#करोनाच्या नजरकैदैत... भाग ७.२

करोनाच्या नजरकैदैत...  भाग ७.२

दादा आम्हाला रोज व्रत देतोय; पण स्वतः पाळत असेल का? असा एक प्रश्न मुलंं, पालक मला विचारत नसले तरी त्यांच्या मनात येत असेलच असंं मला जाणवत होतंं. म्हणून मग एका आठवड्यानंतर मी एक छोटी ऑडिओ क्लिप गटावर पोस्ट केली. त्यात मी स्पष्टपणे सांगितलं की मी आत्ता तुमच्या सोबत व्रते करत नसलो तरी तुम्हाला जे जे सांगत आहे ते ते कधीतरी मी अनुभवलेलंं आहे. तसेच मी दहा वर्ष जे एक व्रत पाळलंं त्याचाही अनुभव मुलांना त्याच ऑडीओ क्लीपमधून सांगितला. मुलांना तो खूपच भावला. काही पालकांनीसुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे अर्थातच व्रते सांगण्याचा माझा अधिकार आता वाढला होता.
....................
व्रत ८
तुम्हाला आज घरातील कुठल्याही सदस्यानंं काहीही काम सांगितलं तर नाही म्हणायचं नाही. नंतर करतो असं म्हणायचं नाही. सांगितलेली गोष्ट करायची व लगेच करायची.

दुपारी मी टीव्हीवर कार्टून बघत होतो; त्यावेळेसच टीव्हीवर गजानन महाराजांचा सिनेमा लागला होता. आजीनंं तो लावायला सांगितला आणि मला नाही म्हणता आलंं नाही.
आज या व्रताचा सगळ्यात जास्त आनंद माझ्या छोट्या भावाला झाला. कारण मी आज सगळं त्याच्या मनासारखं केलं. उद्याचंं व्रतही हेच असावंं असंं त्याला वाटत आहे.
आज सगळ्यांची सगळी कामंं केल्यामुळंं मला कोणाचाही ओरडा खावा लागला नाही.
आजच्या व्रताची संधी साधून भावानंं मला मुद्दाम माझे पोस्टल कलर्स  मागितले. मी त्याला आजवर कधीच दिले नव्हते. पण आज द्यावे लागले.
मोठ्या माणसांचंं ऐकणंं सोप्प असतं. पण लहानांचंं ऐकणंं अवघड असतंं; आज समजलं.
आजच्या व्रताचा सगळ्यात जास्त आनंद तिच्या दादाला झाला आहे. सारखं काहीतरी काम सांगून तो तिला कामाला लावत आहे.
हे व्रत करताना मध्येमध्ये राग येत होता.
....
व्रत ९
मुलांनो आज जरा वेगळ्या प्रकारचंं व्रत आहे. तुमच्या आराध्य देवतेचा जप सकाळी नऊ ते पाच मध्ये प्रत्येक तासाला दहा मिनिटे लिहून काढायाचा आहे. म्हणजे आठ तासांमध्ये ८० मिनिटंं. एकाच वेळी सलग बसून ८० मिनिटे लिहायचा नाही.
हे व्रत दिले तो दिवस अक्षय्यतृतीयेचा होता. दिवस बघून मी हे सांगितलंं नव्हतंं. सहज जुळून आलंं होतंं.

दर तासाला आजी मला जप लिहिण्याची आठवण करून देत होती.
सुट्टीमुळे लिखाणाचा वेग कमी झाला आहे असंं लक्षात आलंं.
प्रत्येक तासाने जप लिहायचंं लक्षात यावंं म्हणून मी अलार्म लावला होता.
मी आज पहिल्यांदाच एकच वाक्य इतके वेळा लिहिलंं.
मी रोज .... या मंत्राचा जप एक माळ करतो. आज लिहूनही झाला.
...
व्रत १०
उद्या न्याहारी करण्यापूर्वी आधी व्रत वाचा; मगच न्याहरी करायला घ्या. उद्याच्या व्रताची मी थोडी वातावरणनिर्मिती आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवली.
आज न्याहारी करताना आईला त्यात थोडंंही मीठ टाकायला सांगू नका. आणि जी न्याहारी केली जाईल ती पूर्णपणे संपवा. घरच्यांना व्रतामध्ये सहभागी व्हायचं नसेल तर तुम्ही बरेच पदार्थ शिकले आहात. त्यातील एखादा पदार्थ तुम्ही तुमच्या पुरता मीठ न घालता करा. अत्यंत बेचव लागेल. पण चवीचा विचार न करता पदार्थ खाणंं हेच आजचंं व्रत आहे. कोणता पदार्थ खाल्ला हे सांगायला विसरू नका.

पहिल्याच घासाला तोंडाची चव गेली. कशाबशा इडल्या संपवल्या. 
आज घरातील सगळ्यांनी अळणी पोहे खाल्ले. खायला खूपच वेळ लागला. 
आज चक्क मिठावरही चारोळी तयार झाली होती. 
मिठाशिवाय चव नाही अन्नास 
जाणीव झाली आज आम्हास 
जाणले मोल तयाचे खास 
अन्नाचा तो जणु श्वास
आज उपीट केलं होतं. खाता यावं म्हणून जवळजवळ अर्ध लिंबू पिळलंं त्यात. पण तरी मनासारखी चव आली नाही. आणि मला वाटलं होतं की एवढंच उपीट आपल्याला पुरेल का? पण वाढलेलंं उपीट सुद्धा माझ्याकडून संपत नव्हतं.
चिमूटभर मिठाचंं अन्नातील महत्त्व कळलंं आज.
जसं एखादंं औषध आपण आवडत नसलंं तरी घेतो तसा मी आज माझ्या आवडीचा नाश्ता केला.
मी आज न्याहारीचे तीनच घास खाल्ले आणि नंतर मीठ असलेली न्याहारी घेतली. सॉरी दादा.
आज आमच्या घरी चर्चा झाली आठवड्यातून एकदा बिन मिठाची न्याहारी करूयात का म्हणून? मी सरळ नाही असंं सांगितलंं आहे.
...
व्रत ११
मुलांनो आज जरा वेगळ्या प्रकारचंं व्रत आहे. आज रात्रीच्या जेवणामध्ये तुमच्या आवडीचा पदार्थ आईला करायला सांगा. तो तुम्ही सगळ्यांना वाढायचा. मात्र स्वतः एकही घास खायचा नाही. पदार्थ समोर आहे, छान वास येतोय, तुम्हाला तो खुप आवडतोय, तुम्हीच वाढत आहात पण तरी खायचा नाही; नक्की जमवा हे.

मुलांचा संयम राहील ना? मलाच भीती. म्हणून परत एकदा संध्याकाळी आठवण केली. 'मुलांनो पदार्थ फक्त वाढायचा आहे, चाखायचा नाही. आणि हो आईचंं मन द्रवू शकतंं.  एक घास खा रे, असंं आई प्रेमानंं अगदी सहज म्हणू शकते. पण तुम्ही ठाम नकार द्या.

अरे हो की रे दादा, आत्ताच आई म्हणाली की तू पनीर खाऊ नकोस त्याची फक्त ग्रेवी खा. पण तुझा मेसेज वाचल्यामुळे मी तिला ठाम नकार दिला.
आजचंं व्रत जमेल का तुला? आज आईनंं मला विचारलंं.  परवाच्या एक वेळ उपवास करण्याच्या व्रतापेक्षा हे बरे की, असंं मी सांगितलंं आईला.
दादा आज आवडीचा पदार्थ नाकाला रुमाल बांधूनच वाढला. नकोच तो  सुवास म्हटलं.
आज मस्त पनीरची भाजी आणि पाकातली पुरी समोर होती. पण पूर्ण संयम ठेवला आणि चपाती, आमटी, भात खाऊन व्रत पूर्ण केलं.
आजचा व्रत सोप होतंं. कारण मला बेकरी पदार्थ आवडतात. आणि ते काही घरी नव्हते. पण जेव्हा आणले जातील तेव्हा मी हे व्रत पाळेल.
आईने चैत्रगौरीसाठी बेसनाचे लाडू, करंज्या, चकल्या केल्या होत्या. रात्री आठ पर्यंत मी कंट्रोल केलंं. पण नंतर मी ते पदार्थ खाल्ले दादा. 
अगदी जेवणाची वेळ होईपर्यंत पक्क ठरवलं होतं; पण आवडीची चीज पावभाजी बघून जिभेचा तोल गेला.
आवडीचे गुलाबजाम खायला एक-दोन वेळा हात पुढे केला; पण आईनंं हातावर फटका मारला.
दादा मी तुझ्या व्रतात थोडी भर घातली.  माझ्या आवडीचा पदार्थ म्हणजे मंचुरियन. तो घरी नेहमी मीच करतो. आजही मीच केला. त्यामुळे केवळ पदार्थ वाढला नाही तर केला सुद्धा मीच आणि तरी चाखला नाही हो.
(पोरं माझा टोन शिकायला लागली होती.)
...
व्रत १२
आज सहावी व सातवीसाठी दोन वेगळ्या प्रकारची व्रते देत आहे. सहावीच्या विद्यार्थ्यांनी आज सर्व मनाचे श्लोक वाचायचे आहेत तर सातवीच्या विद्यार्थ्यांनी दासबोधातील बारावे दशक पूर्ण वाचून त्यातील समाज क्रमांक ९ चा सारांश लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकाच बैठकीत वाचन जमलं तर खूपच छान. नाहीतर दोन वेळा बसून केलंं तरी चालेल. छान देवघरात उदबत्ती, दिवा लावून मग वाचन करा. शक्य असल्यास जे निरूपण असतंं तेही वाचा.
(सगळ्यांकडे घरी ग्रंथ असेलच असंं नाही. म्हणून नेट वरून शोधून ग्रंथाची pdf पाठवली.)
आज आणिक एक योगायोग जुळून आला. दुपारी चारुदत्तबुवा आफळे यांचंं हनुमानावरील कीर्तन होतंं. त्यामुळे मुलांना ते आठवणीनंं ऐकायला सांगितलंं.

दादा एकाच बैठकीत बारावे दशक वाचून पूर्ण केले. पावणेदोन तास लागले. वाचन झाल्यावर मारुतीरायाची व समर्थांची आरती केली. मनाला प्रसन्न वाटलं.
आज बाबांनी समर्थांच्या पोथीची समाप्ती केली आणि यानेही दासबोध वाचन केलंं. म्हणून महानैवेद्य आणि आरती झाली.
नवव्या समासाचा अर्थ मुलांना उपयोगी होईल असा आहे. (एक पालक)
दादा मी दोन टप्प्यात वाचन केलं.
मी व माझ्या आईने सर्व श्लोक मोठ्यानंं एकत्रित वाचले.
शाळेमध्ये कायमच मनाचे एक ते वीस श्लोक म्हटले जातात. आज व्रतामुळे त्यापुढचे श्लोक वाचण्याचा योग आला.
...
व्रत १३
मुलांनो आज अथर्वशीर्षाचंं एकवीस वेळा आवर्तन करायचंं आहे. काल सारखं एकाच बैठकीत जमलं तर फारच छान. नाही जमलं तर अकरा अकराची दोन आवर्तनंं करा.
(अथर्वशीर्ष म्हणताना उच्चारात अनेक जण काही चुका करतात. त्या कोणत्या व त्या त्या शब्दांचा उच्चार कसा करायचा हे समजावंं म्हणून विष्णुपंत कुलकर्णी यांना त्याविषयी काही स्पष्टीकरण करण्यास सांगितलंं. त्यांनी एक ऑडिओ क्लिप करून पाठवली. ती ग्रुपवर पोस्ट केली.)
आवर्तन झाल्यावर फलश्रुती म्हणा. ज्यांना ती येत नाही त्यांच्यासाठी पंतांनी फलश्रुतीचीही ऑडिओ क्लिप पाठवली आहे. ती केवळ ऐकली तरी चालेल.

आज माझा माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानंं हे व्रत आल्यानंं प्रसन्न वाटलंं. 
दादा मी अथर्वशीर्ष सुमेधा पटवर्धन आजीकडून शिकलोय. म्हणून उच्चार चांगले झाले आहेत. या व्रतामुळे आजीची आठवण आली. 
अरे मित्रा, या सुमेधाताई म्हणजे मी शाळेत असताना माझ्या बालवर्गाच्या वर्गशिक्षिका बरे. भेट झाली तर सांग त्यांना आठवण काढली म्हणून, मी उत्तरलो.
आज ऑडिओ क्लिप लावूनच अथर्वशीर्ष म्हटलंं. त्यामुळे घरभर मंत्रोच्चार घुमत होते. नंतर नेवैद्य, आरती झाली. एखादा सण आहे असंंच वाटलंं आज.
मला फलश्रुती येत नव्हती म्हणून मी क्लिप ऐकली.
आवर्तनंं मोजण्यासाठी मी एका वाटीत शेंगदाणे घेतले होते आणि एकेक आवर्तन झालं की एकेक शेंगदाणा खाली ठेवत होते.
...
व्रत १४
मित्रांनो आज व्रत पालनातील शेवटचंं चौदावंं व्रत. मस्त गेले दोन आठवडे. खूप छान छान अनुभव घेतले तुम्ही. मनापासून आणि प्रामाणिकपणे केलं तुम्ही सगळंं. तुम्ही ऐकलं म्हणून आम्हाला सांगायला आनंद वाटला. अभिनंदन तुम्हा सर्वांचं.
तर आजचंं व्रत आहे आवांतर वाचनाचंं. आज प्रत्येकानंं किमान शंभर पाने वाचायची आहेत. 
(घरी पुस्तके असतीलच असंं नाही म्हणून नेटवरची काही पुस्तकंं स्मिताताईने शोधून पाठवली आहेत. कोणती पुस्तकंं व किती पानं वाचली हे जरूर सांगा.)

दादा 'अग्निपंख' पुस्तकातील नऊ प्रकरणंं वाचून झाली. कलाम सर नेहमी इतरांमुळे मी कसा घडलो असंं सांगायचे, हा गुण मला आवडला.
मी आज 'हसरे दुःख' या पुस्तकातील १७७ पानंं वाचली. आणि दासबोधातील पहिल्या दशकातील चार समासही वाचले. 
(दासबोध वाचन हा थोडा धक्का होता मला.)
दादा माझ्याकडे वाचण्यासाठी खूप पुस्तकंं आहेत. आणि मला पुस्तकंं विकत घ्यायलाही आवडतंं.
आवांतर वाचन हा माझा एक छंद आहे. अगदी पहिलीपासूनच मी आठवड्यातून एक-दोन पुस्तकंं वाचत असते. माझे आई बाबा वाढदिवसाला पुस्तकंच भेट देतात आणि बक्षिसाची रक्कमसुद्धा मी पुस्तकांसाठीच खर्च करते. घरी माझ्यासाठी वेगळंं छोटंंसंं ग्रंथालय आहे.
मला वाचनाची खास आवड नाही. आज मी पहिल्यांदाच वेळेचंं भान न ठेवता इतक्या पानांचं वाचन केलं.
आज मी १०८ पानंं वाचली. एकाच दिवसात आपण कधी एवढं वाचन करू असं वाटलं नव्हतं.
दादा आजचा सगळा दिवस वाचण्यात घालवला. एकूण २६० पानंं वाचली आहेत.
.....................
खरंंच अनेक मुलांनी व्रतातील प्रत्येक शब्द मनावर घेतला होता.
त्यांच्या बाजूनंं पूर्ण प्रयत्न केला होता.
यामुळे मनावर संयम ठेवायचा काही सराव मुलांचा झाला होता.
पक्कंं ठरवलंं तर करता येतंं याचा अनुभव मुलांनी यातून घेतला होता.
घरातील वातावरणातही एक प्रकारची उत्सुकता व प्रसन्नता आल्याचं जाणवत होतंं.
मी मात्र वेगळाच विचार करत होतो...
ही व्रते नसती... 
तर कुणाच्या घरी टीव्हीच नाही, कोण डावखरे आहेत, कुणाच्या घरी छोटंं ग्रंथालय आहे... हे सगळ मला कसं समजलं असतंं?
संवाद कमी पडत आहे का माझा?

शिवराज पिंपुडे
विभाग प्रमुख,
पूर्व माध्यमिक विभाग
ज्ञान प्रबोधिनी, निगडी.

Comments

  1. खूप छान, वेगवेगळी व्रते दिली आणि मुलांनी पण पण ती अत्यंत प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न केला आणि मोडलं तर तेही प्रामाणिकपणे कबूल केलं, नेहमीप्रमाणेच लेखन छान लेखनही छान अभिनंदन शिवराय दादा

    ReplyDelete
    Replies
    1. फारच सुरेख आणि ओघवते लेखन आहे.

      Delete
  2. व्रत पालनाचा अनुभव खासच अग्निपंख पुस्तक लेकाने एका दिवसात पुर्ण केले होते. धन्यवाद शंतनू रबडे आईपालक. सौ शरयू रबडे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog