आपल्या व्हाट्सअॅप
मधील काही ग्रुप तात्पुरते असतात. काम झालं की आपण ते डिलीट करतो. पण माझा एक
ग्रुप काम झालं की दहा महिन्यांसाठी सुप्तावस्थेत जातो. दिवाळीच्या साधारण महिनाभर
आधी तो जागृत होतो आणि भडाभडा वाहू लागतो. थोड्याच दिवसात त्याचं बारसंही होतं.
जुनं नाव बदलून नवीन नाव तो धारण करतो. आणि मग ते नाव प्रत्यक्षात आणण्यासाठी २० ते २५ जणांची एक टीम जोरदार प्रयत्न करते... लेखाच्या विषयाबाबत
काहीच समजत नाहीये ना??? सांगतो.
पुण्यात इतिहास
प्रेमी नावाचं मंडळ आहे. प्राध्यापक मोहन शेटे मंडळाचे अध्यक्ष आहेत. या
मंडळातर्फे गेली २० वर्षे दिवाळीत शिवचरित्रातील एखादी लढाई दृकश्राव्य म्हणजे ध्वनीचित्राच्या
माध्यमातून पडद्यावर आणि प्रतीकृतीच्या आणि दिव्यांच्या माळांच्या माध्यामतून
जमिनीवर दाखवली जाते. साधारण पंधरा बाय पंधरा फुटाची युद्धभूमी तयार केली जाते.
लढाईची पार्श्वभूमी, प्रत्यक्ष लढाईचं
रसभरीत वर्णन, लढाईचे परिणाम
सांगणारी एक प्रेरणादायी स्क्रिप्ट शेटे सर लिहितात. त्यांच्याच भारदस्त आवाजात ती
रेकॉर्ड होते. आवाजाला फोटो आणि व्हिडिओची जोड दिली जाते. तर इकडे मैदानात
डोंगररांगा आणि केशरी, हिरव्या, निळ्या लाईटच्या माळांच्या माध्यमातून लढाई दाखवली जाते. त्या
पंधरा-वीस मिनिटात आपण ती लढाई प्रत्यक्ष अनुभवतो. इतिहास शिक्षणाचं हे एक प्रभावी
साधन वाटलं मला. जेव्हापासून या उपक्रमाविषयी समजलंय तेव्हापासून न चुकता दिवाळी
सुट्टीतील एक दिवस या युद्धभूमीवर असतो माझा. सोबत कधी अध्यापक तर कधी विद्यार्थी
असतात.
एकदा पानिपतावरील
रणसंग्राम शेटे सरांनी दाखवला होता. शो संपल्यावर हा सेटअप आपल्या शाळेत उभा करता
येईल की असा एक विचार चमकून गेला. लगेचच शेटे सरांना विचारणा केली. "सगळा
सेटअप उभा करून देतो. लाईट ऑपरेटिंगसाठी मात्र तुमचा माणूस ठेवा फक्त." शेटे
सरांच्या या प्रतिसादाला लगेच होकार भरला. दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यावर मनोहर
सभागृहात ही युद्धभूमी साकारण्यात आली. शेटे सरांच्या कार्यकर्त्यांनी दोन रात्रीतून
काम करून देखावा उभा केला. लाईट ऑपरेटिंगचे काम अवधुतच्या नेतृत्वाखाली युवकांनी
सांभाळलं. अवघड असते ही जबाबदारी. २०-२५ बटणांशी खेळावं लागतं. त्या त्या वाक्याला
ती ती माळ लागली पाहिजे नाही तर फसली तुमची लढाई. आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी, पालकांनी पानिपतचा रणसंग्राम अनुभवला. सगळ्यांनाच भारी
वाटली ही कल्पना.
पुढच्या वर्षीही असाच प्रस्ताव शेटे सरांकडे ठेवला. "यावेळी युद्धभूमी तयार करायला वेळ नाही होणार मला. पण एखाद्या लढाईचा ऑडिओ व्हिडिओ देऊ शकतो मी." थोडक्यात युद्धभूमी आमची आम्हाला तयार करायची होती. "दोन मिनिटात सांगतो सर तुम्हाला." हे काम कोण करेल असा प्रश्नही मला पडला नाही. रघुदादाला फोन फिरवला. "रघुदादा एक काम आहे. तुमच्या आवडीचं आहे..." "दादा प्रस्तावना कशाला सुरूये. आदेश द्या सरळ." विषय संपला होता. रघुदादांनी युद्धभूमी तयार करण्यास होकार दिला होता. (श्री. रघुराज एरंडे – आमच्याच शाळेचे पालक. गडकिल्ल्यांचे अभ्यासक. उत्तम ट्रेकर. ते आणि त्यांचा एक मित्र – ऋषिकेश परदेशी मिळून गेली १० वर्षं चिंचवड गावात दर दिवाळीत एखाद्या तरी किल्ल्याची भव्य प्रतिकृती तयार करतात. त्यांची सगळी दिवाळी इतरांना तो किल्ला दाखवण्यातच साजरी होते.)लाइटिंगच्या कामासाठी एका इलेक्ट्रिशनची मदत आम्ही घेतली. हा प्रयोग यशस्वी झाला.(एक वर्ष शाळेतील हरहुन्नरी तबला अध्यापक पुराणिक सरांनीही यासाठी भरपूर मदत केली.)
मग हे सुरूच राहीलं.
सरांकडून तयार ऑडिओ व्हिडिओ मिळवायचा आणि त्या आधारे लढाई दाखवायची. एकदा पालखेडचा
रणसंग्राम, एकदा कांचनबारीची
लढाई तर एकदा ३०० चौरस फुटांचा हौद बांधून त्यात पाणी सोडून चक्क पद्मदुर्ग
किल्ल्याची प्रतिकृती साकारली. आमचे एक माजी पालक सुधाकर देशपांडे यांनी या
देखाव्यासाठी खास शिवकालीन नौका तयार करून दिल्या.
नववी दहावीचे
इतिहास विषय आवडणारे विद्यार्थी (हो असतात असे काही विद्यार्थी आमच्या शाळेत
दरवर्षी.) एक दोन अध्यापक, युवक कार्यकर्ते
यांची टीमच तयार झाली. महत्त्वाचं म्हणजे नववी दहावीतील मुले अकरावीत बारावीत
गेल्यावरही या उपक्रमासाठी त्यांच्या सवडीप्रमाणे काही दिवस वेळ काढून येऊ लागली. सुरुवातीला
इतिहास अध्यापक असणारे प्रमोद सादुल या गटाचे नेतृत्व करायचे. आता ही धुरा अमेय गुर्जर
वाहतो. शेटे सरांकडून तयार ऑडिओ व्हिडिओ आम्ही घेतो ही गोष्ट मात्र राहून राहून
खटकत होती.
यंदा या
उपक्रमाचं पाचवं वर्ष होतं. आणि या उपक्रमावर लेख लिहिण्याचा मुहूर्त यंदाच्या
लढाईचा निवडला मी. त्याला कारणही तसंच घडलं...
"दादा यावर्षी कोणती लढाई दाखवायची आहे? अमेय माझ्याकडे विचारायला आला होता.
"बोलून घ्या एकदा शेटे सरांशी. कोणतं स्क्रिप्ट
ते देणार आहेत विचारून घ्या."
"यावर्षी मीच लिहायचं म्हणतोय स्क्रिप्ट."
इति अमेय.
मी चमकून त्याच्याकडे बघितलं. आतापर्यंत उभ्यानेच
बोलत होता तो. बस म्हटलं समोर.
"असं झालं तर फारच भारी होईल मित्रा..."
आमची काही चर्चा झाली. काही लोकांशी फोनवर बोलणं झालं
आणि त्याच बैठकीत लढाई ठरली... 'उंबरखिंडीतील कोंडी'
"अमेय, लाग कामाला."
साधारण पंधरा
दिवसांनी अमेय प्रकटला; हातात स्क्रिप्ट घेऊनच. झरझर नजर फिरवली स्क्रिप्टवर.
झक्कास झालं होतं लेखन. "मस्तच रे मित्रा. लेखन शेटे सरांना पाठव. सुधारणा
विचारून घे." दोन-तीन दिवसांनी सरांचा मेसेज आला. 'छान झालं आहे स्क्रिप्ट.' निम्मी लढाई जिंकली होती आम्ही. आता रेकॉर्डिंगची निम्मी
लढाई बाकी होती. आमच्या शाळेत काहीही रेकॉर्ड करायचं म्हटलं तर मोजकी नाव ठरली
आहेत. फार विचार करावा लागत नाही. त्यातही ते लेखन ऐतिहासिक असेल तर कोणाचा आवाज
द्यायचा असला विचार कुणी करत नाही. एकमेव नाव असतं. निगडी केंद्राचे व्यवस्थापक
आदित्यदादा शिंदे. केंद्रप्रमुख मनोजराव देवळेकर यांच्या कृपेने अद्ययावत
रेकॉर्डिंग स्टुडिओ शाळेतच आहे आमच्या. एक दिवस आदित्यदादांनी वेळ काढला आणि ते
स्क्रिप्ट जिवंत झालं. एडिटिंग करणाऱ्या केदार दादाला फार काही काम नव्हतं. फक्त
ते सजवायचं होतं. आता पूर्ण लढाई जिंकल्याचा भाव होता माझ्या मनात. "दादा
रेकॉर्डिंग, एडिटिंग सगळं
झालंय. एकदा पाठवतो तुला ऑडिओ. ऐकून घे. आणि यावर्षी लाइटिंगचं कामही आपणच करूया.
बाहेरून कोणाची मदत नको. नववीतील तीन विद्यार्थी त्यावर काम करताहेत. आणि हो
प्रोग्रामिंग असेल यावेळी. बटन दाबून खेळ करावा लागणार नाही. सगळं ऑटो असेल. त्या
त्या प्रसंगाच्या वेळी ती ती लाईटची माळ आपोआप लागेल." अमेय बोलत होता. हे
माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. हे आम्ही करू असा विचारही शिवला नव्हता मला. अमेयने
अजून एक षटकार ठोकला होता. लगेच त्या तिघांना बोलावणं
धाडलं. अजून काहीही काम त्यांनी केलं नव्हतं. पण
त्यांच्या या कल्पनेसाठीच भरभरून कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या. तर सार हे आहे
की यावर्षी या उपक्रमाच्या बाबत आम्ही स्वयंपूर्ण झालो होतो. आणि म्हणूनच लेख
लिहिण्याचा मुहूर्त यंदाच्या लढाईचा निवडला मी. व्हाट्सअॅप ग्रुपचं नामकरण झालं
होतं ‘उंबरखिंडीतील जबरदस्त कोंडी!’ ग्रुप वाहू लागला होता आणि.
युद्धभूमी तयार होताना...
कुठे कुठे काय
काय दाखवायचं याचे कागदावर नकाशे तयार केले गेले. त्यानुसार साहित्याची जमवाजमवी सुरू
झाली. पन्नास एक तेलाचे डबे जमवले की पोरांनी. त्यातले पंधरा डबे माझ्याच घरचे
होते. नाही नाही इतकं तेल नाही लागत आम्हाला. यावर्षी गणपतीत तिकोना किल्ला तयार
केला होता आम्ही घरी. त्यासाठी हे डबे वापरण्यात आले होते. यंदाच्या गणेशोत्सवात
किल्ल्यावर आमचे बाप्पा विराजमान झाले होते. गणेशोत्सव संपल्यावर ते डबे थोडीशी लांबची दृष्टी ठेवून मी शाळेत पोहचवले होते. युद्धभूमीच्या एका कोपऱ्यात मातीचा ढीग लागला होता.
सात आठ बादल्यातून वर्तमानपत्र फाडून कागदाचे कपटे भिजवायला टाकण्यात आले होते.
पोती, प्लायवुड असं
बरंच काही जमवण्यात आलं होतं.
धनत्रयोदशीच्या
दिवशी रात्री शाळेत चक्कर मारली. १४-१५ युवक युवती कामात मग्न होते. तितक्यात
रघुदादा आणि त्याचा मित्र ऋषिकेशही पोहोचला. संभाव्य युद्धभूमीच्या भोवती बैठक
झाली आमची. प्रत्येक प्रसंग कसा दिसणार आहे, किती आकारात यावर्षी लढाई दाखवायची आहे, किती दिवसात काम उरकलं पाहिजे, फ्लायर कधी व्हायरल करायचा आहे अशा बऱ्याच मुद्द्यांवर
चर्चा झाली आमची. त्याच रात्री
कामाला सुरुवात करण्यात आली. ‘सह्याद्रीचे सांगाती’ या पुस्तकाचा आधार घेऊन
जमिनीवर खडूने आखणी करण्यात आली. घाट आणि
कोकण यांच्यातील उंची निश्चीत करून त्यानुसार तेलाचे डबे लावण्यात आले. त्यांच्या
बाजूने दगड रचण्यात आले; त्यामुळे डब्यांचे सरकणे बंद झाले. वरच्या बाजुतील
तेलाच्या डब्यांवर प्लाय ठेवण्यात आला. त्यावर सह्याद्री आकार घेणार होता. विटांच्या
सहाय्याने घाटवाटांचे, नद्यांचे मार्ग
दाखवण्यात आले.
पुढचा दिवस भाकड
दिवस होता. हा उपक्रम सुरू झाल्यानंतर मला दिवाळीतील भाकड दिवसच अधिक आवडू लागला
आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येने कामाला येतात त्या दिवशी. नरकचतुर्दशी दिवशी
संध्याकाळी सहा वाजता अमेयला फोन केला. शाळेतच होता पठठ्या. आजच्या कामाची चौकशी
केली त्याच्याकडे. वेग घ्यायला पाहिजे असं बजावलं त्याला. अमेय आमच्याच शाळेचा
माजी विद्यार्थी. शिक्षण पूर्ण करून बँकेत कामाला लागला. मन रमलं नाही त्याचं. शाळेत
एक जागा निर्माण झाली आणि पठ्ठ्या बँकेची नोकरी सोडून रुजू झाला. त्याच्या
मुलाखतीच्या वेळी त्याला सहज म्हणालो होतो, “बँकेला शाळेपेक्षा खूपच कमी सुट्ट्या
असतात. ही सवय मोडू नकोस शाळेत रुजू झालास की.” फारच मनावर घेतलंय त्यानं हे वाक्य
असं अधून मधून जाणवत राहतं.
नरक चतुर्दशीच्या
मुहूर्तावर मातीकाम झालं. सगळ्या विटा, पोती यावर सैलसर चिखल माखण्यात आला. आकार मोठा होता.
त्यामुळे काम कष्टाचं होतं. रात्री आठ वाजता सुरू झालेलं काम बारा वाजता संपलं.
लक्ष्मीपूजनच्या दिवशी मात्र सगळ्यांनी सुट्टी घेतली. पाडव्याच्या दिवशी पिओपीचा थर
देण्यात आला. त्यावर कागदी लगद्याने घाटवाटांवरील किल्ले दाखवण्यात आले. मग रंगकाम
झालं. आधी राखाडी रंगाचा बेस देण्यात आला. मग चोकलेटी, हिरव्या रंगांचा साज चढला.
भुसा घेऊन त्याला हिरवा रंग देवून तो किल्ल्यांवर टाकण्यात आला. झाडाझुडपांचा फील
आला त्यामुळे. अन्य बारीकसारीक तपशील दाखवण्यात आले. युद्धभूमी
सज्ज झाली होती आमची. आता वेळ होती चैतन्य, अंजिष आणि शुभम यांची. मराठ्यांचे आणि
शत्रूचे सैन्य अनुक्रमे केशरी आणि हिरव्या रंगाच्या माळांनी दाखवण्यात आलं. निळ्या
रंगाच्या माळांनी नदी मार्ग दाखवले गेले. गडकोटांना, नद्यांना, पर्वतांना नामफलक
लावले गेले. सबकुछ सेट झालं होतं. एक ट्रायल झाली. आणि ती यशस्वी ट्रायल होती. त्या त्या वाक्याला ती ती माळ लागली. बटणांची खाटखुट करावी
लागली नाही. सगळ्यांनी हुश्श केलं. भरभरून शुभेच्छा दिल्या सगळ्यांना.
पहिला शो सुरू झाला होता....
‘उपस्थित सर्व इतिहासप्रेमींचं मनःपूर्वक स्वागत. गेल्या वर्षी साकारलेल्या कांचनबारी लढाईच्या दृकश्राव्य प्रतिकृतीनंतर या वर्षी मातृमंदिर विश्वस्त
संस्था आणि ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र यांच्या पुढाकारातून साकारत आहोत छत्रपती
शिवाजी महाराजांनी केलेल्या शत्रुच्या जबरदस्त कोंडीची शौर्यगाथा उंबरखिंड!.....’ निवेदनाची सुरुवात मयुरीताईंच्या आवाजात होती.
१९ मिनिटांनी टाळ्यांचा उत्स्फूर्त कडकडाट झाला. केलेल्या
श्रमांचे चीज झाल्याचं समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होतं. या टीमची दिवाळी
इथून पुढे १५ दिवस चालणार होती...
दर वर्षी हा
उपक्रम सशुल्क करायचा की ऐच्छिक देणगीवर करायचा यावर आमच्या चर्चा झडतात. दर वर्षी
शो संपल्यावर ऐच्छिक देणगीचं आवाहन करू असंच आम्ही ठरवतो. आणि दर वर्षी भरभरून
ऐच्छिक शुल्क आणि प्रतिसाद लाभतात या उपक्रमाला.
प्रतिसादांचे
काही नमुने –
गुगलपेक्षाही
परिणामकारकपणे प्रदेश दाखवला आहे.
इतिहास आणि
भूगोलाचं नातं उलगडून दाखवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न.
महाराजांच्या
युद्धकौशल्याचा साक्षात अनुभव देणारा उपक्रम.
प्रबोधिनीच्या परंपरेनुसार कोणताही कार्यक्रम झाल्यावर होणारी शोधबोध बैठक सुरु
होती. या बैठकीत एकमेकांचं कौतुक करून झालं. मापं काढून झाली. बैठक संपताना युवक युवतींनी एक प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. “दादा पुढील
वर्षी ....... लढाई दाखवूया का?” माझा सन्मान राखला जावा म्हणून केवळ या वाक्यात प्रश्नचिन्ह घातलं होतं. खरे तर ही घोषणाच होती. और क्या चाहिये
भाई???
Comments
Post a Comment