#पोंक्षे सर...

पोंक्षे सर 

उत्तुंग कर्तृत्व, निरलस कार्यकर्तेपण आणि प्रगतिशील कुटुंबवत्सलता या तिन्हींचा संयोग अभावानंंच आढळतो.  कै. विवेक पोंक्षे सर यांच्या ठायी मात्र या गोष्टी एकवटल्या होत्या. प्रसिद्धीपराङ्मुख पोंक्षे सरांची  शिक्षणक्षेत्रातील कामगिरी पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या प्राचार्य पदापुरती सीमित नव्हती. तिच्या कक्षा महाराष्ट्रातल्या, भारतातल्या विविध प्रदेशांपर्यंत - अगदी ईशान्य भारतापर्यंत सुद्धा विस्तारलेल्या होत्या. हा माणूस बाहेरच्या जगात जितका सच्चा होता तितकाच खाजगी आयुष्यात, घरात आणि आप्तांंमध्येही सच्चा होता. निगडीच्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या पूर्व माध्यमिक विभागाचे प्रमुख शिवराज पिंपुडे आणि पोंक्षे सरांचे सुहृद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातले भौतिकशास्त्राचे प्रा. अभय लिमये यांनी त्यांच्या या वेगळेपणाचे टिपलेले काही कवडसे...

         प्रसंग आहे १९८३ मधला. 'ज्ञान प्रबोधिनी'तल्या युवक विभागाची एक बैठक सुरू होती. विषय होता शिक्षणक्षेत्रात भेडसावणारे प्रश्न. बैठकीत प्राचार्य वामनराव अभ्यंकर (भाऊ) मार्गदर्शन करणार होते. ते म्हणाले, "मला शिक्षक व्हायचंय, असं म्हणणारे तुमच्या सारखे बुद्धिमान युवक शिक्षणक्षेत्रात येत नाहीत, हाच मुख्य प्रश्न आहे. हा प्रश्न सुटला, तर शिक्षणक्षेत्रातील गुणवत्ता नक्की वाढेल. आहे का तुमच्यापैकी कुणी इच्छुक? तर मी पुढे बोलतो." सगळेजण एकमेकांकडे बघायला लागले. एका युवकानंं मात्र लगेचच हात वर केला. मग भाऊंनी पुढे त्यांचं बोलणं पूर्ण केलं. 
          शिक्षक होण्याची इच्छा दर्शवलेल्या या युवकाचंं नाव होतं विवेक पोंक्षे. 
          इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती मिळवलेला. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेला. पुणे विद्यापीठात विज्ञानातील उच्च पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केलेला आणि बी.एड.च्या अभ्यासक्रमात पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राप्त केलेला अत्यंत प्रतिभासंपन्न विद्यार्थी! स्वतः उत्तम भौतिकशास्त्रज्ञ म्हणून एखाद्या प्रयोगशाळेत प्रयोग करत, वेगवेगळे शोधनिबंध लिहीत बसण्यापेक्षा समाजाचा विज्ञान शिक्षक झालेला एक अत्यंत नि:स्वार्थी, धडाडीचा कार्यकर्ता. आणि १९८३ साली व्यक्त केलेला हा संकल्प पुढची तीन तपंं जगलेला अत्यंत प्रयोगशील शिक्षक. 
          पोंक्षे सरांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात प्रबोधिनीच्या कृषीतांत्रिक विद्यालयापासून केली. तिथे दोन वर्षे निवासी राहून त्यांनी अध्यापन केलं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानातल्या संकल्पना समजावून सांगता सांगता त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या अनेक अडचणींवर मात करायला सरांनी शिकवलं. तिथून परत आल्यावर दोन वर्षे अरुणाचल प्रदेशात जाऊन तिथल्या विवेकानंद केंद्राच्या शाळेत अध्यापन केलं. अल्पावधीत तिथली भाषा, तिथलं जनजीवन त्यांनी आत्मसात केलं. शेकडो विद्यार्थ्यांचे ते पालक झाले.
         पूर्वांचलातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांसाठी सरांचे घर हे एक हक्काचंं निवासस्थान होतं. सुमारे वीस-बावीस मुलं सरांच्या घरी काही ना काही काळ राहायला होती. त्यांच्या निवासापासून ते शाळा- महाविद्यालयातल्या प्रवेशापर्यंत सर्व काही सरांनी आणि त्यांच्या पत्नी बागेश्रीताईंनी पाहिलं आहे. नंतर 'नॉर्थईस्ट स्टुडन्ट सोसायटी'च्या स्थापनेतही सरांनी पुढाकार घेतला. या संस्थेच्या माध्यमातून पूर्वांचलातून आलेले मोठ्या वयाचे विद्यार्थी नव्यानंं येणाऱ्या छोट्या विद्यार्थ्यांची काळजी घेऊ लागले. त्यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम योजू लागले. अरुणाचल प्रदेशातल्या 'विवेकानंद केंद्रा'च्या शाळेतून सरांनी 'विवेक इन्स्पायर' नावाचा प्रकल्प सुरू केला. क्षमता विकास आणि बुद्धिमत्ता संवर्धन हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू. आज हा प्रकल्प अरुणाचलातल्या २२ शहरातल्या आठवी ते दहावीच्या निवडक ३५० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे.  
          अरुणाचलातून परत आल्यावर ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत अध्यापक आणि नंतर १८ वर्षे प्राचार्य म्हणून सरांनी जबाबदारी सांभाळली. या काळात शेकडो नवीन प्रयोग करत बुद्धिमंतांच्या शिक्षणाच्या या प्रयोगाला त्यांनी खर्‍या अर्थानंं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याइतकं बळकट केलं. 'रूप पालटू देशाचे' हा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक कृतीतून शिकवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत पहिल्या फेरीत उत्तीर्ण होऊन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या दहावीतल्या विद्यार्थ्यांच्या पुढे जेव्हा ईशान्य भारताच्या नियोजित अभ्यास दौऱ्यासाठी जायचं, की परीक्षेचा अभ्यास करायचा, असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा 'तुम्ही दौऱ्यावर गेलंं पाहिजे. दौऱ्यातील प्रवासात आणि आल्यावर खच्चून अभ्यास करा. पण दौऱ्याला जाच,' अस पोंक्षे सर त्यामुळेच सहज म्हणू शकले. 
         विज्ञान शिक्षक म्हणून त्यांची शिकवण्याची हातोटी काही विलक्षण होती. त्यांची विषयावरची पकड इतकी मजबूत होती, की विज्ञानाचे पुस्तक वर्गात नेण्याची त्यांना कधी गरजच पडली नाही. फक्त तत्त्वंं, व्याख्या, सूत्रंंच नाहीत, तर त्यांना या सर्व शोधांचा इतिहासही तोंडपाठ होता. सरांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतलेले विज्ञानातले प्रकल्प राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत गाजले आणि बक्षिसंं मिळवून गेले. विद्यार्थ्यांना चांगले प्रकल्प करता यावेत याकरता त्यांनी विज्ञान प्रयोगशाळा अतिशय सुसज्ज आणि आधुनिक केल्या होत्या. दहावीपर्यंतच्या शाळेत अगदी पदवीपर्यंतचे प्रयोग करता येत होते. एकूणच विज्ञान हा त्यांच्या आत्मीयतेचा विषय होता. महाराष्ट्रातल्या 'बालविज्ञान चळवळी 'चे ते संस्थापक सदस्य होते. ईशान्य भारत, जम्मू-काश्मीर, झारखंड आणि छत्तीसगड यांसारख्या राज्यातल्या दुर्गम भागातल्या शाळांमध्ये प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान शिक्षण प्रसार करणारा 'ज्ञानसेतू ' हा सरांनी सुरू केलेला उपक्रम विशेष यशस्वी ठरला आहे. २०१८-१९ या वर्षात ७० तरुणांनी सहा राज्यांत मिळून एकूण ११२ विज्ञान कार्यशाळा घेतल्या. यातून सुमारे सहा हजार पाचशे विद्यार्थ्यांपर्यंत हे युवक पोहोचले. ही आकडेवारी ज्ञानसेतू प्रयोगाची यशस्विता सांगायला पुरेशी बोलकी आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही बुद्धिमत्ता असते, हे जाणून ग्रामीण भागातल्या बुद्धिमान आणि चुणचुणीत मुलांसाठी ग्रामीण प्रज्ञा विकास योजना या उपक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सरांनी विशेष पुढाकार घेतला होता. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी ज्ञान प्रबोधिनीतर्फे चालवण्यात येणाऱ्या 'साखरशाळा' उपक्रमातही त्यांचा हिरीरीने सहभाग होता. विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्वाच्या प्रकल्पांना (सीएसआर) त्यांनी शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीकडे वळवलं. त्यातून सुरू झालेला 'छोटे सायंटिस्ट' सारखा प्रकल्प आज ग्रामीण भागातल्या सुमारे सात हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. या उपक्रमामुळे समाजासाठी काही करायची इच्छा असणारे शहरी तरुण ग्रामीण भागाकडे जाऊ लागले.
         प्रबोधिनीच्या कुमारांसाठी सुरू केलेल्या 'छात्र प्रबोधन'मासिकाच्या उभारणीतही सरांचा मोठा वाटा होता. पुढे मासिकाच्या सभासदांसाठी सुरू झालेल्या ग्रामीण परिचय तसंच विज्ञान शिबिरांच्या आखणीतही सरांनी पुढाकार घेतला होता. ज्ञान प्रबोधिनीच्या सोलापूर शाखेचे कार्यवाह म्हणूनही त्यांनी कामाचा ठसा उमटवला. प्रबोधिनीच्या शिक्षण प्रभागाचे उपकार्यवाह म्हणून प्रबोधिनीच्या निगडी, सोलापूर, हरळी इथल्या शाळांमधल्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीत सरांचं मोठं योगदान होतं. पुणे प्रबोधिनीत 'विनायक भवन' या नावानं बांधलेल्या वास्तूचे प्रकल्प प्रमुख म्हणून सरांनीच काम पाहिलं. निगडित मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे सुरु करण्यात आलेली 'ज्ञानवर्धन व्याख्यानमाला' ही सरांचीच कल्पना. गोवा राज्यातल्या स्थानिक संस्थांच्या सहाय्याने सरांनी तिथे आठ वर्षे 'नॅशनल टॅलेंट स्कॉलरशिप'चे वर्ग चालवले. तसंच गोव्यातल्या ९/१० शाळातून प्रज्ञा विकास कार्यक्रम सुमारे दोन वर्षे घेतला. 
         विद्यार्थ्यांवर संस्कार करत असताना सरांनी विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याही घडणीचा वसा घेतला. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवनवीन उपक्रम आणि अध्यापन पद्धती वापरणाऱ्या तसंच नव्यानं शिक्षण क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍या युवा शिक्षकांसाठी दरवर्षी 'रूप पालटू शिक्षणाचे' शिबिर प्रबोधनी आयोजित करते. त्यात महाराष्ट्रभरातून निवडक शिक्षक स्वखर्चानं येतात. या शिबिराची सुरुवात पोंक्षे सरांच्या प्रेरणेतूनच झाली. 
          तंत्रज्ञानावर सरांची विशेष पकड होती. शिक्षण अधिक प्रभावी होण्यासाठी आणि सर्वदूर पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. प्राथमिकच्या शिक्षकांसाठी सरांनी सुरू केलेलं 'हॅपी टीचर ॲप' अत्यंत उपयुक्त ठरत आहे. प्रबोधिनीच्या माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने 'फिल्म क्लब'ची स्थापना करण्यातही सरांचा पुढाकार होता. भारतभरातल्या दुर्गम भागातल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरांनी शेकडो कार्यक्रम, व्याख्यान योजिली. अलीकडच्या काळात सरांनी हाती घेतलेला प्रकल्प म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकातल्या क्यूआर कोडना चित्रफीतींची जोड देणे हा होय. 'दीक्षा पोर्टल'मध्ये ज्ञान प्रबोधिनी एक भागीदार होणंं याचं श्रेय सरांनाच जातं. तसंच भारत सरकारच्या 'निती आयोगा'सोबत 'अटल टिंकरिंग लॅब' या उपक्रमात ज्ञान प्रबोधिनी मार्गदर्शक म्हणून काम करत आहे; ही गोष्टही सरांमुळेच शक्य झाली. 
          सरांच्या कामाची यादी न संपणारी आहे. श्रद्धांजली वाहायची म्हणजे नेमकं काय करायचं असतं? एकदा वामनराव अभ्यंकर या विषयावर मुलांशी संवाद करताना म्हणाले," जुनं शरीर सोडून गेलेला जो जीवात्मा आहे, त्याचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी देह हवा असतो. तो देह माझा आहे असं सांगणं. आपला देह त्याच्या कामासाठी देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे श्रद्धांजली." सरांना मनोमन या प्रकारची श्रद्धांजली वाहिलेले आणि कार्यकर्ते देशभरात असतील याची खात्री आहे.
(माहेर, डिसेंबर २०१९ अंकातून साभार)

शिवराज पिंपुडे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मंतरलेली रात्र...!