#लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास - भाग ५
नित्य नवा दिवस परिसर निरीक्षणाचा...
मुलांच्याच नाही तर अध्यापक, पालक यांच्याही नजरा परिसराकडे वळवण्यात आम्ही काही प्रमाणात यश मिळवलं होतं ;
त्याचीच ही काही नमुना उदाहरणं.
सुरुवात अर्थातच स्वत:पासून ...
लेकीच्या १० वीच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून;
भाड्यानं दिलेली खोली वापरायला घेतली.
सध्या मोकळीच आहे ना ती.
म्हंटलं तिच्या वाटेला तरी कशाला एकाकीपणा.
या खोलीचा एक फायदा म्हणजे खिडकी उघडली की;
या खोलीचा एक फायदा म्हणजे खिडकी उघडली की;
खालचं आमचं अंगण आणि समोरचं मैदान,
मैदानातील गणपतीचं मंदिर असं सगळं दिसतं.
खिडकीतून डोकावणं हा एक विरंगुळा झाला मग माझा.
खिडकीतून डोकावणं हा एक विरंगुळा झाला मग माझा.
एक दिवस तास सुरु असताना समोर लगबग दिसली.
सूर्यपक्ष्यानं चक्क घरटं बांधायला घेतलं होतं की;
अंगणातील बेलाच्या झाडावर.
मग त्या खोलीत गेल्यावर नजर बाहेरच स्थिरावू लागली.
खूप म्हणजे खूपच गोष्टी लक्षात आल्या;
घरटे बांधकामातील.
९\९.३० ते ५\५.३० असे वर्किंग अवर्स दिसले.
एकदम ऑफिस टाईम की.
नुसत्या चकरा.
एका वेळी त्या इलुश्या चोचीत येणार तरी किती म्हणा.
साधा हिशोब करा.
तासाला किमान २०\२५ फेऱ्या.
असे आठ तास.
असे मी निरीक्षण करत असलेले मोजून १२ दिवस.
त्या आधीचे अंदाजे ४\५ दिवस.
करा आता गणित.
यांच्यात मादी घर बांधते.
नर अधूनमधून सुपरविजन करून जातो.
तेही लांबूनच.
घरट्याजवळ फिरकतही नाही.
(कसलेही भलतेसलते विचार मनात आणू नका.)
तुम्हाला घरट्याला गोलाई कशी येते;
हा प्रश्न कधी पडला होता का ओ?
नाही नाही; मलाही नव्हता पडला.
पण प्रश्न न पडताच उत्तर मिळालं.
घरट्याच्या आत छोटुश्या डोक्यानं ढुशा देऊन देऊन आणि
घरट्यात जाऊन बहुधा मागे पाय झाडून झाडून;
किंवा पंख फडफडून;
ती गोलाई तयार होत असावी.
अजून एक म्हणजे -
याच्या घरट्यात मला एकही हिरवं पान दिसलं नाही.
तर तिकडे ती ठिपकेवाली मुनिया - आठवली का?
हो तीच; शाळेतील बाजरीच्या कणसावरील!
गवती चहाचं पातं खुडून डोळ्यासमोरून उडून गेली.
प्रत्येकाचं बांधकाम मटेरियल पण ठरलेलं असतं राव.
घरटं पूर्ण होतं आल्यावर स्वारी पटकन येईनाशी झाली.
मग समजलं;
फिनिशिंग मटेरियल आणायला वेळ लागत होता त्याला.
प्रत्येक वेळी येताना चोचीत पांढऱ्या रंगाचं काही असे.
बहुधा कापूस किंवा पिसासारखं काहीतरी.
पिलांना खडबडीत लागता कामा नये बाबा.
किती ती काळजी.
चक्क चोरी... हो बरोबर वाचलं तुम्ही.
सूर्यपक्षी लांब गेल्यावर तिकडून चष्मेवाला पक्षी येऊन घरट्या आतील ते पांढऱ्या रंगाचं मटेरियल घेऊन गेला.
दोन-तीन वेळा केलं त्यानं असं.
'ते' शोधण्याचे कष्ट वाचवले होते त्यानं.
घरटं पूर्ण झाल्यावर एक दिवस नीटनेटकं करण्यात गेला.
आतील इकडचा भाग काढ; तिकडे लाव;
आत जाऊन बसून बघ इ. इ.
एकदाचं समाधान झालं बुवा.
एक दोन दिवसांनी पक्षी आता घरट्यातच दिसू लागला.
घरट्यात बसून बसून शरीर आंबलं की;
बाहेर येऊन स्वारी थोडी मोकळी होई.
एकेक पंख बाजूला घेऊन चोचीनं स्वच्छ केला जाई.
थोडं इकडे तीकडे भूऽऽर करून मग परत घरट्यात.
......................................................................
स्वातीताईंनी सकाळी सकाळी एक फोटो पाठवला.
'दादा हे पाहिलं का?'
'कोणत्या पक्ष्याचं घरटं आहे ओ?'
'अहो दादा, पक्षी नाही. माशी बांधत आहे.'
फोटो इतका झूम होता की साफ गंडलो होतो.
लगेच निखील दादाला फोटो पाठवला.
उत्तर आलं... 'सर ही कुंभारीण माशी. या माती आणतात आणि मग लाळ आणि माती एकत्र करून घर तयार करतात. घर पूर्ण झालं की या दुसऱ्या किटकाची larva आणतात. तिला डंख मारून paralyse करतात. मग तिच्या शरीरात अंडी घालतात. अंडी फुटून या माशीची पिले बाहेर आली की ती पिले तीच larva खाऊन मोठी होतात.'
काय बोलायचं यावर.
जरा आपल्या खिडक्या बघा.
या प्रकारातील माशीची घरं तुम्हालाही नक्की दिसतील.
......................................................................
तिकडे आदित्य दादांनी भंडावून सोडलं होतं.
रोज कुठला पक्षी, कीडा पाठवून नावं विचारणं सुरु होतं.
ब्लॉगनं मोठ्यांनाही नादावलं होतं तर.
पण एक दिवस आदित्यने एक फोटो पाठवला...
आधी फोटो बघाच तुम्ही.
हा चतुर म्हणे.
आदित्य आहेच; मी किटकाचं नाव सांगतोय.
आपल्याकडे ४ प्रकारचे मोठे चतुर आढळतात.
त्यातील एक आदित्यने पाहिला होता.
क्या बात है!
...............................................
'दादा आपला कीटक प्रकल्प पूर्ण झालाय; पण मला एक वेगळं सुरवंट दिसलंय. फोटो पाठवू का?'
७ वीच्या वर्गावर अथर्व क्षीरसागरचा msg .
'मित्रा परिसर निरीक्षण प्रकल्प कधीच पूर्ण होत नाही.
पाठव फोटो.'
फोटो आला की पाठव निखीलदादाला किंवा राहुलसरांना.
आणि त्यांनी माहिती दिली की ती संबंधित वर्गावर.
'अहो सर त्या मुलाचं प्रथम अभिनंदन करा.'
'का ओ; काय विशेष?'
'अहो ही baron butterfly ची larva. हा camouflage चा उत्तम नमुना आहे बघा. ही अळी हिरव्या पानावर राहते आणि तिच्या शरीराची मधली पांढरी रेषा बरोबर पानाच्या मधल्या शिरेशी जोडून घेते. (पाहिला ना फोटो परत???)त्यामुळे आपलाल्याच काय पण तिच्या शत्रूलाही चटकन् ओळखता येत नाही. शिवाय इतके काटे अंगावर असल्याचा पण तिला फायदा होतो. शत्रूला वाटतं हिला खाल्लं तर या काट्यांचा आपल्याला त्रास होईल. तिला शाबासकी द्या. सहजी ओळखता येत नाही ती.'
अथर्व खुश की एकदम.
......................................................................
एक दिवस ५ वीतील कृष्णा रत्नपारखी हिचा msg.
'दादा गणपतीसाठी आपण ज्या कापासाच्या वस्त्रमाळा करतो त्या निर्माल्यामध्ये न टाकता आम्ही आमच्या खिडकीच्या ग्रीलला लावून ठेवल्या. आता दररोज काही पक्षी येऊन त्यांच्या घरट्यासाठी तो कापूस घेऊन जातात. त्याचाच काढलेला हा व्हिडीओ. आणि ही कल्पना आम्हाला संवेद विभागाच्या अस्मिताताईने सांगितली होती. आम्ही करून पाहिली. आता रोज छान पक्षी दर्शन होतं.'
हे कमाल होतं.
पक्ष्यांच्या दृष्टीने सिमेंट फुकट मिळण्यासारखं झालं की हे.
'अग ए अस्मिता मला सांगायला काय झालं ग तुला...'
जरा कडक सुरातच माझी अस्मिताला विचारणा.
.............................................
'दादा हा पक्षी कोणता रे?'
पक्षी दिसला नव्हता तर त्याचा आवाज रेकॉर्ड करून पाठवला होता;
हे विद्वान होते; आयुष कुलकर्णी व ऋतुजा मराठे.
हे जरा अति होतंय राव.
पण खरं सांगू का छान वाटलं.
मुलांची उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
आणि आमचे तज्ज्ञ कुठे कमी आहेत.
'हा राखी वटवट्या,' इति नचिकेत.
.............................................
पारिजातक ब्लॉग वाचून आ. संचालकांचा msg आला,
... निशाचर वनस्पती व प्राणी सृष्टीबद्दल आणखी काय काय प्रश्नं मनात आले; असे अनुधावनाचे काम मुलांना दिल्याचा उपयोग होईल.
मग त्या चारच मुलांचा स्वतंत्र ग्रुप केला.
तिथे शोध लागणे सुरूच राहिले.
म्हणजे राघवला एक दिवस १० पाकळ्यांचं फूल दिसलं.
राधानं पारिजातकाची फुले ३ दिवस पाण्यात ठेवली तर ती नाजूक फुलं अतिशय कडक, प्लास्टिकसारखी पारदर्शक झाली; पाणी पिवळे झाले.
परवा धो धो पाऊस झाला.
"आभा घरटं टिकलं असेल ना?"
दोघंही धावतच त्या खोलीत गेलो.
"अग घरटं तिरपं झालंय का ग;"
असं म्हणेम्हणे पर्यंत ते खाली पडलं.
झटकन उचलून घरात आणलं.
पण आता काय उपयोग होता.
संपलं होतं सगळं.
सगळी कारागिरी शब्दशः पाण्यात गेली होती.
काही दिवस ती खोली बंदच ठेवली.
शिवराज पिंपुडे
विभाग प्रमुख,
पूर्व माध्यमिक विभाग,
ज्ञान प्रबोधिनी, निगडी.
अफाट....
ReplyDeleteदादा सुंदर लिहिलंय...
ReplyDeleteप्रत्यक्ष घरटं बांधतानाची
पक्षाची धडपड व
site suparvizor च्या भूमिकेत
पिवळे हेल्मेट घातलेले शिवराजदादा असा फील आला 👍
पूर्वा देशमुख
ReplyDeleteमस्तच लिहीलंय दादा...... खूप वेगवेगळी निरीक्षणे नोंदविली आहेस.
पक्ष्यांची घर बांधणे कारागिरी प्रत्यक्ष पाहिलीस.... जवळजवळ अनुभवलीसच की रे ... मस्त
ReplyDeleteमस्त च दादा...
ReplyDeleteप्रत्यक्ष अनुभवल्या सारख वाटतय...
काय वाटल असेल त्या पक्षाला घर पावसात पडल्यानंतर....?...?
परत घरटे....
ओ घवत्या भाषेत नेमक्या शब्दात अतिशय सुंदर वर्णन
ReplyDeleteखूप छान दादा. तुमच्या लिखाणातून आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतो. तुम्ही निसर्ग निरीक्षणाच्या नवीन शोध धडे आम्हाला शिकवत आहात
ReplyDeleteVery nice narrative, we filled it through your words.
ReplyDeleteमस्तच अनुभव दादा! शब्दांकन भारीच!👍👍🙏🏻🙏🏻
ReplyDeleteयोगिनी कुलकर्णी
दादा तुझा प्रत्येक blog आला की आम्ही आमच्या मित्रमंडळींनी,शिक्षकांनी कायकाय नवे अनुभव घेतले हे वाचायला उत्सूक असतो.निरीक्षणासाठी दिलेल्या या नवीन दृष्टिकोनामुळे मलाच नाही तर माझ्या कुटुंबीयांना सुद्धा निरीक्षणाची सवय लागली आहे. गावाकडे असलेली माझी काकू कुंभारीणी चे घरटे रागाने काढून टाकत होती,पण कुंभारीणी बद्दल नवीन माहीत नसलेली माहिती ऐकल्यावर मात्र आता ती निरीक्षण करत आहे.(ओजस्वी पवार ७ वी क)
ReplyDeleteसुंदर प्रकल्प (कधीच पूर्ण न होणारा). निसर्गातील कमाल पाहताना निसर्गाशी एक वेगळेच नाते तयार होतानाची प्रक्रिया वाटते. अभिनंदन!
ReplyDeleteसुंदर!
ReplyDeleteखूप छान ...शिवराज
ReplyDeleteमस्तच
ReplyDelete