सफर अध्यापकांच्या अनुभव विश्वाची!

    शिक्षण पद्धतीतील एक महत्त्वाचं सूत्र म्हणजे अध्यापक विद्यार्थी जिव्हाळ्याचं नातं हवं. अर्थात यासाठी हवा प्रत्यक्ष संपर्क, संवाद अन् सहवास! पण मग या करोनाच्या काळात काही करता येईल का? अध्यापकांच्या गप्पांतून त्यांचा जीवनप्रवास मुलांना समजला तर? वा! वा!! मजा येईल की!!! स्वतःवरच खूष.

खरं तर प्रत्येकच व्यक्तीनं त्याच्यात्याच्या आयुष्यात काही न काही मिळवलेलं असतं. अडचणींवर मात केलेली असते. छोट्यामोठ्या आव्हानांना तो सामोरा गेलेला असतो. त्याच्यात्याच्या परीनं लढलेला असतो. पण आपला हा सगळा प्रवास उलगडून दाखवण्याची वेळ किंवा संधी प्रत्येकालाच मिळते असं नाही. सध्याच्या काळात ही संधी जाणीवपूर्वक निर्माण केली तर... यातूनच जन्म झाला या गप्पासत्रांचा. नाव होतं - सफर अध्यापकांच्या अनुभवविश्वाची!!!

पहिली मुलाखत ठरली ती नाट्य प्रशिक्षिका मानसीताईंची. 







"अहो मानसीताई या शनिवारी आपल्या विभागातील सर्व मुलांसमोर तुमची मुलाखत ठेवू. काय म्हणता?"

"काहीही काय? हे काय मध्येच?? नको ओ..."
"मुद्दे काढून ठेवा. मग एकदा फोनवर बोलून क्रम अंतिम करू."
"अहो पण...."
त्यांची वाक्ये माझ्या कानावर पडतच नव्हती. माझी मात्र त्यांच्या कानावर आदळत होती.
............................

सुमारे तासाभराच्या गप्पांतून मला मानसीताईंचा प्रवास समजला होता.

"मानसीताई खूपच भन्नाट अनुभव आहेत ओ तुमचे. मजा यईल. पण सुरुवात जरा हटके करू. लहानपणापासून नको. तुमच्या पाकिस्तान दौऱ्यातील उर्दू नाटकापासून करू."
"चालेल."
(अखेर या  नोटवर मानसीताई आल्या होत्या.)
"पण घेणार कोण?"
"कोण म्हणजे मीच."
(मानसीताईंनी एक पॉज घेतला होता. त्या शांततेत 'अरे देवा' हे न उच्चारलेले शब्द ऐकू आले होते मला.)
"अहो तुम्ही न चिडता बोलाल ना? म्हणजे मूड नको ओ जायला माझा मध्येच."
"ठेवा फोन. भेटू परवा मुलाखतीला"
.............................

ये हृदयी चे ते ह्रदयी !!!

हा उपक्रम सुरु झाला अन्; एकावर एक धक्के बसत गेले मुलांना. म्हणजे

मानसीताईंनी  पाचवीत असतानाच एका व्यावसायिक नाटकाचे तब्बल २५ प्रयोग केलेत. पुढे युवा कलाकार म्हणून एकाच दिवशी ५ वेगळ्या प्रकारची नाटकं करण्याचा अनुभवही त्यांच्या खाती जमा आहे; तोही या नाटकातील डायलॉग त्या नाटकात न करता. याशिवाय शॉर्टफिल्मस्जाहिराती इतकचं काय दोन चित्रपटात छोटीशी भूमिकाही केलीये त्यांनी. होय होय आकाशवाणीवरही काम केलंय की... 

समाधानदादाच्या मुलाखतीतून त्यांचं ग्रामीण भागातील कष्टप्रद जीवन मुलांच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. गाव ते पुणे या प्रवासातील गमतीजमती, निगडीच्या प्रबोधिनीत काही काळ कामाचा अनुभव घेतल्यानंतर चिखलीतील गुरुकुलाच्या उभारणीत केलेलं महत्त्वाचं योगदान आणि पुन्हा निगडी प्रबोधिनीत स्वीकारलेली महत्त्वाची जबाबदारी... दादांच्या जीवनातील एकेक पान उलगडत गेलं साऱ्यांना. पण महाविद्यालयात असताना स्वत:चा खर्च भागवता यावा  म्हणून रूमवरील  मित्रांना त्यांची मेस बंद करायला लावून त्यांचं जेवण दादांनी स्वत: बनवून देण्यास सुरुवात केली; हा प्रसंग अनेकांना स्पर्शून गेला.

स्वातीताई या केवळ आपली विविध स्पर्धांची तयरी करून घेत नाहीत तर त्यांनी स्वत: त्यांच्या शालेय जीवनात अनेक स्पर्धांमध्ये उत्तम यश मिळवलंय; हे त्या दिवशी मुलांना समजलं. त्याही मानसीताईंप्रमाणे लहानपणी  आईवडिलांकडे न राहता आजीआजोबांकडे राहिल्यायेत, नंतर स्वतःच्या आईच्याच शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलंय, आकाशवाणीवर काम केलंय... असं बरंच काही नव्यानं समजलं मुलांना.

"दादा असं स्वतःच्याच आयुष्याकडं मागं वळून पाहण्याचा योग कधी आला नव्हता ओ. छान वाटलं आज..." स्वातीताईंनी आवर्जून फोन करून प्रतिसाद दिला.

स्मिताताई आपल्याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत हे त्या दिवशी आमच्या पाचवीच्या मुलांना प्रथमच समजलं. १ ली ते १० वीत तीनही तुकड्यात सलग १० वर्षे प्रथम येण्याचं त्यांनी केलेलं रेकॉर्ड, पुढील काळात ३\३ विषयात (विज्ञान, संस्कृत, शिक्षणशास्त्र) घेतलेली मास्टरस् ची पदवी; आणि तरी ठरवून शिक्षणक्षेत्रात येण्याचा केलेला संकल्प पूर्णत्वास नेलेल्या स्मिताताई अनेकांना आयडॉल वाटल्या दिवशी. 'विज्ञानावर भक्ती असूनही गंध मोहवी काव्याचा,' ही पंक्ती आठवली मला तुझी मुलाखत ऐकताना; ही शीतलताईनं दिलेली प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. 

मयुरीताई शाळेत असताना नाटकात काम करायला घाबरायची; तिची या क्षेत्रातील सुरुवात १० वी नंतर झाली हे ऐकून तर मुलं तीनताड उडाली. अनेकांना जबरदस्त आत्मविश्वास मिळाला त्या दिवशी. ताईने २५० च्या वर प्रयोग केले आहेत हे ऐकून मुलांचे डोळे विस्फारले. अंत्यंत प्रसन्न चेहऱ्यानं वावरणारी मयुरीताई  एका असाध्य आजारावर मात करून; मृत्यूशी झगडून परत आली आहे हे ऐकून करोना किरकोळ वाटला अनेकांना त्या दिवशी.

क्रीडाशिक्षक शंभूराजे सरांचा कोणताही खेळ खेळायचा बाकी नाही. कुस्तीपासून कबड्डीपर्यंत आणि रग्बीपासून टेबल टेनिसपर्यंत सगळे खेळ  खेळून झालेत सरांचे! सरांनी नवरात्रीतील कडक उपवासातही रोजचा व्यायाम (फक्त १० किमी पळणं आणि दोन तास अनवाणी {नवरात्र म्हणून} पायांनी व्हॉलीबॉल खेळणं) चुकवलं नाही... मुलं स्तब्ध होऊन ऐकत होती. 

अनुजाताई गेली अनेक वर्षे ४ वाजता उठतात. ३० एकर जमीन शेतमजुराच्या नावावर करण्याचा वडिलांचा हा ‘देण्याचा’ वारसा गेली दोन तपे अनुजाताईंनीही त्यांच्या परीनं जपला आहे; इथपासून ते चार संगणक ते संगणक प्रशिक्षणातील विद्यालयाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा विद्यालयाचा प्रवासही सर्व मुलांनी प्रथमच ऐकला त्या दिवशी.  

....................................

काही uncovered stories...

    सगळच तास-दीडतासात बसवणं शक्य नव्हतं. प्रत्येकाच्याच प्रवासातील काही स्टेशनं गाळली मग आम्ही. काही किस्स्यांना कात्री लावली. त्यातीलच एक -

स्वातीताई दुसऱ्या शाळेतून अतिरिक्त होऊन आमच्याकडे आल्या. पण काही काळ त्यांचा प्रभाव टिकून राहिला त्या शाळेतील मुलींवर. त्या शाळेत एका चुकीसाठी एका मुलीला प्राचार्यांसमोर उभं करण्यात आलं. माझी चूक नाही असं परोपरीनं ती समजावून सांगत होती. पण कुणाचा विश्वास बसत नव्हता.  शेवटी एका क्षणी ती म्हणाली, "स्वातीताईंची शपथ मी काहीही चुकीचं केलं नाहीये." प्राचार्यांनी फोन करून हा किस्सा स्वातीताईंना ऐकवला. भरून आलं होतं ताईंना. 
...........................
मुलाखतींची रंगत वाढण्यासाठी...

    मुलाखतींची उत्सुकता टिकून राहील, त्या रंगतदार होतील याकडंही आवर्जून लक्ष दिलं आम्ही. मानसीताईंची आकाशवाणीवरील अनाऊंसमेंट, मयुरीताईंचे संगीत नाटकातील पद, स्मिताताईंनी शाळेला लिहिलेल्या पत्र वाचनाने केलेला समारोप, एका मुलाखतीत घेतलेला रॅपिड फायर राउंड, अध्यापकांच्या जुन्या फोटोंचे केलेले ppt... नावीन्य टिकवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आम्ही. आदल्या दिवशी मुलाखत घेणारा व देणारा यांच्या फोटोसह तयार केलेला फ्लायर सर्व ग्रुपवर जायचा; तेव्हा मुलांना समजायचं उद्या कुणाची मुलाखत आहे ते. पहिली मुलाखत आम्ही झूमवरच घेतली. पण काही मुलं सांगूनही मध्येच व्हिडीओ सुरु करायची. मग तीही सगळ्यांना स्क्रीनवर दिसायची. ते जरा विचित्र दिसायचं. मग youtube live सुरु केल्या आम्ही मुलाखती. त्यातून आमचा प्रश्न तर मिटलाच पण एक फायदाही झाला. ज्यांना त्यावेळी मुलाखत पाहता आली नाही; ते नंतर पाहू शकले. तसेच अध्यापकांना त्यांच्या परिचितांपर्यंत मुलाखत पोहचवणं सहज शक्य झालं. अगदी दोन-तीन हजार लोकांपर्यंत पोहचला हा उपक्रम!

...........................

नेमकं काय साधलं या खटाटोपातून...

दोन महिन्यात ७ मुलाखती झाल्या. या गप्पासत्रातून जे साधायचं त्याच्या जवळ पोहचलो होतो आम्ही.

अध्यापकांच्या आजवरच्या जीवन प्रवासातील महत्त्वाचे टप्पे तर मुलांसमोर आलेच पण स्वतःचं शालेय जीवन कसं मिळवलं यावर प्रत्येकानं भर दिला. स्वतःच्या विषयाचा व्यासंग कसा जपला गेला हेही आवर्जून सांगितलं गेलं. 

मानसीताईंची मुलाखत झाल्याझाल्या पाचवीतील एका आई पालकांचा - योगिनीताई कुलकर्णी यांचा msg आला; 'आपल्याला शिकवणाऱ्या ताई इतक्या ग्रेट आहेत हे वैष्णवीला आजच समजलं दादा. खूप छान वाटलं तिला.मुलांना हे असं कधी तरी '' वाटणंही महत्त्वाचं आहे. अध्यापक आम्हाला केवळ सांगणारा नाही तर स्वतः अनुभव घेतलेला, घेणारा आहे; हे मुलांच्या समोर येणं गरजेचं आहे. संदर्भच बदलून जातात मग. मुलाखतीनंतर तासाला गेल्यावर सबंधित अध्यापकांना मुलांनी भरभरून प्रतिसाद दिले. पाठ टाचण बाजूलाच पडलं त्या तासाचं. अध्यापकांविषयी जिव्हाळा महत्त्वाचा तसा आदरही.

अध्यापक मुलांपर्यंत पोहचलेचपण त्यांची क्रीडा, नाट्य, संगणक ही क्षेत्रेही पोहचली. म्हणजे नाटकाची आवड असेल तर पुरुषोत्तम मधला सहभाग चुकवायचा नाही; हे मयुरीताईच्या मुलाखतीनंतर सहजच ठसलं होतं मुलांच्या मनावर. 

मुलांनाच काय अध्यापकांनाही आपले सहकारी नव्यानं समजले. इतकं मन मोकळं करायला शाळेत सवड होईलच कशीनकळत आदर वाढला; स्नेहबंध घट्ट झाले.

एक गोष्ट सांभाळण्याचा आम्ही प्रयत्न केला. कुठेही उपदेशाची भाषा येणार नाही असं पाहिलं. हे पूर्णपणे जमलं असं नाही; पण 'हा आमचा अनुभव आहे आणि आम्ही यातून हे शिकलो;' असंच अनेकांनी मांडलं.

स्मिताताईंची मुलाखत झाल्यावर आमच्या साक्षीताईंनी M.A. करण्याचा संकल्प सोडला. खूप झालं शिक्षण असं वाटल होतं त्यांना तोवर. आ. भाऊ (श्री. वा. ना. अभ्यंकर) नेहमी म्हणतात, 'अध्यापक म्हणून आपण बरसत राहिलं पाहिजे. कुणी तरी भिजतंच. काही तरी उगवून येतंच.या वाक्याचा अर्थ अधिक उलगडला मला साक्षीताईंच्या संकल्पानंतर .

विभागप्रमुख म्हणून सहकाऱ्यांशी वैयक्तिक संवाद महत्त्वाचा असतो. या मुलाखतींच्या पूर्वतयारीसाठी (जरी सगळ्या मुलाखती मी घेणारा नसलो तरी) संबंधित अध्यापक व मुलाखतकार यांच्या तासातासाच्या गप्पा मीही ऐकल्या. प्रत्येकाचाच एक तरी नवा पैलू समजला. अरे आजवर हे माहितीच नव्हतं की आपल्याला असंही बऱ्याचदा झालं. महत्त्वाचा वाटला मला हा केवळ 'ऐकण्याचा' संवाद.

आणि हो माझंही मस्त अनुभव शिक्षण झालं हो... youtube live मुलाखती घेण्याचं आणि त्या host करण्याचं... खरेच मजा आली खूप! 

................................................

काही नमुना (नमुनेदार) प्रतिसाद...

अनुजाताईंनी शाळा संगणक प्रशिक्षणाचं मोठ केंद्र व्हावं असं स्वप्न मांडलं. ‘ताई तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या परीनं नक्कीच प्रयत्न करेन.’ ७ वीतील अपूर्व क्षीरसागरने ताईंना कोरा चेक दिला.

‘दादा अध्यापक मुलाखती उपक्रम खूपच छान सुरुये. आम्ही संध्याकाळी आवर्जून मुलाखती बघत आहोत. एक वेगळचं नात तयार होत असल्यासारखं वाटतंय...’ पाचवीची पालक बैठक सुरु असताना उतस्फुर्तपणे श्री. दत्तात्रय निकम म्हणाले.

‘समाधानदादा तुमची मुलाखत आज आम्हा पालकांसाठीही प्रेरणादायी ठरली...एका अध्यापकातील स्वयंप्रेरित विद्यार्थी नव्यानं समजला...इच्छा तेथे मार्ग या उक्तीचा प्रत्यय आला...selfmade का काय म्हणतात ते तुमच्या मुलाखतीतून नीट समजले...’ इति विभागातील सहकारी अध्यापिका स्वातीताई.

'लोकहो मुलाखत दिल्यामुळे आजवर केलेलं काम संपलं आपलं. आता परत १० वर्षांनी मुलाखत झाली तर सांगण्यासारखं काही जमवायला हवं. चला तर  पुनश्च हरी ओम करूयात...' मुलाखत दिलेल्या स्मिताताईंनी विभागाच्या गटावर msg पोस्ट केला.

छान वाटलं.

...............................................

मुलाखतकार व मुलाखत दिलेले

सौ. मानसी फाटक – श्री. शिवराज पिंपुडे
श्री. समाधान सुसर – सौ. मयुरी जेजुरीकर
सौ. स्वाती मोरे - सौ. मानसी फाटक
सौ. स्मिता माने – श्री. श्रीराम इनामदार
सौ. मयुरी जेजुरीकर - श्री. शिवराज पिंपुडे
श्री. शंभूराजे मनुर – श्री. अवधूत गुरव
सौ. अनुजा भंडारी – सौ. अनघा देशपांडे 

 

शिवराज पिंपुडे 

विभाग प्रमुख,
पूर्वमाध्यमिक विभाग,
ज्ञान प्रबोधिनी, निगडी.  

 



Comments

  1. Bharich dada aase wegle upkram tulach suchu shaktat. Mast kalpana , khup chan .

    ReplyDelete
  2. खूपच छान तुमचा कल्पना अफलातून असतात.👌👌👌👍👍👍

    ReplyDelete
  3. या उपक्रमाचा भाग झाल्यामुळे जबाबदारी वाढली. पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. असेच सर्वांना दिशादर्शक बरोबर घेऊन जाणारे काम आपल्या हातून घडो ही सदिच्छा🙏🙏

    ReplyDelete
  4. जबरदस्त .... अध्यापकांची मुलाखत हा उपक्रमच खूप आवडला मला. बाहेरचे आदर्श आणून दाखवण्यापेक्षा मुलांना आपल्यातील आदर्शांचे दर्शन घडवलेस ... मस्तच 👌👌
    उपक्रम हिट ... नेहमीप्रमाणे 🙏

    ReplyDelete
  5. खूप छान शिवराजदादा.
    खूप प्रेरणादायी (मुलाखतकार व मुलाखत घेणारे )असल्याने आमच्या मुलीनेही(अनन्या) स्वयंप्रेरणेने या सर्व मुलाखतींची टीपणे काढली. त्यामुळे आम्हा पालकांपर्यंतही हे खरे आदर्श व छुपेरूस्तुम आले व. गुरूजन अजूनचं मोठे व आदरणीय झाले आहेत. धन्यवाद शाळा.

    ReplyDelete
  6. कल्पना सुचणे आणि ती प्रत्यक्षात आणणे याबाबत तुमचे आणि सहकारी वर्गाचे खूप कौतुक वाटते

    ReplyDelete
  7. चांगला उपक्रम होता दादा. मुलांसाठी तुमचे प्रयत्न असेच सुरू राहुद्यात.

    ReplyDelete
  8. भारीच आहे दादा!

    ReplyDelete
  9. शिवराज दादा खूप कौतुक, छान उपक्रम. विद्यार्थी आणि अध्यापक दोघांनाही याचा उत्तम उपयोग होईल.

    ReplyDelete
  10. खूपच छान उपक्रम! सर्व अध्यापकांचे मनापासून कौतुक...

    ReplyDelete
  11. पूर्वा देशमुख
    फारच भावलं दादा.......सगळा प्रवास मांडल्याने आपले अध्यापक मुलांसाठी चेतना केंद्र बनतील यात काही शंका नाही

    ReplyDelete
  12. शिवराज, आता पुस्तक रुपात सगळं एकत्र वाचायला आवडेल.
    भाऊ आणि विवेक सर यातून स्वतःचे स्वतंत्र रसायन जराती आहेस .. परिणामकारक आणि प्रेरक... खूप शुभेच्छा आणि अपेक्षा !!!.

    ReplyDelete
  13. उषा पिंपुडे
    छान उपक्रम गुरुकुलात अशा मुलाखतीना आपण व्यक्ती-परिचय म्हणतो. मा.भाऊंचे स्वप्न की सगळी शाळाच गुरुकुल झाली पाहिजे त्याचाच हा परिणाम असं मी म्हणेन
    अध्यापकांनाही या निमित्ताने आपल्या जीवन-प्रवासाचे सिंहावलोकन करताना नवी उर्जा मिळाली असेल
    तर अडचणींचे खड्डे बुजवायचे असतात, संकटांवर स्वार व्हायचे असते अन् अल्पशा यशाने हुरळून न जाता अधिक दैदिप्यमान यशाकडे घोडदौड करायची असते हा संदेश आपल्या विद्यार्थी -मित्राना मिळाला हे आलेल्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होतेच आहे
    आई

    ReplyDelete
  14. नेहमी प्रमाणे खूप छान उपक्रम,बाहेर आदर्श शोधण्यापेक्षा आपल्यातीलच आदर्श मुलांसमोर आणण्याचा चांगला प्रयत्न. विद्याताई

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog