उत्सव विक्रीचा...

ग्रुपवर एक फोटो आला होता. हॉटेलबाहेर जोरदार विक्री... सं कॅप्शन होतं त्या फोटोला. सार्थक गुंजाळ आणि आयुष शिंदे यांनी प्राधिकरणातील कृष्णा हॉटेलच्या पुढ्यात स्टॉल थाटला होता. मस्त रे पोरांनो,’ मनातून शाबासकी देऊन टाकली त्यांना. दुसऱ्या दिवशी दोघांना बोलावून घेतलं. स्टॉल कसा सुरुए,’ मी विचारलं.                                        दादा, सहा वाजता जातो आम्ही हॉटेलच्याबाहेर. रात्री दहापर्यंत थांबतो. चांगली विक्री होत आहे.                                                                   टेबल, खुर्ची  काय घरनं नेता का मग?”                                                     नाही. नाही. पहिल्या दिवशी हातामध्ये राख्या घेऊनच थांबलो होतो. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या मॅनेजर काकांनी स्वतःहूनच हॉटेलमधलं टेबल आणि खुर्ची घ्यायची परवानगी दिली. रात्री जाताना फक्त जागेवर ठेवायला सांगितलं.”       “होतीये का चांगली विक्री?”                                                                     “हो दादा. रविवारी तर खूप विक्री झाली दादा. गर्दी होती हॉटेलला. वेटिंग होते. मग वेळ कसा घालवायचा म्हणून अनेकांनी राख्या बघितल्या, विकतही घेतल्या.”                                                                                         दोघांचा उत्साह ओसंडून वाहत होता.


दुसऱ्या दिवशी ग्रुपवर अजून एक फोटो आला. आठवडी बाजारामध्ये युवा नेते पार्थ पवार हे  दिव्या डांगे या ७ वीतील विद्यार्थिनी कडून राखी बांधून घेत होते. सोबत नगरसेवक, आमदारही होते. पार्थ पवार यांचा संपर्क दौरा सुरू होता. या दौऱ्यात प्राधिकरणातील आठवडी बाजाराला त्यांची भेट होती. त्यात या मुलीला राखी विकताना बघून ते आवर्जून थांबले. तिच्याशी संवाद केला. आवडला उपक्रम त्यांना. तिचं, शाळेचं कौतुक केलं आणि मग तिथेच राखी बांधून घेतली. भरपूर व्हायरल झाला हा फोटो.  दुसऱ्या दिवशी दिव्याला निमंत्रण धाडलं. “एका रात्रीत स्टार झालीस की,” मी. “ते सगळं ठीकये दादा पण एका राजकीय नेत्याला राखी बांधताना घाबरले होते मी. म्हणजे इतकी घाबरली होते की हात थरथर कापत होता माझा.” हे ऐकल्यावर शिक्षक असल्याने उपदेशाचा जो उमाळा आतून आला तो शमवला. पण घटना, उपक्रम मुलांच्याही नजरेतून बघितले पाहिजेत हा मी पूर्वीच घेतलेला धडा परत एकदा अधोरेखित करून घेतला या प्रसंगातून.

तुमच्या लक्षात आलंच असेल, या लेखाची गोष्ट आहे प्रबोधिनीत गेली सुमारे ४० वर्षे होणाऱ्या राखी विक्री उपक्रमाची!

 उपक्रमाची पार्श्वभूमी

मुलांचं संवाद कौशल्य वाढीस लागावं, कौशल्यपूर्वक स्वतःच्या मालाची विक्री करता यावी, अनोळखी लोकांशी बोलण्याची भीड चेपावी, पैसे सांभाळता यावेत, हिशोब करता यावा, समाजातील नाना तऱ्हेच्या व्यक्तींचे दर्शन घडावं अशी उद्दिष्टं डोळ्यांसमोर ठेवून प्रबोधिनीत राखी विक्री उपक्रम योजला जातो. निगडीच्या शाळेत ६ वी, ७ वीचे वियार्थी राखी विक्री करतात. साधारण १५ दिवस चालतो हा उपक्रम. प्रत्येकाच्या पोतडीत नानाविध अनुभवांचं गाठोडं साठतं या १५ दिवसांत.                                                       प्रशिक्षण आणि प्रबोधन

          विक्री उपक्रम सुरु करण्यापूर्वी मुलांशी २-३ वेळा संवाद होतो. उपक्रमाची सगळी पार्श्वभूमी त्यांना समजावून सांगितली जाते. विक्री करताना कोणती पथ्ये पाळायची, घेतलेल्या राख्यांची नोंद कुठे, कशी करायची, हिशोब कसा लिहायचा, पैसे कधी, कोणाकडे जमा करायचे, काय काय युक्त्या आधीच्या मुलांनी वापरून पहिल्या आहेत असं बरंच काही बोललं जातं मुलांशी. विक्रीचा चक्क एक डेमोच करून दाखवला जातो मुलांना. खवचट लोकांची भूमिका पक्की वठवतात आमचे शिक्षक. दारावरची बेल किती वेळा वाजवायची, दार उघडल्यावर पहिले शब्द काय उच्चारायचे इथपासून ते राख्या घेतल्या नाहीत तरी कसा हसून निरोप द्यायचा इत्यादी इत्यादी गोष्टींचं प्रशिक्षणच दिलं जातं. मुख्य म्हणजे या उपक्रमावर लोकं काय काय आक्षेप घेऊ शकतात; त्यांना काय उत्तरं देता येतील अशी चर्चाही घडवली जाते. राख्या ठरवून दिलेल्या किमतीलाच विका हेही बजावून सांगितलं जातं. गेल्या वर्षीचे उच्चांक सांगितले जातात. गेल्या वर्षी विक्रमी विक्री केलेले विद्यार्थी त्यांचे अनुभव मांडतात. एकदम राखीमय वातावरण निर्माण केलं जातं.

पण केवळ मुलाचं प्रशिक्षण पुरत नाही. विक्री उपक्रम सुरू करण्यापूर्वी पालकांचं प्रबोधन करणंही महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण शाळेत जोरदार वातावरण निर्मिती करतो पण घरून त्यावर पाणी फिरवलं जाऊ शकतं. त्यासाठी हा उपक्रम आपण किती वर्ष करतोय, का करतोय, मुलं नेमकी काय काय शिकतात यातून असं सगळं सविस्तर बोलावं लागतं पालकांशी. म्हणजे मग त्यांची भूमिका उपक्रमाला अनुकूल होते. किमानपक्षी विरोध राहत नाही. नाही तर ‘काही विक्रीबिक्री करण्यात वेळ घालवायचा नाही. २०० रुपयांच्या राख्या घेऊन ये आणि आणि घरातच ठेव. मी देतो पैसे.’ असं मुलांना सांगणारेही काही महाभाग असतात. एक वर्ष तर चक्क कै. भाऊंनी या उपक्रमाबाबत पालकांना पत्रच लिहिलं होतं. त्यात भाऊ लिहितात... ‘घरातल्या चौकोनी जगाच्या बाहेर अपरिचित परिसरात वावरण्याचा मोठा लाभ मुलामुलींना होतो.जगाच्या चांगल्या वाईट पद्धती समजून त्यामधून होणारे शिक्षण पुस्तकातून, व्याख्यानातून किंवा परीक्षांमधून केव्हाच होत नाही. ‘याला जीवन ऐसे नाव’ हे अनुभवता येते. चांगले आणि वाईट ठरवून आपले योग्य वागणे काय हे समजून घेता येते. क्वचित प्रसंगी पैसे चोरले जाणे, हरवणे इत्यादीमुळे थोडीफार आर्थिक झळ सोसावी लागली तरी त्याला शिक्षणाचे शुल्क म्हणता येते. त्याने दक्षता वाढते.’                                         प्रत्यक्ष विक्री सुरु झाल्यावर...

सूचनाफलकाबाहेर मुलांची तोबा गर्दी गर्दी होती. खूपच क्वचित सूचना फलकाच्या नशिबात असे क्षण येतात. राखी विक्रीची काल अखेरची आकडेवारी लावण्यात आली होती. प्रत्येक वर्गातील कालपर्यंतचे सर्वाधिक राखी विक्री करणाऱ्या मुलांची नावे सूचनाफलकात झळकली होती. आपला वर्ग कितवा आहे; सर्वाधिक विक्री करणाऱ्यात आपण कितवे आहोत हे बघण्यासाठी मुलांची झुंबड उडाली होती.

अध्यापकांपैकी एक जण विक्री उपक्रम प्रमुख असतो. खूप भाव असतो त्या अध्यापकाचा या १५ दिवसांत. त्याने राखी संदर्भात काम आहे असं सांगितलं की लगेच बुलेटीन काढावं लागतं त्याचं. राखी खरेदी करायची आहे असं त्यानं सांगितल्यावर लगेच गाडी घोडे उपलब्ध करून द्यावे लागतात. त्याची मुख्य जबाबदारी म्हणजे राख्यांची खरेदी, त्यांचे वाटप आणि एकूण हिशोबावर लक्ष ठेवणे. राख्या खरेदी करतना एकीकडे त्या मोठ्या प्रमाणात शिल्लक राहणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते तर दुसरीकडे मुलांना राख्या कमी पडणार नाहीत हेही बघावं लागतं. तसं जोखमीचंच काम.

बाकी मुलांना राख्या देणे, न विकल्या गेलेल्या परत घेणे, पैसे जमा करून घेणे, एकेका मुलाचा हिशोब करणे ही सगळी कामे वर्गशिक्षक करतात. सकाळचा परिपाठाचा वेळ त्यासाठी वापरला जातो. त्यामुळे अध्ययन-अध्यापनाच्या, क्रीडेच्या आणि अभिव्यक्तीच्या तासिकांवर अतिक्रमण होतं नाही.

 उच्चांकी विक्री

रक्षाबंधन होऊन दोन दिवस झाले होते. आज विक्रीचा हिशोब पूर्ण करण्याचा शेवटचा दिवस होता. वर्गावर्गातून हिशोबाचे पैसे जमा करण्याचे काम सुरू होतं. शाळा सुटल्यावर विभागप्रमुख समाधानदादा सुसर एकदम हसतमुख चेहऱ्यानं माझ्या कार्यालयात आले.                                            दादा, यावर्षी विक्रमी विक्री झाली. तब्बल अकरा लाखाची.”                      अबब! जोरातच की. एकूण किती विद्यार्थी होते सहावी सातवीचे मिळून?”    “३७२.”                                                                                                    प्रत्येक वर्गानं किमान लाखभराची विक्री केली आहे. सातवी ची सर्वाधिक विक्री आणि अमृत्य कळसकर या विद्यार्थ्यानं गेल्या वर्षीचं स्वतःचंच रेकॉर्ड मोडून तब्बल ४०००० रुपयांची विक्री केली आहे.”                                 “भले  शाब्बास रे! उद्या पाठवा त्याला मला भेटायला."

“दादा, अजून एक यावर्षी नव्यानेच रुजू झालेल्या केतन सोनटक्के सरांनी भरपूर मदत केली. आणि आपल्या दिपाली ताईंनी त्यांना छान मार्गदर्शन केलं त्यांना.”                                                                    “मस्तच. केतन सरांनाही मी आठवण काढली आहे म्हणून सांगा.”

परदेशातही राख्या पोहचल्या आमच्या

        दुसरे दिवशी अमृत्य भेटायला आला. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या. यावर्षी विक्रीची कोणती नवीन युक्ती वापरलीस या प्रश्नाचं उत्तर देताना अमृत्य म्हणाला, “दादा यावर्षी दुसऱ्या शहरात, राज्यात आणि परदेशातही राख्या विकल्या.”                                                                                      “काय म्हणतोस. कसं काय जमवलंस हे?” मला जाम धक्का होता हा.            “अमेझॉन, फ्लिपकार्ट वापरून आपण गोष्टी कुठेही कुरियरने पोहचवू शकतो तर राख्या का नाही विकता येणार; असा विचार केला मी. मग माझे सगळे दूरदूरचे नातेवाईक शोधले. यादीच केली त्यांची. प्रत्येकाला व्हिडीओ कॉल केला. उपक्रमाची माहिती दिली. राख्या दाखवल्या. किमती सांगितल्या. सगळ्यांना आवडला उपक्रम. सगळ्यांनी छोटी मोठी ऑर्डर दिली. मग काय नांदेड, सोलापूर पासून ते हैद्राबाद, गुलबर्गा पर्यंत राख्या गेल्या माझ्या.”      “जोरदार मित्रा. आणि ते परदेशाचं काय म्हणत होतास?”                          “अमेरिकेत बाबांचा एक मित्र राहतो. त्यांची मुलगी माझी मैत्रीण. ते भारतात असताना आम्ही बऱ्याच वेळा भेटायचो. मग एकदा तिला कॉल करून राखी विक्रीची माहिती दिली. त्यांच्या आसपास बरेच भारतीय लोक राहत  होते. त्यांना तू राख्या विकू शकशील असे तिला सुचवले. तिचे बाबा उद्योजक असल्याने त्यांना ही कल्पना आवडली. मग काय तिच्या पसंतीच्या राख्या मी तिला विकल्या आणि तिने त्या अमेरिकेत विकल्या.”                            “बाबा आता जा तू. आजच्या दिवसातील धक्के बसण्याचा कोटा पूर्ण झाला आहे माझा. उद्या परत भेटू आपण.”

मी शाळेत विद्यार्थी असल्यापासून राखी विक्रीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. म्हणजे ९० साली एकानं पुणे ते लोणावळा लोकलचं रिटर्न्स तिकीट काढलं आणि फेऱ्या वर फेऱ्या केल्या त्या १० रुपयात. जोरदार विक्री त्याची लोकलमधून. कोणी कंपनी सुटताना गेटवर थांबून विक्री केली इत्यादी इत्यादी. पण परदेशात राख्या विकून ज्याला विकल्या त्याला तिथे विक्री करायला लावण्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग असावा.

थोडंसं आत्मचिंतन

हिशोबाचे काम पूर्ण झाल्यावर सर्व मुलांना एक प्रश्नावली देण्यात आली होती. घरी पालकांशी चर्चा करून भरायला काहीच हरकत नव्हती आमची. मोजकेच दान दहा-बारा प्रश्न होते.

सर्वांची प्रश्नावली भरून आल्यावर मग मुलांशी संवाद केला. ‘ज्यांचं उद्दिष्ट लवकर पूर्ण झालं त्यांनी पुढे विक्री केली की थांबले?’ पालकांचा पाठिंबा, प्रोत्साहन नसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यावर कसे उपाय शोधले?’ असे त्या प्रश्नावलीत नसलेले काही प्रश्न विचारले.                                                                         काय काय शिकलात,’ हा प्रश्न विचारला; पण त्याची प्रश्नावलीत मुलांनी लिहिलेली उत्तरंही सांगितली. यापेक्षा वेगळं काही असेल तर सांगा म्हटलं.                                                                                            एकीनं सांगितलं, “मी संयम शिकले”                                                         म्हणजे ग?”                                                                                             काही वेळा स्टॉलवर बराच वेळ थांबून काहीच विक्री होत नसे. काही वेळा दहा-बारा घरी जाऊनही कोणी एकही राखी घेत नसे. अशा वेळी संयम ठेवून विक्री करत राहिले.”                                                                           वा! अभिनंदन तुझं.”

‘विक्री करताना काय काय शक्कली लढवल्या,’ असं विचारलं. बऱ्याच गोष्टी सांगितल्या मुलांनी. पण एकानं सांगितलं, “दादा, विक्रीसाठी घरोघरी गेल्यावर काही घरातून चॉकलेट्स द्यायचे. त्यातले माझ्या आवडीचे मी खाऊन टाकायचो. आणि न आवडणारे सोबत ठेवायचो. विक्रीला गेल्यावर ज्या घरात लहान मुलं असतील त्यांना ती चॉकलेट्स द्यायचो; मग ती लहान मुलं राख्या घेण्यासाठी आपल्या आईबाबांकडे हट्ट करायची."           जोरदार हशा पिकला त्याच्या या युक्तीवर.                                                   म्हटलं, “मस्तच रे! पण तुम्ही जी उत्तम पुरुष लक्षणे रोज म्हणतात त्यातील एका लक्षणाशी विसंगत झालं थोडं हे. कोणाला सांगता येईल का ती ओळ?”  थोड्याशा शांततेनंतर एकानं हात वरून हात वर करून सांगितलं, “उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा.”                                                                      “बरोबर. तर मित्रा, नावडीचा पदार्थ दुसऱ्याचा द्यावा असं नाही म्हटलं            “इतके अनुभव घेतल्यावर वागण्यात काही बदल करावा असं वाटलं का?” माझ्या संवादातील हा शेवटचा प्रश्न होता.                                                  एकानं उत्तर दिलं... “घरी बरेच विक्रेते अधून मधून येत असतात. त्यांना एकदम नाही असं म्हणणार नाही. काही प्रश्न विचारू, पाणी देऊ. खरेदी करूच असं काही नाही. पण त्यांच्या तोंडावर दार लावणार नाही. आम्हालाही अशी खूप घरे सापडली की ज्यात आमची भरपूर प्रेमानं चौकशी अगदी प्रेमाने केली लोकांनी पण राखी मात्र घेतलीच नाही.”                          ‘वागण्यात’ किती येईल लगेच माहिती नाही पण ‘समजेत’ आलं होतं हेही खूप झालं.

पालक सहभाग

पालकही वेगवेगळ्या भूमिकेतून या उपक्रमाकडे बघत असतात. आम्ही राखी विक्रीची बहुतांश बक्षीसं ज्या दुकानातून खरेदी करतो त्याचे मालक आमचे पालकच आहेत. त्यांचा मुलगा यंदा सातवीत होता. त्यांच्याकडे राखी विक्री उपक्रमाची बक्षिसं खरेदी करायला गेलो असताना ते सांगत होते, “या वर्षी स्टॉल मांडून विक्री करायचं म्हणाला मला. आणि माझ्याच दुकानाच्या बाहेर स्टॉल थाटला की. त्याला म्हटलं असं चालणार नाही. स्टॉल मांडायचा तर माझ्या ओळखीतून तुला एक दुकान मिळून देतो. त्या दुकानाच्या बाहेर बस. इथे स्टॉल लावशील तर माझ्या ओळखीतून तुझी विक्री होईल. ते नकोय मला.”                                                                                           “एकदम योग्य केलंत तुम्ही.” माझा प्रतिसाद.

आणखी एक पालक राखी विक्री सुरू असताना भेटले. सर, खूपच चांगला उपक्रम आहे.आत्मविश्वासानं बोलायला लागली आहे आता ही. पण मी ओळखीच्याच घरी जाऊ देतोय. अनोळखी घरी अजून पाठवले नाही.”     “छान. पण किमान पाच अनोळखी घरात तरी तिला जाऊ दे. वाटल्यास तुम्ही घराबाहेर थांबा.” मी सुचवलं.

 असाही एक किस्सा

पालक बैठकीत या उपक्रमाविषयी पालकांनाही मनोगत व्यक्त करायला सांगितलं. अनेक मुद्दे नेहमीचेच होते. पण एक अनुभव विशेष होता. एक ताई म्हणाल्या, आमच्या काही नातेवाईकांशी आमचा अबोला होता. पण ही तिथेही गेली राखी विक्री करायला आणि त्यातून तो अबोलाच संपला.” हे सांगतानाही त्यांना भरून आलं होतं. या उपक्रमाचं असंही काही फलित असू शकेल हे दूर दूर तक आमच्या मनात नव्हतं.

 या उपक्रमातील एक उत्सुकतेचा क्षण

बक्षीस वितरण कार्यक्रम सुरू होता. विक्रीच्या रकमेनुसार बक्षीसांची योजना केली होती. सुरुवात दहा रुपयाच्या पेनानं तर शेवट कॅसिओने झाला होता. विभागात, वर्गात प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी सॅक, छोटी एक कप्पा असलेली सॅक, स्पोर्ट बॅग, पाऊच, पाण्याची बाटली, रंगपेटी, डार्ट गेम, ट्रॉफी असं बरंच काही मिळालं होतं. हातात बक्षिसं आणि चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता मुलांच्या.

या कार्यक्रमात ६ वी, ७ वीच्या ९०% मुलांना बक्षिसे मिळतात. वर्षभरात प्रत्येकाला किमान एक बक्षीस हे आमचं धोरण या एकाच उपक्रमातून पूर्णत्वास जातं. ५ वीच्या विद्यार्थ्यानाही मुद्दाम या कार्यक्रमाला बसवतो आम्ही. टाळ्या वाजवून वाजवून कंटाळतात पोरं पण पुढील वर्षी आपण कोणते बक्षीस मिळवायचे आणि त्यासाठी किती रुपयांची राखी विक्री करायची याचे संकल्प याच कार्यक्रमात नक्की होतात अनेकांचे.

बक्षीसाच्या स्वरूपावर पण दरवर्षी खूप विचार करतो आम्ही. काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न असतो आमचा. एका वर्षी विशिष्ट रकमेच्या वर विक्री करणाऱ्या मुलांना थेटरमध्ये नेऊन फर्जंद चित्रपट दाखवला. घोषणांनी दुमदुमून गेलं होतं थेटर. एकदा विक्रमी विक्री करणाऱ्या मुलांना घेऊन का पठारावरील रानफुलं  दाखवली. सहलीचं हे बक्षीस नक्कीच कायम स्मरणात राहील या मुलांच्या. यावर्षी बक्षीसं देण्यापूर्वी पालक प्रतिनिधींची तंही जाणून घेतली. एक-दोन आम्हाला सुचलेल्या कल्पना पालकांनी मांडल्या. सर्वाधिक विक्री करणाऱ्या सहावी आणि सातवीतील एकेका वर्गास एक बक्षीस मात्र गेली काही वर्ष आम्ही सातत्यानं देत आलो आहोत. ते बक्षीस म्हणजे एक दिवस - मुक्त दिवस!’ म्हणजे त्या दिवशी शाळेत यायचं पण कोणताच तास त्या मुलांचा होणार नाही. बॅगेत काय भरायचं ते ज्याचं त्यांनं ठरवायचं. शाळेत आल्यावर काय करायचं तेही प्रत्येकानं आपापलं ठरवायचं. भूक लागली की डबा उघडून खायचा. सुट्टी होण्याची वाट बघायची नाही. जाम धमाल करतात मुलं या दिवशी.

यावर्षीची बक्षिसं आवडली का?’ असं पालक प्रतिनिधींच्या गटावर विचारलं.  दादा, बक्षीसं आवडलीच आहे पण कधी एकदा तो मुक्त दिवस येतोय असं झालं मुलांना.’ एका प्रतिनिधीनं प्रातिनिधिक भावना बोलून दाखवली.

थोडक्यात काय विक्रीचा हा उत्सव भरभरून देऊन जातो... सगळ्यांनाच!

Comments

  1. माहीत असलेल्या गोष्टी पण तुझ्या शैलीत वाचायला मजा आली......

    ReplyDelete
  2. छान उपक्रम ! वाचताना प्रत्यक्ष अनुभूती मिळत होती. लेखनशैली भारी आहे.

    ReplyDelete
  3. किती छान लिहिलं आहेस रे, खरंच राखी विक्रीच्या आठवणींना उजाळा दिलास👌 मुलांचं कौतुक आहे, विक्रमी विक्री करतायत!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मंतरलेली रात्र...!