#या हृदयीचे त्या भिंतींवर...

 या हृदयीचे त्या भिंतींवर...

 मागच्याच्या मागच्या मे महिन्यात शाळेचं रंगकाम निघालं.
 प्रत्येक वर्ग वेगळ्या रंगाने रंगवण्याचं ठरलं.
 या रंगकामात मुलांचाही काही सहभाग घेऊयात असं वाटून   गेलं.
 त्यासाठी प्रत्येक वर्गातील मागची भिंत न रंगवता प्रायमर   देऊन   तशीच ठेवण्यात आली. 
 शाळा सुरु झाली आणि या पांढऱ्या रंगानंं विविध रूपंं धारण   करण्यास सुरवात केली.
 हातांच्या ठशांपासून ते फुटबॉलच्या शिक्क्यापर्यंत आणि
 स्वाक्षरीपासून ते शाईच्या डागापर्यंत सर्वांनी भिंत सजू लागली.
 आता काहीतरी तातडीन करण्याची गरज निर्माण झाली होती.
 जम्मत घराने योजलेल्या एका कार्यशाळेच्या माध्यमातून   आभाताईंंचा परिचय झाला होताच.
 ..................................................
 इ. ९ वी क चा वर्ग.
 वेळ सकाळी ९ ची.
 वर्गातील बाकांची रचना बदलेली.
 सर्व बाकं फळ्याच्या बाजूने, दाटीदाटीने.
 आज फळा म्हणून मागची भिंत.
 वर्गात फक्त १५-१६ मुलंमुली, आभाताई व कामथे सर. 
 आजच्या विषयाबाबत माझी उपस्थिती असूननसून सारखीच.
 वर्गातील शैक्षणिक साहित्य – रंगांचे डबे, ब्रश, रोलर, फडकी,   ‘घोडा’, टेबलं.
 मुलांचा गणवेश – कळकट मळकट.
 ..................................................
 मी मुलांना आभाताईंचा परिचय करून दिला.
 “या आभाताई भागवत. पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार.   अक्षरनंदन   शाळेत चित्रकला विषय   शिकवतात.  भित्तिचित्रे ही यांची   खासियत. आजवर सुमारे   १२५ भित्तिचित्रंं काढलीयेत यांनी....” 
 आभाताईंनीही छान हसून सर्वांचं स्वागत केलं.
 “मग मजा करायची ना आज? मस्त चित्र काढूयात. अगदी   बिनधास्त रंगकाम करा. चुकायची बिलकुल धास्ती नको.   निरीक्षण मात्र बारकाईने करा...” - आभाताई.
 वा! प्रत्येकच अध्यापक या प्रकारे मुलांशी करू लागला   तर...माझा   स्वतःशी संवाद.
 पहिल्या ५ मिनिटांतच आभाताईंनी मुलांना जिंकून घेतलं.
 आश्वस्त केलं.
 मग आज काढायचं चित्र दाखवलं ताईंनी मुलांना.
 बर्फाच्छादित प्रदेश, हिमवर्षाव, इग्लू, मासे पकडणारा   एस्किमो....
 चित्र भन्नाटच होतं.

‘हे...हे चित्र काढायचंय? जमेल का आम्हाला?? अहो आम्ही ६वी,   ७ वीतील लहान मुले आहोत...” मुलांच्या मनातीत स्वगत मी   त्यांच्या चेहऱ्यावर वाचत   होतो.
 “जमेल रे. छान कराल. काळजी नका करू.”
 मी मुलांना उगाच धीर देण्याचा प्रयत्न केला.
 "मी स्केच काढून देते. तुम्ही मस्त रंग भरा. मी स्केच कसे   काढते तेही काळजीपूर्वक बघा”
 असं म्हणून बुडवला की ताईंनी रंगाच्या डब्यात ब्रश आणि   भिंतीवर फटकारे देण्यास सुरवात केली.
 ‘ए ताई थेट ब्रशने चित्र काढतायेत...पेन्सिलबिन्सील काही   नाही...आणि चुकलं तर...अरे खोडायचं कसं...’
 मुलांनी जो ‘आ’ वासला होता; त्यात हे सारे प्रतिसाद मी   स्पष्टपणे वाचले.
 इकडे ताईंचे काम सुरूच होतंं.
 बेसिक स्केच भिंतीवर उतरलं होतं.
 त्यात कुठेच चूक नव्हती.
 ना आकारातील ना प्रमाणातील.
 आता कामथे सरांनी १५ मुलांचे ५-५ चे ३ गट केले.
 एकावेळी एका गटाला काम.
 पहिला गट पुढे आला.
 त्यांच्या हातात रोलर दिले गेले.
 आजवर केवळ पेंटरच्या हातात पाहिलेली गोष्ट स्वतःच्या   हातात   पकडताना मुलांना जो आनंद झाला तो केवळ   पाहण्यासारखा.
 “रोलर पूर्ण रंगात बुडवा. छान निथळून घ्या. आणि हो   एकसारखा   नका फिरवू. वरखाली, उभाआडवा फिरवा.   छान  टेक्चर तयार होऊ   देत. बिलकुल सपाट नको” ताईंच्या   सूचना सुरु झाल्या.
 मुलांचे हात त्यानुसार फिरू लागले.
 २४*१२ ची भिंत रंगवायची होती.
 त्यामुळे काही मुले ‘घोड्या’वर स्वार झाली.
 काही टेबलावर स्टूल ठेवून त्यावर उभी राहिली.
 काहींनी चक्क माळ्यावर आपलं बस्तान थाटलं.

दुसऱ्या गटातील मुलांनी आधार देण्याचं काम केलं.
पांढरी भिंत आता निळसर दिसू लागली.
एकीकडे ताईंनी रंगांच्या छटा करायला घेतल्या.
स्टेनरच्या साह्याने एकाच   रंगातून विविध शेड्स तयार होऊ लागल्या.
 त्या छटा भिंतीवर थोड्या वापरून मूळ चित्राशी त्या   जुळतायेत   ना हे पाहणं सुरु झालं.
 आता सुरु झालं प्रत्यक्ष रंगकाम.
 सर्वांच्या हातात आता ब्रश आले.
 प्रत्येक जण त्याला नेमून दिलेला भाग मनःपूर्वक रंगवू   लागला.
 या रंगकामाच्या वेळी काहीवेळा मजेशीर दृश्य दिसायचं.
 टेबलावर उभी राहून काम करणारी मुलं.
 त्याच टेबलावर बसून काम करणारी मुलं.
 आणि त्याच टेबलाच्या खाली बसून काम करणारी मुलं.
 काम सुरु होऊन आता ४-५ तास झाले होते.
 चित्र निम्म रंगवून झालं होतं.
 अगदी खर सांगायचं तर ते ठीकठाक दिसत होतं.
 होईल ना छान?
 दिसेल ना सुंदर?
 माझ्या मनात प्रश्नांची मालिका सुरु झाली होती.
 थोड्या वेळानं चित्रात तपशील भरण्याचं काम सुरु झालं.
 त्यातल्या साध्या साध्या युक्तीने चित्र अधिक अधिक उठावदार   होत गेलं.
 “मुलांनो आता चित्र अंतिम टप्प्यात आहे. आता चूक नको   बरं.   आता चूक झाली तर सुधारायला वाव नाही. दमला   असाल,   कंटाळा आला असेल तर दुसऱ्याला काम द्या.   थोडा  वेळ विश्रांती   घ्या.” – सलग ६-७ तास काम   केल्यानंतरही आभाताईंच्या सूचना   देण्याचा स्वर प्रेमळच   होता.
 ही एक गोष्ट मी कधी शिकणार आहे कुणास ठाऊक.
 रोलर, ब्रशनंतर आता थेट बोटांचा वापर सुरु झाला.
 चित्रात ठिकठिकाणी ठिपके आले.
 फारच गंमत आणली या ठिपक्यांनी.
 पुढच्या २,३ तासात चित्राचा चेहरामोहराच बदलला.
 ताईंनी काढून आणलेल्या चित्रापेक्षाही भिंतीवरच चित्र अधिक   सुंदर झालं होतं.
 अधनंमधनं खिडकीतून डोकावणाऱ्या अन्य मुलांचे   प्रतिसादही  हेच  सांगत होते.
 शेवटच्या अर्ध्या तासात ताईंनी सर्व सूत्रे स्वतःच्या हातात   घेतली.
 मुलांना परत एकदा बारकाईने निरीक्षण करण्यास सांगितलंं.
 फिनिशिंग काय असतं हे मुलांनी या अर्ध्या तासात अनुभवलं.
 सायंकाळी ६ च्या सुमारास चित्र पूर्ण झालं.
 चित्र अप्रतिमच झालं होतं.
 सहभागी मुलांना घ्यायला आलेले पालक आपल्या मुलांना,   “तुम्ही   रंगवलंय हे?” असं अविश्वासाने विचारू लागले.
 पालकांच्या मोबाईलमधून बालकलाकारांचे फोटोसेशन सुरु   झालं.
 पुढच्या काही मिनिटांंतच चित्र शेकडो लोकांपर्यंत पोहचलं.
 चित्राचं, मुलाचं, ताईंचं भरपूर कौतुक सुरु झालं.
 या पार्श्वभूमीवर मी लगेच पुढील कार्यशाळेची तारीख जाहीर   करून नोंदणीचंं आवाहन करून टाकलं.
 नेमकं काय साधलं या खटपटीतून???
 मुलांना एका कलाकाराची कला जवळून पाहता आली...
 त्या कलाकारासोबत कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला...
 भित्तिचित्रातले अनेक बारकावे समजले...
 माझ्या वर्गाची भिंत मी रंगवली ही कदाचित आयुष्यभर   लक्षात   राहणारी ठेव मुलांना गवसली...
 वर्गाच्या सौंदर्यात नक्कीच भर पडली...
 न जाणो वर्गातील अध्ययन अध्यापनालाही पोषक वातावरण   तयार झालं असावं...
 ..................................................
 ५ भिंती पूर्ण झाल्यावर एक कल्पना सुचली.
 एखादी भिंत सर्व विभागातील कला अध्यापकांनी रंगवली   तर...
 शाळेत तब्बल १९ विभाग.
 या सर्वांंतून कलेची आवड असणाऱ्यांचा शोध सुरु केला.
 सापडले की १५ जणं.
 त्यातील एक सदस्या तर कार्यालयात हिशेब तपासणीचं काम   करणाऱ्या होत्या.
 धमाल केली या सर्वांनी.
 त्या दिवशी आभाताईही खुश होत्या.
 कारण त्या दिवशी त्या निवांत होत्या.
 कोणतीही गडबड नाही.
 दंगामस्ती नाही.
 रंगांची सांडवासांडवी नाही.
 सतत सूचना करण्याचीही आवश्यकता नाही.
 चित्रही अंमळ लवकरच पूर्ण झालं त्या दिवशी.
 मलाही या चित्राची उत्सुकता होतीच.
 उत्तमच झालं होतं चित्र.
 सर्वांंनीच आपल्यातील सर्वोत्तम ते देण्याचा प्रयत्न केला होता   याची जणू साक्ष म्हणजे ते चित्र होतं.

वर्षभरात खालच्या मजल्यावरील ११ वर्गातील भिंती रंगवून पूर्ण  झाल्या.
एकूण मिळून सुमारे १६० विद्यार्थ्यांच्या सहभागाने.
 हत्तीच्या पिल्लाची शेपूट पकडलेली आई हत्तीण. पिल्लू   हत्तीवर   स्वार झालेली इटुकली पिटुकली. त्यातली बोलक्या   डोळ्यांची   मुलगी तर खरी वाटावी अशी. हत्तीणीवर   विराजमान झालेलं   शैक्षणिक साहित्य...ही आनंददायी   शिक्षण वारी खरंंच   पाहण्यासारखी.
 प्रत्येकच चित्र असं वर्णन करण्यासारखं. 
 हत्ती, उंट, मोर, खवले मांजर, मासे, पांडा यांच्यापासून ते   राजगड, संथाल चित्रशैली, पुण्यातील प्रसिद्ध वास्तू असं खूप   काही  अवतरलं वर्गातून.
 एकत्र ही सर्व चित्रं बघताना खरंंच मजा येते.
 त्यासाठी एकदा नक्की वेळ काढून या बरं.



२-३ वर्षांनी चित्रांचे रंग उतरतील, फिके पडतील.
परत एकदा ही चित्रे काढून घेण्याचा मोह होईल.
 पण...त्यावेळी आर्या, साहिलच्या मार्गदर्शनाखाली बाकी   मुलांनी   काम करावं अशी इच्छा आहे.
 (आर्या, साहिल कोण हा प्रश्न पडला तर ‘रंग पेरताना’ हा   ब्लॉग   कृपया वाचावा.)
 पाहूयात काय काय आणि कसं कसं होतंय ते.
 छोटी छोटी स्वप्नं दाखवायला...अपेक्षा व्यक्त   करायला...हरकत  ती काय...

शिवराज पिंपुडे 
शिक्षण समन्वयक 
ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र 
8888431868, 9423239695










Comments

  1. 11 भिंती रंगविताना प्रत्यक्ष नव्हते... या लेखाने त्या दुनियेत नक्कीच नेले... धन्यवाद ही सफर घडविल्या बद्दल 👏👏👏

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. खूपच छान !
    भिती बोलक्या कशा झाल्या ?
    हा प्रवास खूप मस्त वाटला

    ReplyDelete
  4. Chan kalpana pratyakshat utrawalit

    ReplyDelete
  5. शीर्षक एकदम मस्त आहे आणि लिहिलेले ही छान

    ReplyDelete
  6. खरं तर रंग, चित्र, ब्रश, याचा माझ्याशी फारसा संबंध नाही.. पण या उपक्रमामुळे खर्च आपणही एखादी भिंत रंगवावी अस वाटतं य..
    माझ्यासारख्या अनेकांना य कलेविषयी आस्था निर्माण झाली असेलच.. यातच या उपक्रमाचे यश आहे, हो ना??

    ReplyDelete
  7. हे ह्रदयीचे ते ह्रदयी या उक्तीप्रमाणे मनातील भाव चित्रकलेच्या माध्यमातून भिंतीवर उतरविण्याची ही कल्पनाच मोठी कलात्मक आहे. भारीच.
    नेहमी प्रमाणे मुलांसाठी ही अनुभुति व नवे शिकण्याची छान संधी होती.
    तुझे व छोट्या चित्रकारांच्या चमूचे अभिनंदन!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog