#करोनाच्या नजरकैदेत...भाग ५
करोनाच्या नजरकैदेत... भाग ५ दिवस होता हनुमान जयंतीचा. उठलो तेव्हाच मनात एक विचार होता. पण सकाळचे सात ही काही कोणाला फोन करायची वेळ नव्हती. त्यामुळे काटे पुढे सरकायची वाट पाहू लागलो. ९:३० च्या ठोक्याला एक फोन लावला. (आजकाल फोन लावण्यापेक्षा फोन आला तर खूप बरे वाटते. कुणी आठवण काढली म्हणून नाही ओ. करोनाची जाहिरात तीन-तीन वेळा ऐकण्यापासून सुटका होते ना... असो.) "हॅलो अनुजाताई, तुम्ही तर संगणक विभागवाले. त्यामुळे आमच्यापेक्षा जास्तच बिझी असणार तुम्ही. पण तरी आम्हालाही तुमची एक मदत हवी आहे." "करू की दादा." संगणक विभाग... अनुजाताईंच्या नेतृत्वाखाली नियोजनपूर्वक काम करणारा अत्यंत शिस्तबद्ध असा निगडी केंद्रातील एक महत्त्वाचा विभाग. "ताई, लवकरच अनघाच्या २१ कविता पूर्ण होतील. तर त्या सगळ्यांंचंं संकलन ऑडिओ बुकच्या स्वरुपात प्रकाशित व्हावं असं मनात आहे." "होईल की." संगणक विभाग आणि नकार... कसं शक्य आहे राव. "मला एक दोन क्लिप पाठवून ठेवा. मी त्यावर काम करून बघते." त्याच दिवशी रात्रीपर्यंत एक ट्रायल व्हर्जन आले...