#सफर खुबसुरत है मंजिल से भी...
सफर खुबसुरत है मंजिल से भी...
अकरावीत असतानाची गोष्ट. कॉलेजात पहिलंंच वर्ष असल्यानंं तासांना न बसण्याचा संस्कार अजून व्हायचा होता. त्यामुळे नियमित सर्व तासांंना हजेरी लावत होतो. मराठीच्या तासाला मात्र जाम कंटाळा यायचा. संपता संपत नसे तो तास. त्यावर मी माझ्यापरीनंं एक उपाय शोधून काढला होता. अकरावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात श्री. अविनाश धर्माधिकारी यांचा एक पाठ होता. त्यात त्यांच्या एका सायकल सहलीचंं वर्णन होतं. खूपच मस्त होता तो पाठ. प्रत्येक मराठीच्या तासाला मी तो पाठ वाचून काढायचो. या पारायणाचे दोन परिणाम घडले. एक म्हणजे मराठीच्या तासाचा वेळ मजेत जाऊ लागला अन् दुसरी गोष्ट म्हणजे आपणही सुट्टीमध्ये सायकलवर भटकंती करावी असं तीव्रतेनंं वाटू लागलं. लगेचच मनातला बेत मित्रांसमोर व्यक्त केला. त्यांनीही कल्पना उचलून धरली आणि दिवाळीच्या सुट्टीत सायकल सहलीला जाण्याचंं आम्हा चार-पाच जणांचंं निश्चित झालं. ठिकाण ठरलं साताऱ्याजवळचा सज्जनगड!
एकदाची परीक्षा संपली आणि सगळेजण सहलीच्या तयारीला लागलो. सायकल ठीकठाक करणे, सायकल दुरुस्तीचे प्राथमिक धडे गिरवणे, सहली मधल्या मुक्कामांचे नियोजन करणे इत्यादी. पण सहलीला जाण्याचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतसा एकेक मित्र एक एक अडचण सांगू लागला. कोणाचे बाबा अचानक नको म्हणाले, कोणाच्या आजीनंं अबोला धरला, कोणाचं एकदमच गावी जाण्याचं ठरलं असं बरंच काही. निघायच्या दोन दिवस आधी मला कळलं की सहलीला सोबत येणारे सर्व मित्र आता मला केवळ 'शुभेच्छा' देणार आहेत अन् जाणारा मी एकटाच राहिलो आहे
'एकट्या न कुठंं एवढ्या लांबवर जायचं असतं का? असं कर अजून थोड्या वर्षांनी गाडीवरच जा. नाहीतर मे महिन्यात नवीन सायकल घेऊन देतो तेव्हा जा...' असे वेगवेगळे प्रस्ताव माझ्यासमोर येऊ लागले. (मी एकुलता एक आहे. आता या पार्श्वभूमी वरची ही वाक्ये परत वाचा. अर्थ वेगळे लागतील.) माझा निर्धार मात्र पक्का होता. जरा तिरीमिरीतच भाऊंंकडे गेलो. (भाऊ - ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचे केंद्रप्रमुख.)
"भाऊ कुणी असो अथवा नसो मला जायचं आहे."
"बिनधास्त जा. एखादी चांगली गोष्ट करताना सोबत कोण आहे, कोण नाही यावर आपला निर्णय कशाला अवलंबून ठेवायचा? तू खुशाल जाऊन ये. माझ्या शुभेच्छा आहेत." इति भाऊ.
ही दोन वाक्यंं पुरेशी होती मला.
(पण आज एक अध्यापक म्हणून या संवादाकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येतं की अशा एखाद्या उपक्रमासाठी या प्रकारच्या शुभेच्छा द्यायला देणाऱ्याची तपस्या असावी लागेल. इतक्या विश्वासानंं मी माझ्या विद्यार्थ्यांना कधी सांगू शकणार आहे? असो.)
मग घरी येऊन 'तो' पाठ घरच्यांनाही वाचून दाखवला आणि 'चाललोय' असं जरा मोठ्यानंच सांगितलं.

निघायच्या आदल्या दिवशी सायकलीचे मला अनावश्यक वाटणारे सर्व भाग काढून टाकले. अगदी चेनकव्हर पासून ते मडगार्ड पर्यंत. त्यामुळे सायकल बरीच हलकी झाली. पुण्यातील व साताऱ्यातील माझ्या काकांना फोन करून माझं नियोजन कळवलंं. मोठ्या उत्साहानं माझी सगळी तयारी चालू होती. तरी एक अनामिक भितीही मनात दाटून आली होती हेही खरंच.
नियोजनानुसार दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी प्राधिकरणातून प्रवासाला सुरुवात केली. तासाभराने पुण्यातील माझ्या काकांकडे मुक्कामासाठी पोहोचलो. प्राधिकरणापासून पुण्यात येईपर्यंत संथ पडणाऱ्या पावसानंं छान सोबत केली. मडगार्ड काढल्यामुळे शर्टाच्या मागच्या बाजूला छानशी नक्षी तयार झाली होती. काकांच्या घरी ही, 'उगाच वेडेपणा करू नकोस. उद्या साताऱ्याच्या ऐवजी घरचाच रस्ता पकड,' अशा शब्दात माझी समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. तो अर्थातच निष्फळ ठरला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरून ठीक सहा वाजता प्रवासाला सुरुवात केली. ध्येय होतं सातारा ११५ कि.मी. थोड्याच वेळात कात्रजचा घाट लागला. सायकल हातात धरून चालतच घाट चढलो.
सकाळच्या प्रसन्न वातावरणामुळे फारसंं दमायला झालंं नाही. घाट संपल्यावर चहा बिस्कीटाने पोटपूजा केली. तासाला सुमारे चौदा ते पंधरा कि.मी. अंतर कापलंं जात होतंं. दमल्यावर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कठड्यावर पडून विश्रांती घेत होतो. त्या कठड्यावर पाठ टेकल्यावर जो आनंद व्हायचा ना त्याचं वर्णन ते काय करू. सायकल चालवताना एकच ध्रुपद आळवत होतो...
घाटातील चौकी |

अकेले है तो क्या गम है
चाहे तो हमारे बस मे क्या नही...
काही तासांच्या प्रवासानंतर 'खंबाटकी घाट सुरू होत आहे', अशी पाटी वाचली. काही ठिकाणी पाटीवर लिहिलं होतं, 'वाहने सावकाश चालवा.' आम्ही तर आधीच सावकाश झालो होतो. तो घाट बघून तर गतीच थांबायची वेळ आली. (ही गोष्ट सुमारे २५ वर्षांपूर्वीची आहे. जुना घाट रस्ता आठवा. आणि हो मोबाईलही नसण्याचा काळ होता तो.)
सायकलवरून उतरून घाट चालत चढू लागलो. मागून येणाऱ्या प्रत्येक वाहनातील प्रत्येक माणूस मागे वळून वळून माझ्याकडे बघत होता. बऱ्याच ट्रकचालकांनी तर, 'अरे भाई सायकल के साथ बैठो गाडी में', अशी माझी परीक्षा पाहणारी ऑफर दिली. मोठ्या संयमानं मी ती नाकारली. घाटात दोन वेळा विश्रांतीसाठी थांबलो. घाम निथळत होता, पाणी संपलं होतं, कडकडून भूक लागली होती. थोडक्यात काय एकदम बुरी हालत झाली होती. एकदाचा तो घाट संपला आणि उतार लागला तेव्हा कुठे जीवात जीव आला. घाट संपल्याचा आनंद मोठ्यानंं ओरडून व्यक्त करावासा वाटला पण अंगात तेवढेही शक्ती उरली नसल्याचंं लक्षात आलंं. त्यामुळे बेत रहीत केला.
बरोबर ११ तासांनी म्हणजे सायंकाळी पाच वाजता सातार्यात पोहोचलो. साताऱ्यातही माझे काका आहेत.
यावेळी काकांकडे नेहमीपेक्षा जरा जोरातच स्वागत झालं. काकांकडे पोहोचल्यावर कडकडीत पाण्यानंं आंघोळ केली. पोटभर जेवलो. भरपूर विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सायकला विश्रांती देऊन बसने सज्जनगडावर गेलो. गडावर रामदास स्वामींचंं दर्शन घेताना तेही माझ्याकडे कौतुकानंं पाहत आहेत असं मला आपलं उगीच वाटलं.
सज्जनगड भटकून प्रसाद घेऊन संध्याकाळी काकांच्या घरी परतलो. नंतर सायकलच्या काही मागण्या पूर्ण केल्या. कारण तिला उद्या थेट घर गाठायचं होतं; म्हणजेच १३५ कि.मी.चा प्रवास करायचा होता.
सज्जनगड भटकून प्रसाद घेऊन संध्याकाळी काकांच्या घरी परतलो. नंतर सायकलच्या काही मागण्या पूर्ण केल्या. कारण तिला उद्या थेट घर गाठायचं होतं; म्हणजेच १३५ कि.मी.चा प्रवास करायचा होता.
प्रवासाचा शेवटचा दिवस उजाडला. परतीचा प्रवास असल्यामुळे की काय पण सायकलही जोरात पळत होती. तिच्या विविध प्रकारच्या अवयवातून चित्रविचित्र आवाज येऊ लागले होते. पण सायकलनेही शेवटापर्यंत चांगली साथ दिली. कुठेही कसलाही त्रास दिला नाही.
थोड्याच वेळात परत एकदा खंबाटकी घाट लागला. परवाच्या दिवशी तो मला हसत होता. आता माझी वेळ होती. आज मला घाट उतरायचा होता. तेही बिलकुल ब्रेक न दाबता, सुसाट वेगानं, मोठ मोठ्यानंं ओरडत, वाटेतील प्रत्येक वाहनाला ओव्हरटेक करत. खंबाटकी घाट उतरताना जो आनंद मिळाला तो काही औरच! त्या आनंदासाठी तो घाट पुन्हा चढून पुन्हा उतरावा असं क्षणभर वाटून गेलं. पण क्षणभरच.
शिरवळला नाश्ता करून पुढे निघालो. आता पुणंं येईपर्यंत कुठंही थांबायचं नाही असं ठरवूनच सायकलवर टांग मारली. हळू वेगानंं पण न थांबता पुणंं गाठलं. कात्रजचा घाट उतरतानाही मजा आली. दुपारी तीनच्या सुमारास पुण्यात पोहोचलो. स्वारगेटला जेवण करून शेवटच्या टप्प्यातल्या प्रवास सुरू केला. कासारवाडीपासून घरापर्यंत जोरदार पावसानंं मला नखशिखांत न्हाऊ घातलं. सगळा थकवा निघून गेला. चिंब भिजलेल्या अवस्थेत घराच्या दारात उभा राहीलो. अंगातून निथळणारा पाणी कमी होतं की काय म्हणून आईचाही डोळ्यांना धार लागली. माझी दृष्ट काढून ओवाळताना माझं लक्ष तिच्या डोळ्यातल्या निरांजनांंकडे होतं.

७२ तासात सुमारे २७० कि.मी. अंतर पार केलं होतं. म्हटलं तर तशी छोटीशीच गोष्ट. पण खूप मोठा आनंद देऊन गेली. खूप काही शिकवून गेली.
माझी ही सफर गुरुकुलाच्या सायकल सहल उपक्रमाचा श्रीगणेशा ठरली. त्याच वर्षापासून मग मुलींच्या १०० कि.मी. तर मुलांच्या ३०० कि.मी. सायकल सहलींना सुरुवात झाली. सिंहगड, बनेश्वर, थेऊर, कानिफनाथ, पाबळ, जुन्नर, भीमाशंकर, राजगड, प्रतापगड अशा अनेक ठिकाणी मग विद्यार्थी मित्रांसोबत सायकल सहलीला जाऊन आलो. मनसोक्त भटकंतीतील आनंद लुटला. डुंबरे आर्यांनी अनेक वर्ष हा उपक्रम लावून धरला.
.........................................................................
आईच्या आग्रहाखातर सज्जनगड सायकल सहलीचं अनुभव कथन लिहिलं. २\३ वर्तमानपत्रांच्या कार्यालयाबाहेरील पेटीत टाकून आलो. एका रविवारी घरातील लँँडलाईन वाजला. "अरे शिवा, तुझा लेख छापून आलाय आज. मस्तच लिहिलायस रे." हा एक सुखद धक्का होता. "तुझा लेख वाचून छोटी सायकल सहल करून आलो रे..." असं म्हणणारे २\३ तरी गट नंतर भेटले. छान वाटलं.
मग कसला विचार करताय? अंगातील मस्ती, रग जिरवण्याचे हेच तर दिवस. व्हा स्वार सायकलवर अन् करा मस्त सफर...
शिवराज पिंपुडे
पूर्व माध्यमिक - विभाग प्रमुख
ज्ञान प्रबोधिनी, निगडी
व्वा ! ! ! सायकल सहल 'करो-ना'...!!!
ReplyDeleteमस्त दादा आपणही जाऊ 👌👌🌷🌷🚩🚩
ReplyDeleteप्रेरणादायी
ReplyDeleteवाह! लय भारी सायकल स्वारी! प्दारेरणादायी प्रवास आणखी किती-किती उपक्रमांचा तुम्ही श्रीगणेशा केलाय!! लेखनशैली इतकी मस्त की डोळ्यासमोर चलचित्र उभे राहिले आणि प्रवासात आम्ही पण सोबत होतो की काय असा भास होत होता.
ReplyDeleteमस्त दादा ,आजचा पिढीसाठी प्रेरणादायी,मुलासुद्धा चांगली तयार केली आहेत तुम्ही .नक्कीच एकआधी मोहीम आखतील.
ReplyDeleteदादा लेख मस्तच. Lockdown संपण्याची लाट बघत आहे. नक्की सायकल सफर करणार.
ReplyDeleteशंतनु रबडे
खूपच छान लेख
ReplyDeleteह्याई वयात मलाही क्षणभर वाटलं आपणहि एक असा प्रयत्न करावा का?
पण क्षणभर......