#लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास - भाग ६
हल्ली हा प्रश्न सतत विचारला जातोय.
आणि प्रत्येक वेळी वेगळं उत्तर द्यायला मलाही जमलंय.
यावेळचं उत्तर होतं...
त्याचं असं झालं...
प्रशांत दिवेकर सरांशी फोन सुरू होता.
ई-प्रशिक्षकसाठी मी लिहित असलेल्या लेखासंदर्भात.
ई-प्रशिक्षकसाठी मी लिहित असलेल्या लेखासंदर्भात.
ढीग सूचना करत होते सर माझ्या लेखावर.
एकदाच्या त्या झाल्यावर सरांना म्हटलं, "प्रशांत सर माझ्या डोक्यातील परिसर निरीक्षणाचे घटक संपले बुवा. सुचवा की काही."
"ढगांचे निरीक्षण करता येईल बघ," लगेच उत्तर.
जणू माझ्या या प्रश्नाची ते वाटच पाहत होते; इतकं लगेच.
"सध्याचा काळही यासाठी उपयुक्त आहे आणि."
विषय आवडला होता आपल्याला.
व्यक्तीशोध मनातून सुरु होण्याआधीच;
"सुरेंद्रला वेळ काढायला सांग."
नावही पुढयात (कानात) येऊन पडलं होतं.
एका हातानं प्रशांतसरांचा फोन ठेवला आणि दुसऱ्या हातानं सुरेंद्रदादांना फोन लावला.
"हो. चालेल की."
सुरेंद्रदादाचं बोलणं मोजकं व नेमकं.
दोन दिवसात तारीखही निश्चित झाली.
दोन दिवसात तारीखही निश्चित झाली.
मुले मराठी माध्यमातील आहेत हे समजल्यावर सुरेंद्रदादानं सर्व ppt आवर्जून मराठीतून तयार केलं.
व्याख्यान काहीच्या काही भारी झालं.
अर्थातच खूप गोष्टी नव्यानं समजल्या.
ढग म्हणजे काय? ते कसे तयार होतात? त्यांचे प्रकार;
हे सगळं तर होतंच.
पण गार कशी तयार होते? गडगडाट का होतो? चंद्राला खळे का पडते?
असंही खूप काही होतं.
ppt मध्ये प्रत्येक प्रकारच्या ढगाचे दोन फोटो होते.
एक दिवसाचा; एक संध्याकाळचा.
मुलांना ओळखायला सोप्प जावं म्हणून.
"मुलांनो तुम्हाला ढग काढायला सांगितलं की तुम्ही सगळे गोलाकार असलेले ढग काढतात. वर गोल; खालीही गोल. पण हे अत्यंत चुकीचं आहे. साधारणपणे ढगांचे तळ हे सपाटच असतात. हवा गरम झाली की ती हलकी होते; मग वर जाते. एका विशिष्ट उंचीला तेथील थंड हवेमुळे त्या हवेतील बाष्पाचे रूपांतर जलकणात होते. ती दवबिंदू उंची समजले जाते. ही उंची म्हणजे ढगाचा तळ. त्यामुळे त्या ठिकाणी ढग सपाट दिसतात. तेव्हा उत्तम भूगोल शिकलेला मुलगा ढगांचा तळ सपाटच काढतो..."
माझ्यासह अनेकांच्या नजरा खिडकीतून वर गेल्या होत्या.
हे आजवर कसं कधीच लक्षात आलं नाही...
माझ्यासह अनेक जण हाच विचार करत होते.
नेहमीप्रमाणं व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरं झाली.
ढगाला वजन असते का?
काही वेळा आकाशात रॉकेट गेल्यासारखे ढगांची रचना दिसते; ते काय असतं?
प्रश्नांवरून मुले ढगात शिरतायेत हे जाणवलं.
हेतू सफल होत होता.
५ वीतील मुलीने एक प्रश्न विचारला, "काही ढग ससा, हत्ती असे प्राणीपक्ष्यांसारखे दिसतात. त्यांची नावे काय दादा?"
प्रश्नातील निरागसता स्पर्शून गेली.
बाकी योगायोग तो किती असावा?
व्याख्यानाचा दिवस होता २२ सप्टेंबर!
बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असणारा दिवस!!
म्हणजे विषुवदिनाचा!!!
अशा या भौगोलिक संपात दिनी एका भौगोलिक विषयाचं ज्ञान मुलं घेत होती.
अजून एक विशेष.
"आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होईल. मग ऋतू बदलेल. त्यामुळे या काळात ढगांचे बरेच प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील..." इति दादा.
छान वाटलं.
आता परत एकदा पावसाळी वनस्पतींच्या निरीक्षणासाठी खाली झुकलेल्या मुलांच्या माना ढगांच्या निरीक्षणासाठी वर उंचावल्या गेल्या होत्या.
सुरेंद्रदादानं निरीक्षणासाठी पुष्कळ मुद्दे सांगितले.
पण तरी मुलांचा वयोगट लक्षात घेता त्यांना अजून सोपं जावं म्हणून या मुद्द्यांच्या आधारे एक छोटी निरीक्षण सूची तयार केली.
सुरेंद्रदादाकडून तपासून घेऊन मगच मुलांना पाठवली.
सोबत दादाचे ppt ही पाठवले.
पण तेही थोडं एडीट करून.
म्हणजे ढगांच्या प्रकारांचे केवळ फोटो व नावेच पाठवली.
पण तरी हेही पुरेसं वाटेना.
परवा शाळेतील नवीन बांधकामावर गेलो होतो.
पाच मजले चढून.
(दम लागला नाही. झाली म्हंटले आपली करोना टेस्ट.)
या उंचीवरून नजर थेट सिंहगड, तोरण्याला भिडते.
आकाश झकास दिसत होतं.
ढगांचे फोटो काढून दादाला पाठवले.
'यातील एकाचं वर्णन तू करून सांगशील का म्हणजे निरीक्षणाबाबत मुलांना अजून स्पष्टता येईल.'
रात्रीपर्यंत उत्तर आलं होतं.
(तुम्हीही करा की जरा वर्णन करण्याचा प्रयत्न.
उत्तर लेखातच कुठे तरी आहे.)
६ वी, ७ वीची मुले एकत्र करून या फोटोवर चर्चा केली.
शार्वी नलावडे हिने मस्तच वर्णन करून सांगितलं
नंतर दादानं केलेलं वर्णन सांगितलं.
निरीक्षण सूचीवरही चर्चा झाली.
आता खऱ्या अर्थानं निरीक्षण सुरु होईल हा विश्वास वाटला.
................................
एक महिना होऊन गेला होता.
एक आढावा घ्यावा म्हटलं.
"मुलांनो बोला. काय काय पाहिलं? काय काय टिपलं? वहीत, मोबाईलमध्ये?"
एक ते दहा दिवसापर्यंत मुलांनी निरीक्षणे केली होती.
दहा दिवस नोंदी करणारो होती - अनुष्का मगर.
३ ते ६ प्रकार मुलांना ओळखता आले होते म्हणे.
प्रकार ओळखण्यात चूक नको म्हणून काहींनी चक्क व्याख्यानाची टिपणवही सोबत ठेऊन नोंदी केल्या.
पूर्वा शिंदे हिने १० प्रकार दिसल्याचा दावा केला.
दुपारी गॉगल घालून निरीक्षणे केली दादा. उन्हाचा त्रास झाला नाही. प्रथमेश वाघ म्हणाला.
दादा एके दिवशी आकाशात एकाच वेळी एका बाजूला पांढरे तर दुसऱ्या बाजूला काळे ढग होते. मस्त दृश्य होतं एकदम. इति शर्वरी गुजर.
दोन ते ३७ फोटोंपर्यंत मुलांनी फोटोग्राफी केली होती.
कुणाला डोंगरांसारखे तर कुणाला घोड्यांची रेस लागल्यासारखे आकार दिसले होते.
मध्यस्तरी मेघ व स्तरमेघ या दोन प्रकारचे ढग ओळखताना जरा गोंधळ झाला दादा, आर्या चव्हाण म्हणाली.
एकुणात काय काही दिवस तरी मुले ढगात गेली होती तर...
................................
लेख संपला.
आता दादाचा परिचय करून घेऊ - सुरेंद्र ठाकूरदेसाई. ज्ञान प्रबोधिनी पुण्याचे माजी विद्यार्थी. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचे प्रमुख. काही काळ उपप्राचार्य पदावरही कामाचा अनुभव...अजून बरंच काही. हे सोडा. एक किस्सा सांगतो. दुर्गजागर मोहिमेत .लोहागडावरून एक सेल्फी काढून DP ठेवला होता. दादाचा msg आला, 'आज काय लोहगडावर का?' मी बुचकळ्यात. कारण DP मध्ये लोहगडाचा अंशही नव्हता. 'तुमच्यामागे तुंग व मोरगिरी दिसतोय; त्यावरून अंदाज केला.' भूगोल कशाशी खातात हे त्या दिवशी समजलं!
................................
ब्लॉगमधील ढगाच्या फोटोचं सुरेंद्रदादानं केलेलं वर्णन -
वरच्या भागातील रंग पांढरा; तळाशी काळा.
मध्यभागी व दूरवर पुंजक्यासारखा आकार.
३\४ आकाश ढगाळलेले.
तळ सपाट.
जमिनीपासून उंची कमी.
ढगांची उंची मध्यम.
प्रकार - पुंज मेघ, डोक्यावर स्तरीय मेघ.
ढग इतकं काही सांगत असतो... ऐकत जा जरा त्यालाही.
................................
शिवराज पिंपुडे
विभाग प्रमुख,
पूर्व माध्यमिक विभाग,
ज्ञान प्रबोधिनी, निगडी
दादा म्हणजे एक वेगळच रसायन
ReplyDeleteभारीच दादा
जमिनीवरून आकाशाकडे उड्डाण , थेट ढगांना जाऊन भिडलात .मग काय? पाणी आहेच तरंगायला
ReplyDeleteखूप छान दादा
ReplyDeleteखुपच छान लेख 👍
ReplyDeleteदादा फार सुंदर, तुमच्या लिखाणाची शैली अप्रतिमच.
ReplyDeleteदादा मी आणि ढग आता मित्र झालोत... खूप गप्पा मारतो..
ReplyDeleteमस्तच दादा . सतत नावीन्यपूर्ण लेखन शैली .👍
ReplyDeleteदादा तुमची लेखन शैली जणू आता आकाशाच्या उंचीला जाऊन भिडली आहे , अतिशय उत्तम लेखन झाले आहे दादा
ReplyDeleteकशा कशाचे निरीक्षण करता येऊ शकते याचा अंदाज येतो दादा.....मुलांमधील वेगळेपणा कायमच पाहिला जातो निरीक्षणातून.... पण या प्रकारच्या निरीक्षणाने मुलेच वेगळी कळत असणार.... खूपच छान.... कायमच वेगळाच दृष्टिकोन....
ReplyDeleteआमचं बालपण आठवलं, दादाच्या ढग निरिक्षण उपक्रमातून आणि आपल्याच विद्यार्थ्यांचा हेवा वाटला.ढगांत कल्पनेने पाहिलेला राक्षस सुरेन्द्र दादाच्या व्याख्यानातून दूर पळाला .विविध प्रकारचे ढग आणि त्यांची नावे कळली . मुलांचे कुतुहल पाहून भारी वाटलं.👍
ReplyDeleteएकदम मस्त लेख. लहानपणी गच्चीवरील उन्हाळ्यातील झोपेची आठवण झाली. आकाशाकडे बघत वेगवेगळ्या आकाराचे ढग ओळखले जात. अर्थात बालिशपणा.कारण प्रकार असतात हेच माहित नव्हते.
ReplyDelete