#करोनाच्या नजरकैदैत... भाग ८

करोनाच्या नजरकैदैत... भाग ८ 

कॉन्फरन्स कॉल सुरु होता.
"कंटाळा आला आहे ओ घरकामाचा", इति मयुरीताई. 
"हो ना. आता मुलांसारखंं आम्हालाही होत आहे; काहीतरी कृती द्या, नवीन सांगा काहीतरी करायला", इति मानसीताई. 
सगळ्यांचंं एक खळखळून हास्य.
"बरं ऐका ना." 
या दोन शब्दांंनंतर एकदमच शांतता. 
काहीतरी वाढून ठेवलंं आहे आपल्या पुढ्यात याची जाणीव दोघींनाही तत्काळ झाली. 
"तुमच्या दोघींच्या प्रत्येकी अकरा अकरा कथा सांगून झाल्या आहेत. तर असं वाटतंय की हा कथावाचन उपक्रम थांबवूया."
(हे अनपेक्षित होतं दोघींंनाही.) 
"हो हो. अगदी आनंदानंं. आमच्याही मनात येतच होत हे. पण मांजराच्या गळ्यात...."
"हं हं कळलं कळलं. बरं ऐका ना."
परत एकदा तीच शांतता. 
"समजा मुलांना कथा वाचून त्या पोस्ट करायला सांगितल्या तर चालेल का?"
"हो चालेल की. काहीच हरकत नाही."
"तसंं नाही हो. आधी उपक्रम जाहीर करू. मग इच्छुक मुलांची नोंदणी करू. त्यांचे दोन गट करू. त्यातला एकेक गट तुमच्याकडे येईल. त्या गटातील मुलांनी क्रमश: आधी तुम्हाला कथा पाठवायच्या. तुम्ही त्या ऐकायच्या. त्यांना सुधारणा सांगायच्या. तसे बदल करून त्या मुलांनी परत तुम्हाला कथा पाठवायच्या आणि तुमचं समाधान झालंं की मग तुम्ही गटावर पोस्ट करायच्या. बोला. चालेल का?"
"आमच्या कथा बंद होणार असतील तर मुलांच्या कथा ऐकायला वेळ होईल. काही अडचण वाटत नाहीये सध्यातरी."
"करायची का घोषणा मग?"
"डन." (दोघी एका सुरात.)
"मयुरीताई सूचनेचा एक ड्राफ्ट तयार करा. तो वाचून आम्ही त्यात भर घालू."
"हं... हे आलंंच ओघानंं. करते."
दुसऱ्या lockdown च्या दुसऱ्या दिवशी ग्रुपवर सूचना पोस्ट झाली होती. 
'मुलांनो काव्यवाचन संपले आहे तर आता कथावाचन सुरू करूयात. तेही तुमच्या आवाजात... 
उपक्रमाचे नाव गोष्ट माझी ऐका
बोला कोणकोण सहभागी व्हायला उत्सुक आहे?'
अहो तीस जणांची नोंदणी झाली की. 
सातवीसोबतच सहावीलाही उपक्रम सुरू करूया असं वाटलं.
लगेच स्वातीताईंंशी संवाद केला. 
अर्थात त्यांचाही उत्साही होकारच आला.
त्यांच्याही सहावीच्या वर्गावर तब्बल १४ कथा सांगून झाल्या होत्या. 
त्यांनी आमच्या एक महिला पालिका तृप्तीताई दिकोंडा यांची मदत घेण्याचं ठरवलं. 
याही नाट्यक्षेत्रातीलच. 
त्यामुळे अर्थातच या उपक्रमातील जाणकार.
त्याही आनंदानं तयार झाल्या. 
चांगली टीम तयार झाली होती आता.
कथावाचन कसंं करायचंं याविषयी स्वातीताईंनी अत्यंत सविस्तर लेखन करून वर्गावर सूचना पाठवली.
१ गोष्ट तुमच्या वयोगटाला साजेशी असावी व दहा मिनिटांपेक्षा मोठी नसावी. 
२ गोष्ट रेकॉर्ड करण्यापूर्वी किमान पाच वेळा तरी वाचण्याचा सराव करा.
.
.
.
१० गोष्ट संपल्यावर धन्यवाद म्हणू नका. गोष्ट जिथंं संपते तिथेच सोडा. तिचा परिणाम तसाच राहू द्या.
उपक्रम जाहीर झाला; मुलांचा क्रम जाहीर झाला.
पण मुलांचा उत्साह इतका की २३ क्रमांकावरील मुलीनंं पहिल्याच दिवशी गोष्ट पाठवली ताईंंना.
ताईंंना गोष्ट पाठवली की त्यांच्याकडून प्रतिसादाची पण तितकीच घाई सगळ्यांना.
ताई ऐकली का गोष्ट? 
ताई कशी वाटली गोष्ट? 
ताई काय सुधारणा करू?
पण या दोघीही काही कमी चिवट नाहीत.
सुधारणा सांगून प्रत्येकाला किमान दोनदा तरी गोष्ट रेकॉर्ड करायला लावलीच. 
या सगळ्याला आणखी एका गोष्टीची जोड दिली आम्ही.
ज्या मुलाची गोष्ट ज्या दिवशी पोस्ट होणार असेल त्याने त्या गोष्टीचा फोटोही ग्रुपवर पाठवायचा. 
अन्य सहभागी मुलांनी ती गोष्ट वाचून सराव करायचा आणि आपल्या पालकांसमोर रात्री ती गोष्ट म्हणून दाखवायची.
हे कितपत झालं हे काही आम्हाला कळू शकलंं नाही आणि याचा पाठपुरावा घेण्याइतका वेळही आम्हाला होऊ शकला नाही.
वर्गातील एका मुलाला बोलताना अडखळण्याचा थोडा त्रास आहे.
पण त्यानंंही या गोष्टीचा बाऊ न करता उपक्रमात भाग घेतला.
गोष्टही अशी निवडली की ज्यात अनेक पात्रंं होती.
आणि प्रत्येक पात्राला वेगळा आवाज देण्याचा त्यानं उत्तम प्रयत्न केला.
आम्हा सगळ्यांनाच छान वाटलं.
काही काही मुलांनी फारच सुंदर गोष्टी सांगितल्या होत्या.
प्रकट वाचनाचे अनेक बारकावे मुलांना समजले होते.
मुख्य म्हणजे गोष्ट शोधण्यासाठी प्रत्येकाच्या ३\४ गोष्टी वाचून झाल्या होत्या.
वर्गातील अन्य मुलांंनाही आपल्या वर्ग मित्रमैत्रिणींंच्या गोष्टी ऐकायला मजा येत होती.
आणि त्यांनी दिलेले प्रतिसाद कथावाचकांना सुखावत होते.
७ वीतील २० तर ६ वीतील २४ मुलांनी कथा सांगितल्या.
उपक्रम संपल्याच्या दिवशी एक वैयक्तिक msg आला. 
'दादा मग याचेही ऑडीओ बुक करणार आहेस का रे?' 
देवा... 
(ऐकुयात दोन नमुना गोष्टी)

https://drive.google.com/file/d/10qqZWXFs546_8gd6VPSJlLgaCafF_T0H/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1cELWdGKWuTKvxRzWJ9YrThP4TxBc4Z4s/view?usp=drivesdk

....................
आतापर्यंत आम्ही पुष्कळ उपक्रम lockdown च्या काळात घेतले होते. 
पण कुठली स्पर्धा अशी घेतली नव्हती. 
तर मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी एखादी स्पर्धा घेता येईल का असा विचार सुरू होता. 
मोबाईल फोटोग्राफी??? 
ज्यात प्रत्येक विद्यार्थी अगदी सहज सहभागी होऊ शकेल.
वा! मजा येईल. (स्वगत)
मनात ठरलं होत; आता जनात सांगण्यासाठी काही नियोजन आवश्यक होतं.
अर्थातच हा विषय सुचल्यासुचल्या डोळ्यांसमोर नाव आलं ते म्हणजे सुमेध फाटक याचं.
सुमेध... डोंबिवली केंद्राच्या माजी केंद्रप्रमुख श्रुतीताईंचा सुपुत्र. फोटोग्राफीचा छंद. शॉर्ट फिल्म मेकिंगचा कोर्स वगैरे केलेला. दोन शॉर्ट फिल्म बनवण्याचा अनुभव असलेला. सध्या प्रबोधिनीच्याच नेतृत्व संवर्धन केंद्राचंं काम करतोय. मुख्य म्हणजे मागच्याच वर्षी अभिरुची वर्षानिमित्त याच विषयावर त्याची एक  कार्यशाळा शाळेमध्ये झाली होती. 
त्यामुळे त्याला संपर्क केला आणि एक दिवस वेळ काढण्यासाठी सुचवलं.
नेहमीप्रमाणे एखादा नवीन उपक्रम म्हटला की तो उलगडून सांगणं, त्याची नियमावली जाहीर करणं या सगळ्या गोष्टी आल्याच. 
सुमेधनं अतिशय रितसर केल्या त्या.
आम्ही स्पर्धेला नाव दिल होतं - 
मोबाईल फोटोग्राफी - घरातील व अंगणातील. 
सुमेधनं स्पर्धेसाठी काही विषय मुलांना सांगितले.  
जसे की -  नैसर्गिक व कृत्रिम प्रकाशाचा वापर करून कुठल्याही सावल्यांचे फोटो काढा. 
कुठल्याच चकाकणाऱ्या पृष्ठभागाचा वापर करून वस्तूच्या रिफ्लेक्शनचे फोटो काढा. 
खाद्यपदार्थांचे फोटो काढा. 
एखादा विषय घेऊन त्यावर आधारित प्रतिकात्मक फोटो काढा. उदाहरणार्थ उन्हाळा. 
९\१० विषय सुचवल्यावरही याशिवायही वेगळा विचार नक्की करून बघा; हे सांगायला सुमेध विसरला नाही.
अर्थातच दिवसभर फोटो काढा आणि त्यातून निवडक तीनच फोटो संध्याकाळी पाच ते सहामध्ये पोस्ट करा; अशी एक सूचना आम्ही द्यायला विसरलो नाही हे आमचं भाग्यच म्हणावंं लागेल. 
नाहीतर त्या दिवशी एकेका मुलाचे किती किती फोटो आले असते याची गणतीच करता आली नसती. 
उदंड... अक्षरशः उदंड प्रतिसाद मिळाला. 
आजवर एकाही उपक्रमात सहभागी नसणारेही या उपक्रमात मात्र आवडीनंं सहभागी झाले. 
फोटोंंमधील वैविध्य तर केवळ चकित करणारंं होतंं.
'सुमेध प्रत्येक वर्गातून १० फोटो निवड. पण त्यांना क्रमांक देऊ नकोस.'
'होय. एक दिवस लागेल मला यासाठी.'
'अगदी. निवांत वेळ घे.'  
दुसऱ्या दिवशी दुपारी सुमेधचा मेसेज आला की काही फोटो त्यानं बाजूला ठेवलेत. ते या काळातले वाटत नाहीत. जुने फोटो वाटत आहेत. 
स्पर्धा म्हटली की दोष शिरलेच पाहिजेत का? (माझं स्वगत)
संध्याकाळी सुमेधनंं वर्गानुसार फोटो पाठवले. 
सोबत फोटो काढणाऱ्या मुलांची यादीही करून पाठवली. 
एकदम पद्धतशीर काम.
(आईवर गेलाय अन् काय.)
'दादा lockdown संपल्यावर या फोटोंच्या प्रिंटआउट काढून त्यांचं वर्गात प्रदर्शन भरवता येईल इतके सुंदर फोटो आहेत काही काही.'
'वा वा! चांगली कल्पना आहे रे. नक्की करू आम्ही.'
दुसऱ्या दिवशी निवडलेले फोटो, मुलांची नावं, त्या मुलांची डिजिटल प्रशस्तीपत्रकंं असं सगळं ग्रुपवरती पोस्ट झालं.
दोन दिवसांनी सुमेधला एक msg केला.
'अरे त्या दिवशी फोटो पाठवताना फोटोवर त्या दिवशीची तारीख येईल असे सेटिंग करा असंं सांगायला हवंं होतंं रे.'
वेळ निघून गेली होती.
पण तोवर इकडे या फोटोग्राफीचा मुलांना नादच लागला होता की.  
दुसऱ्याच दिवशीपासूनच न सांगता वेगवेगळ्या प्रकारचे फोटो ग्रुपवर येऊ लागले होते.
अनेकांच्या कॅमेऱ्यावरील धूळ झटकली गेली होती.
फोटो काढताना लढविलेल्या शक्कली तर कमालच होत्या.
अजून काय हवे; नाही का?

Comments

  1. अनुभव संपन्न !! मस्त लेखन ..

    ReplyDelete
  2. भन्नाट उपक्रम आणि भन्नाट लेखन..
    मस्तच दादा 👍👍💐💐

    ReplyDelete
  3. करोनाच्या नजरकैदेत आपण मात्र कल्पनेच्या प्रांतात मुक्त संचार केलात अन् विद्यार्थी मित्रांनाही तो करू दिलात त्यामुळे तेही कृतीशील राहिले अन् आपले सहकारीही -- नजर कैदेतील स्वातंत्र्य
    आई

    ReplyDelete
  4. खूप छान उपक्रम असे उपक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत...

    ReplyDelete
  5. खूपच छान दादा 👍👍
    मुलांना व आम्हा पालकांनाही असे उपक्रम प्रत्येक वर्षी उन्हाळा किंवा दिवाळी सुट्टीत अनुभवायला नक्की आवडतील.

    ReplyDelete
  6. दादा नेहमीप्रमाणे नाविन्यपूर्ण,मस्त.👌👌👌

    ReplyDelete
  7. आता कृतीपुस्तक लेखन कर दादा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मंतरलेली रात्र...!