#संवादू व्हॉटस्अॅपचे रंगी...

संवादू व्हॉटस्अॅपचे रंगी...

पूर्व माध्यमिक विभागाचा मी विभागप्रमुख आहे.
एक विभागप्रमुख म्हणून आमच्या सर्वच्या सर्व - ३२५ पालकांशी  संपर्क येतोच असे होत नाही.
वर्गशिक्षकच बऱ्याच गोष्टी हाताळतात, निस्तरतात.
मग मी whatsapp हे माध्यम निवडले.
काही हितगुज करतो मी या माध्यमाद्वारे.
एकतर्फी.
निरपेक्ष भावानं..
म्हणजे किती जण वाचतात, त्यावर ते काय विचार करतात, काही सुचवले असेल तर तशी कृती करतात का
यातलं मला काहीच समजत नाही.
पण मी संवाद करत राहतो.
प्रसंगोत्पात.
दिवस ठरवून नाही.
त्यातीलच काही मोजके संवाद हा आजच्या ब्लॉगचा विषय.
गुरुकुलात काम करत असताना आ. भाऊ ( श्री. वा. ना. अभ्यंकर, केंद्रप्रमुख, ज्ञान प्रबोधिनी निगडी) नेहमी म्हणायचे
'पालक व अध्यापक हे दोन स्वतंत्र गट असता कामा नये. हा मिळून एक गट असला पाहिजे.'
माझ्या विभागातील हे दोन्ही गट परस्परपूरक होण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न.

(प्रत्येक संवाद कोणत्या प्रसंगाबाबत झाला हे समजायला तुमच्यासाठी थोडी पार्श्वभूमीही दिली आहे.)
..................................................
पार्श्वभूमी - त्या वर्षी पाऊस जरा जास्तच झाला होता. याबाबतच्या  वर्तमानपत्रातील बातम्याही भीतीदायकच होत्या. परिणामस्वरूप पावसाळी सहलीतील मुलांची उपस्थिती लक्षणीयरीत्या घटली होती.
संवाद १ -
शनिवारी उपासनेनंतर ५वी ते ७वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद चालू होता. 
मुलांना त्यांच्या पावसाळी सहलीचे अनुभव मांडायला सांगितले होते. 
सहलीला गेलेली मुले भरभरून बोलत होती. 
पण जवळपास ५०-६० विद्यार्थी ‘हे काय चाललय?’ 
‘अरे आपण हे अनुभवलंच नाही’ 
‘हे आपलं राहूनच गेलं’ अशा उदास, खिन्न मनानं ऐकत होती.
कारण ते सहलीलाच गेले नव्हते.
काहींची कारणे समजून घेण्यासारखी होती.
पण बहुतांश जणांना त्यांच्या पालकांनी सोडलं नव्हतं.....
बाहेरचं वातावरण थोडं गंभीर होत हे खरंच! 
पण  मी गुरुकुलात काम करत असताना तर असे प्रसंग वारंवार यायचे. 
७-८ दिवसांची निवासी शिबिरे, राज्याबाहेरच्या सहली, ३०० किमीच्या सायकल सहली अन् बरंच काही. 
तेव्हा पालक बैठकीत भाऊ सांगायचे, “अहो, अपघात घडायचा तर आपल्या घराच्या  बाथरूममध्ये पाय घसरूनही घडेल, जे व्हायचं ते थांबत नसत.”
प्रवीण दवणेंच एक वाक्य आहे, ’घरापलीकडेही जग आहे; आणि जिवंत राहण्याहूनही अर्थपूर्ण जगणं ही आमची गरज आहे...'
आणि एका ठिकाणी ते असंही म्हणतात,
'भविष्याच्या काळजीने मुलांचं वर्तमान हिरावून घेऊ नका...’  
हा उपदेश नाही. 
मीही एक पालकच आहे आणि प्रत्येक वेळी घरातील ही लढाई मी जिंकेनच असे नाही. 
पण प्रयत्न तर करू, काय म्हणता?
..................................................
पार्श्वभूमी - नुकतीच राखी विक्री संपली होती. ६ वी, ७ वीच्या विद्यार्थ्यांनी मिळून सुमारे सव्वा दोन लाखांची विक्रमी विक्री केली. त्यामुळे मुलांना बक्षिसेही भरघोस मिळाली.
संवाद क्र. २
स्नेहल मर्दाने नावाची मुलगी.
७ वी ब मध्ये शिकते. 
राखी विक्रीत वर्गात दुसरी आली. 
मैत्रिणी 'पार्टी' मागत होत्या. 
वडापाव द्यायचे ठरले. 
माझी परवानगी घ्यायला आली. 
म्हंटलं, 'हा एका वर्गाचा प्रश्न आहे. तू, तुझे पालक व वर्गशिक्षक मिळून काय ते ठरवा. माझी काहीच हरकत नाही.'
मग विचार, चर्चा सुरु झाली. 
वडापाव नको. 
पौष्टिक काही तरी देऊ. 
लाडू देऊ. 
इथून सुरु झालेला विचार शेवटी वर्गातील गरजू मुलींंना ड्रेस भेट देऊयात इथपर्यंत जाऊन पोहचला.
छान वाटलं. 
बर झालं मी निर्णय दिला नाही. 
हा विचार कदाचित मलाही सुचला नसता. 
सुचवता आला नसता.
..................................................
पार्श्वभूमी - ६वी, ७वी च्या इच्छुक ७२ मुलांचे शिबिर नुकतंच चिखलगाव, दापोली या ठिकाणी संपन्न झालं.  शिबिर ५ दिवसांचं होते. दिवाळी सुटीतील ३ व शाळा सुरु होतानाचे २ दिवस शिबिरासाठी मिळवले होते.
संवाद क्र. ३
परवा एक गंमत झाली.
६ वीतील सृजा खातू नावाची एक चुणचुणीत मुलगी सुट्टीमध्ये माझ्याकडे आली. 
आणि म्हणाली, 'दादा आपलं शिबिर १६ ते २० आहे. शाळा तर १९ ला सुरू होणार. मग आमची 'शाळा' बुडणार का दोन दिवस?'
एक क्षण तिच्याकडे पाहिलं आणि उत्तर दिलं, 
'मुली जे शाळेत येणार त्यांचं 'शिबीर'  बुडणारए. त्यांचा दापोलीचा 'अभ्यास' नाही होणारए.'
थोडी गोंधळली ती.
पण समजलं तिला मला काय म्हणायचंय ते.
छान हसली.
'कळलं, कळलं दादा', म्हणत निघून गेली.
खरंच पाठ्यपुस्तकी अभ्यास म्हणजेच अभ्यास हे किती भिनलंंय ना आपल्यात.
विविध प्रकारचे अनुभव घेणंं हाही मोठा अभ्यासच आहे.
पटतंय ना???
..................................................
पार्श्वभूमी - या वर्षी चिंबळी गावातील आर्थिकदृष्टया दुर्बल गटातील १२ मुलींचे प्रवेश एका संस्थेच्या वतीने विद्यालयात करण्यात आले. निवास व भोजन खर्च त्या संस्थेने उचलला होता. काही उपक्रम, प्रकल्प यांचे शुल्क भरण्यासाठी त्यांना थोडी अडचण वाटत होती.
संवाद क्र. ४
नमस्कार पालक बंधू भगिनी,
मी बरेच काही पाठवत असतो तुम्हाला. 
बऱ्याच वेळा हा एकतर्फीच संवाद असतो. 
पण सध्या तरी हेच माध्यम बरे वाटते.            
आजही एक विषय बोलायचा आहे तुमच्याशी. 
चिंबळी गावातील १२ मुली आपल्या शाळेत शिकतात. 
त्यांचा विविध प्रकल्पांचा खर्च  सुमारे ५०-६० हजार  असेल. 
वाचताना रक्कम मोठी वाटते. 
पण आपल्या विभागात सुमारे ३२५ पालक १५ शिक्षक आहेत. 
तेव्हा ३४० जणात ही रक्कम विभागली तर एकदम छोटी होऊन जाईल. 
माझी इच्छा आहे हा खर्च आपण सर्व जण मिळून उचलूयात.
अर्थात सगळेच हा msg वाचतील असे नाही.
आणि वाचलेले सर्व प्रतिसाद देतीलच असेही नाही. 
तेव्हा ज्यांची ऐपत आहे, ज्यांच्यावर परमेश्वराची कृपा आहे त्यांनी अधिकही द्यायला हरकत नाही.
एका स्वामींची एक गोष्ट सांगतात. 
स्वामी भिक्षा मागत एका झोपडीजवळ आले. 
आतून एक महिला आली. 
कळकळीने म्हणाली, ''महाराज देण्याची इच्छा आहे. पण घरात अन्नाचा एक कणही नाही.''  
स्वामी म्हणाले, ''माते ठीक आहे. तुझ्या अंगणातील मूठभर माती घाल झोळीत. तुझ्यातला 'देण्याचा' संस्कार नको हरवायला. म्हणजे मग जेव्हा परिस्थिती बदलेल तेव्हा सहज देऊ शकशील.''
चला तर मंडळी, आपल्याही मुलांवर  हा देण्याचा संस्कार करूयात. 
मी स्वतःपासून सुरवात करतो. 
तुम्हीही तुमच्या कुवतीनुसार तुमचा वाटा उचलावा ही विनंती.
चालेल ना?
उद्यापासून दसऱ्यापर्यंत  माझ्याकडे रक्कम जमा करावी.  
रक्कम मुलांकडूनच पाठवावी. 
हे अनिवार्य नाही. 
पूर्णपणे ऐच्छिक आहे.
..................................................
या पोस्टनंतर पुढच्या ४च  दिवसात आवश्यक ती रक्कम उभी राहिली.
माझ्यासाठी हा अनुभव नवा होता.
मी जाणीवपूर्वक कोणत्याही मुलाशी, अध्यापकाशी, पालकाशी प्रत्यक्ष संवाद करण्याचे टाळलं होतं.
माझे msgs वाचले जातात.
त्यावर पालक विचार करतात.
आणि बरेच पालक कृतीही करतात.
याचा पहिला ठळक साक्षात्कार त्या दिवशी झाला.
छान वाटलं.
संवाद सुरु ठेवण्याची माझी प्रेरणा वाढली.

शिवराज पिंपुडे 
शिक्षण समन्वयक 
ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र 
८८८८४३१८६८,९४२३२३९६९५

Comments

  1. खूप चांगला संवाद आहे हा दादा..असाच वाचायला मिळू देत..

    ReplyDelete
  2. सुरेख ,मनाला साद घालणारे लिखाण. अभिनंदन

    ReplyDelete
  3. संवादातून उपक्रमाची अपेक्षित उद्दिष्टे व परिणामकाराता कशी साधायची याचे हे उत्तम उदाहरण .👌🏻

    आपल्यातील प्रयोगशील शिक्षक च हे साधू शकतो🌹

    या ब्लॉग च्या माध्यमातून काही गोष्टी शिकायला मिळत आहेत

    Keep Writing👍

    ReplyDelete
  4. छान! सोशल मीडियाचा समर्पक उपयोग कसा करावा हे शिकायला मिळतंय.

    ReplyDelete
  5. खूप सुंदर संवाद साधले आहेत.
    हा लेख वाचल्यामुळे तुमच्या विभागातील अनेक व नाविन्यपूर्ण उपक्रम समजले.
    --- स्मिता झंझणे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog