#राकट देशा कणखर देशा 'गडां'च्याही देशा...


राकट देशा कणखर देशा 'गडां'च्याही देशा...

(अभ्यास सहल क्र.२)



‘परत’ एकदा इतिहासाचा तास.
परत शब्दाचा संदर्भ मागील विरगळींवरचा ब्लॉग.
‘मग आवडलं का कालचं डॉ. संग्राम इंदोरे यांचं व्याख्यान? किती घटक समजले एखाद्या किल्ल्याच्या निरीक्षणाचे?’
‘दादा व्याख्यान छान झालं. मी २९ घटकांची यादी केलीये.’
‘मी ३०.’
‘दादा माझे ३२ घटक.’
‘ठीकये ठीकये. चला आपण फळ्यावरच यादी करू. सांगा एकेक घटक.’
‘घेरा, तटबंदी, बुरुज, महाद्वार, दिंडी दरवाजा....
मुले सांगू लागली.
मी फळ्यावर हात चालवू लागलो.
मोजून ३१ घटकांची यादी झाली.
‘बरं याशिवाय अजून कोणती माहिती आपल्याला असायला हवी? आपण मिळवायला हवी?’
‘दादा किल्ल्याची उंची.’
‘किल्यावर घडलेला इतिहास.’
‘आजूबाजूचे किल्ले.’
ही सुद्धा यादी १०, ११ पर्यंत गेली.
पुढच्या तासाला याबाबतचा आणखी एक लेख वाचून दाखवला.
त्यात किल्ल्यावर जाण्यापूर्वी करायचा अभ्यास, प्रत्यक्ष किल्ला पाहताना केलेल्या नोंंदी, पडलेले प्रश्न आणि नंतर त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा केलेला प्रयत्न असे तीन टप्पे छान सांगितले होते.
‘चला पूर्वतयारी उत्तम झाली आहे मुलांनो. आता जाऊयात एखाद्या गडावर.’
निलेशजी गावडेंना संपर्क करून कोरीगड निश्चित केला.
(मागच्या वर्षी तिकोणा किल्ल्यावर गेलो होतो.)
(श्री. निलेशजी गावडे – शाळेचे पालक, गडकिल्ल्यांचे अभ्यासक, गडकिल्ले सेवा समितीचे सदस्य, एका वाक्यात सांगायचं तर इतिहास जगणारा माणूस, आठवड्यातून एकदा तरी कोणत्या तरी किल्ल्याचा माथा हे गाठणारच. एकटे नाही. अनेकांना घेऊन. यांचा स्वतःचा कोणताही किल्ला बघायचा शिल्लक नाही. त्यामुळे किल्ला पहावा तर गावडेंंसोबतच...)
‘गावडे साहेब किल्ल्याचा नकाशा पाठवा. पालकांच्या ग्रुपवर पाठवतो. मुलांना पाहायला सांगतो.’
पाचव्या मिनिटाला नकाशा माझ्या मोबाईलमध्ये होता.
‘रघुभाई परवा वेळ ठेवा. कोरीगडावर जायचं आहे.’
‘येतो की दादा.’
(श्री. रघुराज एरंडे – हेही शाळेचे पालक, गावडेंंमुळेच हे माझ्या संपर्कात आले. गावडेंंची सर्व विशेषणे यांना लागू होतात. एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे गेली १० वर्षे चिंचवड गावात दर दिवाळीत एखाद्या तरी किल्ल्याची भव्य प्रतिकृती तयार करतात. यांची सगळी दिवाळी तो किल्ला दाखवण्यातच साजरी होते.)
...................................................
‘मुलांनो मागच्या सहलीत मुलांनी चुलीवर मसालेभात केला होता. तुमची इच्छा असल्यास ठरवू शकता.’
त्याच दिवशी शाळा सुटताना समीक्षा व ऋतुजा माझ्याकडे आल्या.
‘दादा आम्ही बनवतो भात.’
‘बयांनो मी काही मदत करणार नाही. मला वेळ नाही. साहित्य काय आणायचं, कुणी आणायचं, ते गडावर कसं न्यायचं, पाण्याची व्यवस्था, करणार कोण सर्व काही बघावं लागेल.’
मी पुरेसं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला.
पण...
‘दादा तू फक्त परवानगी दे. बाकीचं सगळं आम्ही बघतो.’
‘ठीकये. मग लागा कामाला.’
माझ्या लक्षात आलं.
या दोघींना किल्ला दिसत नाहीये.
त्यांनी त्यांच्या पुरतं उद्दिष्ट निश्चित केलंय.
‘चुलीवरचा खमंग मसालेभात.’
....................................................
स. ७.३० वाजता घोषणांच्या दणक्यात सहल सुरु झाली.
३९ मुली व ३१ मुले मिळून ७० जण होते.
सोबत ३ अध्यापक, २ पालक, २ तज्ञ मिळून एकूण ७ जण होतो आम्ही.
दोन पालकांपैकी एक होत्या डॉ. प्रतिमाताई काळे.
यांना सोबत घेणे हा एक उत्तम निर्णय ठरला.
मनशक्ती केंद्रात मोठ्यांचा तर लोणावळ्याच्या रायवूड उद्यानात (देवराईत) मुलांचा नाश्ता झाला.
तेथील वृक्षसंपदा मन प्रसन्न करून गेली.
११ च्या सुमारास किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो.
‘मला सर्वांच्या डोक्यावर टोपी हवी. बुटाची लेस नीट बांधा. सॅक पाठींवर हवी. पाठीच्या खाली नको. चढताना उतरताना दुसऱ्याला धरू नका......’- इति गावडे सर.
गावडेंनी सहल ताब्यात घेतलीये याचे हे सूचक होते.
‘भात बनवण्याचे साहित्य जो थोडा वेळ तरी वर चढवेल त्याच्याच नशिबात भात असेल.’ – मी.
इतकी सूचना पुरेशी ठरली.
साहित्य घ्यायला मुलांनी नंबर लावले.
एका रांगेत ७७ जणांची फौज निघाली.
किल्ल्याची चढण एकदम सोपी.
एक तासही खूप झाला किल्ला चढायला.
पण माहिती घेत घेत पोहचायला २.३० तास लागले.
सुरवातीलाच पाण्याचं टाकं लागलं.
टाकं कोरडं होतं.
रघुभाई  आत उतरले.
एकेका गटाला आत घेऊन माहिती सांगण्यास सुरवात केली त्यांनी.
मुलांनी सांगितल्या प्रमाणे measuring tape आणला होता.
प्रथम मोजमाप झालं.
२३*१५*८
'या आकारमानाला आता २८ ने गुणा.'
'२७६०*२८ = ७७,२८०.'
‘मुलांनो या उत्तराचा अर्थ म्हणजे इतके हजार लिटर पाणी या टाकीत साठू शकतंं.’
‘बरं का दादा एकाने हे गणित शोधून काढलंय.’
‘आणि मुलांनो या टाक्या खोदताना जो दगड निघतो तोच किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला जातो. आता या टाकीच्या अलीकडच्या दोन्ही बाजूच्या दगडांना मोठी भोकं आहेत याचा अर्थ या टाक्या झाकायची व्यवस्था होती पूर्वी. इथे अडसर लावला जात होता. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, शेवाळ होऊ नये म्हणून टाक्या झाकून ठेवल्या जायच्या...’
अशी एकेका गोष्टीची सविस्तर माहिती घेत गडावर पोहचलो.
‘दादा भात कधी बनवायचा?’
‘अग आधी डबे खाऊ. मग बघू.’
‘नाही आम्हाला नाही भूक. करू का आम्ही?’
एका गटाला त्याशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतंं.
गडावरच्या कोराईदेवीच्या मंदिरात उपासना झाली.
नंतर सर्वांनी डबे खाल्ले.
मला वाटलं झाला आता किल्ला बघून.
तर रघु म्हणाले, ‘दादा चला मुलांना चोर दरवाजा दाखवू.’
‘तो कुठेये?’
‘चला तर.’
मुलांना सुरक्षिततेच्या सर्व सूचना परत एकदा दिल्या गेल्या.
इकडे वृषालीने ऐटीत चूल पेटवायला घेतली.
लायटरने गॅॅस पेटवण्याइतकं हे सोपे नाही हे लवकरच समजलं तिला.
शेवटी गावडेंंनी सूत्रंं ताब्यात घेतली आणि मुलांनी हुश्श केलं.
‘तो’ गट खुश होता आता.
आम्ही सगळे बाकी मुलांना घेऊन चोर दरवाजाच्या शोधात.
वाट थोडी अवघड होती.
पण राघुदादांंनी मस्त उतरवलं एकेकाला खाली.
छानच अनुभव होता.
चिलखती तटबंदीचाही एक नमुना तिथे पाहायला मिळाला.
मुले खुश झाली.
या गडावर येणारे अनेक जण हा भाग न बघताच किल्ला उतरतात.
२ तास लागले सर्व गोष्टी पाहायला.
जंग्या, फांजी, शौचकूप....
'दादा ३१ पैकी २१ घटक पाहिले आपण या गडावर' सोहमने माहिती पुरवली.
सर्व फिरून जागेवर आलो.
भात तयार होता.
कधी एकदा आम्ही त्याची चव घेतो असे ‘त्या’ गटाला झाले होते.
दोन तास भर उन्हात किल्ला भटकल्यावर मसालेभाताची लागणारी चव ती काय वर्णावी...
काही मिनिटात भाताचा फडशा.
तिथल्या माकडांनाही थोडा नैवेद्य दाखवला.
बरीच तरतरी आली सर्वांना.
स्वयंपाकी गटाचंं तोंडभरून कौतुक केलंं.
भांडी विसळण्यात आली.
मग किल्ल्याचा उर्वरित भाग पाहिला.
'मुलांनो या किल्ल्याचे महत्त्व म्हणजे पुरंदरच्या तहात जे १२ किल्ले महाराजांनी स्वतःकडे ठेवले त्यातील एक म्हणजे कोरीगड. १६५७ मध्ये महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला...' रघुदादा किल्ल्याचा इतिहास सांगत होते.
पाच वाजून गेले होते.
आता लवकर  किल्ला उतरणंं गरजेचंं होतंं.
परत एकदा रांग लावून घेतली.
शेवटचंं counting झालंं आणि मावळे गड उतार झाले.
......................................
किल्ला उतरताना...
'गावडे साहेब आपल्या पुणे जिल्ह्यात एकूण किती किल्ले येतात हो?'
'२९.'
'काय म्हणता? आजचं समजलं हे.'
'रघुभाई आपण ज्या जिल्ह्यात राहतो तो जिल्हातरी मुलांनी आधी नीट पाहिला पाहिजे. नाही का?'
'काय विचार चालूये दादा?'
'म्हंटल करूयात का एक दुर्गमोहीम...इच्छुक मुलांच्या गटाला घेऊन जानेवारी २०२० पर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले सर करू. इतिहास समजून घेऊ. छोटासा पराक्रम करू. काय म्हणता?'
'चालतंय की दादा.' इति गावडे व रघुभाई.
मग होणार का आमच्या दुर्गमोहिमेत सहभागी?
वाट पाहतोय...

(जवळपास सर्व फोटो श्री. नागेश जोशींच्या सौजन्याने )
शिवराज पिंपुडे
ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र
शिक्षण समन्वयक
८८८८४३१८६८,9423239695




 



Comments

  1. मस्त तुमची सहल नियोजन बद्ध आणि खूप छान अनुभव देणारी असते दादा हेवा वाटतो मुलांचा

    ReplyDelete
  2. इतिहास असापण शिकवता येतो याचे आदर्श पण practical उदाहरण...

    ReplyDelete
  3. आम्हालाही घेऊन जा एखाद्या गडावर.

    ReplyDelete
  4. मला आवडेल सहभागी व्हायला

    ReplyDelete
  5. mule itihas pratykasha shikatat mast anubhaw

    ReplyDelete
  6. मस्त practical ईतिहास 👍 वाचताना गडावरच आहोत असे वाटले

    ReplyDelete
  7. दादा नमस्कार.
    एखाद्या किल्याचा अभ्यास कसा करावा, विद्यार्थ्यांना किल्ला कसा दाखवावा, सहलीचे वृत्तलेखन कसे करावे, सहलीत मुलांचे निरीक्षण कसे करावे, आणि अनुभव शिक्षण दिल्यानंतर आढावा कसा घ्यावा इत्यादी बाबी शिकायला मिळाल्या आणि आपले इतिहासप्रेम अधिक तीव्रतेने निदर्शनास आले. या लेखातून अप्रत्यक्षपणे केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि कोराईगडाची मानसिक सहल घडविल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete
  8. Dada, once again a wonderful blog.
    Our history is the greatest source of knowledge and pride, visiting forts and historical places can ignite the feeling of National Pride and sence of gratitude towards our glorious history.

    Your black board writing is so good. (Any plan to change black boards with green boards..? Think of it.)
    Visiting all the forts in Pune district is really good target you have set.
    I will be happy to join ...🙋‍♂️

    Regards,
    Dr. Vaibhav Dhamal

    ReplyDelete
  9. अप्रतिम लेखन! मी सुद्धा तुम्हा सर्वांबरोबरच होतो असा भास होऊ लागला...फक्त भात न खाल्ल्यामुळे भानावर आलो!

    ReplyDelete
  10. पुणे जिल्हातील दुर्गमोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा! आवर्जून करा, अद्याप कोणी एक जिल्हा घेऊन दुर्गमाहिम केल्याचे ऐकिवात नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog