#लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास - भाग २

लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास - भाग २


नुकताच पाऊस झाला होता.
हवेत गारवा अन् मातीचा गंध भरून राहिला होता. 
अचानक अंगणात कावळ्यांची कावकाव सुरू झाली.
जरा जास्तच.
काहीतरी घडामोड सुरू आहे हे लक्षात आलंं.
गेली पंचवीस तीस वर्षे आमच्या घरात मांजरी असल्याने असे अनेक आवाज आमच्या परिचित आहेत.
सहज म्हणून बघायला बाहेर गेलो तर अंगणात भरपूर किडे उडत होते.
दर पावसाळ्यात दिसतात तेच.
दिव्याखाली खच असतो यांच्या पंखांचा
.
आज ते अंगणभर उडत होते.
आणि त्यांना टिपायला कावळे कुंपणावर आले होते.
तितक्यात तिकडून आमचा बोक्या पण आला.
त्यानेही त्याची जागा घेतली.

आज निसर्गाकडून मेजवानी होती त्याला.
पण इतके कीटक अचानक कुठून येताएत असं शोधत होतो.
आणि जे पाहिलंं त्यानंं स्तब्ध झालो.
जमिनीतील एका छिद्रातून हे किडे बाहेर येत होते.
जमिनीतून बाहेर येणाऱ्या या किड्यांचे पंख एकमेकांना चिकटलेले होते.
बाहेर आल्यावर ते आपले पंख वेगळे करण्याचा प्रयत्न करत आणि पंख वेगळे झाल्यावर मग उडत.
ज्यांना पंख वेगळे करता येत नव्हते त्यांचं आयुष्य बहुधा तिथंंच संपल्यात जमा होतंं.
आणि उडणाऱ्यांचंंही फार होतंं असंं नाही; 

कारण कावळे व आमच्या बोक्यापासून त्यांना वाचायचंं होतंं.
https://drive.google.com/file/d/1dZwjWaNfIGPaEsyfRUQVna2VJrOeRxRI/view?usp=drivesdk
(अंगणातील व्हिडिओ)
त्या छिद्राखालील त्यांचंं घर  नेमकंं किती मोठंं आहे?
त्यात हे कीटक किती दिवसांपासून वाढत आहेत?

ते किती संख्येनंं आहेत?
त्यांच आयुष्य इतकं लहान कसं?
आणि परत पुढच्या वर्षी त्यांचं प्रजोत्पादन कसंं होत असेल?
प्रश्नांची एक मालिकाच मनात तयार झाली होती.
त्यातूनच परिसर अभ्यासाचा दुसरा घटक सापडला.

कीटक.
........................
विषय थोडा किचकटच.

त्यामुळे कोणाची मदत घ्यावी हे समजेना.
एकदम गच्ची बागेत आलेल्या राहुल सरांची आठवण झाली.
बागेतील सीताफळाच्या झाडाला खोडकीड लागली होती.
रसायनंं वापरायची नव्हती.
मग काय उपाय करता येईल असंं शोधत शोधत राहुल सरांपर्यंत पोहचलो.
मित्र कीटकांचा व्यवसाय करतात हे. प्राणीशास्त्र विषय घेऊन Ph.D. संपादन केली आहे यांनी. अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. प्लास्टिक खाणारे कीटक, कीटकांच्याद्वारे स्फोटकांचा ऱ्हास असे प्रकल्प प्रसिद्ध आहेत सरांचे.
"...सर काढाल का वेळ?'
"अगदी आनंदानंं."
पण ३०० मुलांसाठी एक तज्ज्ञ हे प्रमाण विषम वाटले.
शोध सुरूच होता.
किरण पुरंदरेसरांशी गप्पा सुरू होत्या.

सरांकडून एक संपर्क मिळाला संजीव नलावडे सर. 
त्यांच्याकडून आणखी एक संपर्क मिळाला.
निखील जोशी सर.

Zoology मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले. कीटक वेडापायी अगदी पूर्वांचलपर्यंत भरपूर भटकंती केलेले. यासंदर्भात काही शोधनिबंध लिहिलेले. सध्या MIT-WPU मध्ये सहाय्यक संशोधक म्हणून कार्यरत असलेले निखील सर.
"सर, तुम्ही मला निखील म्हंटले तरी चालेल."
या एका वाक्यात माझे अनेक प्रश्न संपले होते.
आनंदानंं तयारी दर्शवली त्यांनी.
मग चक्क इयत्ता वाटून दिल्या.
६ वी साठी राहुल सर तर ७ वी साठी निखील सर.
तोपर्यंत तिकडे मुलांना घरात, अंगणात दिसणाऱ्या कीटकांचे फोटो ग्रुप वर पाठवायला सांगून झालंं होतंं.
त्यामुळे मुलांच्या माना आधी पक्ष्यांसाठी वर होत्या;
आता त्या खाली गेल्या होत्या.
'य' फोटो ग्रुपवर येऊ लागले.

मुंगी, झुरळ, डास, चिलीट, फुलपाखरू, चतुर...
धान्यातील किडे, भाजीतील अळ्या काही म्हणून सोडलंं नाही मुलांनी.
नाव माहीत नसलेल्या कीटकांचे फोटो यांच्या काही पट होते.
(माझ्या मुलीनंं हा प्रकल्प होईपर्यंत मोबईलला हात न लावण्याचा संकल्प केला. उघडला की किडेच दिसायचे ना.)
मीही जरा मग घरातील, अंगणातील मला नावानंं माहिती असणाऱ्या कीटकांची यादी करायला घेतली.
१७ कीटक झाले ओ!
तरी यात उपप्रकार धरले नाहीत. 
कोळ्यांचेच तीन-चार प्रकार दिसले घरात व अंगणात.
(कोळ्यांना शोधत त्यांचे फोटो काढताना माझ्याकडे बघणाऱ्या घरच्यांच्या नजरा पाहण्यासारख्या होत्या.)
बहुधा कोणतेही घर यांच्यापासून सुटत नाही.
दोन्ही तज्ज्ञांशी व्याख्यानाविषयी सविस्तर संपर्क झाला.
दोन्ही व्याख्यानं केवळ अप्रतिम झाली.
कीटक म्हणजे काय?
त्यांची वैशिष्ट्ये, प्रकार, वर्गीकरणाची पद्धत...सबकुछ होतं व्याख्यानात.
अधूनमधून धक्केही बसत होते.
काही कीटक कात टाकतात.
कोळी हा कीटक नाही.
कोळ्याला ६ ते ८ डोळे असतात.
मानवाला दोन पंखांच्या कीटकांपासून अधिक धोका असतो.
कीटकांचे पाय छातीखालून आलेले असतात.
गोम व पैसा या संधिपाद प्राण्यातील फरक त्यांच्या उदराच्या एका खंडातून पायाच्या किती जोड्या आल्या आहेत यावरून होतो.
(कधी एकदा घरात गोम दिसते असंं झालंं मला.)
सव्वा तासाची सुंदर मांडणी झाली.
सोबत कीटकांचे आकर्षक फोटो व माहिती असलेले ppt होतेच.
व्याख्यानंतर मुलांनी प्रतिसाद व प्रश्नांनी chat box भरून टाकला.
व्याख्यान मुलांपर्यंत पोहचल्याची ती खुण होती.
कीटक प्रकाशाकडे का आकर्षित होतात?
घरमाशी एका ठिकाणी बसली की मिशा का घासते?
सर्वात लहान कीटक कोणता?
"प्रश्न पुरे करा आता," असंं शेवटी सांगायला लागलंं. 
जवळपास १० दिवस मुले फोटो काढून पाठवत होती.
एक अभ्यासपूर्ण व्याख्यानही त्यांनी आता ऐकलंं होतंं.
तिसरा टप्पा सुरु करण्याची वेळ झाली होती आता.
यावेळी व्याख्यानावर आधारित एक प्रश्नावली दिली मुलांना.
उत्तरे पाहून मुलांनी व्याख्यान कानांनी व डोळ्यांनी नीट पाहिल्याचे लक्षात आले.
या प्रश्नावलीवर चर्चा झाली.
पुढच्या तासाला चर्चा करून कीटक निरीक्षण सूची तयार करण्यात आली.
त्याआधारे एका संधिपाद प्राण्याचे निरीक्षण करण्यास सांगण्यात आले.
"झुरळंं, डास बिनधास्त मारा. बाकी कीटकांचे लांबूनच निरीक्षण करा. मोबाईल मध्ये फोटो काढा. तो झूम करून बघा...कुठे दिसला, आकार, रंग, पंख किती इ. इ."
याशिवाय परिसरात जे कीटक दिसतात त्यांचे वर्गीकरण करून ठेवण्यासही सांगितले.
चार पंख असलेले / दोन पंख असलेले, नांगी असलेले \ नसलेले, सोंड असलेले / नसलेले इ. इ.
विज्ञान अध्यापिका स्मिताताईंनी मस्तच लक्ष घातलंं या सगळ्यात.
इतका कीटक अभ्यास पुरेसा वाटला.
...................
निखील दादाला माझा तो व्हिडीओ पाठवला.
"निखीलजी हे कोणते कीटक आहेत? इतक्या लवकर कसे मरतात?"
"अहो ते वाळवीचे कीटक आहेत. प्रौढ झाले की पंख येतात त्यांना. ते मरत नाहीयेत आणि ते. जोडीदार सापडला की स्वत:हून आपले पंख झडून घेतात. मग मेटिंग होते त्यांचे."
"आईशप्पथ... मी काय समजत होतो आणि काय होतंं हे."
केवळ अजब आहे निसर्ग...केवळ.
.....................................
शाळेतील गच्ची बागेतील आहे
अंगणात बसलो होतो.
एक कोळी गोल गोल फिरत होता.
या महाशयांचे काय चालले आहे हे बघायला म्हणून जवळ गेलो.
तर जाळंं विणणंं सुरु होते.
तयार जाळंं खूपदा पाहिलंं होतंं.
आज विणताना पहात होतो.
काय ती कारागिरी.
आधी उभे धागे टाकून झाले होते.
आता गोलाकार धागे टाकणे सुरु होते.
दोन धाग्यातील अंतर समान ठेवत.
३० च्यावर गोल केले पठ्ठ्यानंं काही वेळातच.
जीव तर कितीसा तो.
मग स्वारी बरोबर मध्यभागी जाऊन बसली.
सावजाच्या शोधात.
आज अंगणाने हेही दृष्य दाखवलंं.
स्वतःला विसरण्याचा अनुभव मिळतो अशा वेळी.
..........................
अजून एक गंमत.
किरण पुरंदरे सर सांगत होते,
"पावसाळा आपल्या परिसरातील अनेक छोट्या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो."
(अहो का काय का?)
"या काळात सगळीकडंं हिरवगार असतं. अशा वेळी पक्ष्यांना सहजच 'दडण' (लपायला जागा) मिळतं. घरटी सुरक्षित राहण्याची शकयता वाढते. अनेक वर्षायु वनस्पती उगवून आलेल्या असतात. त्यांच्यावर जगणाऱ्या अनेक कीटकांची पैदास झालेली असते. त्यामुळे पक्ष्यांना त्यांच्या पिलांसाठी सहजच खाद्य उपलब्ध होतं..."
"सर आणि त्यातून कीटक नियंत्रणही सहज होतं असेल ना?"
"अहो अर्थातच..."
आमचे परिसर अभ्यासाचे दोन घटक एकमेकांशी असे जोडले गेले होते तर...
कमाल ना...
बाकी एखादा 'कीटक किडा' आमच्या विद्यार्थ्यातूनही निघावा...

शिवराज पिंपुडे
विभाग प्रमुख,
पूर्व माध्यमिक विभाग, 
ज्ञान प्रबोधिनी, निगडी 


Comments

  1. खूपच अचूक व नेमके वर्णन छान शिवराज

    ReplyDelete
  2. मस्तच तुला आणखी चार माणसे जोडता आली मुलांना नवीन उपक्रम देता आला तुझा डोळसपणा खूप भावला कीटकापासून कीटक तज्ज्ञापर्यतचा तुझा हा प्रवास आवडला
    असेच नित्य नवे दिसावे
    . . . . आई

    ReplyDelete
  3. मस्तच तुला आणखी चार माणसे जोडता आली मुलांना नवीन उपक्रम देता आला तुझा डोळसपणा खूप भावला कीटकापासून कीटक तज्ज्ञापर्यतचा तुझा हा प्रवास आवडला
    असेच नित्य नवे दिसावे
    . . . . आई

    ReplyDelete
  4. छान.. आता या मालिकेत पुढे..???!!! वनस्पतीशास्त्रात घेऊन जाणार काहीकाळ अजून प्राणीविश्वातच रमवणार..!! खरोखरीचा परिसर अभ्यास!!! मस्त!!!!

    ReplyDelete
  5. लै भारी...
    लई न्यारं..
    लई झ्याक....
    लै वांड.....
    करते रहो, लिखते रहो !!!!

    ReplyDelete
  6. एक वेगळा अनुभव आणि माहितीपूर्ण लिखाण.खुप छान.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog