#खेळ मांडियेला...


खेळ मांडियेला...
ही गोष्ट आहे सुमारे 7-8 वर्षांपूर्वीची.
खेळण्याचं एकही दुकान पालथं घालायचं सोडलं नव्हतं मी.
अक्षरशः मिळेल तिथून दिसेल ते खेळणं खरेदी केलंय.
कधी शाळेतून घरी यायला उशीर झाला तर आई विचारायची नातीला, ’काय ग तुझा खेळणीवाला बाबा आला नाही का अजून?’
परत एकदा बारसं केलं होतं तिने माझं.
एकदा असाच खेळण्याच्या शोधात एका मॉलमध्ये पोहचलो.
खेळण्यांचं मोठ्ठं प्रदर्शन भरलं होतं तिथंं.
बहुतांश खेळणी परदेशातील.
हरखूनच गेलो ती ecotoys पाहून.
सर्व खेळणी लाकडी.
सुंदर नैसर्गिक रंग, सुंदर रचना, एकाहून एक उत्तम कल्पना, अप्रतिम फिनिशिंग आणि उत्तम पॅकिंग.
एक उदाहरण देतो.
एका खेळण्यात छोट्या छोट्या रंगीत लाकडी मधमाश्या होत्या.
त्यांना इवले इवले रंगीत कापडी पंख होते.
त्यांच्या घराच्या (पोळ्याच्या) आकाराचे छोटे छोटे रंगीत ब्लॉक्स होते.
आणि एक लाकडी चिमटा होता.
आता करायचं काय तर...
चिमट्याने एकेक मधमाशी पकडायची आणि अलगद एकेका  ब्लॉकमध्ये ठेवायची.
हे झालं मुलाचं motor skill.
गंमत अशी की ते ब्लॉक एकमेकांवर रचून तुम्ही वेगवेगळ्या  रचना करू शकता.
ही झाली मुलाची कल्पनाशक्ती.
पण मग तुमचं motor skill पण पणाला लागणार.
कारण हात थोडा जरी हलला, चिमटयाचा धक्का इकडेतिकडे लागला की कोसळला तुमचा डोलारा.
आणिक एक गंमत म्हणजे मधमाश्यांचे जे रंग आहेत तेच रंग ब्लॉकला आहेत.
मुलगा हुशारीने मधमाशी ज्या रंगाची आहे त्याच रंगाच्या ब्लॉकमध्ये ती टाकतो का हे पहायचं.
ही झाली मुलाची निरीक्षण क्षमता.
(फोटो सांगेलच तुम्हाला मी काय म्हणतोय ते.)
एकूणच ही सगळी प्रक्रिया पाहताना भारी मज्जा येते.
असं प्रत्येक खेळण्याविषयी सांगता येईल.
(खेळण्यांंतून मुलांचे काय शिक्षण होते यावर मा. विवेकराव पोंक्षे  यांच्या मार्गदर्शनाखाली मी काही अभ्यास केलाय.
त्यावर लवकरच स्वतंत्र लेख लिहायचं मनात आहे.)
असो.
तर त्या मॉलमधील एक खेळणं उत्सुकतेने हातात घेतलं.
किंमत पाहिली.
३००० रु.
बापरे.
इतकं तर वार्षिक शुल्कही नाही आपल्या जम्मत घराचं.
(जम्मत घर म्हणजे आमच्या शाळेतील खेळण्यांची लायब्ररी.)
थोडंसं खट्टू व्हायला झालं.
तितक्यात घसघशीत २५% डिसकाउंटच्या पाटीवर नजर गेली.
परत एकदा डोळे चमकले.
मनातल्या मनात हिशोब चालू झाला.
पण पैशाचं गणित काही जुळेना.
तिथूनच देवळेकर सरांना (शाळेचे केंद्र उपप्रमुख) फोन लावला.
यांच्याकडे कोणताही हट्ट करू शकतो मी.
आणि बहुतेक वेळा त्यांनी तो पूर्णही केलाय.
‘सर खेळणी घ्यायाचीयेत.’
‘घे की मग.’
‘नाही किंमत थोडी जास्त आहे.’
‘घे रे ५-१० हजाराने काही बिघडत नाही.’
‘नाही सर थोडी आणखी जास्त आहे.’
‘किती?’
‘एक लाख.’
‘काय?’
‘ये आपला परत.’
‘सर...’
‘भेटून बोलू.’
‘हं.’
(दिवस दुसरा. ठिकाण सरांचं कार्यालय.)
‘सर ऐका ना खेळणी खूप मस्त आहेत.’
२५% डिसकाउंट चालूये.
अत्यंत आधुनिक खेळणी आहेत.
आपण खेळण्यांची लायब्ररी चालवतो तर ही खेळणी असलीच पाहिजेत आपल्याकडे.
सर...सर परत अशी संधी नाही मिळणार.
घेऊयात ना सर.’
‘अरे पण करणार काय त्या खेळण्यांचं.’
‘ते बघू नंतर.’
आधी खरेदी तर करू.’
‘खर्च वजा जाता जम्मत घराचे किती शिल्लक राहतील वर्ष अखेरीस?’
‘सर सुमारे ५००००.’(हा हिशोब करूनच आलो होतो मी.)
‘आणि बाकीच्या ५०००० चे काय?’
‘मग काय उगीच तुमच्याकडे आलोय का सर.’ (माझा थोडा वैतागलेला सूर...नेहमीसारखा)
थोडा वेळ शांतता.
‘ऐक मी काही मदत करतो.’
‘उरलेले तू मिळव.
परतीच्या बोलीवर.’
‘okk सर.
खूप खूप धन्यवाद.’
लहान मुलाला चॉकलेट मिळाल्यावर कसा आनंद होतो, अगदी तस्साच झाला मला.
परतीच्या बोलीवर पैसे उभे करणं काहीच अवघड नव्हत.
५-६ फोनकॉल्सवर काम झालं.
(ठिकाण परत एकदा ‘तो’ मॉल.)
ऐटीतच प्रवेश केला आज जरा.
सोबत नेहमीप्रमाणे अनुप सावंत व शिल्पा संधाने होतेच.
(यांना मी जम्मत घराचे संस्थापक सदस्य म्हणतो, मानतो.)
तुटूनच पडलो आम्ही त्या खेळण्यांवर.
सुमारे एक लाख तीस हजाराच्या आसपास खरेदी केली.
सूट वजा जाता सुमारे लाखभर रुपयांची खरेदी झाली.
अहो खेळणी किती घेतली म्हणून काय विचारता?
तब्बल ५५. (फारच महागडा मामला होता सारा.)
खरेदी तर झाली.
स्वतःच त्या खेळण्यांशी खेळूनही झालं.
लोकांना बोलावून बोलावून खेळणी दाखवून झालं.
आता...आता...पुढे काय???
सभासदांना तर खेळणी नक्की देता येणार नव्हती.
जम्मत घरात तर ही खेळणी ठेवायलाही जागा नव्हती.
त्यांना शाळेच्या अभ्यागत कक्षात स्थान दिलं.
VIPचं होते ते माझ्यासाठी.
एकीकडे विचारचक्र चालू होतंच.
विचार...विचार...विचार...
अन सुचलं एकदम.
आपण...आपण या खेळण्यांंचंं प्रदर्शन भरवलं तर???
सर्व खेळणी शाळेच्या सभागृहात मांडू.
एकावेळी ५० मुलांना त्यांच्या पालकांसह प्रवेश देऊ.
दोन तास वेळ देऊ.
आणि १०० रु. शुल्क ठेवू.
येतील का पालक १०० रु. शुल्क देऊन?
का नाही?
नक्की येतील.
त्या भक्तिशक्ती चौकात वेगवेगळ्या खेळण्यांत पोरांना बसवतात. त्याचे दोन मिनिटाचे २०रु. देतात.
पोरं नुसतीच 'बसतात'.
'करत' काहीच नाहीत.
इथे तर दोन तासांचे फक्त १०० रु.
आणि या खेळण्यांमध्ये बसायचं नाही तर त्यांच्यांशी मनसोक्त खेळायचं.
बरं खेळणी तर अशी जी कधी मुलांनी पाहिलीही नसतील.
खरेदी तर दूरकी बात.
(......हे सगळ अर्थातच माझं स्वगत बरं)
अजून एक tagline केली...
‘फक्त १०० रुपयात एक लाखाच्या ५० खेळण्यांचा आनंद घ्या.’
बालभवन विभागात जोरदार जाहिरात केली.
२-३ दिवसात २०० पालकांनी नोंदणी केली.
५०-५० मुलांचे ४ गट केले.
दोन गटांमध्ये अर्ध्या तासांचं अंतर ठेवलं.
स. ९ ते रात्री ९.
(ठिकाण शाळेचं मनोहर सभागृह)
आदल्या दिवशीच सर्व खेळणी मांडली.
कुठलं खेळणंं कुठे मांडायचं...
दोन खेळण्यात किती अंतर असलं पाहिजे...
खेळणी जमिनीवर ठेवायची की सतरंजीवर...
बराच विचार करून रचना केली.
या कामात आभाने (मुलगी माझी) आनंदाने मदत केली.
सोबत अनुप, शिल्पा होतेच.
सुरु झाला ‘तो’ दिवस.
पहिले ५० सभागृहात आले....
आणि हरवूनच गेले खेळण्यांच्या दुनियेत.
म्हणजे इतके ‘हरवले’ की पोरगं एका खेळण्याशी खेळतंय आणि आईबाप दुसऱ्या खेळण्याशी.
सारखा ‘जोड्या जुळवा’ कार्यक्रम करावा लागला आम्हाला.
पण सर्व जण जाम खूश.
मनसोक्त बागडली मुलं.
काय करू आणि काय नको असं झालं होतं त्यांना.
पालकांच्याही प्रतिक्रिया बोलक्या होत्या.
'मुलांमुळे आम्हालाही इतकी सुंदर, आधुनिक खेळणी पाहता आली. मुख्य म्हणजे आम्हालाही खेळता आले. बालपणी न अनुभवलेले क्षण अनुभवता आले. जम्मत घराचे खूप धन्यवाद’. – सौ. परळे
‘अप्रतिम खेळणी. नावीन्यपूर्ण संकल्पना. एकाच वेळी मुलांना अनेक प्रकारच्या खेळण्यांशी खेळता आले.’ – श्री. गावडे.
दोन तासही कमी पडले मुलांना.
अक्षरशः काही मुलांना पालकांना ओढत ओढत बाहेर न्यावं लागलं.
परत एकदा विस्कटलेली खेळणी नीट मांडली आणि दुसऱ्या ‘शो’साठी आम्ही तयार झालो.
ठरल्याप्रमाणे ४ बॅचेस पार पडल्या.
दिवस संपला होता.
कल्पनेनं आपला रंग दाखवला होता.
मुले, पालक तर खूश होतीच पण २०,००० चा गल्लाही जमला होता.
दोघांचे पैसे लगोलग परत करून टाकले.
आता...आता पुढे काय???
दुसऱ्या शाळेत?
देतील का संस्थाचालक मान्यता?
येतील का पालक?
परत एकदा प्रश्नांची तीच मालिका.
आणि परत एकदा, करून तर पाहू...असा माझाही नेहमीचाच सूर.
पुण्यातल्या शाळांपासून सुरु झालेला हा प्रवास बारामती, नगर, सोलापूर, अगदी गोव्यापर्यंत पोहचला.
७-८ ठिकाणी लावलेल्या या प्रदर्शनातून तब्बल १००० मुले सहभागी झाली.
पैश्यांचा हिशोब केव्हाच मागे राहिला होता.
मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आमचा ‘ठेवा’ होता.
अर्थात शिल्लक पैशातून परत नवीन खरेदी झाली होती हे सांगायला नकोच.
मग सांगा कधी येऊ तुमच्या शाळेत खेळणी घेऊन...

शिवराज पिंपुडे
शिक्षण समन्वयक
ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र
९४२३२३९६९५, ८८८८४३१८६८


Comments

  1. जबरदस्त ... ♥️
    खरेदी व प्रत्यक्ष उपक्रम करताना ही सगळी तुझी धावपळ बघितली आहे... पण तुझ्या बाजूने हा प्रवास कसा होता हे आज कळलं आणि हा प्रवास वाचायला मजा आली...
    उत्तम लेखन 👏👏

    ReplyDelete
  2. खेळणी आणि तू याचे बरेच अनुभव तुझ्यासोबत घेताना मीही खूप समृद्ध झाले आहे.

    पण त्याहीपेक्षा छान वाटत आहे तुला व्यक्त होताना अनुभवताना.
    लेखन हे मागे पाऊलखुणा सोडतात.
    काहींना समाधान, काहींना प्रेरणा देतात.
    काम तर आधीपासूनच उत्तम करतोस पण हा लेखनप्रपंच पण जप.
    खूप शुभेच्छा💐

    ReplyDelete
  3. दादा ही सगळी खेळणी पहायची आहेत... आणि आपल्या शाळेतच का नाही घेत आपण दरवर्षी प्रदर्शन??? घेऊयात ना मे मदत करेन नक्की...

    ReplyDelete
  4. दादा ही सगळी खेळणी पहायची आहेत... आणि आपल्या शाळेतच का नाही घेत आपण दरवर्षी प्रदर्शन??? घेऊयात ना मे मदत करेन नक्की...

    ReplyDelete
  5. किती छान ! पुढच्या प्रदर्शनाला यायला आवडेल मला. माझी लेक पण खरं तर खेळणी खेळायच्या वयाचीही नाही पण मलाच खेळायचं आहे. लहानपणीची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करायची आहे.
    तू केलेले लेखन वाचून छोट्या छोट्या गोष्टीतून तुझी शिक्षणा बद्दलची तळमळ जाणवली. तुझ्या लेखनाला , जिद्दीला , चिकाटीला सलाम हो खेळणेवाले बाबा !!!

    ReplyDelete
  6. Khup sundar dada tumchya likhanatun aanik in eak tumcha pails ujedat aala. Pan ya saglyajani eak gostha lakshyat yete ti mhanje tumche dhads aani eakhadi gostha tharvli ki ti tadis nene aani he sagle vidyathya sathi he far far mahtwache aahe. Khup khup subhechya tumchya pudhil likhana sathi aani prayogasathi.

    ReplyDelete
  7. 'Khel madiyela ' ya lekhamadhala tuza pravas achat karnara aahe. Uttam lekhan aahe .vishesh mahnje khelanyanchi pradarshne bharavane hi kalpana pharch aavadli .

    ReplyDelete
  8. शिवराज दादा,
    तुझे हे लेखन वाचल्यावर कळते की तू जो खेळणी घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्या वेळच्या परिस्थितीत जो काही प्रयत्न केल्यास त्यास तोड नाही. पैसे फिटले , हौशी भागली. माझा मुलगा त्यावेळी लहान असता तर त्याच्या बरोबर ही खेळणी बघण्यात किंबहुना खेळण्यास मला आवडले असते. आता सुद्धा नुसती बघायला आवडतील. केव्हा येऊ.
    लेखन अतिशय सुंदर केले आहे.
    👌👌

    ReplyDelete
  9. भार्रीच दादा; खरं तर मी हे सगळं पाहिलंय , काही माहित होतं.....काह माहिती आत्ता वाचुन समजलं....इथवरच्या प्रवासाची......खरं तर आपल्या जम्मत घराकडून प्रेरणा घेऊन( आणि अर्थातच तुमच्याकडून )मी एक छोटेखानी खेळघर सूरू केलंय. माझं brainbooster Toybrary सुरू झालंय . तुम्हाला धन्यवाद आणि खुप खुप शुभेच्छा !!!!

    ReplyDelete
  10. लहानपणापासुन तुझी वक्तृत्व कला ऐकली.
    नंतर वाचनाची आवड पाहिली
    आणि आता तुझी लेखन शैली वाचली.
    कोणतीहि गोष्ट करावयाची तर पूर्ण झोकूनच हा तुझा स्वभाव
    या तुझ्या लेखनशैलीस शुभेच्छा.
    गजानन महाराज अशीच तुला स्फूर्ती देवो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना,
    पप्पा.

    ReplyDelete
  11. अभिनदन ! उत्तम कल्पना !!
    याच संकल्पनेवर आधारित ' BRAiN TiCKLE Cafe' आम्ही ( अंजली ढोले व आशा बापट ) चिंचवड येथील Empire Estate येथे चालवितो. अवश्य भेट द्यायला या. मुलांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद खरच खूप समाधान देऊन जातो. अंजलीताई तुमच्या शाळेत शिक्षकांचे याच विषयावर प्रशिक्षण घ्यायला आल्या होत्या तेंव्हा भेट झाली असेलच. जरूर या.
    आशा बापट

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog