#खेळ खेळण्यातून घडवताना...


खेळ खेळण्यातून घडवताना...

      जम्मत घरात पझल लायब्ररीची सुरुवात नुकतीच झाली होती. मा. विवेकराव पोंक्षे सर (उपकार्यवाह, शिक्षण प्रभाग, ज्ञान प्रबोधिनी) म्हणाले, ‘वेबसाईटसाठी छोटा व्हिडिओ बनवूयात पझल लायब्ररीवर.' स्वतः आले त्या दिवशी. अर्ध्या तासात काम झालं. सरांनीही एक बाईट दिला. जाताना म्हणाले, 'छान सेट झालीये लायब्ररी. पण तू खेळण्यांना साधने म्हणतोस तर नेमकं काय शिक्षण होतं मुलांचं; असं काही पाहिलयंस का? काही निरीक्षणं करता येतील का? नोंदी करता येतील का?'
      असा काही विचारच  केला नव्हता मी अद्याप. सरांनी जाता जाता डोक्यात एक पिल्लू सोडलं होतं. माझं विचारचक्र सुरू झालं. थोडं फार लेखनही सुरु झालं. सरांशी फोनवर चर्चा सरू झाली. सहा-सात दिवस चालला हा कार्यक्रम. पण त्यातून एक विषय आकार घेत होता'खेळण्यांच्याद्वारे मुलांच्या निरीक्षणात्मक नोंदी.'
      परत एकदा आमच्याकडे असणारी खेळणी आम्ही नीट पाहिली. एखाद्या खेळण्याशी मूल खेळत असेल तर त्याच्याविषयी कोणत्या गोष्टी समजतील? त्याची काय प्रकारची निरीक्षणे नोंदवता येतील? असा विचार सुरु केला. खेळणी तीच होती. पण दृष्टीकोन नवा होता. त्यामुळे नव्या गोष्टी सुचायला मदत झाली. पहिला घटक आम्ही निश्चित केला तो म्हणजे वेळ. कोणत्या खेळण्यांशी मुले अधिक काळ खेळतात यावरून कोणती खेळणी मुलांना आवडतात हे आम्हाला समजणार होते. तर एखादं मूल कोणत्या प्रकारच्या खेळण्याशी खेळतं यावरून त्याची आवड लक्षात येणार होती. दुसरा घटक ठरवला तो समजेचा. खूप मुलांना खेळणंं पाहिल्या पाहिल्या त्याचंं नेमकंं काय करायचंं, ते कसंं खेळायचंं हे समजतंं. किंवा थोडी खटपट केल्यानंतर लक्षात येतंं. फारच कमी मुलांना खेळणंं समजावून द्यावंं लागतंं. म्हणून आम्ही पालकांना सांगतो की बिलकुल मुलांना खेळणे कसे खेळायचे हे सांगायला जाऊ नका. करू दे त्याची त्याला धडपड. नाहीच जमले तर मदत करा. न मागितलेली मदत करायला जाऊ नका. तिसरा घटक आम्ही निश्चित केला तो म्हणजे कारक कौशल्ये (motor skills). खेळणे खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हालचाली मूल किती सहज, सफाईदारपणे करते की कष्टपूर्वक करते हे तर सहजच लक्षात येतं. त्याची हाताची पकड कशी आहे, बोटांचा वापर ते कसा करते या गोष्टींची निरीक्षणे अगदी सहजपणे करता येतात. आणि चौथा घटक म्हणजे खेळणे खेळताना त्यातून मुलांची समजणारी विविध प्रकारची गुणवैशिष्ट्ये. याविषयी थोडं सविस्तर पाहू.
      एक खेळणं आहे. त्यात विविध रंगांचे छोटे छोटे लाकडी चौकोनी ठोकळे आहेत. एका कागदावर त्यांची रचना कशी करायची याची चित्रे दिली आहेत. मुलांनी त्यातील एकेक चित्र पाहून त्याप्रमाणे ते ठोकळे रचत जायचे. यातून मुलांची निरीक्षण क्षमता सहज लक्षात येते. आणखी एका खेळण्यात विविध आकारातील लाकडी ठोकळे आहेत. आयताकृती, चौकोनी, अर्धगोल इ. हे आकार वापरून मुले खूप भन्नाट आकार तयार करतात. काही वेळा आपल्याला समजंत एक पण त्यांंच्या डोक्यात वेगळीच कल्पना असते. मुलांशी सहज संवाद केला तर अशा बऱ्याच गोष्टी समजतात. तर ते मूल किती प्रकारच्या रचना त्यातून साकारते यातून त्याची कल्पनाशक्ती समजते. मागच्या लेखात मधमाश्यांचा खेळाचा उल्लेख केला होता. एकेक लाकडी मधमाशी चिमट्याने उचलायची आणि तिच्या घरात ठेवायची. खूप वेळा ती मध्येच पडते. काही मुले १,२ प्रयत्न करतात आणि नाही जमलं तर सोडून देतात. काही जण लगेच कंटाळून चक्क चिमटा बाजूला ठेवून हाताने मधमाशी तिच्या घरात ठेवतात. पण सोडून देण्यापेक्षा हे नक्कीच चांगलं असं वाटतं. काही पठ्ठे मात्र असतात ते शेवटची मधमाशी तिच्या घरात चिमट्याने जाईपर्यंत जागेवरून हालत नाहीत. त्यांची चिकाटी पाहण्यासारखी असते. अशी मुलांची निरीक्षणे करणे हा खूपच आनंददायी अनुभव असतो. जणू ती खेळणी त्यांच्याशी खेळणाऱ्या मुलांबाबत आपल्याला भरभरून सांगत असतात. आपण फक्त पहायचे असते.
      तर मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारची २५ खेळणी निवडली. प्रत्येक खेळणं कसं खेळायचं? त्यातून मुलांच्या कोणत्या गोष्टींचा विकास होऊ शकतो? मुलांच्या कोणत्या बाबींची निरीक्षणे नोंदवता येतील? असं लिहून काढलं. नंतर वर निश्चित केलेल्या चार घटकांची प्रत्येकी चार विधाने लिहिली. A,B,C,D श्रेणीनुसार. पण लहान मुले आहेत त्यामुळे श्रेणी पण नको; कलर कोडींग करुयात असं ठरलं. त्यानुसार चार विधानांचे चार रंग पुढीलप्रमाणे ठरवले.
निरीक्षण घटक
रंग
१ वेळ
अ. ८ मी. पेक्षा अधिक काळ खेळला.
ब. ५ ते ८ मि. खेळला.
क. ३ ते ५ मि. खेळला.
ड. ३ मि.पेक्षा कमी खेळला. 

केशरी
हिरवा
निळा
लाल   
२ समज
अ. खेळणे बघून स्वतःहून खेळला.
ब. एकदा सांगावे लागले.
क. सारखी मदत करावी लागली.
ड. कसे खेळायचे ते समजलेच नाही.

केशरी
हिरवा
निळा
लाल
३ कारक कौशल्ये
अ. पहिल्याच प्रयत्नात जमलं.
ब. २-३ प्रयत्नांत जमलं.
क. पालकांच्या मदतीने खेळला.
ड. हालचाली अत्यंत विस्कळीत होत्या.


केशरी
हिरवा
निळा
लाल
४ गुण (चिकाटी,प्रयत्नवादी, उत्साही, सर्जनशीलता)
अ. खेळणे पूर्णपणे खेळला.\ दोनपेक्षा अधिक रचना केल्या.
ब. प्रोत्साहन दिल्यावर वरील गोष्टी केल्या.\ दोन रचना केल्या.
क. प्रत्येक पायरीवर प्रोत्साहन द्यावे लागले.\ एकच रचना केली.
ड. खेळणे अर्धवटच खेळला.\ एकही रचना पूर्ण केली नाही.



केशरी


हिरवा

निळा

लाल




      समजा मुलगा वीस पंचवीस खेळण्यांशी  खेळला आणि त्याच्या नोंदी केल्या तर कोणता रंग ठळकपणे नजरेत भरतो हे बघायचं. त्यानुसार पालकांसाठी या रंगांचा अर्थ स्पष्ट करणारा एक feedback तक्ताही खालीलप्रमाणे तयार केला.
केशरी रंग -  
      जवळपास सर्व खेळणी विद्यार्थ्याला आवडली. विद्यार्थ्याने स्वतः निरीक्षण करून, पुढाकार घेऊन खेळणी खेळली. विद्यार्थ्याची कारक कौशल्ये वयाला साजेशी विकसित झाली आहेत असे दिसले. खेळणे अर्धवट न खेळता पूर्णपणे खेळला तसेच खेळताना स्वतःच्या कल्पनाशक्तीचाही चांगला वापर केला. नव्या रचना चांगल्या केल्या.
हिरवा रंग –
      बहुतांश खेळणी विद्यार्थ्याला आवडली. समजावून सांगितल्यावर खेळणी खेळला. वयानुरूप कारक कौशल्ये विकसित होण्यासाठी थोडे प्रयत्न आवश्यक. स्वभावात स्थिरता पुष्कळ प्रमाणात आहे. खेण्यातील नव्या रचना \ कृती करण्याचा प्रयत्न केला.
निळा रंग –
      काहीच खेळण्यांमध्ये विद्यार्थ्याने रुची दाखवली. खेळणी खेळण्यासाठी निरीक्षकाची \ पालकांची मदत घ्यावी लागली. त्यामुळे विद्यार्थ्यास स्वतःहून काम करण्यास प्रोत्साहन द्या. कारक कौशल्ये विकसित होण्यासाठी अधिक लक्ष द्यावे. एखाद्या खेळण्याचा पटकन कंटाळा येतो. स्वभावातील स्थिरता वाढायला प्रयत्न करायला हवेत. खेळण्यातील नव्या रचना \ कृती करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
लाल रंग –
      घरी विद्यार्थ्याला अधिकाधिक खेळणी खेळण्याचा अनुभव द्या. खेळणे विद्यार्थ्याने पूर्णपणे खेळावे म्हणून त्याला प्रोत्साहन द्या. हातांचा व बोटांचा अधिकाधिक वापर करता येईल अशी जास्तीतजास्त कामे त्याला द्या. जसे की मटार सोलणे, पालेभाजी निवडणे, फुले वेचणे इ. संवाद करताना सकारात्मक भाषेचा वापर करा. जसे की एखादी गोष्ट जमत नसली तरी ‘जमेल तुला, प्रयत्न चांगला केलास’, असे बोला. कृपया ‘ठोंब्या, बावळट’, असे शिक्के मारू नका.
    याचा पहिला प्रयोग सोलापूरला वय वर्ष ४ व ५ च्या सुमारे १०० मुलांवर करायचे ठरले. तिथे शिशु अध्यापिका विद्यालय चालते.  या विद्यालयाच्या प्राचार्या सुलभाताई कुलकर्णी यांनी होकार दिला. एक दिवस आधी तेथील सर्व तायांचे प्रशिक्षण घेतलं. काय नोंदवायचं? कशावरून नोंदवायचं? कसं नोंदवायचं? इत्यादी गोष्टी स्पष्ट करून सांगितल्या. दोन तीन वेळा सरावही करून झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही निवडलेली २५ खेळणी मांडली. खेळण्यांना क्रमांक दिले. प्रत्येक प्रशिक्षक विशिष्ट अंतर ठेवून बसला. मुले आली. पालकही होते सोबत. पालकांच्या हातात निरीक्षण तक्ते दिले. मूल त्याला हव्या त्या खेळण्याशी खेळायला जायचं. पालक त्यांच्या हातातील तक्ता त्या खेळण्यामागच्या ताईला द्यायचे. मस्त खेळायची मुलं. त्यांना पत्ताच नाही आपलं निरीक्षण चालू आहे. नोंदी चालू आहेत याचा. कागद हातात दिल्यावर पालकांनाही काही कळायचं नाही. कारण त्यात केवळ रंग भरलेले असायचे. सर्व खेळ खेळून झाल्यावर कागद भरून जायचा. मग जाताना पालकांना रंगांचा अर्थ स्पष्ट करणारा feedback तक्ता द्यायचो. तेव्हा कुठं पालकांना अर्थ लागला. अनेक पालकांनी नोंदी योग्य वाटल्याचे आवर्जून येऊन सांगितले.
      खेळणी ही मुलांच्या अभ्यासाचा एक भाग आहेत असं आम्ही म्हणायचो  तर मग निरीक्षण, नोंदी या गोष्टी करणं क्रमप्राप्त होतं. त्यादिवशी याचा एक छोटासा प्रयोग झाला. मुलांना केवळ आनंद मिळावा म्हणून सुरु केलेल्या गोष्टीचं एका शैक्षणिक प्रयोगात रुपांतर झालं; असं त्या दिवशी वाटलं. एक टप्पा गाठता आलं याचं नक्कीच समाधान लाभलं.
      तर मग भरपूर खेळणी...चुकलं...शैक्षणिक साधनं शाळेतून \ घरातून  मुलांना उपलब्ध करून द्या. आणि हो प्रत्येक वेळी सगळी खेळणी विकतचीच आणली पाहिजेत असे नाही. घरातील, अंगणातीलही अनेक गोष्टी मुले खेळणी म्हणून वापरत असतातच. त्यालाही आपले प्रोत्साहन असावे. खेळणी वापरायला मुलांना पुरेसा वेळ द्या. आणि तुम्ही निवांतपणे एका कोपऱ्यात बसून निरीक्षणे करा. मग त्या निरीक्षणांच्या आधारे एकेका मुलाला काय प्रकारच्या संधी दिली पाहिजे हे ठरवा. आणि हो तुम्हीही याबाबत काही प्रयोग केले असतील तर नक्कीच सांगा. समजून घ्यायला निश्चितच आवडेल.
('जडणघडण' मासिकातून साभार)
शिवराज पिंपुडे
शिक्षण समन्वयक
ज्ञान प्रबोधिनी, निगडी
8888431868

Comments

  1. स्तुत्य उपक्रम -- निरीक्षणाच्या नोंदी त्या पण रंगानुसार मस्तच !!👍 मुलांच्या क्षमता मोजत असताना खूप बारीक गोष्टीचा विचार केला आहे ...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog