कसं पाहायचं आहे? इत्यादी. इत्यादी. कीटकांविषयी आधी व्याख्यान न झाल्यानं ईशानने सविस्तर संवाद करावा असं सुचवलं त्याला. सुरुवात त्यानं एका प्रश्नानं केली. “तुम्हाला कोणते किडे बघायला आवडतात मुलांनो?” आजवर असा प्रश्न मला कोणी विचारला नव्हता आणि मी माझ्या आयुष्यात कोणाला विचारला नव्हता. एक उत्तर लगेचच माझ्याही मनात आलं. मुलांनीही ते लगेचच दिलं.

“फुलपाखरु.”

“आणखी?” ईशानने मुलांना प्रोत्साहन दिलं.

तनिष्काने उत्तर दिलं, “काजवा!”

‘खरंच की.’ (माझा मनातील प्रतिसाद.)

ईशानने चांगला सविस्तर संवाद साधला. कीटकांचा जीवनक्रम, त्यांची शरीररचना, त्यांचे प्रकार, त्यांच्या वर्गीकरणाची पद्धत... अशी बरीच चर्चा केली ईशानने. 'फोरेन्सिक विज्ञान आणि कीटकशास्त्र यांचा काय सहसंबध?' पोरांनी विचारलं. ईशानचं उत्तर... "तुम्हाला २-३ उदाहरणे सांगतो मी. जेव्हा जंगलात एखादी डेड बॉडी सापडते तेव्हा ती किती दिवसांपूर्वची आहे हे ओळखण्यासाठी कीटकांचा उपयोग होतो.  (सगळ्यांचेच डोळे मोठ्ठे झाले आणि कान टवकारले गेले.) बॉडीच्या ओपनींगमध्ये (सगळ्यांच्या कपाळावर आठ्या... त्या बघून...) म्हणजे उघड्या अवयवांमध्ये उदाहरणार्थ तोंड उघडे असेल तर किंवा कान, नाक यात maggot, flies, bees अशा प्रकारचे कीटक अंडी घालतात. कीटकांच्या प्रकारानुसार काही तासांनी किंवा काही दिवसांनी ती अंडी फुटून त्यातून अळ्या बाहेर येतात. मग त्या अळीचा आकार बघून ते प्रेत किती दिवसापूर्वीचं आहे हे शोधून काढता येतं. कारण कोणत्या अळीची अंडी किती दिवसांनी फुटतात आणि प्रत्येक दिवशी अळीचा आकार साधारण किती वाढत जातो या सगळ्याचा अभ्यास करून ठेवण्यात आलाय मुलांनो."

'देवा....' (सगळ्यांच्या मनातील प्रतिसाद.)
अशी आणखी दोन-तीन प्रकारची उदाहरणं सांगितली ईशानने. आता या असल्या कथा पोरांना आवडणार नाही तर दुसरे काय होणार?

त्यानंतर दोघाही तज्ञांना मुलांचा गराडा पडला. अनौपचारिक गप्पा, प्रश्नोत्तरे सुरू झाली. त्यात ईशानने फॉरेन्सिकचा अभ्यास केल्यानं मुलांना या विषयातील जाणून घेण्याची भलतीच उत्सुकता दिसली.

प्रवासात श्रावणातील पावसाची ये-जा सुरू होती. एके ठिकाणी गाडी थांबवून गाडीतच नाष्टा केला. बाहेर बसण्यासाठी कोरडी जागाच नव्हती. साधारण अकराच्या सुमारास चाळकेवाडी परिसरात पोहोचलो आम्ही. खिडकीतूनच टोपली कारवी दिसायला लागली होती. पालथ्या घातलेल्या टोपल्यासारखा आकार म्हणून नाव टोपली कारवी. कारवीला ७ वर्षांनी फुले येतात म्हणे. इथे मात्र केवळ हिरवे गुच्छच होते. पण ते दाट पुंजके पाहणेही मोठं आनंददायी होतं.

“सर, आधी इथे उतरून काही निरीक्षणं करू. मग पुढे जाऊ.” भूषणने गाडी थांबवली. रिमझिम पाऊस सुरूच होता. त्यामुळे रेनकोट घालूनच उतरायला सांगितलं. “मुलांनो, पायाखाली बघतच चाला. ‘काहीही’ असू शकतं.” काहीही शब्दावर मी जरा जोर दिला. ईशान आणि भूषणला एकत्र थांबायला सांगितलं. “दोघे दोन दिशांना वेगवेगळं काही दाखवत आहात असं शक्यतो नको मित्रांनो. सगळ्यांना सगळं बघायला, ऐकायला मिळायला हवं.” जिथे उतरलो ती जागा आहे फुलांनी गच्च भरलेली नक्कीच नव्हती. “इथे का उतरलोय आपण भूषण?”

“सर, इथे आठ नऊ प्रकारची फुले सहज बघायला मिळतील.”

मग भूषणची  नजर फुलांना तर ईशानची  नजर कीटकांना शोधू लागली. खरंतर कीटक शब्द वापरणं चूक ठरेल. हालचाल करणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना शोधू लागली.

भूषणने एके ठिकाणी मुलांना बोलावून घेतले. “इकडे बघा मुलांनो...” ‘इथली जमीन तुम्हाला कशी दिसततीये?’ ‘माती कशी वाटतीये?’ ‘खडकाचा रंग कसा दिसतोय?’ असे बरेच प्रश्न विचारले त्याने. मग उत्तरादाखल भूषणनेच जांभा दगड, त्याची वैशिष्ट्ये, प्रदेशनिष्ठ वनस्पती इत्यादी इत्यादी उलगडून सांगितलं. भूषणने रानफुले निरीक्षणाची सुरुवात ‘दीपकाडी’पासून केली.



“काय काय निरीक्षणं नोंदवाल तुम्ही या वनस्पतीची?” भूषणचा प्रश्न.

“एकच दांडी वर आली आहे.”

“दांडीला एकाच बाजूने फुले आहेत.”

“जमिनीलगत काही दांड्या आडव्या दिसत आहेत.”

मुलांनी झटझट प्रतिसाद नोंदवले.

“छान. छान मुलांनो. जमिनीलगत तुम्हाला जे दिसत आहे ती या वनस्पतीची पाने आहेत. कशासारखी वाटत आहेत ती? त्यांना बघून काही आठवतय का?”

“हो. हो. कांद्याच्या पातीसारखी वाटतायेत.”

“व्वा! फक्त ही सरळ नसून थोडी कर्व्ह झालेली आहेत. फुलांची अजून काही वैशिष्ट्यं जाणवत आहेत का?”

या प्रश्नावर थोडी शांतता.

“किती पाकळ्या दिसत आहेत?” प्रश्न सोपा केला भूषणने.

“तीन.” अनेकांनी एकाच वेळी प्रतिसाद दिला.

“मग आता मला सांगा तीन-तीन पाकळ्यांच्या रचनेत कोणत्या प्रकारच्या वनस्पतींना फुले येतात?”

परत एकदा शांतता.

“एकदल वनस्पतींना.” अध्यापिका स्मिताताईंनी उत्तर दिलं.

“बरोबर. या फुलांचा आकार कंदिलासारखा दिसतोय बघा. एका काडीवर जणू दिवे ठेवल्यासारखे वाटत असल्यानं हीचं नाव दीपकाडी! हा एक प्रकारचा कंद आहे.”

भूषणचं बोलणं संपत नाही तोवरच मागच्या बाजूला मुलांचा गलका सुरू झाला. ईशानने हातात काहीतरी पकडून आणलं होतं. मी ही पटकन बघायला गेलो. साधा ग्रासहुपर होता तो. ‘हा काय आमच्या घराच्या, शाळेच्या बागेतही दिसतो की.’ (माझा मनातील प्रतिसाद.) मग ईशान बोलू लागला... काय काय वैशिष्ट्यं दिसतायेत याची? लांबी किती असेल याची? हिरवाच रंग का असेल? मागचे पाय आणि पुढचे पाय यात काही फरक वाटतोय का? असे बरेच प्रश्न विचारले त्याने. स्मिताताईंनी पटकन चार-पाच भिंग काढून मुलांना दिली. काहींनी भिंगातून बघत उत्तरं द्यायला सुरुवात केली.

“दादा याच्या पायांना दाते असल्यासारखं वाटतय.” एकानं निरीक्षण नोंदवलं.

“अगदी बरोबर. याचा जो आवाज येतो तो तोंडाने येणारा नसून हा जेव्हा याचे मागचे पाय एकमेकांना तो घासतो त्यावेळी होणारा आवाज असतो तो.”

आता मीही पटकन एकाकडून भिंग जवळजवळ हिसकावूनच घेतलं. ‘शाळेच्या बागेत दिसणारा कीटक,’ हा प्रतिसाद विरला होता माझा.

“याच्या मागच्या पायांची लांबी साधारण त्याच्या शरीराइतकीच असते. उड्या मारण्यासाठी ते पाय मोठे असतात. डोळे संयुक्त प्रकारचे असतात. म्हणजे एका डोळ्यात ५० ते २०० डोळे.”

सगळंच नवल वाटत होतं. नाकतोडा प्रकरण झाल्यावर परत एकदा भूषणने फुले दाखवण्यास सुरुवात केली. दातेरी तेरडा, गुलाबी तेरडा, सोनकी, सीतेची आसव, (फुलाचेच नाव आहे हे.) आषाढ आम्री, टूथ ब्रश ऑर्किड (काय पण नावे असतात ना.) इत्यादी इत्यादी. प्रत्येक फुलाची कथा सांगायचा कंटाळा केला नाही भूषणने.

 “एक तरी कारवीचं फूल दाखव बाबा.”  भूषणच्या मागे माझा लकडा सुरूच होता. या भागातील कारवी यावर्षी फुलणार नव्हती. (कास पठारावरची फुलली होती.) एक मात्र खरं गाडीतून बघताना इथे इतक्या प्रकारची फुले दडलेली असतील असं नक्कीच वाटलं नव्हतं.

एके ठिकाणी मला कारवीच्या झाडात थोडी हालचाल दिसली. ईशानला हाक मारली. त्यांनं अलगद कारवीची पानं बाजूला केली. सरडा होता तो. अगदी शांत, स्थिर थांबला होता. शहरात सरडा दिसणं वेगळं आणि सहलीत त्याचं निरीक्षण करणं वेगळं. पटकन सगळ्या मुलांना बोलावलं.



“बोला याची काय काय वैशिष्ट्ये दिसतायत तुम्हाला?” ईशानने विचारलं.

“पाठीवरून दोन रेषा गेल्या आहेत.”

“त्या दोन रेषांच्या मध्ये षटकोनी आकाराचं डिझाईन दिसतंय.”

“शेपटी शरीराइतकीच मोठी वाटतीये.”

“बरोबर. डोकं कसं दिसतंय याचं?” - ईशान

“त्रिकोणी.”

“आणखी कोणाचं असत असं डोकं?” - ईशान  

“सापाचं.”

“अगदी बरोबर. म्हणजे सरड्यांनं सापाची मिमिक्री केली आहे बघा. त्याच्या शत्रूने जर त्याला समोरून बघितलं तर डोक्याच्या आकारामुळे त्याला सरडा साप वाटू शकतो.” – ईशान

अरे बापरे असं पण असतं का? केमोफ्लॅज विषयी माहीत होतं. मिमिक्रीची भानगड मी तरी प्रथमच ऐकत होतो.

ईशांनच बोलणं पूर होत नाही तोवरच भूषणने हाक मारली. “या इकडे सगळे. तुम्हाला कारवीची फुलं बघायची होती ना. या बघा.”



पळतच सुटले सगळे. “सावकाश रे. निसरड आहे खाली.” असं श्वेतलताईंचं वाक्य हवेत विरण्यापूर्वीच एक जण चांगलाच सटकला. रेनकोटमुळे कपडे भरण्यापासून वाचले होते. पण शेक चांगलाच बसला त्याला. त्याच्यामुळे माझ्यासकट त्याच्यामागचे सगळेच शहाणे झाले. जपून चालू लागले. समोरच दृश्य मन प्रसन्न करणारं होतं. तीन-चार कारवीच्या वनस्पतींना फुलं लागली होती. जांभळ्या रंगाची टपोरी फुलं वाऱ्यावर मस्त डोलत होती.

निसर्ग नावाचा एक विद्यार्थी सहलीत होता. त्याचं स्वतःचंच काही निरीक्षण चालू होतं. आत्तापर्यंत दोन तज्ञ काहीतरी शोधून आम्हाला बोलावत होते. पण यावेळी निसर्गने हाक दिली. “ईशानदादा इथल्या डबक्यात काही किडे दिसतायेत,” मग सगळ्यांची वारी त्या डबक्याच्या दिशेनं निघाली. निसर्गने त्याच्या ओंजळीत त्या डबक्यातील एक किडा घेतला. दुसरा एक जण लगेच त्याच्या ओंजळीतून निसर्गच्या ओंजळीत पाणी टाकू लागला. ओंजळीतील पाणी कमी नको व्हायला म्हणून. ‘निसर्गाची हानी नाही,’ ही सूचना पक्की लक्षात घेतली होती मुलांनी. ओंजळीत घेतल्याने त्या किड्याचं खूपच छान निरीक्षण करता आलं. “अरे हा तर वल्हव मारल्यासारखा पोहतोय.” अगदीच अचूक होतं हे निरीक्षण. म्हणून याचं नाव वॉटर बोटमॅन म्हणे.

“ए तो बघ बेडूक,” सौम्या ओरडली.

जणू काय आपल्याच पायाखाली बेडूक असल्यासारखं ‘कुठे?’ ‘कुठे?’ करत अनेक मुलींनी जागेवरच उड्या मारल्या. विशेषच होता हा बेडूक. याच्या पाठीच्या बरोबर मधून एक रेषा गेली होती. ती फ्लोरोसंट रंगाची होती. पाण्यात ती जास्तच लकाकत होती. त्यामुळे लोभस वाटला तो बेडूक.

“याचं नाव कॉमन बुल फ्रॉग. ”  ईशानने माहिती पुरवली.

मग बेडूकपुराण झालं.

“चला आता गाडीतून पुढे जाऊयात सर.” भूषणने आज्ञा केली.

परत एकदा सगळे गाडीत बसले. आणखी काही अंतर गेल्यावर गाडी थांबवण्यात आली.

“आता इथून देवराईपर्यंत चालत जाऊयात. वाटेत बरंच काही दिसू शकेल.” भूषणने पुढचा प्लॅन सांगितला.

“आधी जेवण करूयात ना?” स्मिताताईंनी मुलांची वकिली केली.

रिमझिम पावसात रेनकोट घालूनच जेवणाचा कार्यक्रम पार पडला. समोरच छोटंसं तळं होतं. त्यातच हात धुतला मुलांनी. वारा चांगलाच सुटला होता. भणाणता वारा काय असतो ते जाणवत होतं. त्यात कानांना रेनकोटची टोपी असल्यानं तिची फडफड वाऱ्याच्या वेगाचा अंदाज देत होती. पायवाटेनं देवराईच्या दिशेनं आम्ही चालायला सुरुवात केली. खऱ्या अर्थानं हा नेचर वॉक होता. एका पाणथळ जागी भूषणने सगळ्यांना एकत्र केलं. पांढऱ्या रंगाची गोल गोल आकाराची अनेक फुलं होती तिथं. त्यांच्या मध्ये मध्ये  गुलाबी रंगाचे तुरेही दिसत होते. ती पांढरी फुले म्हणजे पान गेंद आणि ते तुरे म्हणजे Rotala म्हणे.



या पायी प्रवासात स्पायडर ऑर्किड (फूल बघा मग या नावाचा अर्थ लागेल.), मश्रूम, नभाळी, तुतारी (होय होय फुले बघितल्यावर हे नाव का ते समजेल.), धोतरा,  दातपडी वनस्पती, नरक्याचे झाड, खडकारील दगडफूल, मॉस असं सगळं दाखवलं भूषणने.

“सर, तो ओढा ओलांडून त्या झाडापाशी गेल्यावर देवराई दिसेल.” भूषणने इच्छित स्थळ आल्याचं सांगितलं.

ओढ्यामुळे आजूबाजूला काही डबकी तयार झाली होती. निसर्ग ओढ्याच्या दिशेने न येता डबक्याकडे गेला. त्याचा अंदाज बरोबर ठरला होता. त्या डबक्यात त्याला काही किडे दिसले आणि मगाशी बघितले त्यापेक्षा ते वेगळे होते. परत एकदा ईशानला निमंत्रण धाडण्यात आलं.

“अरे हे वॉटर स्ट्रायडर आहेत. यांचे केवळ पाय पाण्यावर आहेत. बाकी सगळं शरीर पाण्याच्यावर आहे. आणि यांची हालचाल बघा खूप जलद आणि वेडीवाकडी आहे. त्यामुळे शत्रू कन्फ्युज होतो यांचा.”

“हे पावसळ्यात दिसतात पण इतर वेळी कुठे असतात हे?” निसर्गने विचारलं. (उत्तर वाचकांनी अभ्यास करून शोधावं.)  

आता सगळे ओढा पार करून भूषणच्या जवळ पोहोचले होते. तिथून दिसणारं खालचं दृश्य थक्क करणारं होतं. मी प्रथमच अशा टॉप व्ह्यूने एखादी देवराई बघत होतो. केवळ दाटी होती झाडांची. जणू काही त्या तेवढ्याच भागात हिरवा रंग अक्षरशः ओतला होता कोणी. ‘पुढच्या वेळी केवळ देवराई बघायलाच येऊ,’ असं आश्वासन देऊन त्या दृश्यातून बाहेर काढलं मुलांना.

“दादा, थोडा वेळ पाण्यात पाय टाकून बसू का?” तीन-चार मुलींनी विचारलं.

“जरूर.” माझा प्रतिसाद.

लागलीच त्या मुली बूट काढून पाण्यात पाय टाकून बसल्या. मलाही मग मोह आवरला नाही. अनवाणी पायांना पाण्याचा स्पर्श सुखावत होता. वारा सुसाट होता. त्यामुळे पाण्यावरही तरंग उमटत होते. त्यांची दिशा आमच्याच बाजूने होती. त्याचवेळी हलका पाऊस सुरु झाला. रेनकोट टोपीमुळे पावसांच्या थेंबांचा बारीक ताशा कानात वाजू लागला होता... असे काही निवांत क्षण हवेतच की सहलीत.

वेळ पुढे पुढे सरकत होती. ‘पीछे मूड’ करून देवराईपासून गाडीपर्यंतचा पायी प्रवास सुरू केला आम्ही. चालण्याच्या कमीजास्ती वेगामुळे चार-पाच गट पडले होते मुलांचे. अर्थातच मी सर्वात मागच्या गटात होतो. पुढे जाऊन एके ठिकाणी सगळे जण थांबले होते. ईशानदादाचा धावा सुरू होता. त्या मुलांना काहीतरी दिसलं होतं. मीही पळतच पोहोचलो. एक चॉकलेटची गोळी वाटावी असं काहीतरी रस्त्यात पडलं होतं.



“अरे हे तर सेंटीपीड. त्याला धोका जाणवल्यानं त्यांनं असं वेटोळं करून घेतलंय.”

फारच सुंदर दिसत होता हा प्रकार. अनेकांनी हातात घेऊन पाहिला अगदी.

“दादा याला घेऊन जायचं का आपल्या प्रयोगशाळेत? प्रीझर्व करून ठेवू.” एका विज्ञान शिक्षिकेनं सुचवलं. पण माझ्या नजरेतील भाव बघून,  “सोडा रे त्याला त्या गवतात.” असं त्यांनीच फर्मावलं. मुलांनी अलगद त्याला गवतात ठेवून दिलं. तो वेटोळं सोडून कधी परत एकदा त्याची चाल सुरू करतो असं निरीक्षण करता आलं असतं; पण तितका वेळ नव्हता आमच्याकडे. दिवसभरात बग दिसले. बीटल दिसले. दोघातील फरक समजला. गोगलगाय, मिलीपीड, सुरवंट, मधमाशी, दिवसा आराम करणारा पतंग, रातकिडा, खेकडा, कोळी, गप्पी मासा असं बरंच काही दिसलं प्राणी विश्वातलं.

          थोडं पुढे गेल्यावर एके ठिकाणी भूषणने सगळ्यांना एकत्र केलं. ‘मगाशी इथून जाताना कसं काय लक्ष गेलं नाही माझं.’ स्वतःशीच पुटपुटला तो.

“कोणाला टॅटयू काढून घ्यायचा आहे का?”

कोणालाच काहीच अर्थबोध झाला नाही.

“मुलांनो हे सिल्व्हर फर्न.”

असं म्हणून त्यानं त्या झाडाचं एक पान तोडलं. मागून एकदम चंदेरी होतं ते. एका मुलाला पुढे बोलावून त्याच्या हातावर त्याचा शिक्का उमटवला भूषणने. फारच सुंदर नक्षीकाम होतं ते. जाम खुश झाली मुले. या झाडाची काही पाने तोडली गेली मग. मीही जरा डोळेझाकच केली.

फुले, कीटक बघताना निसर्गाची किमया मुलं अनुभवत होतीच पण या सिल्व्हर फर्नममुळे सहलीचा चंदेरी ठसा मुलांच्या मनावर कायमचा कोरला गेला...



थोड्याच वेळात गाडीजवळ पोहचलो आम्ही. परतीचा प्रवास सुरु करण्याची वेळ झाली होती.

.......................

एकाड एक वर्ष रानफुले दाखवण्याच्या सहली योजत राहिलो आम्ही. एक-दोनदा कास पठारावरही नेलं मुलांना. एका कास सहलीतील एक अनुभव...

प्रवेशद्वार तीनपाशी तिकीट काढलं. तिथूनच फुलांचं एक पुस्तकही विकत घेतलं. हातातच ठेवलं ते. आमचे गाईड होते चंद्रकांतदादा. “चंद्रकांतजी जितकं दाखवता येईल तितकं दाखवा आमच्या मुलांना. बिलकुल घाई करू नका.” माझ्यायील शिक्षकानं  लगेच एक सूचना करून टाकली. पंद, अबोलीमा, निलकेणी, चावर, आभाळी... एकसे बढकर एक फुलं बघायला मिळाली. एका जागेवर पोहचल्यावर, “तुमचं नशीब असेलं तर तुम्हाला इथं एक वनस्पती बघायला मिळेल.” असं म्हणून चंद्रकांतजी खाली वाकून काही तरी शोधू लागले. “आहे आहे नशीब जोरावर आहे तुमचं. वाका खाली मुलानो. हे बघा कंदील पुष्प.” त्यांनी जे दाखवलं ते बघताना आम्ही आमचे राहिलो नाही. इत्तूश्या आकाराचं कंदील पुष्प! अगदी हुबेहूब कंदीलासारखं. आणि याच्या परागीभवनाची कथा तर केवळ थक्क करणारी. कासला आल्याचं सार्थक झालं होतं.

एका सहलीत कीटकभक्षी वनस्पतीही बघायला मिळाली. आजवर केवळ पुस्कतकात चित्रात बघितलेली वनस्पती प्रत्यक्षात बघताना हरखून जायला झालं. प्रत्त्येक सहलीत काही ना काही नवीन दिसतंच गेलं आम्हाला. नाही चुकलं वाक्य. प्रत्येक सहलीत काही ना काही नवीन निसर्ग दाखवतच गेला आंम्हाला

तर थोडक्यात काय मंडळी, पावसाळा ते दिवाळी रानफुलांच्या शोधात रानवाटा धुंडाळत राहा. रंगरंगुल्या सानफुलांचा हा नजारा  नक्कीच तृप्त करेल तुम्हाला.

(जडण घडण मासिकातून साभार.)

शिवराज पिंपुडे

ज्ञान प्रबोधिनी, निगडी.

 

 


Comments

Popular posts from this blog