लेखमाला - डोळस भटकंती – लेख क्रमांक १
लेखमाला
- डोळस भटकंती – लेख क्रमांक १
शाळा
हळूहळू पूर्ववत सुरु होत आहे. दैनंदिन अध्ययन-अध्यापनापासून ते शैक्षणिक
सहलीपर्यंत सगळ्याच गोष्टी टप्याटप्याने सुरु होतील. त्यामुळे या महिन्यापासून आपण
एक लेखमाला सुरु करत आहोत. नाव आहे – डोळस भटकंती! जवळपास सर्वच शाळातून वार्षिक
सहलींचे आयोजन केले जाते. या सहली योजताना नेमका काय विचार करायचा असतो? काय
प्रकारचे नियोजन करायचे असते? कोणत्या प्रक्रिया सहलीत होतील याकडे शिक्षकांनी
लक्ष द्यायचे असते? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे या लेखमालेतून तुम्हाला नक्की
मिळतील असा विश्वास आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्रात या प्रकारचे उपक्रम
राबवणारे अध्यापक शिवराज पिंपुडे यांचे शैक्षणिक सहलींचे अनुभव आपण या लेखामालेतून
वाचणार आहोत.
वीरगती जिवंत होते
तेव्हा...
७वीच्या वर्गावर इतिहासाचा तास सुरू होता. ‘इतिहासाची साधने’ नावाचं एक प्रकरण आहे सातवीला.
त्या साधनांचा एक प्रकार म्हणजे भौतिक साधने. त्यातील
एक घटक म्हणजे स्मारके. स्मारकांची उदाहरणे म्हणजे समाधी, कबर, वीरगळ
इ. वीरगळ...शब्द
नेहमीच्या पठडीतला, वाचनातला
नाही. त्यामुळे मुलांची शंका ठरलेली असते. याही वेळी मुलांनी अर्थ विचारलाच. मीही नेहमीप्रमाणे पुस्तकी छापील उत्तर
देऊन वेळ
मारून नेली. पण यावेळी थोडा आपणही शोध घ्यावा असं
वाटून गेलं. तास संपल्यासंपल्या श्री. निलेशजी गावडे
यांना संपर्क केला. निलेशजी
गावडे – एक
इतिहासप्रेमी व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्रातील
सर्व...सर्व म्हणजे सर्व (सुमारे ३५०) किल्ले पालथे
घातलेला अवलिया. म्हंटलं, ‘गावडे
सर वीरगळ प्रकरण समजून घ्यायचंय.’ ‘शनिवारी
वेळ काढा दादा.’ गावडे
सरांचा तत्पर प्रतिसाद आला. शनिवारी
शाळा सुटल्यावर गावडे सरांसोबत नेरे गावात गेलो. गावातील
एका मंदिराच्या परिसरात १५-२० वीरगळी मांडल्या
होत्या. तिथे गावडे सरांनी माझी शाळा भरवली. दीड
दोन तास वीरगळ या
एकाच विषयावर बोलत
होतो आम्ही. माझ्या कल्पनेपेक्षा भलतंच इंटरेस्टिंग प्रकरण निघालं हे. तिथेच एक कल्पना डोक्यात शिजली. पुढच्याच तासाला मुलांना विचारलं, ‘जायचं का रे
मुलांनो वीरगळी पाहायला?’ वर्गाच्या भिंतींबाहेर जायला मुलं नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे नकार
येणं अपेक्षितच नव्हतं. वीरगळी दाखवायला कोणी सहली काढत
नसेल. आहे काय त्यात ‘बघण्यासारखं’? आणि आहे काय त्यात ‘दाखवण्यासारखं’? असं कुणालाही वाटू शकतं. कालपरवापर्यंत मलाही हेच वाटत होतं. सहल ठरली. सोबत
असणार होते गावडे सरांचे मित्र श्री. अनिल दुधानी. व्यवसायाने
इंजिनियर. पण पक्का वीरगळ वेडा माणूस. गेली दोन वर्षे
वीरगळींचा अभ्यास करतायेत. किल्ले पहाता पहाता अचानक त्यांना हा विषय सापडला. आजवर सुमारे ८०० गावातून सुमारे ५५०० वीरगळी पहिल्यायेत त्यांनी. पुष्कळच अभ्यास
केलाय
आणि आता त्यांचं एक वीरगळींवरचं पुस्तकही प्रकाशित झालंय. सहलीचं ठिकाण होतं वाईजवळील
किकली नावाचं गाव. भुईंज फाट्यावर
डावीकडे वळायचं. चंदन वंदन
किल्ल्यांच्या पायथ्याचं गाव;
ही
आणखी एक ओळख. पुण्यापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर. स्वतःच्या वाहनाने
गेल्यास अडीच तीन तासात पोहोचतो आपण गावात. अनिल दुधानी सरांच्या प्रयत्नातून हे गाव वीरगळींचं गाव म्हणून प्रसिद्धीस येतंय. गावातील भैरवनाथ मंदिराच्या
परिसरात वेगवेगळ्या
प्रकारच्या सुमारे ७०-७५ वीरगळी आहेत. अकराच्या सुमारास आम्ही गावात पोहोचलो. मुलांना एकत्र
करून वीरगळींची संकल्पना थोडी स्पष्ट केली
मी. – ‘वीरगळ
ही संकल्पना कर्नाटकातून आली. कर्नाटकात दगडाला ‘कल्लू’ असे
म्हणतात. त्यामुळे तिथल्या ‘वीरकल्लू’चे
महाराष्ट्रात वीरगळ असे झाले. वीरांचा पराक्रम सांगणारी
ही कोरीव शिल्पे आहेत.’ इतकीच
माहिती दिली. खरं तर लगेच एकेक वीरगळ दाखवून माहिती देता
आली असती. पण तसं केलं नाही. त्याऐवजी मुलांना
काही प्रश्नं देऊन त्यांची उत्तरे शोधण्यास सांगितले. ज्ञानाची
निर्मिती स्वतः करण्यातच खरी मजा असते. १. काय काय कोरले आहे? २. सर्व वीरगळींमध्ये समान कोणत्या
गोष्टी आहेत? ३. काही निकषांच्या आधारे या वीरगळींचे वर्गीकरण करता येईल का? ४. कोणत्या वीरगळी विशेष जाणवल्या?
का? ५.या वीरगळींवरून आपल्याला त्या काळातील कोणती माहिती
समजते? प्रश्नांची उत्तरे शोधण्यास थोडा
वेळ दिला. हे निरीक्षण एकेकट्याने करायचे होते. खरं तर असा मोकळा, स्वतःचा
वेळ हवाच असतो मुलांना
सहलीत. अर्ध्या तासाने
सर्वांना एकत्र केलं. छान
निरीक्षणं नोंदवली होती मुलांनी. बऱ्याच
गोष्टी सांगण्यापूर्वीच मुलांनी शोधल्या होत्या. त्यांची
निरीक्षणे ऐकून आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो. एक छोटंसं उदा. द्यायचं झालं तर पाचव्या
प्रश्नाचं उत्तर देताना मुलांनी नोंदवलं… त्या काळात शिवभक्त खूप असावेत. युद्धे खूप होत असावीत. शिल्पकलेचा चांगला विकास झाला असावा
इत्यादी इत्यादी. मुलांचं भरपूर कौतुक केलं आणि आत्तापर्यंत माझ्या ताब्यात असलेली सहलीची
सगळी सूत्रे
दुधानी सरांकडे सोपवली आणि
मी विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरलो. सरांनी
सगळ्यांना एका वीरगळापाशी नेलं. त्यांच्या बाटलीतील पाणी
त्यांनी त्या वीरगळावर ओतलं. एकदम
लक्ख, कुळकुळीत
झाले ते शिल्प. सगळी
चित्रं एकदम स्पष्ट दिसू लागली. एक छोटीशी युक्ती पण अत्यंत उपयोगाची. मग दुधानी
सरांनी विचारलं, ‘कशी
वाचाल ही वीरगळ?’ एकानं मस्त उत्तर दिलं. ‘वरच्या
भागात आधी वीर त्याच्या देवतेची पूजा करून युद्धाला निघालाय. मग तो युद्ध करतोय.
सर्वात शेवटी त्याला
वीरमरण येऊन तो पडतो.’ चांगला विचार केला होता त्यानं. पण बरोबर उलटा केला होता. आता दुधानी सर बोलू लागले, “मुलांनो ही वीरगळ पहा.
याच्या सर्वात खालच्या कप्प्यात
वीरगती प्राप्त झालेला वीर दिसतोय हा वीर पायदळातील होता.
त्याने दोन घोडेस्वारांशी पराक्रमाने झुंज दिली. शत्रू घोडेस्वारांच्या हातात भाले होते. वीराच्या हातातही भाला होता. वीर पराक्रमाने लढला. पण त्याचा शत्रू सैन्यासमोर निभाव
लागला नाही. त्याची झुंज अपयशी ठरली. त्याला वीरगती
प्राप्त झाली. पण या वीराची अवस्था नाही चिरा नाही पणती अशी झाली नाही. त्याच्या अतुलनीय शौर्याची गाथा वीरगळीवर कोरली गेली. राज्यासाठी लढण्याचं-मरण्याचं पुण्य त्याला मिळालं. त्याला न्यायला स्वर्गातून चार अप्सरा आल्या. त्यांच्या हातात चौरी होती. चौरीने वीराला हवा घालत अप्सरा त्याला घेऊन स्वर्गात गेल्या. वरच्या खणात पुरोहित दिसतोय. पुरोहिताच्या हातात घंटा व बिल्वपत्र आहे. तो वीराकडून त्याच्या उपास्य देवतेची- शंकराची पूजा करून
घेतोय. वीरगळीच्या वर कलश आहे. याचा अर्थ त्याला मोक्षप्राप्ती झाली...” मुलं रंगून जाऊन ऐकत होती. एक दगड
इतकं काही सांगतो यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. दुधानी सरांचं बोलणं
झाल्यावर मुलांना बरीच माहिती मिळाली होती - वीरगळ ही खालून वर वाचतात. वीरगळीचे साधारण ३
ते ४ कप्पे असतात. वीराच्या पराक्रमानुसार त्यांची संख्या कमी
जास्त असू शकते. काही वीरगळींच्या
चारही बाजूंनी चौकटी कोरलेल्या असतात. खालून पहिल्या भागात वीरमरण आलेला
वीर दाखवलेला असतो. त्या वरच्या भागात युद्धाचा प्रसंग
कोरलेला असतो. त्यावरून कोणत्या प्रसंगात त्याला वीरमरण
आलं हे समजू शकतं. त्या पुढच्या त्या वीराचे स्वर्गारोहण तर सगळ्यात वरच्या कप्प्यात वीराची मोक्षप्राप्ती दाखवलेली असते. पुढे त्यांनी वीरगळीचे आणखी प्रकार दाखवले.
पशुधन
निदर्शक वीरगळ, लढाई
निदर्शक वीरगळ,
आत्मबलिदान
निदर्शक वीरगळ, सेनानायक
निदर्शक वीरगळ इ. इ. मजा आली मुलांना हे सगळं समजून
घेताना. आता सगळ्यांचा कडकडून भूक लागली होती. पोटभर डबा खाल्ला सगळ्यांनी. थोडी विश्रांतीही झाली. परत एकदा मुले एकत्र केली. आता त्यांचे ४-४ जणांचे गट केले. प्रत्येक
गटाला एक निरीक्षण सूची दिली. होती. त्यात १०-१२ मुद्दे होते. अर्ध्या तासात गप्पाटप्पा, चर्चा
करत चांगल्या नोंदी
केल्या मुलांनी. या निरीक्षण सूचीमुळे वीरगळ
बघायची म्हणजे नेमकं काय बघायचं
हेही मुलांना समजलं. मध्ये काही महिने उलटले. मुलांना एक मंदिर दाखवायला घेऊन गेलो
होतो. काही जण ओरडतच माझ्याकडे आले. ‘दादा
तिकडे चल पटकन, तिकडे
पशुधन वीरगळ आहे.’
वीरगळ सहल पचली होती तर मुलांना. छान वाटलं. नक्की वाचा इतिहासाचे मूक साक्षीदार – वीरगळ आणि
सतीशिळा – श्री. अनिल
दुधाने निरीक्षण सूचीतील काही मुद्दे Ø निरीक्षण
करण्याचा दिनांक व ठिकाणाचे नाव. Ø वीरगळाची उंची, लांबी, जाडी नोंदवा. Ø किती
बाजूंनी कोरली आहे? Ø वीरगळावरील कप्प्यांची / चौकटींची संख्या किती
आहे? Ø कोणते
प्राणी कोरलेले दिसतात? Ø कोणती
शस्त्रे कोरलेली आहेत? Ø किती
प्रकारच्या व्यक्ती कोरलेल्या आहेत? Ø वीराचे
आराध्यदैवत कोणते दिसत आहे? Ø कप्प्यानुसार
प्रसंगाचे वर्णन लिहा. Ø ज्यांना
शक्य आहे त्यांनी निरीक्षण करत असलेल्या वीरगळाचे चित्र काढा. Ø तुम्ही
केलेल्या निरीक्षणाच्या आधारे हा वीरगळाचा
कोणता प्रकार वाटतोय? शिवराज पिंपुडे विभाग प्रमुख, पूर्व माध्यमिक विभाग ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र 8888431868 |
|
|
Comments
Post a Comment