#करोनाच्या नजरकैदेत...भाग ५

करोनाच्या नजरकैदेत... भाग ५

दिवस होता हनुमान जयंतीचा.
उठलो तेव्हाच मनात एक विचार होता. 
पण सकाळचे सात ही काही कोणाला फोन करायची वेळ नव्हती. 
त्यामुळे काटे पुढे सरकायची वाट पाहू लागलो.
९:३० च्या ठोक्याला एक फोन लावला. 
(आजकाल फोन लावण्यापेक्षा फोन आला तर खूप बरे वाटते. कुणी आठवण काढली म्हणून नाही ओ. करोनाची जाहिरात तीन-तीन वेळा ऐकण्यापासून सुटका होते ना... असो.)
"हॅलो अनुजाताई, तुम्ही तर संगणक विभागवाले. त्यामुळे आमच्यापेक्षा जास्तच बिझी असणार तुम्ही. पण तरी आम्हालाही तुमची एक मदत हवी आहे."
"करू की दादा." 
संगणक विभाग... अनुजाताईंच्या नेतृत्वाखाली नियोजनपूर्वक काम करणारा अत्यंत शिस्तबद्ध असा निगडी केंद्रातील एक महत्त्वाचा विभाग.
"ताई, लवकरच अनघाच्या २१ कविता पूर्ण होतील. तर त्या सगळ्यांंचंं संकलन ऑडिओ बुकच्या स्वरुपात प्रकाशित व्हावं असं मनात आहे." 
"होईल की." 
संगणक विभाग आणि नकार... कसं शक्य आहे राव. 
"मला एक दोन क्लिप पाठवून ठेवा. मी त्यावर काम करून बघते." 
त्याच दिवशी रात्रीपर्यंत एक ट्रायल व्हर्जन आले देखील."
(यांच्यासोबत काम करायचंं म्हणजे स्वतःच्या कामाचा वेग गतिमानच ठेवावा लागतो.)
अडचण एकच होती. 
त्यांच्या घरच्या संगणकावर उपलब्ध असणाऱ्या सॉफ्टवेअरचाच केवळ वापर करता येणार होता. 
पण मला काहीच हरकत नव्हती.  
कवितांचंं, त्यांच्या अर्थांचंं संकलन होणंं, इ पुस्तक स्वरूपात ते जतन होणंं आणि त्यामुळे ते केव्हाही वापरायला उपलब्ध असणं आणि मुख्य म्हणजे मुलांना प्रोत्साहन मिळणंं... माझ्या मनात उद्दिष्टे स्पष्ट होती. 
"अनघा, करूयात का असे?"
"करूयात रे बाबा. पण मला यात काहीही कामाला लावू नकोस. आधीच खूप कामे तुंबली आहेत माझी. सध्या उठल्यापासून झोपेपर्यंत केवळ कविता कविताच करत असते ." 
"हं...ठीक आहे.(नाराजी लपवण्याचा माझा अटोकाट प्रयत्न) पण तरीही काही गोष्टी तुलाच कराव्या लागणार आहेत. बाकीचे बघुयात."
स्वतःचे म्हणणे लावून धरण्याचा माझा एक क्षीण प्रयत्न.
२१ दिवसात कोणी किती कविता म्हटल्या, कशाप्रकारे म्हंटल्या याचंं उत्तम रेकॉर्ड होतंं अनघाकडे. 
त्याआधारे तिनंं कुठल्या मुलानंं कुठली कविता म्हणायची याची यादी तयार केली.
आता या मुलांचा स्वतंत्र गट करणंं, त्यांची कविता त्यांना सांगणंं, सराव करून गटावर पाठवायला सांगणंं, ती ऐकणंं, त्यात सुधारणा सांगणं आणि  पुन्हा रेकॉर्ड करून घेणं असंं एक अत्यंत जिकिरीचं काम होतं. 
स्मिताताई सुद्धा मुलांना सांगितली कविता न चुकता रेकॉर्ड करून ग्रुपवर पाठवत होत्या.
त्यामुळे वरील जबाबदारी कोणाला द्यायची हे ठरवायला सोपं गेलं.
"ताई, तू सांगितलेलं बदल करून कविता पाठवली आहे."
"ताई, तू माझी कविता अजून ऐकली नाहीस का?"
"ताई, आता बघ ग. बरोबर झाली आहे का? तिसऱ्यांदा पाठवली आहे."
मुलांनी भंडावून सोडलंं पार.
पण नेहमीप्रमाणे स्मिताताई कामाला व मुलानांंही पुरून उरल्या.
कवितांच्या अर्थांंचं वाचन मात्र मोठ्यांनी कोणीतरी करावंं असंं वाटत होतंं. 
खरं तर हे काम अनघानंंच करावं असं खूप वाटत होतं मला.
पण आवाज बरा नाही या कारणाचंं तिनंं पांघरूण घेतलं.
आणि आता दिवसभर अर्थ अर्थ करतीये, हे मला तिच्याकडून ऐकायची बिलकुल इच्छा नव्हती. 
थोडा विचार करताच डोळ्यांंसमोर नाव आलं... वेदांगी कुलकर्णी. 
गुरुकुलाची माजी विद्यार्थिनी आणि सध्या आकाशवाणीच्या बालोद्यान विभागात काम करणारी युवती कार्यकर्ती. 
त्यामुळे आवाज, उच्चार, स्पष्टता या सगळ्यांंचंं प्रमाणपत्र तिला खुद्द आकाशवाणीनंं दिलंं होतंं.
तेव्हा आम्ही बापडे कोण त्याची तपासणी करणारे?
वेदांगी ही माझी विद्यार्थिनी. 
त्यामुळे तिच्याशी बोलताना उगा ओढूनताणून स्वर नम्र करण्याची काहीच आवश्यकता नव्हती.
नकारबिकाराचा तर दूर दूर तक प्रश्न नव्हता. 
पण अर्थाचंं वाचन एकाच आवाजात नको म्हणून थोडी टीम तयार करण्याचंं ठरलंं. 
मयुरीताई, मानसीताई, गौरव आणि आदित्यदादा. 
आवाजाची छान व्हरायटी झाली होती आता.
तर सुरू झाला होता एक प्रवास. 
सुमारे २५/२६ जणांचा. 
तोही आपापल्या घरून. 
एकाच दिशेनंं. 
आणि आहे त्या साधनांसह. 
अनुजाताईंनी दिवस रात्र एक करून...नाही चुकलं.
रात्रीतूनच सगळी कामंं उरकली. 
कारण त्या आजारी पडल्या होत्या.
त्यामुळे घरचे झोपल्यावर सर्वांच्या नकळत त्यांनी आपला दिवस सुरू केला. 
पण ठरलेल्या मुदतीत त्यांनी त्यांचं काम शेवटास नेलंच.
इ ध्वनी पुस्तिका असली तरी कवितेचे शब्द, कवीची माहिती, कवितेचा सारांश या सगळ्यांनी ही पुस्तिका सजत गेली.
यातल्या बहुतांश कल्पना अनुजाताईंच्याच होत्या. 
पुस्तिकेचा आकार मात्र आम्हाला कमी ठेवता आला नाही. 
इथे महेंद्रभाईंचा अनुभव आमच्या कामी आला. 
पुस्तिकेचा आकार १३०० mb वरून ३०० mb पर्यंत खाली आणता आला.
पण अनेक मर्यादांमध्ये काम केल्यामुळे काही उणीवा राहून गेल्या आहेत. 
त्यांची कल्पना, जाणीव आहे. 
दिनक्रम पूर्ववत झाल्यावर त्याही दूर करण्याचा नक्की प्रयत्न करू.
उपक्रम प्रमुख अनघा होती. 
त्यामुळे नाव ठरवण्याचा अधिकार तिचा होता. 
हसरी बोलफुले तिनं नामकरण केलं. 
ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मनोजराव देवळेकर यांनी त्यांच्या घरून मोठ्या स्क्रीनवर ही इ ध्वनी पुस्तिका उघडली आणि आमची पुस्तिका समस्त ग्रुपवर व्हायरल करायला आम्ही मोकळे झालो.
उपक्रम संपल्यावर तुमच्या भावना ताईला वैयक्तिक msg करून कळवा, असं मुलांना म्हटलं. 
निवडक मुलांचे पण मनापासूनचे प्रतिसाद अनघापर्यंत पोहोचले. 
'ताई आमच्या घरी कवितांची बरीच पुस्तकंं आहेत. पण मी ती कधी वाचली नव्हती. आता मात्र कुणी सांगायच्या आधीच ही पुस्तकंं वाचायला घेतली आहेत...'
'ताई एक विद्यार्थी म्हणून मी तुमची परतफेड कधीच करू शकणार नाही. तुम्ही माझ्या कायम लक्षात रहाल...'
अनेक वर्ष सेवा करूनही जे मिळत नाही किंवा मिळवता येत नाही ते अनघानंं २५ दिवसांंतच कमावलं होतं.
अनघानंं तिच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणंं आम्ही सगळे या कवितेच्या धाग्यानंं आता बांधले गेलो आहोत.
बंध अदृश्य आहे.
पण मजबूत आहेत.
तेव्हा सध्याच्या काळात एक सकारात्मक ऊर्जा पसरवण्याच्या या प्रयत्नांचंं तुम्ही नक्की स्वागत कराल अशी आशा करतो.
.................................................
काव्य वाचनातील शेवटची कविता होती ना. धों. महानोर यांची.
शब्द होते,
सूर्यनारायणा नित नेमानं उगवा 
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा...
हा योगायोग मन प्रसन्न करून गेला.


शिवराज पिंपुडे
ज्ञान प्रबोधिनी, निगडी.

(खाली लिंक दिली आहे.)

(टीप - एकदा डाऊनलोड केले की पुस्तिका  ppt app मध्ये सेव्ह होते. मग परत डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.)


Comments

  1. आमचाही अनुभव खुप छान आहे दादा. या lockdownच्या काळात ही काव्यात्मक ठेव नेहमी संग्रही राहिल. वाचनातुन ते कविता वाचन दिवस आठवले.
    खुप खुप आभार.
    शंतनु रबडे

    ReplyDelete
  2. आत्ता पर्यंतचा कवितांचा उपक्रम शब्दात मांडणे जरा अवघडच. काय सांगु काय नको असे होते पण दादा तुमच्या लिखिण्यातून सगळे दिवस डोळ्यासमोर आले कारण या सर्वांचे आम्ही पालकही साक्षीदार आहोत.
    अनघा शेवळे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मंतरलेली रात्र...!