#करोनाच्या नजरकैदेत...भाग - २

करोनाच्या नजरकैदेत...भाग २

"हॅलो अनघा."
"बोला दादासाहेब."
"अग सातवीसाठी एक उपक्रम सुरू केला आहे. तुझी थोडी मदत हवी होती."
'सांगा की दादा."
या टोनमध्ये इतका उत्साह व आश्वासकता होती की माझे काम पूर्ण होणार याची खात्री पटली.
मग एक छोटा संवाद झाला दोघांचा. 
आणि सुरू झाला आणखी एक उपक्रम. 
सातवीच्या दोन्ही वर्गावर रोज सकाळी अनघा एक कविता पोस्ट करू लागली. 
विद्यार्थ्यांनी ती तीन-चार वेळा वाचून नंतर त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग करून ग्रुप वर पाठवणे अपेक्षित होते. संध्याकाळी अनघा ती कविता स्वतः वाचून त्याचे रेकॉर्डिंग पाठवू लागली. 
सोबत त्या कवितेचा अर्थही सांगू लागली.
इतकेच नाही तर ज्यांनी ज्यांनी रेकॉर्डिंग पाठवले आहे त्यांचे ऐकून त्यांना प्रतिसादही देऊ लागली. 
'कृष्णा, तुझा आवाज काव्य वाचनासाठी एकदम छान व गोड आहे. पण ही कविता खूप घाईघाईत म्हटली आहेस तू. थोडी सावकाश म्हण. क्षण क्षण शब्द तर खूप घाईत झाला आहे.'
'आर्या, छान म्हंटली आहेस. चाल पण चांगली आहे. पण श्वास कुठे घ्यायचाय हे आधी ठरवायला हवं. कडव्याच्या शेवटच्या ओळीला श्वास पुरला नाहीये.'
मुलांनाही मग हुरूप येतोय.
आणि काव्यवाचनही अधिकाधिक प्रभावी होत चाललंय.
मृदुलाची एक कविता ऐकूनच पहा ना...

https://drive.google.com/file/d/1ew9XsXMRo9DUvyzQX9LB5KhAvNhkTc5y/view?usp=drivesdk

या माध्यमातून शिक्षणाचा हाही एक फायदा. 
तत्काळ प्रतिसाद देता येतो.
अनघाकडून कविता समजून घेणं हे खरंच मोठ्या आनंदाचं ठरत आहे पण.
अगदी मीही तिचा विद्यार्थी झालोय.
हे ऐका म्हणजे तुम्हालाही का ते समजेल... 

https://drive.google.com/file/d/1RDpxq7XqouG8Eb-7tpOUKxHOXC5gDipZ/view?usp=drivesdk

माणूस माझे नाव, हिरवा पाहुणा, कुंभारासारखा गुरु, देणाऱ्याने देत जावे,,,,,,६ कविता झाल्या की आजवर
२१ दिवस २१ कविता... 
बघुयात काय आणि कितपत जमतय ते.
या सर्व कविता एका वहीत लिहून ठेवा असंही सांगितलं आहे मुलांना.
......................
त्याच दिवशी दुपारी दुसरा कॉल वृषालीला झाला. 
आता हिच्याविषयी काय सांगू? 
उत्साहाचा झरा सॉरी चुकलं की जरा. 
उत्साहाचा धबधबा असं म्हणणं अधिक उचित राहील.
एकदम खटपट्या स्वभाव. 
"वृषाली तुझे चारोळी लेखनाचे सत्र घेशील का सातवीसाठी?" 
अर्थात नकार येण्याचा प्रश्नच नव्हता. 
कारण हे सत्र तिने अनेक ठिकाणी घेतले होते. 
चांगली तयारी होती तिची. 
त्यामुळे लगे हात दुसराही विषय करून घेतला. 
"आणि ऐक ना वृषाली. सहावीसाठी चित्रावरून गोष्ट कशी लिहायची असेही बोल ग".
अर्थात यालाही होकारच आला. 
तिच्या वेळा घेऊन त्या ग्रुपवर पोस्ट केल्या.
सहावीच्या सुमारे ६५ तर सातवीच्या ४० विद्यार्थ्यांनी याला प्रतिसाद दिला. 
कथालेखनाच्या सत्रानंतर स्वातीताईनीही त्यांचे अनुभव मांडले.
मुलांना कथालेखनाची सूत्रे समजली होती.
आता प्रतीक्षा होती मुलांच्या लेखनाची.
मुलांनीही भरभरून प्रतिसाद दिला.
चारोळ्यांचा आणि कथांचा खच पडला ग्रुपवर.
वृषालीनेही अनेकांना वैयक्तिक प्रतिसाद दिले. 
कथा वाचून प्रतिसाद देणे मात्र आम्हा कुणाला जमले नाही. चारोळ्यांनी मात्र धमाल आणली गृपवर.
पहिल्याच प्रयत्नात छान-छान सुचलं मुलांना.
विषय होते रविवार आणि पक्षी...

दिवस आहे सवडीचा 
रविवार आमच्या आवडीचा 
नसते शाळा नाही जादा तास 
जेवणातही असतो बेत खूप खास
आर्या...

पक्षी रे पक्षी तू असा कसा 
उडतो जसा जादूगार जसा 
घरटे बांधतो सुंदर असे 
जणू ताजमहाल शोभून दिसे
जान्हवी...

दिवस मस्त गेला एकदम.
संध्याकाळी सातवीतील विस्मयाच्या आईने ग्रुप वर त्यांच्या भावना व्यक्त केल्या,
'सर्व शिक्षकांचे मनापासून आभार. मुले आणि आम्ही आत्तापर्यंत भीतीखाली वावरत होतो. आता वेळ छान जातोय. कल्पकतेला वाव मिळतोय. सकारात्मक ऊर्जा मिळतीये. मुले आनंदी आहेत.'

अजुन काय हवे...नाही का?

शिवराज पिंपुडे 
ज्ञान प्रबोधिनी, निगडी 
(क्रमशः)

Comments

  1. मस्तच मांडले आहे...

    मी धबधबा... गंमत आणि आनंद दोन्हीही वाटले... ☺️

    तुझी ओळख..

    लहानपणापासून उषाताई (तुझी आई)
    या माझ्या अत्यंत लाडक्या बाईंचा... उत्तम कथाकथन, वक्तृत्व करणारा गुणी मुलगा हे आई बाबांकडून ऐकून होते... काही असे प्रभावी बोलताना ऐकलेही होते...

    २००९ ला शाळेत पूर्व प्राथमिक विभागात मी जेंव्हा काम करायला सुरुवात केली... तेंव्हा वर्षारंभ, गणेशोत्सव, इतर केंद्रीय उपक्रम, वर्षांत यातून तुझे वेगवेगळे प्रयोगशील शिक्षण पद्धती मला नेहमीच आकर्षित करायची...

    मग हळूहळू मी तुझ्याशी बोलून , कधीतरी मागे लागून त्या उपक्रमात सहभागी होत गेले ... थोडा उशीर झाला असेल कदाचित, पण खूप नवेनवे अनुभव घेतले...

    इतके छान होते ते सारे की वाटायचे आपण पुन्हा विद्यार्थी व्हावे आणि सर्व उपक्रमात सक्रिय सहभाग घेत राहावे...

    सारेच अविस्मरणीय अनुभव आहेत... थोडक्यात संपणार नाहीत...

    मुलांसाठी असेच नवनवीन प्रयोग करत रहा.. हक्काने मला बोलवत रहा.. त्यातून मलाही नवे शिकण्याची वाढण्याची संधी मिळत असते ...

    आणि मुख्य म्हणजे हे उपक्रम इतरांना माहिती होण्यासाठी वेळ काढून लिहीत रहा....

    वृषाली... अभिगंधशाली😊

    ReplyDelete
  2. खुप छान. दादा हे खरेच आहे काव्यवाचन चारोळी या सगळ्यामुळे रंगत आली आहे.‌ सर्वात महत्त्वाचे आता कुणी forwarded message पाठवले की आम्ही शंतनुचे आवाजातील काव्यवाचन पाठवतो आणि मेसेज करतो enjoyyyy
    शंतनु रबडे

    ReplyDelete
  3. दोन्ही भाग अतिशय उत्तम आहेत. आपणच स्वतः हे सगळे अनुभव घेत असल्याची भावना निर्माण झाली, इतके प्रभावी लिखाण. धन्यवाद. आणखी लेखांच्या प्रतीक्षेत आहे .

    ReplyDelete
  4. दोन्ही भागातले लेख उत्तम दादा

    ReplyDelete
  5. खूप छान लेखन केलाय आणि उपक्रम पण अनुकरणीय आहेत दादा...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog