#लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास भाग - ३

पारिजातक...'ट्री ऑफ जॉय'

घरातून बाहेर पडून एक वळण घेतलं की एक झाड लागतं. 
पारिजातकाचं.
















त्या रस्त्यानं सध्या गेलो की मस्त सडा पडलेला दिसतो. 
अगदी सहज गाडीचा वेग कमी होतो. 
क्षणभर तो सडा डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न होतो. 
डोळ्यांत साठलेल्या त्या फुलांचा सुगंध मनभर जाणवतो. 
त्या सड्याच्या रूपातून पारिजातक मला काही तरी सांगतोय असं प्रत्येक वेळी तो सडा पाहताना वाटायचं. 
पण नेमकं काय सांगतोय ते माझ्यापर्यंत पोहोचायचं नाही. 
राममंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पारिजातकाचं रोप लावलं; 
आणि  हा वृक्ष भलताच चर्चेत आला. 
योगायोगानं आईनं मला एक व्हिडिओ पाठवला.
खूपच सुंदर व सविस्तर वर्णन होतं त्यात पारिजातकाचं.
म्हणजे पारिजातकाच्या जन्माच्या पौराणिक कथांपासून ते त्याच्या आयुर्वेदिक उपचारांपर्यंत... सबकुछ.
त्यातील एक आख्यायिका म्हणजे १४ वर्षांच्या वनवासानंतर सीतेने झाडापासून आपसूक गळून पडणाऱ्या फुलांची इच्छा दर्शवली.
तेव्हा श्रीरामांनी पारिजातकाची फुले आणून दिली म्हणे.
हा व्हिडिओ पाहत असताना अचानक पारिजातक मला काय सांगू पाहतोय याची जाणीव माला झाली.
लगेच गुगलबाबांच्या आश्रयाला गेलो.
पण मी जे शोधत होतो ते काही मला सापडलं नाही.
पारिजातकाची फुले रात्री उमलतात व पहाटे सडा पडतो.
असाच उल्लेख सगळीकडे वाचायला मिळाला.
मला नेमकी वेळ हवी होती.
ती काही मला मिळत नव्हती.
पारिजातक मला हेच तर सांगत होता.
...माझ्या फुलांच्या बरसण्याची वेळ शोध मित्रा.









झटकन सहावी, सातवीच्या वर्गावर msg पोस्ट केला.
कुणाच्या अंगणात किंवा घरासमोर पारिजातक आहे का?
२१ जणांचे प्रतिसाद आले की.
मग त्या २१ जणांना वैयक्तिक msg पाठवला.
...मुलांनो पारिजातकाच्या फुलांचा पहाटे किती वाजता सडा पडतो अशी काही माहिती उपलब्ध नाहीये. किंवा असली तरी ती आपल्याला आपल्या निरीक्षणातून शोधून काढायची आहे. त्यासाठी एक रात्र तुम्हाला कमी झोपावं लागेल आणि निरीक्षण करत जागावं लागेल. पण मजा येईल तुम्हाला. तुमच्या घरच्यांना चालणार असेल तर त्यांच्या परवानगीनं आणि त्यांच्या सोबतीनं अशी एक रात्र पारिजातकाच्या सहवासात घालवणार का?
चार जण गळाले की लगेच.
उरलेल्यांसाठी पाच प्रश्न पाठवले.
१. फुले किती वाजता उमलायला सुरुवात होते.
२. किती ते किती फुले उमलत असतात?
३. फुले किती वाजता पडायला सुरुवात होते?
४. सडा किती वेळ पडत राहतो?
५. रात्री झाडावर उमलेलं फूल आणि पहाटे गळून पडलेलं फूल यात काही फरक जाणवतो का?
एका शनिवारची रात्र निश्चित केली आम्ही.
पण रविवारी मुलांसाठी एक व्याख्यान ठरल्यानं तो दिवस (क्षमस्व. ती रात्र) रद्द करावा लागला.
पुढे गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली;
अन् सगळंच बारगळलं.
मग मदतीला आली शाळेतील भविष्यचिंतन बैठक.
सर्व अध्यापकांसाठी दोन दिवसांची बैठक होती.
त्यामुळे मुलांना सुट्टी होती.
यातल्या पहिल्या दिवसाची आम्ही निश्चिती केली.
सांयकाळी सात ते सकाळी ६ पर्यंत मुलांनी निरीक्षणं करावीत,
या मुलांचा स्वतंत्र whatsapp ग्रुप तयार केला होता;
त्यावर फोटो पोस्ट करावेत,
निरीक्षणे मांडावीत,
गप्पा माराव्यात असं सुचवलं.
दोन अध्यापकांना मदतीला घेतलं.
मुलांनी पूर्ण रात्र जागायची होती.
आम्ही अध्यापक ३\३ तासच त्यांना सोबत करणार होतो.
दुसऱ्या दिवशी उघड्या डोळ्यांनी भविष्य चिंतन करायचं होतं ना.
संध्याकाळी सात वाजल्यापासूनच मुलांचे msg सुरु झाले.
ताई दोन फुले उमलली, चार फुले उमलली.
मुलांना जागते ठेवण्यासाठी दीपालीताई व स्मिताताईनी झूमची लिंक पाठवली.
त्यावर त्यांच्या मस्त गप्पा झाल्या म्हणे मुलांशी.
माझी वेळ रात्री ३ ते सकाळी ६ अशी होती.
गजर झाल्याझाल्या उठलो.
जाम उत्सुकता होती.
पाचच मिनिटात म्हणजे मध्यरात्री ३ वाजून ५ मिनिटांनी एक msg आला.
दादा एक फूल पडलं.
कोण आनद झाला सगळ्यांना.
सगळे म्हणजे आम्ही पाचजण.
चार विद्यार्थी - राघव, अनिषा, अदिती, राधा - आणि मी.
बाकीच्यांची विकेट पडली होती.
सव्वातीन वाजता दुसरा msg आला.
दादा दोन फुले गळाली.
फुले गळून पडण्यास सुरुवात होण्याची वेळ लक्षात आली होती तर आमच्या.
इतक्या रात्री झूमवर गप्पा करणं मला शक्य नव्हतं.
मग झाडासोबत एक सेल्फी घ्या.








मस्त चहा किंवा कॉफी करा.
घरच्यांसोबत चहा घेतानाचा एक फोटो पोस्ट करा.
असं काहीबाही सांगून मी ग्रुप व मुलं जागती व हालती ठेवण्याचा प्रयत्न केला.
मुलांनो अन्य निरीक्षणेही सुरु ठेवा. कीटक, प्राणी इत्यादी.
हो दादा आत्ताच चिचुंद्री दिसली.
आदिती चिवचिवली.
दादा माझं निरीक्षण - आज पौर्णिमा आहे.
चंद्राचा फोटो पाठवत राघव ग्रुपवर पुटपुटला.
अहाहा खासच की.
विशेष होतं हे निरीक्षण.
पौर्णिमेच्या प्रकाशात पारिजातकाच्या फुलांची परसात पडण्याची वेळ आम्ही शोधत होतो तर.








राघवनं अजून एक फोटो पोस्ट केला.
त्यात चार पारिजातकाची फुले ओळीत मांडली होती.
आणि खाली लिहिलं होतं प्रत्येक फूल वेगळं आहे.
मला काही अर्थ लागला नाही.
पाकळ्याच्या संख्येकडे लक्ष गेलं.
ती होती पाच, सहा, सात, आठ.
हा शोध आमच्यासाठी नवीन होता.
पाकळ्यांची संख्या समान नसते तर.











नंतर तज्ञांकडून माहिती मिळाली की काही फुलांमध्ये असं दिसून येतं.
त्यातील एक पारिजातक.
पाचपर्यंत सडा पूर्ण पडला नव्हता.
पण मुले व त्यांचे पालकही आता कंटाळले असतील असं गृहीत धरून मुलांना झोपायला सांगितलं.
आजचा दिवस झोपून काढा. अभ्यासाला सुट्टी द्या आज.
(हेवा वाटत असेल ना मुलांना प्रबोधिनीत शिकत असल्याबद्दल. शिक्षक काय सांगतात; तर दिवस झोपून काढा. वा!)
दुसऱ्या दिवशी या चौघांची एक बैठक घेतली.
प्रत्यक्ष संवादातून निरीक्षणे समजून घेतली.
न राहवल्यामुळे दोन आई पालकांनी पण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
त्यांनाही खूप छान वाटलं होतं.
राघवची आईम्हणाली, "दादा १२ च्या सुमारास झाड पूर्ण डवरलेलं असतं. सुगंध भरून राहिलेला असतो सर्वत्र."
ज्यांच्या अंगणात, दारासमोर पारिजातक आहे त्यांनी एकदा तरी ही १२ ची वेळ नक्की गाठा. 
करोनाला खिजवल्यासारखे होईल.
राधा प्रथमच पूर्ण रात्र जागली होती.
तिला त्याचंच खूप कौतुक वाटत होतं.
एकंदर मुले खुश होती.
मग मुलांना अजून काही प्रश्न, कृती दिल्या मी. 
त्यातील एक म्हणजे रात्री ८ ते ९ मध्ये उमलणाऱ्या फुलांना रंग लावा. पहाटे ४ वाजता उठून ती फुले कधी गळून पडतात ते पहा. फुले झाडावर साधारण किती तास असतात तेही शोधू आता. तसेच काही फुले घरात आणून ठेवा. ती किती तासांनी कोमेजतात ते बघा...इ. इ.
दोन दिवसांनी मुलांची निरीक्षणे गटावर आली.
एक छोटुसा प्रकल्प पूर्ण झाला होता.
साधारणपणे...
पारिजाताकाची फुले सायंकाळी ६.३० ते १०\१०.३० पर्यंत उमलतात.
रात्री १२ वाजता झाड आकारानं मोठ्या झालेल्या फुलांनी पूर्ण डवरलेलं असतं.
त्यावेळी सर्वाधिक सुगंध जाणवतो.
फुले सुमारे ९ ते १० तास झाडावर असतात.
पहाटे ३ ते सकाळी ६\६.३० पर्यंत मुख्य सडा पडतो.
उशिरा उमललेली काही फुले सकाळी ९ ते १० पर्यंतही पडत राहतात.
घरात वाटीत पाणी घेऊन ठेवलेली फुले अगदी संध्याकाळपर्यंत ताजी राहतात.
....................................................
दोन दिवसांनी अनिषाचा  msg आला.
दादा काल रात्री पाऊस पडला तर फुलांचा आकार नेहमीपेक्षा लहान वाटला.
मुलांची नजर स्वतःहून गोष्टी टीपू लागली होती तर.
आमचं काम संपलं होतं.
.....................................................
रात्री गळून पडणाऱ्या शुभ्र फुलांमुळे या झाडाला 'ट्री ऑफ सॉरो' म्हणतात म्हणे.
आमच्यासाठी मात्र हे झाड 'ट्री ऑफ जॉय' ठरलं होतं.

( सहभागी विद्यार्थी - 
इ. ७ वी - राधा धारवाडकर, अनिषा भोंडवे, अदिती पालपिनकर 
इ. ६ वी - राघव डेरे )

शिवराज पिंपुडे
विभाग प्रमुख,
पूर्व माध्यमिक विभाग,
ज्ञान प्रबोधिनी, निगडी.


 

Comments

  1. सुखद रात्र
    अनुभवली बाळगोपाळानी

    ReplyDelete
  2. शोधमय राञ अनुभव ..👌👌

    ReplyDelete
  3. किती भारी अनुभव दिलास....तु प्रकल्प करून घेतला म्हणून माझ्या १० वी तील निरीक्षण सांगते.आमच्या पारीजातकाला फुले येत नव्हती.कृषी खात्त्यात बाबांचे मित्र होते .ते म्हणाले हे नर झाड आहे याला फुले नाही येणार..सर्वजण नाराज झाले.मात्र माझी आई त्या दिवसांपासून
    रोज झाडाच्या खोडावर हात फिरवून बोलायची मग पानांना मायेने स्पर्श करायची आणि त्या वर्षिच्या श्रावणात झाडाला बहर आला.फुलाला १०-१२ पाकळ्या.मोठ्ठं फुल होतं.वर्षातील केवळ एकच महिना त्याला फुले नव्हती ( मे).कित्येक प्रकारचे किटक त्याच्यावर यायचे.केवळ चार फुटांच्या झाडाने ७-८वर्ष आम्ही क्वार्टरला असेपर्यंत भरभरून फुले दिली. आमची बदली झाल्यावर दुसरीकडे गेल्यावर ते झाड मात्र वठले दादा.

    ReplyDelete
  4. खूप छान प्रकल्प शिवराज दादा, नवनवीन सुचणे आणि ते करून बघणे, या तुमच्या छंदामुळे , मुलांना नवनवीन करण्याची प्रेरणा मिळते व शोधक वृत्ती निर्माण होते.

    ReplyDelete
  5. कसलं भारी रे ! मुळात प्राजक्त मला खूपच आवडतो पण त्याचं असं काही निरीक्षण वगैरे ... तूच करू जाणे 🙏🙏

    ReplyDelete
  6. Replies
    1. सुंदर कृतीयुक्त शिक्षण !!!!👌💐

      Delete
    2. खुपचं भारी प्रकल्प....वाचताना आपणच अनुभव घेत आहोत असे वाटले दादा


      Delete
  7. निरिक्षणातून शिक्षण

    ReplyDelete
  8. खूप छान खूप काही शिकवणारा ब्लॉग

    ReplyDelete
  9. फारच भारी... पारिजातक हे अतिशय आवडीचं फुल... कायम त्याविषयी आकर्षण... ह्या गोष्टी कळल्यावर अजून उत्सुकता वाढली आहे.... खूपच भारी....

    ज्या मुलांनी प्रयोग केले त्यांचे ऐकून नंतर अजून कुणी मुलांनी केले का रे दादा???

    ReplyDelete
  10. अतिशय सुंदर लेख आणि फारच अप्रतिम निरीक्षण. माझ्या सुद्धा मनात पारिजातकाच्या फुलांचे असेच कुतूहल होते पण कधी रात्री जागायची हिम्मत केली नाही. फार छान माहिती मिळाली. धन्यवाद
    रोहित महाडदळकर

    ReplyDelete
  11. अभ्यास पुर्ण व कधीच कोणी केले नाही. असे प्रकल्प फक्त ज्ञानप्रबोधिनी चे अध्यापकच करू शकतात. आणि त्यात दादाच्या डोक्यात काय येईल या बाबत परमेश्वराला देखील कोडं पडत असेल अतिशय छान व वेगळा प्रयोग/प्रकल्प नेहमी प्रमाणे तेच म्हणेल की आम्ही नशीबवान आमची मुले ज्ञानप्रबोधिनी मध्ये आहेत

    ReplyDelete
  12. खूपच छान... साधं सोपं तरी खूप शिकवणार...

    ReplyDelete
  13. Khup mast vatal
    Sundar mahiti milali

    ReplyDelete
  14. एकूण भारीच लेख आणि पारिजातकाचे निरक्षिण...
    दादा भन्नाट व्यक्तिमत्त्व आहे हे निश्चित. दुर्गजागर च्या निमित्ताने शिवराज दादाला खुप जवळून अनुभवायले मिळाले. जबरदस्त कल्पनाशक्ती आणि ती प्रत्यक्षात उतरवणे आणि इंतरानाही सामावून घेऊन अभ्यासने हे दादासारखे उत्तम अध्यापकच करु शकतात.
    विद्यार्थी  व शिवराज दादाचे कौतुक आणि अभिनंदन.




    ReplyDelete
  15. Tree of Sorrow शी या चार लहानग्या जीवांनी रात्रभर हितगुज साधून त्याच्या आयुष्यातील हा एक दिवस... .(एक रात्र) आनंदाने भरून टाकला.... दुसऱ्याच्या अंगणात बरसतना आज कोणीतरी साक्षी होते याचा त्याला नक्कीच आनंद होऊन तो प्राजक्त ही आज सुखावला असणार...

    झाडावरून प्राजक्त ओघळतो तेव्हा....
    ही मुले ही काव्यपंक्ती वेगळ्या प्रकारे नक्कीच पूर्ण करू शकतील.

    ReplyDelete
  16. दादा खूपच छान. तुमच्यासारखे शिक्षक मुलांना मिळणे म्हणजे खरंच भाग्य. अशा उपक्रमांनी १००% संशोधक वृत्ती मुलांमध्ये निर्माण होईल.

    ReplyDelete
  17. दादा तुमचे लिखाण नेहमीप्रमाणेच खूप उत्तम आहे. तुमचे सर्वच ब्लॉग आम्ही नेहमीच वाचतो हा उपक्रम सुद्धा खूप छान वाटला आणि प्रतिसाद दिल्यावाचून रहावले नाही. माझ्या आई-बाबांच्या इमारतीच्या अगदी जवळच पारिजातकाचे झाड आहे. त्याच्या डवरलेल्या फुलांचा सुगंध किती वेळा घेतला आहे आणि त्या झाडावर बुलबुल पक्षी नेहमी घरटी करतात. तुमचे हे निसर्गातून शिक्षण खरोखरच खूप उपयोगी आहे.

    ReplyDelete
  18. भन्नाट प्रकल्प! निरीक्षण कौशल्याचा सुंदर अनुभव मुलांना मिळाला आणि हा फक्त तेवढ्यापुरता नसून आता ही मुले प्रत्येक झाडाकडे, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघतील! मस्तच!👏🏻👍🏻
    योगिनी कुलकर्णी.

    ReplyDelete
  19. एक उत्सुकता वाढविणारा प्रकल्प !! मुलांनाच नाही तर आम्ही पालकही यात अगदी आपसूक गुंतून गेलो. अनेक वर्षे पारिजातक हे झाड अंगणात आहे पण त्या फुलांचे असे निरीक्षण होईल ही अनोखी संधीच होती. संध्याकाळी ५ पासून पहाटे ५.३०-६ पर्यत अगदी १२ तास या फुलांचे निरीक्षण सुरू झाले. मुली बरोबर आम्ही दोघेही गल्लीतील इतर झाडे आता निरखून पाहायला लागलो आहोत. फक्त मुले, पालक जागली नाही तर त्यांचे शिक्षकही रात्रभर जागे होते , शाळा सोडून इतर बऱ्याच गप्पा होत होत्या आणि अधूनमधून मलाही कॉफी मिळत होती ��.
    निरीक्षणे अजूनही चालू आहेत नवीन नवीन गोष्टी समजत आहेत. अशा कृतिशील शाळेत आपली मुले आहेत याचा आनंद पुन्हा पुन्हा होतो. शिवराज दादांचे आभार, मस्त खूप मजा आली. ����

    - सीमा-मिलिंद धारवाडकर

    ReplyDelete
  20. दादा खूपच छान उपक्रम धमाल आली असेल,
    आपणही असेच एक दिवस भीमाशंकर परिसरात रात्रभर काजवे पाहत भटकलो होतो त्याची आठवण झाली.

    ReplyDelete
  21. डोकेबाज प्रकल्प! अप्रत्यक्षपणे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारा. अभिनंदन आणि शुभेच्छा. प्रज्ञा

    ReplyDelete
  22. खूपच सुंदर प्रकल्प दादा.
    हे खरं प्रबोधिनीचं शिक्षण.
    आमच्या मिरजेच्या वाड्यात पारिजातक होता. वाड्याचे दार उघडून आत आल्यावर सोप्याच्या आधी हा आमचे स्वागत करे. बाजूने पुढची गच्ची होती. तिथे वर जाऊन मी आणि आजोबा सकाळी लवकर त्याला हलवून उठवायचो. 2-3 परड्या भरून फुलं निघायची.
    हे सगळं वाचून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
    धन्यवाद ��

    ReplyDelete
  23. खुप सुंदर प्रयोग .आणि मुलांचे निरीक्षण ही खूप छान होते.निरीक्षण व त्याचे केलेले वर्णन ही खूप छान वाटले.आणि अशे नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली.त्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  24. खुपच सुंदर प्रयोग... वाचताना आपण स्वतां् सहभागी असल्यासारखे वाटले...

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान लेख आहे दादा. जबरदस्त निरिक्षण.

      Delete
  25. खूपच छान प्रयोग.

    ReplyDelete
  26. खूप छान प्रयोग.

    ReplyDelete
  27. 'प्राजक्त'

    नका हलवू तुम्ही माझी
    फांदी,
    फुलं उचला खाली पडलेली।

    प्रत्येक माझ फुल आहे वेगवेगळं,
    स्वभावही प्रत्येकाचा भिन्नभिन्न,
    खाली कधी पडायचं
    हे त्यांच ठरलेलं,
    नका हलवू माझी फांदी।

    काही फुलं आहेत
    साधुसंत,
    फुलताच क्षणात होतात नि:संग,
    सोडून देऊन देठ,
    क्षणात पडतात ती खाली।


    काही अगदी वेंधळी,
    एकमेकांशी खेळताना
    पडतात ती त्यांच्याही नकळत।

    काहींना वाटत असते भीती,
    खाली पडल्यावर लागेल किती?
    धीर त्यांना गोळा करायला,
    वेळ द्या तुम्ही थोडा,
    हलवू नका माझी फांदी।


    काही फुलं पडतात कळीच्या प्रेमात,
    मिठी तिची सोडवायला,
    निरोप तिचा घ्यायला,
    वेळ द्या तुम्ही थोडा,
    हलवू नका माझी फांदी।

    काही फुलं माझ्यात गुंततात,
    देठ सोडायला वेळ घेतात,
    हळुच त्यांना दूर करायला वेळ मला थोडा द्या,
    हलवू नका माझी फांदी।


    पडलेली फ़ुलं तुम्ही उचला,
    देव्हारातल्या देवाला प्रेमानी वहा,
    नाजुक सुंदर फुलांना
    पुण्य तुम्ही मिळवून द्या,

    नका हलवू तुम्ही माझी फांदी
    फ़ुलं उचला खाली पडलेली।

    @ वसुधा

    ReplyDelete
    Replies
    1. मी वसुधा देशपांडे

      Delete
    2. ही वरची कविता आम्ही हौशी जेष्ठ नागरीकांचा एक काव्यांजली नावाचा ग्रुप आहे त्यासाठी लिहीली होती.या विषयाला योग्य वाटली म्हणून पाठवते आहे.
      वसुधा देशपांडे.

      Delete
    3. मी वसुधा देशपांडे
      जेष्ठ नागरीक.
      काव्यांजली ग्रुप आहे आमचा.ही माझी कविता या विषयाला योग्य वाटली म्हणून पाठवते आहे

      Delete
  28. वसुधा ताई कविता अप्रतिम. आणि या विषयाला समर्पक

    ReplyDelete
  29. नव नवीन प्रकल्पाना आता दिवस कमी पडू लागली म्हणून रात्रही जागवलीत छान
    निसर्गातील अनेक गोष्टी तुला आता खुणावत आहेत म्हणून आता तुला निसर्गमित्रच म्हटले पाहिजे
    तुला साद देणारे तुझे छोटे , अध्यापक अन् पालकांचेही कौतुक
    आई

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मंतरलेली रात्र...!