#जेव्हा वीरगती जिवंत होते...


अभ्यास सहल क्र. १ 
जेव्हा वीरगती जिवंत होते...

...अनिल दुधानी सरांनी मुलांना एका वीरगळीपाशी नेलं 
आणि ते सांगू लागले...
‘’मुलांनो ही वीरगळ पहा. याच्या सर्वात खालच्या कप्प्यात 
वीरगती प्राप्त झालेला वीर दिसतोय. हा वीर पायदळातील होता.
त्याने दोन घोडेस्वारांशी पराक्रमाने झुंज दिली. शत्रू 
घोडेस्वारांच्या हातात भाले होते. वीराच्या हातातही भाला होता. 
वीर पराक्रमाने लढला. पण त्याचा शत्रू सैन्यासमोर निभाव 
लागला नाही. त्याची झुंज अपयशी ठरली. त्याला वीरगती 
प्राप्त झाली. पण या वीराची अवस्था नाही चिरा नाही पणती
अशी झाली नाही. त्याच्या अतुलनीय शौर्याची गाथा 
वीरगळीवर कोरली गेली. राज्यासाठी लढण्याचं-मरण्याचं 
पुण्य त्याला मिळालं. त्याला न्यायला स्वर्गातून चार अप्सरा 
आल्या. त्यांच्या हातात चौरी होती. चौरीने वीराला हवा 
घालत अप्सरा त्याला घेऊन स्वर्गात गेल्या. वरच्या खणात 
पुरोहित दिसतोय. पुरोहिताच्या हातात घंटा व बिल्वपत्र आहे. 
तो वीराकडून त्याच्या उपास्य देवतेची- शंकराची पूजा 
करून घेतोय. वीरगळीच्या वर कलश आहे. याचा अर्थ 
त्याला मोक्षप्राप्ती झाली...

पण तरी विरगळ म्हणजे नेमकं काय असाच प्रश्न पडलाय ना???
वाचा तर मग...   
................................................................................
तिहासाचा तास सुरू होता.
इतिहासाची   साधने नावाचंं एक प्रकरण आहे सातवीला.
त्या साधनांचा एक प्रकार म्हणजे भौतिक साधने.
त्यांचा एक प्रकार म्हणजे स्मारके.
स्मारकांची उदाहरणे म्हणजे समाधी, कबर, वीरगळ.
वीरगळ...शब्द नेहमीच्या पठडीतला, वाचनातला नाही.
त्यामुळे मुलांची शंका ठरलेली.
याही वेळी मुलांनी अर्थ विचारलाच.
मीही नेहमीप्रमाणे पुस्तकी छापील उत्तर देऊन 
वेळ मारून नेली.
पण यावेळी थोडा आपणही शोध घ्यावा असं वाटून गेलं.
तास संपल्यासंपल्या श्री. निलेशजी गावडे यांना संपर्क केला.
निलेशजी गावडे – एक इतिहासप्रेमी व्यक्तिमत्त्व.
कधी तरी सवडीनंं लिहीन त्यांच्याविषयी.
आज एकच सांगतो.
महाराष्ट्रातील सर्व...सर्व म्हणजे सर्व (सुमारे ३५०) किल्ले 
पालथे घातलेला अवलिया.
म्हंटलं, ‘गावडे साहेब वीरगळ प्रकरण समजून घ्यायचंय.’
‘शनिवारी वेळ काढा दादा.’
गावडे सरांचा तत्पर प्रतिसाद, नेहमीप्रमाणेच.
मग शनिवारी शाळा सुटल्यावर गावडेंसोबत नेरे गावात गेलो.
गावातील एका मंदिराच्या परिसरात १५-२० वीरगळी 
मांडल्या होत्या.
तिथे गावडे सरांनी माझी शाळा भरवली.
दीड दोन तास आम्ही केवळ वीरगळी या एकाच विषयावर 
बोलत होतो आम्ही.
माझ्या कल्पनेपेक्षा भलतंच इंटरेस्टिंग प्रकरण निघालं हे.
तिथेच एक कल्पना डोक्यात शिजली.
पुढच्याच तासाला मुलांना विचारलं, ‘जायचं का रे मुलांनो 
वीरगळी पाहायला?’
वर्गाच्या भिंतींबाहेर जायला मुलं नेहमीच उत्सुक असतात.
त्यामुळे नकार येणंं अपेक्षितच नव्हतं.
वीरगळी दाखवायला कोणी सहली काढत नसेल.
आहे काय त्यात बघण्यासारखं’? आणि
आहे काय त्यात दाखवण्यासारखं’?
असं कुणालाही वाटू शकतं.
कालपरवापर्यंत मलाही हेच वाटत होतं.
सहल ठरली.
सोबत असणार होते गावडेंचे मित्र श्री. अनिल दुधानी सर.
व्यवसायाने इंजिनियर.
पण पक्का वीरगळ वेडा माणूस.
गेली दोन वर्षे वीरगळींचा अभ्यास करतायेत.
किल्ले पहाता पहाता अचानक त्यांना हा विषय सापडला.
आजवर सुमारे ८०० गावातून तब्बल ५८०० वीरगळी 
पहिल्यायेत त्यांनी.
पुष्कळच अभ्यास केलाय आणि
आता त्यांचं स्वतःच एक वीरगळींवरचंं पुस्तकही 
प्रकाशित होतंय.
सहलीचं ठिकाण त्यांनीच सुचवलं.
वाईजवळच किकली नावाचं गाव.
भुईंज फाट्यावर डावीकडे वळायचं.
चंदन वंदन किल्ल्याच्या पायथ्याचे गाव
ही आणखी एक ओळख.
निगडी पासून सुमारे १२० किलोमीटर अंतरावर.
स्वतःच्या वाहनाने गेल्यास अडीच तीन तासात पोहोचतो 
आपण गावात.
अनिल दुधानी सरांच्या प्रयत्नातून हे गाव वीरगळींचंं गाव 
म्हणून प्रसिद्धीस येतंय.
गावातील भैरवनाथ मंदिराच्या परिसरात 
 सुमारे ७०-७५ वीरगळी आहेत.
अकराच्या सुमारास आम्ही गावात पोहोचलो.
मुलांना एकत्र करून वीरगळींची संकल्पना थोडी स्पष्ट केली. –
‘वीरगळ ही संकल्पना कर्नाटकातून आली. कर्नाटकात 
दगडाला ‘कल्लू’ असे म्हणतात. त्यामुळे तिथल्या 
‘वीरकल्लू’चे महाराष्ट्रात वीरगळ असे झाले. इंग्रजी भाषेत 
यांना Hero Stone असे म्हणतात. वीरांचा पराक्रम 
सांगणारी ही कोरीव शिल्पे आहेत.’
इतकीच माहिती दिली.
खरं तर लगेच एकेक वीरगळ दाखवून माहिती 
देता आली असती.
पण तसं केलं नाही.
त्याऐवजी पाच प्रश्न दिले मुलांना.
ज्ञानाची निर्मिती स्वतः करण्यातच खरी मजा असते.
१ काय काय कोरले आहे?
२ सर्व विरगळींमध्ये समान काही आहे का?
३ काही वर्गीकरण करता येईल का?
४ कोणत्या वीरगळी विशेष जाणवल्या?
५ या वीरगळींवरून आपल्याला त्या काळातील कोणती 
माहिती समजते?
आणि या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास थोडा वेळ दिला.
हे निरीक्षण एकेकट्याने करायचे होते.
खरं तर असा मोकळा, स्वतःचा वेळ हवाच असतो 
मुलांना सहलीत.

अर्ध्या तासाने सर्वांना एकत्र केलं.
छान निरीक्षणे नोंदवली होती मुलांनी.
बऱ्याच गोष्टी सांगण्यापूर्वीच त्यांनी शोधल्या होत्या.
मुलांची निरीक्षणे ऐकून तेही आश्चर्यचकित झाले.
एक छोटंसं उदा. द्यायचं झालं तर...
शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देताना मुलांनी नोंदवलं,
त्या काळात शिवभक्त खूप असावेत,
युद्धे खूप होत असावीत,
शिल्पकलेचा चांगला विकास झाला असावा इत्यादी.
मुलांंचं भरपूर कौतुक केलं आणि
आत्तापर्यंत माझ्या ताब्यात असलेली सहलीची सगळी 
सूत्रे दुधानी सरांकडे सोपवली.
आणि मी विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरलो.
सरांनी सगळ्यांना एका वीरगळीपाशी नेलं.
त्यांच्या बाटलीतील पाणी त्यांनी त्या वीरगळीवर ओतलं.
एकदम लक्ख, कुळकुळीत झाली वीरगळ.
सगळी चित्र एकदम स्पष्ट दिसू लागली.
एक छोटीशी युक्ती पण अत्यंत उपयोगाची.
दुधानी सरांनी विचारलं,
‘कशी वाचाल ही वीरगळ?’
एकानंं मस्त उत्तर दिलं.
‘वरच्या भागात आधी वीर त्याच्या देवतेची पूजा करून 
करून निघालाय. मग तो युद्ध करतो. सर्वात शेवटी 
त्याला वीरमरण येऊन पडतो.’
चांगला विचार केला होता त्यानंं.
पण बरोबर उलटा केला होता.
आता दुधानी सर बोलू लागले,


‘मुलांनो वीरगळ ही खालून वर वाचतात. वीरगळीचे साधारण 
३ ते ४ कप्पे असतात. वीराच्या पराक्रमानुसार त्यांची संख्या 
कमी जास्त असू शकते. खालून पहिल्या भागात वीरमरण 
आलेला वीर दाखवलेला असतो. त्या वरच्या भागात युद्धाचा 
प्रसंग कोरलेला असतो. त्यावरून कोणत्या प्रसंगात त्याला 
वीरमरण आलं हे समजू शकतं. त्या पुढच्या त्या वीराचे 
स्वर्गारोहण  दखवलेले असते. तर सगळ्या वरच्या कप्प्यात 
वीराची मोक्षप्राप्ती दाखवलेलली असते.’
...मग अनिल दुधानी सरांनी मुलांना एका वीरगळीपाशी नेलं 
आणि ते सांगू लागले...
पुढे त्यांनी वीरगळीचे आणखी प्रकार दाखवले.
पशुधन वीरग
परचक्र वीरग
अश्वदल वीरग
गजदल वीरग
आत्मबलिदान वीरग
सती वीरग
इत्यादी..
मजा आली मुलांना हे सगळ समजून घेताना.
आता सगळ्यांचा कडकडून भूक लागली होती.
पोटभर डबा खाल्ला सगळ्यांनी.
थोडी विश्रांतीही झाली.
परत एकदा मुले एकत्र केली.
आता त्यांचे ४-४ जणांचे गट केले.
प्रत्येक गटाला एक निरीक्षण सूची दिली.
दुधानी सरांनीच तयार केली होती.
त्यात १५-१६ मुद्दे होते.
वीरगळीच्या आकारापासून ते कुठल्या खणात कुणाची किती 
चित्रे असे खूप काही नोंदवायचं होतं.
अर्ध्या तासात गप्पाटप्पा, चर्चा करत चांगल्या 
नोंदी केल्या मुलांनी.
या चेकलीस्टमुळे वीरगळ बघायची म्हणजे नेमकं काय 
बघायचं हेही मुलांना समजलं.
सहलीत वृषाली डेंग्वेकर सहभागी होती.
जाताना सांगून गेली,
‘सर इतिहास विषय शिकण्याचा नाही तर अनुभवण्याचा आहे 
हे आज उमगले बरं.’
ही आम्हा सर्वांचीच प्रातिनिधिक भावना होती.
मध्ये काही महिने उलटले.
मुलांना एक मंदिर दाखवायला घेऊन गेलो होतो.
पोरं ओरडतच माझ्याकडे आली.
‘दादा तिकडे चल पटकन, तिकडे सती वीरगळ आहे.’
वीरगळ सहल पचली होती तर मुलांना.
छान वाटलं.

शिवराज पिंपुडे 
शिक्षण समन्वयक 
ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र 
8888431868, 9423239695
दुधानी सर 7798187478
गावडे सर 8237402714







Comments

  1. वा दादा इतिहास असाही शिकता येतो हे आज समजले.

    ReplyDelete
    Replies
    1. दादा, परत एकदा लहान होऊन तुझ्या वर्गात यावं वाटतंय..

      Delete
    2. दादा, परत एकदा लहान होऊन तुझ्या वर्गात यावं वाटतंय..

      Delete
  2. छान जमु लागलाय लिहायला !!

    ReplyDelete
  3. Anubhaw shikshanacha uttam namuna

    ReplyDelete
  4. वाह... खूपच मस्त..

    ReplyDelete
  5. दादा, पुस्तकातील इतिहास आता उपलब्ध असलेल्या साधनांच्या मदतिने जिवंत करून शिकवण्याचा हा मार्ग फारच छान आहे.
    *लेखातून मी काय शिकलो..
    1. अनुभवाधिष्ठीत शिक्षण अधिक प्रभावी असते.
    2.लहाण प्रसंगातूनही मोठ्या गोष्टी शिकता येतात.
    3. स्व-अभ्यास व निरिक्षण यांचे महत्त्व.
    4. तज्ज्ञांची मदत घेउन आपण अधिक माहिती घेतली पाहिजे.
    5. तुझी उपक्रमशिलता.
    6. माझ्या गावच्या देवळात एक विरगळ आहे, त्याची माहिती मी मुली सोबत घेणार आहे.

    वैभव ढमाळ.

    ReplyDelete
  6. Asa mi itihas shiktana vhayla hv hot re Dada... Kadachit tula laglele kasht kmi zale aste...😇😂

    ReplyDelete
  7. Asa mi itihas shiktana vhayla hv hot re Dada... Kadachit tula laglele kasht kmi zale aste...😇😂

    ReplyDelete
  8. अरे व्वा ! आज एक नवीन घटक अभ्यासायला मिळाला....

    ReplyDelete
  9. दुधाने सर आपल्यामुळे खुप काही नविन शिकता आले बहुतेक जण इतिहास रटाळ विषय समजतात पण आपल्या अशा शिकवण्यानें इतिहास नव्याने शिकता येईल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मंतरलेली रात्र...!