#...विहंगमांचे भव्य थवे...


...विहंगमांचे भव्य थवे...
दीड तास झाला तरी मुले व्याख्यान ऐकण्यात दंग होती.
व्याख्याते होते श्री. उमेश वाघेला सर.
वाघेला सर व्यवसायाने आर्किटेक्ट.
पण हौसेने निसर्ग मित्र.
पक्षी, फुले, वृक्ष, कीटक या सर्वांचा उत्तम अभ्यास असणारे.
आज त्यांना दिलेला विषय होता 'परिसरातील पक्षी'.
पक्ष्यांचे आकर्षक फोटो आणि सोबत पक्ष्यांचे हुबेहूब काढून दाखवलेले आवाज यामुळे यामुळे मुले खुश होती. 
एकूणच उद्याच्या दिवसाची भरपूर उत्सुकता या व्याख्यानाने तयार झाली होती.
आमचा हेतू सफल झाला होता.
वाघेला सरांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.
व्याख्यानानंतर मी मुलांशी संवाद साधला.
"मुलांनो आज व्याख्यानात जे जे पक्षी आपण फोटोत पाहिले त्यातील बरेच पक्षी उद्या आपल्याला प्रत्यक्ष बघायचे आहेत. उद्याच्या सहलीला गणवेश नाही. हवा तो पोशाख घाला. खूप ऊन आहे. त्यामुळे अंगभर कपडे राहू द्या. कपड्यांचे रंग मात्र भडक नकोत.  निसर्गाशी मिळत्याजुळत्या रंगांंचे कपडे घाला. ज्यांच्याकडे घड्याळ आहे त्यांनी ते घालून या. आपल्याला काही निरीक्षणे नोंदवायची आहेत.  त्यात वेळेचाही संदर्भ आहे. म्हणून घड्याळ असू द्या. टोपी, बूट अनिवार्य.  पाण्याची किमान एक लिटरची बाटली घ्या..."
................
दुसऱ्या दिवशी सातच्या सुमारास सहलीस सुरुवात झाली.
थोड्याच वेळात मी माझ्याकडची पक्ष्यांवरची तीन चार पुस्तके मुलांमध्ये वाटली.
चाळा म्हंंटलंं.
त्यातील एक पुस्तक भिगवमध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांवरचंं होतंं.
"हे पुस्तक नीट बघा.  पक्ष्यांची चित्रंं, त्यांची नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. बघुयात पक्षी दिसल्यावर तुम्ही स्वतःहून किती पक्ष्यांची नावे सांगता ते."
बाकी गप्पा आता जरा बाजूला पडल्या.
काही मुलांची तरी डोकी पुस्तकात गेली.
कर्वेरोडला पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे सर गाडीत चढले.
ते गाडीत येताच मुलांनी टाळ्या वाजवून त्यांचंं स्वागत केलं.
मी किरण पुरंदरे सरांचा परिचय करून दिला.
सर म्हणाले, "मला किका म्हणा. किरण काका."
"एखाद्या पक्ष्याचंंच नाव वाटतंं की." स्मिताताईंनी त्यांचा अभिप्राय दिला.
आता किकांंनी मुलांशी संवाद साधण्यास सुरुवात केली.
भारतात एकूण किती प्रकारचे पक्षी आहेत?
महाराष्ट्रात किती प्रकारचे पक्षी आहेत?
न उडणारे पक्षी कोणते?
असे अनेक प्रश्न त्यांनी सुरुवातीला विचारले.
कालच्या व्याख्यानामुळे बहुतांश प्रश्नांची मुलांनी बरोबर उत्तरे दिली. 
मग किकांंनी त्यांच्याकडच्या माहितीचा पेटारा मुलांसमोर खुला केला.
पक्ष्यांच्या वैशिष्ट्यांपासून ते सर्वात उंचीवरून उडणाऱ्या पक्ष्यापर्यंत...पक्षी जगताची एक सफरच त्यांनी मुलांना घडवून आणली.
नऊ साडेनऊच्या सुमारास एका हॉटेलच्या परिसरात सर्वांनी नाष्टा केला.
नंतर थोड्याच वेळात पाटस आलंं.
तिथल्या तलावावर किकांंनी नेलं.
मी लगेच मुलांना पक्षीनिरीक्षणाची सूची काढून दिली.
प्रत्येक पक्ष्याची 7,8 मुद्द्यांच्या आधारे निरीक्षणंं नोंदवायची होती त्या सूचित.
मुलांनी कागद पॅडला लावला.
एका हातात पॅड दुसऱ्या हाताने स्पोर्टिंग स्कोप धरून मुलांनी पक्षी निरीक्षण सुरू केले.
स्पॉटिंग स्कोप... 
एक भन्नाट यंत्र.
पन्नास फुटावरच्या पक्ष्याचा डोळाही दिसतो यातून.
इतक्या दूरवरचा पक्षी इतका जवळ दिसतोय याचंंच मुलांना किती ते कौतुक.
किकांच्या नजरेनंं सात आठ प्रकारचे पक्षी तिथे टिपले.
झटकन त्यांनी  स्पॉटिंग स्कोप ऍडजेस्ट केला.
पहिला पक्षी होता नदीसुरय.
पिवळी चोच.
काळे डोके.
पांढरट मान व पोट.
बाकी रंग राखाडी.
याच्या हवेतील हालचाली पहात राहाव्या अशा.
फारच सुंदर पक्षी.
मुलांनी पक्षी बघून निरीक्षणे नोंदवणे सुरू केले.
किकांंनी 3 दुर्बिणी आणल्या होत्या.
मीही शाळेची दुर्बीण सोबत घेतली होती.
त्यातूनही मुलांचे पक्षी निरीक्षण सुरू झाले.
"मुलांनो तिकडे नीट बघा. दोन ठिकाणी पाणकावळा व बगळा एकत्र दिसत आहेत. दिसले का?"
"हो सर."
"त्यांची एक गंमत सांगतो. तुम्ही जसे डबे एकत्र खाता. कुणाची पोळी संपली तर तुमच्यातील देता. कुणाची भाजी आवडली तर सगळ्यांना थोडी थोडी देता. देता ना? त्या पाणकावळा व बगळ्याचे तेच सुरु आहे."
मुलांना बाउन्सर होता हा.
"अरे तो पाणकावळा बघा नीट. तो सूर मारेल बघा नदीत आता. मारला बघा...पाण्यात एखादं क्षेपणास्त्र गेल्यासारखं वाटलं की नाही? पकडला बघा त्याने मासा. पण त्याच्या या सूर मारण्यानंं त्याचा शत्रुपक्ष मासा घाबरतो. बिथरतो आणि पाण्याच्या वरच्या थरात येतो. मग काय बगळा टपलेलाच आहे त्यांना पकडायला.  याला पक्ष्यांमधील सहभोजिता असे म्हणतात."
निरीक्षण चालू असताना किका अशी इंटरेस्टिंग माहिती पुरवत होते.
पाटस तलावाच्या परिसरात आम्ही नदीसुरय, ब्राह्मणी बदक, काळा शराटी, वंचक, राखी बगळा, शेकाट्या, अडकित्ता करकोचा असे पक्षी पाहिले.
तिथून आम्ही भिगवणला निघालो.
रविवारचा दिवस होता.
त्यामुळे भिगवणला गर्दी असेल की काय अशी मला शंका होती.
पण गावात पोचण्यापूर्वीच एके ठिकाणी किकांंनी अचानक गाडी थांबवायला सांगितली.
"सर तिकडे भरपूर फ्लेमिंगो आहेत.  जाऊयात का तिकडे?"
“कुठे सर?”
“तिकडे त्या शेताच्या पुढे बघा.”
मला तर तिकडे केवळ पांढरे पुंजके दिसत होते.
"ते...ते फ्लेमिंगो आहेत का?".
"हो सर". 
लगेच गाडी बाजूला घेतली.
सर्व मुले उतरली.
शेताच्या बांधावरुन वाट काढत काढत सुमारे एक-दीड किलोमीटर चालल्यावर आम्ही एकदाचे त्या ठिकाणी पोहोचलो.
किकांंनी एके ठिकाणी लांबूनच स्पॉटिंग स्कोप लावून दिला.
मग त्यातून जे दृश्य दिसलं...
फ्लेमिंगो...अग्निपंख...रोहित पक्षी
शुभ्र शरीर.
पंखांना गुलाबी पिसे.
व काळी किनार.
लांबलचक गुलाबी पाय.
चोच मध्यभागी वाकलेली.
व टोकाला काळसर.
मानही लांबलचक.
विश्रांती घेताना वेटोळी करून पाठीवर टेकवून विसावा तिला विसावा देण्याची पद्धत.
एका पायावर उभं राहण्याचा छंद.
चालणंही शिस्तबद्ध.
उडणं तर काय विचारावं...उडताना पंखांच्या आतील गुलाबी भाग अग्निसारखा दिसतो म्हणून अग्निपंख नाव.
थवेच्या थवे पाहिले फ्लेमिंगोंचे.
त्यात जागा अशी होती की आमच्या शिवाय कोणीच पर्यटक नव्हते तिथे. 
फ्लेमिंगोंशिवाय चित्रबलाक, थापट्या, पट्टकादंब, कुरव, चमच्या, कांडेसर असे अनेक पक्षी पाहिले.
ऊन चांगलच वाढलं होतं.
भूकही चांंगलीच लागली होती.
परत तो दीड किलोमीटरचा परतीचा प्रवास सुरु केला.
जातानाच एक जागा हेरली होती.
पाट वाहत होता.
तिथे सगळ्यांनी तोंड धुतलं.
चैतन्याचा तो स्पर्श सगळ्यांना ताजंतवानं करून गेला.
आता थेट गावात गेलो.
तिथल्या मंदिरात जेवण केलं.
थोडी विश्रांती झाली.
समोर चांगलीच झाडी होती.
किकांच्या नजरेने तिथंही खूप काही हेरलं.
“सर चला आता जरा झाडांवरचे पक्षी दाखवतो.”
असंं म्हणून खाटिक, वेडा राघू, होला, गप्पीदास, पिवळा धोबी, भारद्वाज, कोतवाल यांचे दर्शन किकांनी घडवले.
सुमारे ३५-४० पक्षी पाहून झाले होते आत्तापर्यंत.
मुले तृप्त होती.
निसर्गाचा हा आविष्कार सर्वांनाच सुखावून गेला होता.
स्मिताताई, वृषालीताई, शंभूराजे सर यांनी त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या.
त्यामुळे मीही पक्षी निरीक्षणाचा मनसोक्त आनंद घेऊ शकलो.                        
....................
परतीचा प्रवास सुरू होता.
नेहमीप्रमाणे गाडीत मुलांचे चार गट करून प्रश्नमंजुषा सुरू केली होती.
प्रश्न विचारणारे आम्ही अध्यापक आणि उत्तर तपासणारे खुद्द किका.
पक्षी कोणाला म्हणतात?
निसर्गातील पक्ष्यांचे महत्त्व सांगा?
स्थलांतर म्हणजे काय?
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
भिगवण गाव पुण्याच्या कोणत्या दिशेला येतंं?
आज पाहिलेला पूर्ण काळ्या रंगाचा, डोक्यावर लाल रंगाचा ठिपका असलेला पक्षी कोणता?
असे सुमारे वीस-पंचवीस प्रश्न सहज झाले.
बरोबर उत्तराला मुलांना एक चॉकलेट बक्षीस होतं.
जवळपास सर्व प्रश्नांची मुलांनी अचूक उत्तरे दिली.
सहलीचा विषय पोचला होता तर मुलांपर्यंत.
शिवाय या सगळ्या प्रकारात तास दीड तास अधिक सहज व मजेत गेला.
आजच्या पक्षी निरीक्षण तासाचं संकलनही झालं.
तास संपायची वेळ झाली होती आता.
पुण्यात किकांना सोडलं.
यावेळी जरा टाळ्या सकाळपेक्षा जोरातच वाजल्या.

शिवराज पिंपुडे 
शिक्षण समन्वयक 
ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र 
८८८८४३१८६८ 
श्री. उमेश वाघेला - 9881101541
श्री. किरण पुरंदरे - 9765818825

Comments

  1. दादा तुझ्यासोबत आम्ही पुन्हा विद्यार्थी होऊन कृतीयुक्त शिक्षण अनुभवतो.

    ReplyDelete
  2. दादा , प्रत्यक्ष अनुभव हेच पुस्तकी ज्ञान अधिक समजायला व विषयाची गोडी वाढायला मदत करते. आपण घेत असलेले उपक्रम व आपला त्यातील प्रत्यक्ष सहभाग आपल्या सर्व लिखाणातून अनुभवायला येतो. धन्यवाद

    ReplyDelete
  3. लेख वाचत होते पण पक्षी जगतात जाऊन आल्याचा अनुभव आला.👍👍👍

    ReplyDelete
  4. खुपच सुंदर लेख वाचताना माझेही पक्षीनिरीक्षण छान झाले

    ReplyDelete
  5. अप्रतिम, जणू काही तुझ्या शब्दातून आमचे सुध्दा छान पक्षी निरीक्षण झाले

    ReplyDelete
  6. Sadhyaa tumhi diwasbhar DAUND railway station var jaree baslaat,
    tar STORKS naa aramat baghu shakta.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog