#करोनाच्या नजरकैदेत... भाग ४

करोनाच्या नजरकैदेत... भाग ४

१४ एप्रिल.
पहिल्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस.
पहिला का होईना पण 'संपला' एकदाचा.
सेलिब्रेशन तो बनता है|
काय करूयात...
कितीही नाही म्हटलं तरी घरातील महिला वर्गाला खूप कामे अंगावर पडली आहेत.
कुटुंबातील अन्य सदस्यांकडून मदत होत आहे.
पण शेवटी ती 'मदतच' आहे.
अजून पुढचे किमान १९ दिवसही असेच असणार आहेत.
आमच्या अनुभव शिक्षणाच्या यादीत रोज घरातील एक काम मुलांना करण्यासाठी देत होतो.
घर झाडण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत अनेक गोष्टी गेल्या २० दिवसात मुलांनी केल्या होत्या.
त्यामुळे कामाचा काही अनुभव त्यांच्या गाठीशी नक्की होता.
मग त्याच जोरावर एक गोष्ट ठरवली.
पहिल्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस
आई पालकांच्या आरामाचा दिवस...
घोषणा तयार झाली.
अचानक जाहीर करण्यापेक्षा तीन दिवस आधीच याची पूर्वसूचना दिली.
बारीक-सारीक कामांची यादी करून ग्रुपवर पोस्ट केली.
थोडी थोडी करता करता तब्बल २८ घरकामे निघाली.
जी कितीही म्हटलं तरी टाळता येत नाहीत.
अट होती आई, आज्जी, काकू... कुण्णाची  मदत घ्यायची नाही.
फक्त मुला-मुलींनी व घरातील पुरुष मंडळींनी मिळूनच यातील सगळीच किंवा अधिकाधिक कामे पूर्ण करायची.
त्यादिवशी टीव्हीचा रिमोट आईकडे असेल आणि अर्थात आईचा मोबाईलही आईकडेच असेल.
हे प्रत्यक्षात येण्यासाठी पूर्वतयारीचे तीन दिवस वापरायचे.
न्याहरी, जेवणातील काही शिकून घ्यायचे असेल तर ते शिकून घ्यायचे.
नियोजन करायचे.
खातेवाटप करायचे.
दिवस उजाडला.
परत एकदा मुलांना आठवण केली.
परत एकदा सर्व कामांची यादी पोस्ट केली.
तासाभराने सहावी, सातवीच्या वर्गांच्या ग्रुपवरती प्रतिसाद यायला सुरुवात झाली.
... चहा बनवला.
... अंगण झाडून रांगोळी काढली.
... पाणी भरले.
... झाडांना पाणी दिले.
दिलेल्या यादीनुसार कामांचा फडशा पडत होता.
बाकी न्याहारी, जेवणाचे भारी भारी बेत ठरवले होते मुलांनी.
गुलाबजामपासून ते मॅन्गो सरबतपर्यंत आणि
शेवभाजी पासून ते रगडा पॅटीसपर्यंतची धामधूम स्वयंपाकघरात चालू होती.
मध्येच तव्याचा चटका बसला...
हिरव्या मिरचीला दाह झाला... हात पाण्याखाली धरला आहे, असंही वाचायला मिळत होतं.
(ताक घुसळताना)
काही काही घरी अचानक बाबा मंडळींना ऑफिसचं जास्तीचं काम लागलं.
त्यामुळे नियोजनानुसार त्यांच्या वाटची कामे करायला त्यांना वेळ मिळाला नाही.
पण मुलांनी निग्रहानं आईची मदत नाकारली.
आणि मुलांचा हा प्रामाणिकपणा आईच्या डोळ्यांंतून पाझरू लागला.
हा खरा मातृदिन... अशा आशयाचा   कामथे सरांचा msg मुलांचा उत्साह वाढवून गेला.
सीमाताईंनी ही सकाळीच एक स्वरचित कविता पाठवून वातावरण निर्मिती केली होतीच.
आज ग्रुपवर बाकी कृती पोस्ट होणार नव्हत्या.
नेहमीसारखा चार वाजताचा एक सराव पेपर आणि
काव्यवाचन उपक्रम केवळ सुरू राहणार होता.
आज १४ एप्रिल.
त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांची 'जग बदल घालुनी घाव' ही डॉ. बाबासाहेबांवरची कविता आज अनघाताईने ठरवली होती.
वेळ मिळेल तसा मुले एकीकडे कविताही रेकॉर्ड करून पाठवत होते.
दुपारनंतर मुले दमतील की काय, कंटाळा करतील की काय असे वाटून गेलं.
त्यामुळे ...आज तुम्ही जे जे करत आहात ते ते तुमची आई रोज अगदी रोज तुमच्यासाठी करत असते हे विसरू नका. तेव्हा थोडं स्वतःला ताणा, कंटाळा, आळस करू नका... या आशयाचा एक छोटा संदेश सर्व वर्गांवर पाठवून दिला.
वर्षाताई, सीमाताई, स्मिताताई, स्वातीताई हे वर्गशिक्षकही ग्रुपवर हजेरी लावून मुलांचा उत्साह वाढवत होते.
दुपारनंतर आई पालकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या.

मे महिन्याच्या सुटीत माहेरी जाऊन जे सुख मिळतं ते सुख आज मुलांनी दिलं...

आज मुलांना घरी आई काय करते ते समजलं, अन्नाची किंमत समजली, कष्ट समजले आणि घरकामातही किती व्यवस्थापन लागतं हेही समजलं...

मस्त खोबरं किसून घातलेले कांदा पोहे समोर आले आणि मनोमन दादांचं स्मरण करून पोहे फस्तही केले...

गॅस पेटवून कढई ठेवून चर्चासत्र सुरू झालं... आई तेल किती चमचे घालायचे, फोडणीत आधी काय घालू... दोन दिवस सगळा अभ्यास करूनही ऐन परीक्षेवेळी विद्यार्थी गर्भगळीत. असे असले तरी, तू स्वयंपाकघरात येऊ नकोस. या वाक्याची लक्ष्मणरेषा चालूच होती. (सध्या चालू असलेल्या रामायण मालिकेचा प्रभाव.)

आम्ही मागून सुद्धा अशी सुट्टी आम्हाला मिळाली नसती...

लेकाने मला खीर आवडते म्हणून खिरीची रेसिपी मला न विचारता गुपचूप आज्जीला विचारून दुपारच्या जेवणासाठी केली...किती गोड लागली म्हणून सांगू.
(आईसाठी  तयार केलेले ताट)
एका ताईंनी कवितेत आपल्या भावना मोकळ्या केल्या. 
कवितेचा शेवट होता,
आला असा दिवस एक
ती झाली माय अन् मी तिची लेक...

एकुणात काय मुलांनी कल्पना अगदी डोक्यावर उचलून धरली होती तर.
छान वाटलं.
.....................................................
दादा, मस्त झाली की ही कल्पना. पण काय ओ तुमच्या घरी अशी १४ एप्रिल तारीख कधी उगवणार आहे?
जवळचे लोक अत्यंत प्रेमानं विचारू लागले होते...
असो अन् काय. 
शेवटी, उम्मीद पे दुनिया कायम है... हेच खरे.
(या अनोख्या दिवसाबाबत पालकांनी दिलेले काही प्रतिसाद खालील लिंकवर वाचायला मिळतील.)

https://drive.google.com/file/d/18thaCzTsVYMavlatNHiPK58oTtKdUa-b/view?usp=drivesdk


शिवराज पिंपुडे 
ज्ञान प्रबोधिनी, निगडी 

Comments

  1. दादा तुमच्या कल्पना नेहमीच भन्नाट असतात.मुलांन सोबत पालक पण उपक्रमांची उत्सुकतेने वाट बघत असतात.

    ReplyDelete
  2. वाह वाह क्या बात है! आई कुठे काय करते, ते आपण केल्यावरच समजते. मनोमन दादांचे स्मरण करुन पोहे फस्त केले...,,😂😂😂 भारीच, कविता फारच आवडली, भोवती रांगोळी काढून केळीच्या पानावर वाढलेले पान...वाह एक नंबर. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं... काय पुण्य असतं की ते घरबसल्या अश्या कल्पना सूचतात आणि मुले ती प्रत्यक्षात आणतात. बच्चे कंपनी लगे रहो! Keep it up!!

    ReplyDelete
  3. मस्त रे दादा
    लगे रहो...

    ReplyDelete
  4. दादा खूपच छान ....👍👍
    आईच्या प्रतिक्रिया वाचताना डोळे भरून आहे हो....

    ReplyDelete
  5. आई साठी सुट्टीची कल्पना छानच दादा

    ReplyDelete
  6. मस्त दादा छान लिहिले आहे. 👍

    ReplyDelete
  7. मस्त लेखन दादा !! या काळातही मुलांना आणि त्यांच्या परिवाराला आनंदाचे क्षण देणारा उपक्रम .

    ReplyDelete
  8. मस्तच गेला तो दिवस.....
    शंतनु निबंध लिहिताना त्यानं लिहिलं, " रोज जेवायला बसल्यावर मी अन्नदाता सुखी भव आजच्यासारखे उद्या मिळो. असं म्हणतो पण आज नाही म्हणणार कारण रोज स्वयंपाक करणं ह्या.... खुप अवघड आहे'.
    एवढे समजले हे ही नसे थोडके..... खुप खुप आभार
    शंतनु रबडे आईपालक

    ReplyDelete
  9. Should be celebrated monthly as mother's day.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मंतरलेली रात्र...!