#लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास - भाग १

लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास - भाग १

शाळेत गेलो होतो.
विशेष काही काम नव्हतं.
सहजच.
मधल्या चौकात आलो आणि समोर लक्ष गेलं.
चक्क बाजरी उगवली होती.
छान कणसंही लागली होती.
ही कुठल्या तरी सेवकाची करामत असावी.
शाळेत बाजरीची कणसंं...
क्या बात है!
आणि विशेष म्हणजे त्यातील एका कणसावर एक छोटुसा पक्षी निवांत दाणे टिपत होता.
दबक्या पावलांनी जास्तीत जास्त जवळ गेलो. 
रंग तपकिरी आणि पोटाखाली पांढरे ठिपके होते त्याच्या.
ते पांढरे ठिपके आणि बाजरीच्या दाणे एकमेकांत बेमालूम मिसळले होते. 
मस्त फोटो मिळाले.
बऱ्याच वेळा दिसतो हा पक्षी शहरातही.
त्याचे नाव मात्र मला आठवता आठवेना.
लगेच उमेश वाघेला सरांना फोटो पोस्ट केले.
काही क्षणातच नाव आलं. 
ठिपकेवाली मुनिया.
खरंच आपल्या आसपासच हे सगळं विश्व असतं.
पण कधी आपल्याला सवड नसते तर कधी उत्साह.
कधी आवश्यकता वाटत नाही तर कधी जाणीवच होत नाही.
सध्याच्या लॉकडाऊनमध्ये हा परिसरच विद्यार्थ्यांना डोळसपणे पाहिला लावला तर...
वा! मजा येईल...
पण खरंच इतके पक्षी असतील शहरात?
अशी कितीशी संख्या असेल??
की कावळे आणि पारव्यांचेच फोटो येतील???
प्रश्न आणि केवळ प्रश्न.
करून तर पाहू...
संध्याकाळी सूचना तयार केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व वर्गावर पोस्ट केली.
पहिलाच फोटो आला तो गॅलरीत अवतीर्ण झालेल्या धनेशचा. 
मी अवाक्. 
हे जरा अति होतंय असं वाटलं. 
म्हणजे ठीकए; धनेश दिसतो आमच्या इथे क्वचित.
पण गॅलरीत???
सर्व ग्रुप फोटोंनी भरभरून वाहू लागले.
तारेवरचे, झाडावरचे, छपरावरचे, अंगणातील पक्षी व्हाट्सअप ग्रुपवर बागडू लागले. 
एकीकडे मी मला माहीत असलेल्या पक्ष्यांची यादी करत होतो आणि एकेक निवडक फोटो नचिकेतला पाठवत होतो. 
होय सांगतो. 
नचिकेत हा आपलाच माजी विद्यार्थी.
२०१७ ची बॅॅच. 
सध्या इंजिनिअरिंग करतोय. 
पाचवीत असल्यापासूनच पक्षीनिरीक्षणाची आवड लागली. 
चिंचवडमधील थेरगावच्या घाटावर तासन् तास  घालवलेत याने. 
मग हौसेला अभ्यासाची जोड दिली. 
पुस्तकं वाचून काढली. 
भटकंती सुरू केली. 
अभयारण्याच्या वाऱ्या केल्या. 
किरण पुरंदरे सरांसोबत सोबत हिंडून आला. 
चांगलीच नजर बसली आहे आता याची. 
केवळ नावच नाही तर इत्यंभूत माहिती सांगतो कोणत्याही पक्ष्याची.
"नचिकेत एक मस्त पीपीटी करून ठेव. चांगले फोटो घे. पक्ष्यांची थोडक्यात माहिती, ओळखण्याची मुख्य खूण असं सगळं स्लाईडवर असू देत. आणि हो मुलांनी ज्या पक्ष्यांचे फोटो पाठवलेत तेच घे फक्त. मस्त संवाद कर."
आवडीचा विषय.
लगेच कामाला लागला पठ्ठ्या.
काही मुलंं अद्याप गावीच आहेत. 
त्यामुळे काही वेगळे फोटोही ग्रुपवर येतील अशी मला खात्री होती. 
खात्री सत्यात उतरली. 
पक्ष्यांच्या घरट्यांचे, अगदी पिलांचेही फोटो ग्रुपवरती आले.
मुलांना दिलेली मुदत संपली होती.
आठवड्याभरात थोडेथोडके नाही तर चक्क तीस-पस्तीस प्रकारचे पक्षी मुलांच्या नजरेनंं आणि मोबाईलच्या कॅमेरानंं टिपले गेले होते. 
याचा अर्थ एकीकडे चिमण्या दिसेनाश्या झाल्या आहेत अशी ओरड असली तरी अद्याप इतके पक्षी शहरी वातावरणातही टिकाव धरून आहेत.
छान वाटलं.
फोटोखाली पक्ष्याचंं नाव देण्याचा मोह मुलांना होत होता. 
त्यामुळे मैनेला कोकिळा, कोतवालला बुलबुल असंंही नामकरण सुरू झालं होतंं.
मुलांचंं काम आता संपलंं होतंं. 
आता वेळ होती नचिकेतची.
शनिवार उजाडला.
२९४ विद्यार्थी दिलेल्या लिंक वर जॉईन झाले.
त्यामुळे जरा गडबड झाली खरी.
पण नचिकेतनंं लवकरच पकड घेतली.
पक्ष्यांच्या खाद्यानुसार त्यांच्या चोचीची रचना, निवासाच्या ठिकाणानुसार पायांची, बोटांची रचना इथपासून ते विणीच्या हंगामाचा कालावधी, भारतातील सर्वात मोठा पक्षी, छोटा पक्षी असं खूप काही नचिकेत भरभरून बोलला.
त्यानंं काढून दाखवलेल्या पक्ष्यांच्या आवाजानंं तर मुलं हरखूनच गेली.
सलग दीड तास मांडणी आणि नंतर अर्धा तास प्रश्नोत्तरे.
नचिकेतचा अभ्यास, बोलण्याची पद्धत, सोबत ppt ची असलेली जोड...
सत्र एकदम बढीया झालं.
समारोप मी केला,
"मुलांनो उद्याचा रविवार पक्षी निरीक्षणाचा वार म्हणून साजरा करू. आता मात्र नावानिशी नोंदी करा. तुम्हाला सोपे जावे म्हणून नचिकेत दादाचे ppt ग्रुप वर पाठवून ठेवतो. त्याचा वापर करा. आणि हो नवीन कुठला पक्षी दिसला तर फोटो काढायला विसरू नका..."
५ वी, ६ वीसाठी इतकंं पुरेसं वाटलं.
७ वीनंं मात्र जरा आठवडाभर निरीक्षण करून संख्येनिशी नोदी कराव्यात असंं वाटलं.
याबाबत त्यांच्याशी एक छोटा संवाद केला.
काय करायचंं, कसंं करायचंं हे समजावून सांगितलंं.
येत्या रविवारी गुगल फॉर्म पाठवून त्यात नोंदी भरून घेण्याचंं ठरलंं आहे.
आपल्या परिसरातील पक्षीगणना. 
मुलांसमोर आज पक्ष्यांचे विश्व उलगडलंं गेलं होतं.
पक्षी हे आपल्या परिसराचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
पर्यावरणाच्या दृष्टीनंं त्यांचंं एक स्थान आहे.
ते ओळखायला हवंं.
जपायला हवंं.
नावानिशी पक्ष्यांची ओळख हे त्यातील पहिलंं पाऊल.
परिसर अभ्यासातील एका भागाच्या अभ्यासास सुरुवात झाली होती...
...........................
मीही एक धडा घेतला.
परिसरातील पक्षी निरीक्षण झाल्याशिवाय भिगवणला मुलांना नेणार नाही;
याआधी झालेली चूक दुरुस्त करेल.
...........................
व्याख्यानानंतर नचिकेतला फोन झाला.
"नचिकेत मस्त झालं रे व्याख्यान. मुले अगदी रंगून गेली होती. किरण पुरंदरे सर नागझिर्याला राहायला गेले आहेत. कायमचे. त्यांची उणीव भासू देऊ नकोस मित्रा आम्हाला."
...........................
व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी मला एक व्हिडीओ व msg आला.
'दादा काल व्याख्यान चालू असतानाच योगायोगानंं आमच्या बाल्कनीत मुनियाची जोडी घरटंं करायला आली. व्याख्यान झाल्यावर अमोघनं खूप वेळ त्यांंचे व्हिडीओ शुटींग केले. त्याचा हा fast forwarded video.'
"अरे वा मस्तच. रोजच्या रोज निरीक्षण ठेवायला सांगा. किती दिवसात घरटे पूर्ण झालंं? त्यासाठी रोज किती तास पक्षी काम करत होते? काय काय साहित्य वापरलं? घरटे पूर्ण झाल्यावर किती दिवसांनी अंडी घातली? पिले किती दिवसांनी बाहेर आली? इ. इ... छान प्रकल्प होईल."
मला खूपच उत्सुकता आहे या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची.
तुम्हाला?
...........................
आठवडा होऊन गेला होता.
पक्षी गणनेविषयी संवाद करून झाला होता.
७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ४ दिवस निरीक्षण, नोंदी करून गुगल फोर्म भरला.
त्यासाठी ३\४ जणांनी तरी ppt मध्ये नसलेले फोटो पाठवून त्या पक्ष्यांची नावे विचारली.
विषयं मुरत असल्याची ही एक छोटी खुण होती.
हे झाल्यावर विज्ञान अध्यापिका स्मिताताई माने यांनी उत्स्फूर्तपणे वीणा गवाणकर लिखित डॉ. सालिम आली यांचं छोटेखानी चरित्र pdf स्वरुपात पाठवलं.
वाचनासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली.
छान वाटलं.
आता खऱ्या अर्थानं परिसरातील पक्षी निरीक्षण हा विषय पूर्ण झाला असं वाटलं.
करोनाच्या नजरकैदेतून सुटल्यावर आमचा नारा ठरला आहे.
चलो भिगवण...

(नचिकेतने केलेले ppt)

शिवराज पिंपुडे
विभाग प्रमुख,
पूर्व माध्यमिक विभाग,
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय.

Comments

  1. छान शब्दबद्ध केलय.nice to read.
    It's good to grow, taking along with subordinates.
    V good activity.
    Rgds,

    ReplyDelete
  2. शिवराज दादा यांच्या डोक्यात काय कल्पना येतील काही सांगु शकत नाही.सहज शाळेत बाजरीच्या कणसावर बसलेला पक्षी पहाणे आणि त्याच्या निरीक्षण नजरेतुन मुलांना आपल्या आजुबाजूला आसणारया पक्षाचे निरीक्षण करायला सांगुन मुलांच्या ज्ञानात पक्ष्याच्या बाबत भर घालणे खुपच भारी उपक्रम आपली मुले नशीबवान त्यांना असे अध्यापक मिळाले जे पुस्तका बाहेरचे ज्ञान मुलांना देत आहे.
    खुपच भारी दादा

    ReplyDelete
  3. फारचं सुंदर लिहिलय दादा.
    चांगल्या गोष्टींचं वेड लावून घ्यावं ते आपल्याकडून. अनेकांना उपयोगी होणारा अनमोल ठेवा आहे हा.

    ReplyDelete
  4. कमाल कल्पना आहे....लेखन उत्तम ! सर्वच प्रयोगशील अध्यापकांनी करून बघावेत अशा उपक्रमांपैकी एक ! स्वतः अभ्यासपूर्वक, अन्य तज्ज्ञ मार्गदर्शक मिळवत उपक्रम घडवून आणणे कमाल आहे. नित्य काम करण्यातला उत्साह नुसतं वाचणाऱ्याचाही वाढेल यात शंकाच नाही....चला, उद्यापासून घराजवळ दिसणाऱ्या पक्ष्यांचे फोटो कुठे पाठवायचे याला एक हक्काची जागा मिळाली.....

    ReplyDelete
  5. शिवराजदादा, सलाम तुला! भारी दिसतं आणि सुचतं तुला!!

    ReplyDelete
  6. भारी रे
    अंबाजोगाई परिसरातील पक्षांचे फोटो व त्यांची माहिती असणारे पुस्तकच काढले आहे पक्षीमित्र ग्रुपने..
    178 पक्ष्यांची माहिती आहे त्यात

    ReplyDelete
  7. शिवराज खूपच छान,एक दाना लावलाकी शेकडो दाण्यांचे कणीस युगवते आणि तुझ्या सारख्या पारख्याच्या नजरेस पडलेकी अशा कणसांतून दाण्यांची मोठी रास उभी राहते याच खूप छान उदाहरण तू घालून दिले आहे.एका कळत नकळत लावलेल्या,उगवलेल्या कणसांतून एव्हढं मोठं काहीतरी हे फक्त आणि फक्त प्रबोधिनीतच आणि प्रबोधिनीचेच तुझ्या सारखे विद्यार्थी करू शकतात.मन:पूर्वक अभिनंदन!👌💐

    ReplyDelete
  8. आपले संधटन-कौशल्य उत्तम. कोणाचे कोणत्या वेळी कशा प्रकारचे सहाय्य आपण मिळवू शकू याचाही अभ्यास छान; अर्थात आपले हे सोबती प्रतिसादी आहेत ही जमेची बाब...
    आपल्या शोधक नजरेस उपक्रम गवसावा. सहका-यानी त्यात रंग भरावेत अन् विद्यार्थ्यांच्यात तो रूजवावा अशा पद्धतीने लाॅक डाऊन मधेही Show must go on असे काम पाहून निश्र्चितच आनंद वाटतो.

    ReplyDelete
  9. खूपच छान कल्पना आणी उपक्रम. लॉक डाऊन मुळे माणूस घरात अडकला आणि निसर्ग मुक्त हस्ते बहरला. आम्ही सुद्धा राहत्या घरातून कितीतरी पक्षी पाहिले. तांबट पक्षाचे फांदी कोरून घर बनवणे , पिल्लू वाढवणे हे पाहणं खूपच भारी होत.

    या सगळ्या तुन परीसर शिक्षण होत ते तुझ्यासारखे पारखी शिक्षक लाभल्या वर . छोट्या छोट्या गोष्टीतून नाविन्यपूर्ण कल्पना , हे तुझं विशेषण . आणी असे शिक्षक सोबत आहेत हे आमचं भाग्य.निरीक्षण, नोंदी, रेफरन्स शोधणं, समपातळीत इतर अभ्यास, एक्सपर्ट शी संवाद, निसर्गाच्या विविध गोष्टींचा मागोवा, सारेच थक्क करणारे. हे सर्व सुचणे म्हणजे हे तूच करू शकतो, कमाल .

    हा प्रकल्प पुर्ण झाल्यावर वाचायला नक्की आवडेल. आम्हाला पण उत्तरे ऐकण्याची उत्सुकता आहे. थोडीफार निरीक्षणे आणी फोटो आम्ही सुध्दा काढले आहेत. काही उपयोगी पडणार असेल पर्सनल ला तर पाठवतो.



    ReplyDelete
  10. शिवराज दादा मस्त आणि अभिनव उपक्रम. खरंय आपण पक्षी बघायला दूर दूर जातो पण आपल्या जवळपास दिसणाऱ्या पक्षांच्याबद्दल आपल्याला माहिती नसते. मुलांना छान कामाला लावलं. घर बसल्या पक्षी विश्वाबद्दल त्यांच्यात कुतूहल निर्माण झालं. उत्तम!

    आणि हो आपल्या शहरी परिसरात धनेश दिसतो. मला माहीत नव्हतं. 👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog