#शांतता...नाटक बसते आहे...


शांतता...नाटक बसते आहे...

‘अरे किती वेळा सांगायचं रे? प्रेक्षक काय विंगेतून नाटक बघणार आहेत का? समोर बघा. पाठ करू नका...’
‘अरे तुम्ही काय प्रेक्षकातून स्टेजवर येताय का? विंगेतून या.’
(कुठली विंग? इथे तर साधा पडदा पण नाहीये. – मुलांच्या मनातील प्रश्न.)
‘अरे त्या दोन फरशा आहेत ना ती तुमची विंग. त्यांच्यावरूनच जा ये करा. कुठेही सराव करताना प्रथम जागा ठरवून घ्यायच्या. लक्षात ठेवा...’
मानसीताईंचा तार स्वरातील आरडाओरडा सुरु होता.
काही वेळा सांगून पुरत नाही.
-    मग दोघी – मानसीताई व मयुरीताई तरातरा उठतात.
(पात्रपरिचय - या दोघी अभिव्यक्ती विकसन योजनेतील नाट्य विषयाच्या प्रशिक्षिका. दोघीही मुळच्या तळेगावच्या. कलापिनी संस्थेतील डॉ. परांजपेंच्या कडक तालमीत घडलेल्या. अनेक व्यावसायिक नाटकांचा अनुभव गाठीशी. एकमेकांच्या घट्ट मैत्रिणी. आणि हो मयुरीताई या शाळेच्या पालकही आहेत बरं.)
तो सीन प्रत्यक्ष करून दाखवायला लागतात.
त्यातही एक पोरगं फटका खातचं.
या दोघी सीन करून दाखवत असताना संबंधित मुलांनी तो भाग समोरून, प्रेक्षकातून पाहिला पाहिजे; असा यांचा आणखी एक नियम.
एक पोरगं त्याच्याच जागेवरून मान वाकडी करून पहात होतं.
खाल्ला मग रट्टा त्यानं.
मग दोघी अगदी समरसून तो सीन करून दाखवतात.
‘समजलं का? हे असे करा रे. एनर्जी लावा रे जरा...’
‘रे’ वर दोघींचा फार जोर.
पण या दोघींना नाटक बसवताना पाहताना मी भरपूर आनंद घेतो.
तयार स्क्रिप्ट वरून नाटक बसवण्यापेक्षा ते improvise करत जायला यांना अधिक आवडतं.
जसं की –
‘अरे तुम्ही थेटरमध्ये आलाय याचा प्रेक्षकांना काय साक्षात्कार होणारे का? established करा जरा.’
या इतकचं सांगणार.
मग मुलं एका कोपऱ्यात जाणार.
काहीतरी खुसुरफुसुर करणार.
सीन परत सुरु होणार.
‘ए हा पिक्चर कधी रिलीज होतोय? मला पाहायचाय.’
‘ए हे पोस्टर किती मस्त आहे ना.’
ही भर मुलांचीच.
सीन improvise करताना मुलांचीही मते ऐकायची.
पटलेली मोकळेपणानं स्वीकारायची.
या बाबतीत काही मानपान नाही दोघींचही.
असं करत सीन बसला की एक बरं हस्ताक्षर असणारं पोरगं वही पेन घेऊन एका कोपऱ्यात बसवायचं.
सीन सुरु करायचा.
आणि त्याला संवाद लिहायला सांगायचं.
की झाली यांची स्क्रिप्ट तयार.
एकूणच काय मोठी आनंददायी प्रक्रिया असते ही.
त्यामुळे वेळ झाला रे झाला की मी नाट्य खोलीत डोकावत असतो.
.................................
या वर्षी एका नाट्य स्पर्धेचा विषय होता पर्यावरण.
मयुरीताईंच्या डोक्यात एक १० ओळींची गोष्ट तयार होती.
त्यावरून तब्बल ३० मिनिटांचं बालनाट्य बसवायचं होतं.
दोघींनी मिळून ‘स्क्रीन प्ले’ लिहून काढला.
मी पण ही भाषा शिकतोय बरं.
मग सुरु झालं एकेका सीनचं improvisaton.
यावेळी त्यांनी आमच्याच विभागातील स्मिताताई माने यांना हाक मारली.
(पात्र परिचय – याही आपल्याच माजी विद्यार्थिनी. शिष्यवृत्ती परीक्षेत, बोर्डात वगैरे चमकलेल्या. आमच्याकडे विज्ञान व गणित विषय शिकवतात. पण मराठीही उत्तम आहे यांचं. छान सुचतं यांना. स्वतःचा ब्लॉग ही लिहितात.)
दोन कप चहा आणि थोडी शांत जागा पुरवल्यावर स्मिताताईही सीनच्या सीन पाडू लागल्या की.
एकहाती...एकटाकी...
.............................................
२ आठवडे झाले होते.
कसून सराव सुरु होता.
कसून म्हणजे १२ ते ६.
मुले शाळेत बसतच नव्हती.
किंवा नाटकाचीच शाळा सुरु होती असे म्हणा फार तर.
एकदा सराव सुरु असताना अचानक प्रार्थना सुरु झाली.
‘बापरे ६ वाजले? अजून एक सीन घ्यायचा होता.’ – मानसीताई.
सलग ६ तास सराव घेतल्यावरही या बाईला अजून वेळ हवा होता ही गोष्ट मला पचतच नाही.
‘ओ ताई बास झालं आता. चला मस्त चहा घेऊयात.’
माझी ‘नम्र’ सूचना.
याला मात्र सर्व जण लगेच तयार.
शाळेजवळच एक ‘चहा का अड्डा’ नावाचं अमृततुल्य सुरु झालंय.
पुण्याच्या तोडीस तोड.
तिथल्या फर्मास चहासोबत आमची छोटेखानी बैठक सुरु झाली.
‘शिवराज दादा तुम्हाला मागच्या वर्षीची  अंतिम फेरी आठवतीये का हो?’ मयुरीताईंनी विचारलं...
'हो तर. ती कशी विसरेन मी...'
स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला होता.
तब्बल ७० संघ सहभागी होते.
त्यातून अंतिम स्पर्धेसाठी केवळ १२ संघ निवडण्यात आले होते.
त्यात आमचाही संघ होता.
पुण्याच्या बालगंधर्वला अंतिम फेरी सुरु होती.
या स्टेजवर मुलांना सादरीकरणाची संधी मिळाली हेच आम्हाला मोठ्ठं बक्षीस वाटत होत.
आमच्या आधी रमणबाग प्रशालेचा प्रयोग सुरु झाला.
नाटक सुरु झाल्याच्या मिनिटापासून ते संपेपर्यंतच्या क्षणापर्यंत आम्ही अक्षरशः अवाक् होऊन पहात होतो.
नाटक संपताच आम्ही तिघांनीही उभं राहून टाळ्या वाजवल्या.
बालनाट्य कशाशी खातात हे त्यादिवशी मला समजलं.
मयुरीताई म्हणाल्या, ‘शिवराजदादा त्यांनी उत्तमच केलं. शंकाच नाही. पण त्यांच्या यशाचं एक मुख्य कारण म्हणजे त्यांची प्रकाश योजना, संगीत, नेपथ्य यांची स्वतंत्र टीम आहे. किती जण आहेत त्यांच्या टीममध्ये बघा की जरा. आपल्याकडे आम्हीच सगळीकडे नाचणार. मग मर्यादा पडणारच ना? आणि आम्ही कलाकार आहोत. ना दिग्दर्शक ना तंत्रज्ञ...’
आज चहा पिताना परत एकदा या संवादाची उजळणी झाली.
दुसऱ्या चहाच्या कपाला मात्र मी धडाधड फोन फिरवले.
सुश्रुत, सिद्धी आणि सुधाकरजी.
योगायोगानं तिघांचीही नावे ‘S’ पासून सुरु होतात आणि फोन करणाऱ्याचेही.
(पात्र परिचय – सुश्रुत जोशी – गुरुकुलाचा माजी विद्यार्थी. आमच्या दोघांच्या गुरुकुलातील ‘य’ आठवणी आहेत. सध्या सुश्रुत व्यावसायिक प्रकाश योजनाकार म्हणून काम करतो. या संदर्भात अगदी परदेश वारीही करून आलाय.
सिद्धी – ही शीतल कापशीकर या आमच्या एका माजी विद्यार्थिनीची मुलगी. गायन व सिंथ वर मनापासून प्रेम करणारी. नुकतीच तिनं विशारदची परीक्षा दिलीये.
सुधाकर देशपांडे – आमच्या शाळेचे माजी पालक. केवळ म्हणायला माजी. दर वर्षी यांच्या घरातील गणपतीची सजावट हालतीडुलती असते. म्हणजे फक्त बाप्पा विराजमान झालेलं टेबल हालत नाही. बाकी सर्व हालता देखावा.)
तिघांना विषय समजावून सांगितला.
सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
अर्थात नकार अपेक्षित नव्हताच मुळी.
आता या दोघींनाही जोर आला.
६ पैकी एका तासाचा सराव संगीतावर सुरु झाला.
सुधाकरजींनी साहित्याची जमवाजमव सुरु केली.
आता केवळ आठवडा बाकी होता.
म्हटलं एक परीक्षण करून घेऊ.
तब्बल ५ परीक्षक बोलावले.
त्यातला एक होता गौरव पत्की.
(पात्र परिचय – गुरुकुलाचा माजी विद्यार्थी. गुरुकुलात असताना याला ‘हृदय चाहिये’ हे काव्य मी शिकवलंय. एकदम खास मित्र. F.T.I. मधून यानं स्क्रीप्ट रायटिंग चा कोर्स पूर्ण केलाय. सध्या विविध मालिकांसाठी लेखन करतो.)
त्यानं नाटक पाहिलं.
त्याच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट होते.
म्हंटल, ‘गौऱ्या एकदम खरं खरं सांग.’
‘चांगल झालंय दादा. पण पथनाट्य वाटतंय. यातील नाट्यमयता केवळ एकाच प्रसंगात आहे आणि ती तुम्ही ५ मिनिटात संपवताय. केवळ सिन्स अदलाबदली करूनही चांगला परिणाम साधता येईल.’
इकडे मानसीताईंचे डोळे लकाकले.
त्यांनाही काही तरी खटकत होतंच.
काय ते आज समजलं.
मी मात्र गॅसवर.
कालपर्यंत 'बसलं' असं वाटणारं नाटक उद्यापासून खरं 'उठणार' होतं तर.
परत एकदा ६ तासांचा सराव सुरु झाला.
ना रविवारची सुटी, ना संक्रातीची ना २६ जानेवारीची.
पण नाटकानं चांगला आकार घेतला.
मुलांनीही सगळे बदल चटकन आत्मसात केले.
D Learning ची प्रक्रियाही लवकर केली मुलांनी.
इकडे सिद्धीने उत्तम music pieces compose केले.
नाटक नदी प्रदूषणावर होतं.
नाव होतं – 'नदी उवाच'. (आमचे संस्कृतचे शिक्षक सोन्नर आर्यांनी सुचवलेलं.)
म्हणून सुधाकर देशपांडे यांनी दोन डोंगरांच्या मधून मोटरच्या साह्याने चक्क नदीचा उगम दाखवला.
खरेखुरे पाणी पडताना होणाऱ्या आवाजानं नाटक एकदम वेगळ्याच उंचीवर पोहचलं.
आदल्या दिवशी सुश्रुत आला.
एकदा त्यानं सर्व नाटक पाहिलं.
मग spot लावून घेतले.
‘दादा LED लागतील निळे. म्हणजे स्टेजचा आर्धा भाग निळसर होईल.’
माझा चेहरा त्याने वाचला.
‘दादा, तुला काय द्यायचे ते पैसे दे. बक्षीस मिळाले तर पार्टी मात्र हवी बरं.’
शेवटचा सराव with light, music, drepary व नेपथ्यासह झाला.
मुलांनीही काही उणीव ठेवली नाही.
प्रत्यक्ष स्पर्धेतील सादरीकरणही उत्तम झालं.
प्रेक्षकांसह परीक्षकांनीही मनापासून आनंद व्यक्त केला.
आता कितवा क्रमांक याच्याशी खरंच देणंघेणं नाही.
एकतर नाटक बसण्याच्या प्रक्रियेतील आणि सादरीकरणातील आनंद आम्ही भरपूर घेतलाय.
आणि दुसरं म्हणजे आता आमची ‘नाटक कंपनी’ तयार झालीये.
त्यामुळे आता शाळेत नाट्य हा विषय अधिक जोरकसपणे रुजेल याबाबत माझ्या मनात तरी शंका नाही.
.............................................
निक्काल लागला होता.
कलापिनी संस्था आयोजित व सकाळ N I E आयोजित दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक.
याशिवाय लेखनात अनुक्रमे द्वितीय व प्रथम, दिग्दर्शनात दोन्ही स्पर्धेत प्रथम, संगीत साथ प्रकारात विशेष बक्षीस आणि उत्कृष्ट अभिनयासाठी 'सकाळ'च्या स्पर्धेतलं मुलींसाठीचं बक्षीसही...निव्वळ धुव्वा. 
मुले मनापासून समाधानी होती.
३ आठवडे शाळा बुडल्याचे पालकांचेही दुःख थोडे हलके झाले होते.
स्पर्धेतील यश खूप महत्वाचे नसले तरी तुमची प्रक्रिया योग्य दिशेने सुरू आहे हे सांगतेच ते.
आम्ही त्याच आनंदात होतो, आहोत.
दुसरं म्हणजे स्पर्धेमुळे उत्तमतेचे अनेक निकष मुले सहज शिकतात असं मला तरी नक्की वाटतं.
.............................................
बक्षीस समारंभ कार्यक्रमातून परताना मयुरीताई म्हणाल्या,
‘अहो तुम्हाला एक सांगायचं राहिलं. तो वेद आहे ना, फारच सिन्सियर आहे. सांगितलेल्या गोष्टी तो अगदी मनापासून करतो. तालमीच्या वेळी वेळ मिळाला तर इतरांसारखी मस्ती न करता चक्क गोष्टीचं पुस्तक वाचतो.’
'हो अभिव्यक्तीतील नाटकाचा तास बुडलेला आवडत नाही त्याला. पण सादरीकरणापूर्वी त्याला थोडा ताण येतो.’ मानसीताईंनी भर घातली.
वेदविषयीच्या या गोष्टी मलाही नवीन होत्या.
‘असं नाटकातील सर्व मुलांविषयी सांगू शकाल काय?’ मी
‘का नाही? नक्कीच.’
लवकरच आमच्या सर्व अध्यापाकांसोबत यांची एक बैठक ठेवायला हवी.
.............................................
आज मुलांशी सहज संवाद केला.
कसा होता हा महिनाभराचा अनुभव असं विचारलं.
भरभरून बोलली मुले.
‘दादा, रोज सकाळी आई सांगायची मला की मी झोपेतही डायलॉग म्हणतीये म्हणून.’
‘दादा, एका नाटकासाठी इतकी मेहनत घ्यायला लागते हे प्रथमच समजलं.’
‘दादा, मस्त टीमवर्कचा अनुभव घेतला.’
‘दादा, माझा रोल स्पर्धेआधी ४ दिवस बदलला. त्यात तो आधीपेक्षा छोटा होता. पण नाराज न होता तोही उत्तम करायचं ठरवलं मी.’
‘दादा, माझे बाबा मला म्हणायचे नाटक सोडून तू आमच्याशी काही तरी बोल बाई.’
थोडक्यात काय खाता-पिता, उठता-बसता, झोपता-जागेपणी मुलांना केवळ नाटकच आठवत होतं.
शिक्षण प्रक्रियेतला हा एक महत्वाचा अनुभव आहे, हो ना?

शिवराज पिंपुडे
शिक्षण समन्वयक 
ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र 
8888431868

Comments

  1. नेहमी प्रमाणे मस्तच दादा.......

    ReplyDelete
  2. पडद्यामागे तुझ्यासारखे आहेत म्हणून रंगमंचावर नवीन कलाकार अनुभव साठवत आहेत.
    असेच प्रयोग करत रहा.💐

    ReplyDelete
  3. शिवराजदादा....अप्रतिम लिखाण
    नाटक टीम मधील मुलांनाही वाचायला द्या त्यांचे कौतुक त्यांच्या पुढील वाटचालीस अजून बळ देईल.

    ReplyDelete
  4. फारच छान. विविध पैलूंवर नवीन पिढी अधिक समृद्ध करताय. रंगमंच किंवा नाटक ही माणूस घडवणारी उत्तम पायरी असते. वाचन, सपोर्ट, एकमेकांना सांभाळून घेणं, कमी पडेल ते भरून काढणं हे सगळं शिकायला मिळतं.
    सगळ्याचं खूप अभिनंदन. .

    ReplyDelete
  5. खूपच मस्त झालंय दादा. तुझ्या लिखाणातून सगळा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला..👌

    ReplyDelete
  6. नेहमी प्रमाणे सुरेख लिहिलंय...

    ReplyDelete
  7. फारच छान दादा अस वाटल कि तिथच आहे.

    ReplyDelete
  8. आज खूप दिवसांनी शाळेत आल्या सारखं वाटले लेख वाचताना. सर्व टिमचे अभिनंदन.

    ReplyDelete
  9. नक्कीच दादा .
    खूप योग्य आणि सुंदर पण सोप्या भाषेत तुम्ही सगळंच सांगितलं.
    नाटक करणं हा अनुभव मुलांना त्यांच्या आयुष्यभर लक्षात रहाणारा असतो .आणि त्यात आता ही मुले सामील झाली आहेत . पुढे जाऊनही हे नक्कीच फार उपयोगी पडेल त्यांना.

    ReplyDelete
  10. खूपच सुंदर . दादा लिहिलय तू पण वाचताना प्रत्यक्ष अनुभव घेतल्या सारखे वाटते आहे👍👍✌✌✌

    ReplyDelete
  11. I read entire blog.
    My observations are,
    1. You have extraordinary narrative skill which makes your content so lively that a reader can visualise it, this is a rare quality for any writer.
    2. Involvement of students was very encouraging.
    3. You involved per-students, which was real key of unexpected success.
    4. You have provided real "stage" to the students.
    5. This entire experience of setting up a play and winning the competition will provide several learning experiences to the participants.
    6. In next 10 years Shivraj Pimpude will be known as leading innovative researcher and practitioner of school education in India.( Plz don't take it as flattering, note it and remind me around 2030)
    All the good wishes Dada.
    Regards,
    Dr. Vaibhav Dhamal

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog