#खुलता कळी खुलेना...


खुलता कळी खुलेना...

शाळेच्या गच्चीवर बागकामाचा एक प्रकल्प सुरुये.
नाव ठेवलंय ‘हिरवी नवलाई’.
अजून बाल्यावस्थेत आहे प्रकल्प.
आत्ताशी कुठे पन्नास एक रोपे लावून झालीयेत.
प्रकल्प फुलायला, फळायला लागला की एक स्वतंत्र लेख लिहीन म्हणतोय.
या ‘हिरवी नवलाई'  प्रकल्पातील एक गंमत शेअर करावीशी वाटली म्हणून हा लेख...
बागेची सुरवात आम्ही गुलाब वगैरे लावून नाही तर कमळ, कुमुदिनी (वॉटर लिली) लावून केली.
बऱ्याच वेळा आपण वॉटर लिलीला कमळ समजतो.
गणपतीत ते कमळ म्हणून विकतही घेतो.
दोघांमधला फरक समजायला तुम्ही आमच्या बागेला भेट द्यायला हवी.
आळंदीजवळ डुड़्डूळ नावाच्या गावात एक अवलिया राहतो.
सतीश गादिया त्यांचं नाव.
त्यांची केवळ कमळ व कुमुदिनीची बाग आहे.
तब्बल ११० प्रकार आहेत त्यांच्याकडे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली २ प्रकारच्या कमळांचे व २ प्रकारच्या कुमुदिनींचे कंद घेतले.
ते लावायला स्क्रॅप मधून पिंप, टाक्या खरेदी केल्या.
त्या कट करून घेतल्या.
योग्य प्रमाणात माती व शेणखत घातलं.
आणि मुख्य म्हणजे गप्पी मासे सोडले.
त्यातील दोन प्रकारच्या कुमुदिनींपैकी एका प्रकाराला सुमारे 2-3 महिन्यांनी फुले येण्यास सुरुवात झाली.
मस्त जांभळ्या रंगाचे.
जवळपास रोज एक.
एक कमळ रुजले, वाढू लागले.
त्याला फुले येण्यास बराच अवकाश होता.
एक कमळ मात्र काही रुजले नाही.
त्याची खंत मनात होती.
ती टाकी रिकामी रिकामी दिसू लागली.
त्या टाकीत काही दिवसांनी छोटी छोटी पाने तरंगू लागली.
पण ती कमळाची नव्हती.
पण टाकी रिकामी दिसण्यापेक्षा वाढू देत म्हंटल जे काही येतंय ते.
पाने मोठी झाल्यावर कळल ती कुमुदिनीची आहेत म्हणून.
ही लॉटरी होती आमच्यासाठी.
बहुतेक त्या मातीतून चुकून कमळासोबत कुमुदिनीचाही एक कंद आला होता.
फूल येईलच याची मात्र शाश्वती नव्हती.
एका तज्ज्ञाने १५-२० दिवस वाट पाहण्यास सांगितले..
तेवढ्या दिवसात कळी नाही आली तर काढून टाका म्हंटले कंद.
आमचं वाट पाहणं कारणी लागलं.
एके दिवशी एका कळीने आपली मान पाण्याबाहेर काढली.
पहिली कळी बघण्यात जो आनंद आहे ना तो केवळ अनुभवण्याचाच.
वर्णन करण्याचा नव्हेच.
छान पांढऱ्या रंगाची कुमुदिनी फुलली होती.
कमळ न रुजल्याचे दुःख आता राहिले नाही.
पण खरी गंमत पुढे होती.
दोन दिवसांनी आणखी एका कळीने डोकं बाहेर काढलं.
कळीचा रंग पाहता ही आणखी एका वेगळ्याच रंगाची कुमुदिनी आहे हे लक्षात आलं.
म्हणजे त्या मातीत २ प्रकारच्या कुमुदिनीचे कंद आले होते.
रुजले होते.
आणि फुललेही होते.
हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा...
असा प्रकार झाला.
आणि एकाच टाकीत दोन प्रकारच्या कुमुदिनी लावायच्या तर त्याची एक वेगळी पद्धत आहे.
इथे तर काहीच न करता दोन प्रकार एकत्र नांदत होते.
कधी कधी बचकाभर फुले दिसतात त्या टाकीत.
पण..
एक कुमुदिनी जी लावली होती तिला कळी येत होती.
मात्र ती फुलत नव्हती.
कंद बरोबर नसेल का?
त्याला काही कमी पडत असेल का?
काहीच समजत नव्हतं.
शेवटी ते रोप काढूनच टाकावं; असं वाटायला लागलं.
तरी एक प्रयत्न म्हणून गच्ची बाग ग्रुपवर आम्ही आमची समस्या मांडली.
कळीचा फोटो पाठवा.’
जरा पानाचा पाठवा.’
हं आता पान उलटे करून फोटो पाठवा.’
सोनोग्राफीच्या वर तऱ्हा वाटली.
पण फुलाची जन्मवेळ का चुकतीये हे जाणून घ्यायचं होतं.
त्यामुळे संयमाने फोटोंचं पोस्टिंग सुरू ठेवलं.
काही वेळानं उत्तर आलं...
'अहो सर बहुधा हे रात्री उमलणारं फूल आहे.'
'काय????'
देवा.....
आमच्यातील काहींची तर  हसून हसून पुरती वाट.
आम्ही वेड्यासारखे रोज आशेनं बघायचो.
की आज तरी कळी खुललेली असेल म्हणून.
पण एक तर कळी आलेली असायची किंवा तिने मान तरी टाकलेली असायची.
त्यात आमची बागेत जायची वेळ दुपारची.
म्हणजे मुलांची शाळा भरल्यावर साधारण १२-१२.३० च्या सुमारास.
आता उत्तर समजलं होतं.
पण...
जेव्हापासून उत्तर समजलं तेव्हापासून कळीच यायची बंद झाली.
अहो पावसाळा आहे.
वातावरण ढगाळ आहे.
थोडं ऊन वाढलं की येतील परत कळ्या.
तज्ज्ञांचे सल्ले सुरू झाले.
थोडक्यात काय तर आमचं वाट पाहणं परत सुरू झालं.
अखेर दोन महिन्यांनी परवा पाण्यात एक कळी दिसली.
सगळेच खूष झाले.
मग सुरू झाली तिच्या वाढीची प्रतीक्षा.
काही दिवसांनी कळी पाण्याच्या वर आली.
बस आता आज किंवा फारफार तर उद्या संध्याकाळ...
पहिल्या संध्याकाळी काही घडलं नाही.
दुसरे दिवशी एका जिवलग मित्राचा - तुषारचा वाढदिवस होता.
त्याला म्हंटल चल तुला एक भेट देतो.
अर्थात ती 'माझी' भेट होती.
त्यामुळे फक्त 'पहायची' होती. 
त्याला घेऊन बागेत आलो.
खूप उत्सुकता होती.
रंग कसा असेल?
आकार किती असेल?
आणि महत्वाचं म्हणजे आज तरी उमलेलं असेल ना?
आणि ते दृश्य दिसलं...
फूल मस्त वाऱ्यावर डोलत होतं.
कशी वाट पाहायला लावली... असंच जणू मला म्हणत होतं.
फूल फा...... रच सुंदर होतं.
त्याचं सौंदर्य पाहता दर्शन द्यायला जो 'नखरा' त्याने दाखवला होता त्याक्षणी तरी तो योग्यच वाटला मला.







आनंदानं मित्राला मिठीच मारली.
निर्मितीचा आनंद काही वेगळाच असतो नाही.
भरपूर फोटोसेशन झालं.
तृप्त मनानं फुलाचा निरोप घेतला.
आमच्या गच्ची बाग ग्रुपवर फोटो पोस्ट केले.
मुलेही खूष झाली.
शौनक म्हणाला, दादा पुढची कळी आली की आपण सगळे रात्री गच्चीवर जाऊ.
चला मुलांचं आणि गच्ची बागेचं नातं निर्माण होतंय तर...
छान वाटलं.
.......................................
४ महिने होऊन गेले होते.
कमळाची पाने टाकीभर पसरली होती.
काही दिवसांनी काही पाने अँँटीनासारखी पाण्याच्या वर फूटभर वाढली.
त्यांनी संदेश दिला होता...
तुमची प्रतीक्षा संपत आलीये याचा.
आणि एके दिवशी ती इवलीशी कळी दिसली.
शब्दशः उड्या मारल्या आमच्या मुलांनी.
त्यानंतर सुमारे तीन आठवडे घेतले तिने.
...त्या दिवशी पोरंं आरडाओरडा करतच खाली आली.
'दादा चल पटकन गच्चीवर...'
'अरे पण काय झालंय?'
'नाही तू चलच लगेच.'
जवळपास पळवतच नेले मुलांनी मला.
समोरचं दृष्य पाहून माझ्याही चेहऱ्यावर प्रसन्न हास्य पसरलं.
आज...आज शाळेच्या गच्चीवर राष्ट्रीय फूल उमललं होतंं.
यंदाच्या गणेशोत्सवात शाळेतील बाप्पाला 'हिरवी नवलाई' प्रकल्पातील कमळ वाहिलंं.
बाप्पा गालातल्या गालात हसतोय की काय असं उगा आपलं वाटून गेलं.
शिवराज पिंपुडे 
शिक्षण समन्वयक 
ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र 
9423239695, 8888431868


Comments

  1. कमलफूल ते अमर ठेले मोक्षदायी पावन !

    ReplyDelete
  2. खूप वेगळा अनुभव

    ReplyDelete
  3. खुओ छान उपक्रम, संयम वाढवणारा व निखळ आनंद मिळणारा उपक्रम राबवल्या बद्दल अभिनंदन
    गुणेश होनप
    पुणे

    ReplyDelete
  4. खुओ छान उपक्रम, संयम वाढवणारा व निखळ आनंद मिळणारा उपक्रम राबवल्या बद्दल अभिनंदन
    गुणेश होनप
    पुणे

    ReplyDelete
  5. खूप सुंदर लिहले आहे दादा। प्रत्येक शब्दा बरोबर उत्सुकता वाढत जाते। तुमचे सततच नवीन प्रयोग सुरू असतात। खरच त्यबद्ल तुमचे खूप कौतुक आणि अभिनंदन।
    प्राजक्ता देशपांडे

    ReplyDelete
  6. दादा सुंदर लिखाण, फुलाची प्रतीक्षा.... वाढदिवसाची भेट अप्रतिम....
    पाहून आनंद देणारी भेट,
    ही कल्पना सुंदर !
    हीच निसर्गाची किमया ज्याने अनुभव घेतला तो खरा सुखी, आनंदी माणूस !
    सुधाकर देशपांडे

    ReplyDelete
  7. कळी खूलण्याचा प्रवास अतिशय उत्सुकता वाढवणारा आहे
    निसर्गातूनच निर्माण केलेली किमया निसर्गालाच अर्पण करतानाचा प्रवास सुंदर आहे
    तुझ्या नवनविन प्रकल्पांना शुभेच्छा
    स्मिता झंझणे

    ReplyDelete
  8. तू लिहिलं आहेस खऱ्याखुऱ्या फुलाच्या कळीविषयी पण मला मात्र गेल्या दहा वर्षात माझ्या वर्गातल्या कळ्या ( मूल मुली) आठवत होते.

    अशा कळ्या वेगवेगळे प्रयत्न करत , समजून घेत फुलवण्याचा आनंद फक्त शिक्षणक्षेत्रातच आहे.

    निसर्ग ही open university आहे आणि आपले काम त्या शिक्षणाची प्रयोगशाळा आहे असे मला नेहमीच वाटते.

    या कळीच्या फुलण्याचा आनंद, केलेली प्रतीक्षा तुला अजून समृद्ध करत राहो हीच सदिच्छा🌷🌸🌻

    ReplyDelete
  9. दिवस रात्रीतील फरक कामाच्या व्यापामुळे आजकाल माणसाला जाणवत नाही पण निसर्ग मात्र आजही त्याचं अनोखेपण जपतोय हे किती छान लिखाणातून दाखवलस रे ! सुंदर !
    कमळ म्हणजेच कुमुदिनी असं वाटायचं आधी पण आज कळला फरक.
    या गच्चीबागेत एक सेल्फी काढेन म्हणते

    ReplyDelete
  10. सुंदर प्रकल्प, तुम्ही घेतलेला प्रत्यक्ष अनुभव आमच्यासाठी अलौकिक आहे , लिखाण खूपच सुंदर , पुण्याला आल्यावर कमळ व कुमुदिनी मधील फरक पाहिल👌👌👌👍🌹🌹🌹

    ReplyDelete
  11. अथक प्रयत्नांना आलेल्या अद्भुत फळांचे(नव्हे फूलांचे) अतिशय रंजक वर्णन केले आहे. हा अनुभव फारच आनंददायी आठवणीचा ठेवा आहे.

    ReplyDelete
  12. सुरेख अनुभव. .

    ReplyDelete
  13. घडणीचे अनुभव आणि शब्दांकन दोन्ही छान!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog