#लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास - भाग २
लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास - भाग २ नुकताच पाऊस झाला होता. हवेत गारवा अन् मातीचा गंध भरून राहिला होता. अचानक अंगणात कावळ्यांची कावकाव सुरू झाली. जरा जास्तच. काहीतरी घडामोड सुरू आहे हे लक्षात आलंं. गेली पंचवीस तीस वर्षे आमच्या घरात मांजरी असल्याने असे अनेक आवाज आमच्या परिचित आहेत. सहज म्हणून बघायला बाहेर गेलो तर अंगणात भरपूर किडे उडत होते. दर पावसाळ्यात दिसतात तेच. दिव्याखाली खच असतो यांच्या पंखांचा . आज ते अंगणभर उडत होते. आणि त्यांना टिपायला कावळे कुंपणावर आले होते. तितक्यात तिकडून आमचा बोक्या पण आला. त्यानेही त्याची जागा घेतली. आज निसर्गाकडून मेजवानी होती त्याला. पण इतके कीटक अचानक कुठून येताएत असं शोधत होतो. आणि जे पाहिलंं त्यानंं स्तब्ध झालो. जमिनीतील एका छिद्रातून हे किडे बाहेर येत होते. जमिनीतून बाहेर येणाऱ्या या किड्यांचे पंख एकमेकांना चिकटलेले होते. बाहेर आल्यावर ते आपले पंख वेगळे करण्याचा प्रयत्न करत आणि पंख वेगळे झाल्यावर मग उडत. ज्यांना पंख वेगळे करता येत नव्हते त्यांचं आयुष्य बहुधा तिथंंच संपल्यात जमा होतंं. आणि उडणाऱ्यांचंंही फार होतंं असंं नाही...