अर्पिलेली वने...

लोणावळ्याच्या दिशेने जाताना वाकसई नावाचे गाव लागते. महामार्गाला लागूनच एक मंदिर आहे. त्या मंदिर परिसरात आमच्या सहलीचा पहिला पडाव होता. ७५ वर्षीय ज्ञानेश्वर बगाडे मुलांशी बोलत होते. "तुकाराम महाराज खोपोलीला व्यापाराला जाताना या मार्गाने जायचे. पूर्वी हा बैलगाडीचा रस्ता होता. तुकाराम महाराज मिरची विकायला घेऊन जायचे आणि येताना मीठ आणायचे. एकदा ते त्यांची हातातली हेद्दी वृक्षाची काठी इथे विसरले. पावसाळ्यात ही काठी रुजली आणि त्याचे झाड झाले. नंतर एकाची अनेक झाडे झाली. तेव्हापासून हे 'तुकारामांचे झाड' म्हणून ओळखले जाते..."  मुले डोळे विस्फारून सगळं ऐकत होती. 

आता सहलीच्या मार्गदर्शिका विनयाताईंनी सूत्रे ताब्यात घेतली. “मुलांनो, आजूबाजूला बघा. तुम्हाला एकाच प्रकारची झाडे अधिक प्रमाणात दिसतील. नंतर त्यांची संख्या मोजा. ही सदाहरित झाडे आहेत. यांची पानगळ होत नाही...” खाली तर पाने पडलेली दिसत होती. त्यामुळे प्रश्न आलाच, "ताई, मग ही पाने कशी काय गळाली?" एकाला एक लागून अशी बरीच प्रश्नोत्तरे झाली. "या झाडाला बारीक बारीक पांढरी फुले येतात. या झाडाची वाढ हळूहळू होते आणि हा दाट वाढतो. या राईतील बाकीची झाडे नंतर लावलेली आहेत." विनयाताईंनी त्यांच्या बोलण्याला पूर्णविराम दिला. नशिबाने एका झाडाला तीन-चार फुले फुले आलेली बघायला मिळाली. त्यामुळे ‘तुकारामांच्या झाडा’च्या फुलांच्याही दर्शनाचा लाभ आम्हाला झाला. “ताई ८-९ झाडें आहेत हेद्दीची.” गाडीत चढता चढता एकाने माहिती पुरवली.

पुढचा प्रवास सुरू झाला. ठिकाण होते लोणावळ्यातील रायवूड उद्यान. आत प्रवेश केल्या केल्या स्वर्गीय नर्तकाने दर्शन दिले. काहीच जणांनाच दिसला पण ज्यांना दिसला त्यांचे डोळे लकाकले. स्थान महात्म्य लागलीच सगळ्यांना जाणवले. १० वाजले होते. त्यामुळे न्याहारी करून भटकंती करण्याचे ठरले.

“ब्रिटीश अधिकारी राय याने या उद्यानाची निर्मिती केली. म्हणून याला रायवूड उद्यान हे नाव पडले. काहींच्या मते हे बोटॅनिकल गार्डन असावे...” उद्यानाच्या इतिहासापासून सुरुवात झाली.

विनयाताई एकेका झाडाची माहिती सांगत होत्या. “आता हे बघा बटरेस्ट रूट.” मुलांच्या नजरेत अनेक प्रश्न! “इतक्या छोट्या मुलांना मी प्रथमच देवराई दाखवत आहे. त्यामुळे यांच्या पातळीला येऊन समजावून सांगणे ही माझीच परीक्षा आहे...” विनयाताईंनी त्यांचे स्वगत मला ऐकवले. “जी झाडे खूप उंच होतात त्यांचा आधार देखील भव्य असायला लागतो. मग खोडाचा काही भाग जमिनीच्या दिशेने येतो आणि त्याला मुळे फुटतात...” मुलांच्या नजरेत आता समाधान होते!!

“आता हा बघा स्ट्रँगलरचा प्रकार. सांगते सांगते.” मुलांनी प्रश्न विचारण्याआधीच ताईंनी मुलांना शांत केले. एका झाडाच्या बाजूने दुसरे झाड वाढायला लागते. ते त्याला पूर्ण वेढून टाकते. कालांतराने ते आतले झाड मरते किंवा दोन्ही झाडे जगतात. इथे पारजांभूळ वृक्षाला प्रेम्ना नावाच्या वेलीने वेढा दिलाय बघा. गुळुम, रानबिब्बा, सीता अशोक (आपल्याला शहरात दिसतो तो खोटा अशोक म्हणे!), फिश टेल पाम (झाडाच्या रचनेवरून नाव कसे दिले जाते त्याचा हा नमुना!).... अशा बऱ्याच झाडांची निरीक्षणे झाली. बुरशीचे प्रकार, अपिवानस यांचीही जाताजाता माहिती मुलांपर्यंत पोहचत होती.

मुले स्तिमित होऊन समोरचं दृश्य बघत होती. हा वेल आहे; असं चारदा सांगूनही मुलांचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी आजवर पाहिलेल्या वेलींशी याचे काहीच जुळत नव्हते. नाजूकता नावालाही नव्हती. गारंबी, पिळूकी (पीळ पडत हा वेल वाढतो म्हणून हे नाव!) हे महावेल पाहून सगळेच हरखले होते.

“अरे तो मेजरिंग टेप, तापमापक काय मिरवायला आणला आहे का? काढा ते साहित्य. करा जरा मोजामोजी.” मध्येच मी माझा चिरका सूर लावला. मुले लागलीच कामाला लागली. खोडाचा घेर, वेलीची लांबी मोजण्यास सुरुवात झाली. १.६६ मी., २.२० मी., ४.६६ मीटर.... तीन-तीन जणांनी मिठी मारूनही झाड कवेत येत नव्हते. वेल नेमका कुठून मोजायचा हेच समजले नाही. एके ठिकाणी तर तो पूर्ण जमिनीतून आला होता. आणि वर गेलेला मोजता येणे शक्य नव्हते. पण जितके मोजता आला त्याचीच लांबी भरली सुमारे ३० फूट! सगळंच विस्मयकारक होतं. देवराई बाहेरील व आतील तापमानातही बराच फरक आढळला. रायवूड उद्यानाबाहेरील तापमान २६ अंश से. होते तर उद्यानात वेगवेगळ्या ठिकाणी मोजलेले तापमान १७, २०, २१ अंश से. भरले. झाडांचे फायदे नकळत मुलांच्या लक्षात येत होते.

“या झाडाची उंची किती असेल रे?” विनयाताईंनी विचारले.

मुले २०,३०,३५ फूट असे अंदाजे सांगू लागली.

मग विनयाताईंनी एका मुलीला झाडाच्या खोडाला चिकटून उभे राहण्यास सांगीतले.

“आता हिची' उंची ४ फूट असेल तर ही एका वर एक किती वेळा ठेवला तर बुंध्याला पोहचेल?” हा अंदाज करणे मुलांना तुलनेनं सोप्प गेले.

“ताई १५ ते २० सिद्धी (त्या मुलीचे नाव) लागतील.”

“मग अंदाजे किती उंच असेल हे झाड?”

“६० ते ८० फूट.”

“बरोब्बर.”

उंची मोजण्याचा एक सोपा उपाय मुले माहिती करून घेत होती. मग प्रश्न न विचारताच उंची सांगण्याची चढाओढ लागली. वेळ होऊन गेली होती. पुढचे ठिकाण वेळेत गाठणे आवश्यक होते.

खरंतर यापूर्वी लोणावळा परिसरातील किल्ल्यांवर जाताना इथे अनेक वेळा नाष्टा केला होता. वृक्षसंपदा, महावेली पाहून हरकून गेलो होतो. पण आज मात्र यातील प्रत्येक झाड विनयाताईंनी बोलतं केलं होतं.

साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर सहलीच्या शेवटच्या मुक्कामी - देवघर या गावी पोहचलो. ठरवून नियोजन नव्हतं केलं पण सहज जूळून आले होते. देवराईचा चढता क्रम मुलांना बघायला मिळाला. एकवृक्षीय देवराई, रायवूड उद्यान आणि पूर्णपणे नैसर्गिक देवराई. या देवराईचा रस्ता अरुंद. आणि ५० मुले एका वेळी थांबू शकतील अशी जागाही देवराईत नव्हती. मग मुलांचे दोन गट केले. एक गट मुळेश्वर मंदिर परिसरात विसावला. विनयाताई त्यांच्यासोबत खालीच थांबते म्हणाल्या. ताईंचे वय ७५! देवराई चढायला त्यांच्या गुडघ्यांनी नकार दिला होता. विनयाताई – आघारकर संस्थेत सुमारे ४ दशके काम करून वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख या पदावरून निवृत्ती स्वीकारली. जवळपास ८० शोध निबंधांचे लेखन. छोट्या मोठ्या ४-५ पुस्तकांचे प्रकाशन. निसर्ग सेवक मासिकाच्या संपादन मंडळावर कार्यरत. विविध पुरस्कारांनी सन्मानित... मुलांशी संवाद करताना वय आडवे येत नाही. इतके वर्ष निसर्गात, निसर्गासाठी काम केल्यावर निसर्गाने जणू त्यांना हिरवाईचे वरदान दिले आहे. मस्त गप्पा मारल्या मुलांनी त्यांच्याशी.

एक गट देवराईची वाट चढू लाहाला. “एका रांगेत चला रे. आवाज नको. आजूबाजूचे आवाज ऐका. पायाखाली बघत चला. कशालाही भसकन हात लावू नका...” सूचनांचा भडीमार केला मी. “दादा तुमच्या आवाजाने निम्मे पक्षी उडाले असतील.” कुणी तरी हिम्मत करून मला शांत करण्याचा प्रयत्न केला. आता विनयाताईंच्या सहकारी रेवतीताई गिंडी यांनी सूत्रे स्वीकारली. थोड्याच वेळात देवराईतील देवाचे ठिकाण लागले. 'चेलोबा' त्याचे नाव. “आता या देवरायातील हे देवाचे ठिकाण आणि पहिल्या देवराईतील देवाचे ठिकाण यात काय फरक वाटतो मुलांनो? असा प्रश्न रेवतीताईंनी केला.

“ताई इथे मंदिर नाही.”

“इथला देव उघड्यावर आहे.” (उत्तर ऐकून हसू आलं मला.)

“ताई इथे मूर्ती नाही.”

“बरोबर. मूर्ती नसलेल्या देवाला तांदळा म्हणतात,” ताईंनी माहिती पुरवली.

देव दर्शनानंतर वृक्ष-वेली दर्शन सुरु झाले होते. माकडलिंबू, दातपडी (मग या नावामागची गोष्ट), कुंभा, रानमिरी वेल, मागच्या बाजूने सिल्व्हर कलरची पाने असणारा आंबुळकीचा वेल, पानांना सोनेरी कडा असणारा अंजनी वृक्ष... वैविध्याचा खजिनाच जणू.

“अरे हा बघा उंबळ वेल. सह्याद्री मधील एकमेव अनावृत्त बीजी वेल. याच्या बिया भाजून गूळ घालून लाडू करतात. खूप पौष्टिक असतात हे लाडू.” मग आवृत्त बीजी, अनावृत्त बीजी अशी चर्चा रंगली.

एका झाडावर वरच्या बाजूला ताईना मुंग्याचे घरटे दिसले. पॅगोडाच्या आकाराचे. या “मुंग्या क्रेमॅटोगॅस्टर जातीच्या आहेत. अत्यंत चावऱ्या असतात त्या...”

“देवराईत जमिनीवर खूप पालापाचोळा असल्याने त्यात ह्युमसचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे कीटकांचे वैविध्यही आढळून येते...”

“हे बघा फनेल वेब स्पायडरचे जाळे...” (याचे trapdoor भलतेच आकर्षक होते. आणि शिकार पकडण्याची तऱ्हा भलतीच सुरस होती.)

अनेक ठिकाणी वाळवीचे वारूळ दिसून आले. देवराईतील कीटक प्रकरण आता उलगडले जात होते.

एक गट खाली उतरला. दुसरा वाट चढू लागला. त्याच उत्साहाने रेवतीताई या गटाला देवराई दाखवायला सज्ज झाल्या. पहिल्या गटासोबत देवराई बघितल्याने माझी उत्सुकता बरीच शमली होती. त्यामुळे रांगेत सर्वात शेवटी थांबणेच पसंत केले मी. रेवतीताईही मागेच होत्या. थोडी वाट चालून झाली असेलनसेल  तर रेवतीताईंनी एकदम हळू आवाजात “सर वर बघा.” त्यांच्या सूराने मी लागलीच सावध झालो. नजर भिरभिरू लागली माझी. सोबत ३\४ मुले होती. “काहीही दिसले तरी ओरडू नका. पुढच्या मुलांना बोलावू नका.” प्रयत्नपूर्वक हळू आवाजात मी सूचना केल्या. “सर शेकरू बघा.” मला तरी झाडांचे केवळ बुंधेच दिसत होते. आणि एकदम ती झुपकेदार शेपूट दिसली. अहाहा! नशीब जोरावर होते आज. साक्षात राज्यप्राण्याने दर्शन दिले होते. इंडियन जायंट स्क्विरल. ‘मोठी खारूताई’, ‘पहाडी खार’ या नावानेही प्रसिद्ध. मन एकदम तृप्त झाले. काही क्षण ध्यानच लागले म्हणा ना.

दुसऱ्या गटाचेही देवराई दर्शन पार पडले होते. या फेरीत ताईंना एक/दोन औषधी वनस्पती दिसल्या. गावातील जुने जाणकार लोक आजही या वनस्पतींचा वापर करतात म्हणे. याही गटातील मुलांच्या प्रतिसादाने रेवतीताई खुशीत होत्या. परतीच्या प्रवासात रेवतीताईंना मुलांची परीक्षा घेण्यास सुचवले.

“मग मुलांनो देवराईची कोणती वैशिष्ट्ये तुमच्या लक्षात आली?” ताईंचा पहिला प्रश्न.

“ताई जमिनीवर खूप पालापाचोळा असतो. अनेक ठिकाणी जमीन दिसतही नाही.”

“ताई महावेली असतात. खूप जाडजूड व खूप लांबवर पसरलेल्या.”

“ताई देवराईतील झाडे कुणी तोडत नाही.”

“ताई देवराईत झाडांचे ३/४ स्तर असतात. खूप मोठे, त्यापेक्षा छोटे, जमिनीवरील वनस्पती.”

मुले त्यांना समजलेली देवराई त्यांच्या शब्दात सांगत होते. अशी बरीच प्रश्नोत्तरे झाली. मग एक अवघड प्रश्न विचारण्यात आला.

“गारंबी महावेलाचे शास्त्रीय नाव काय?”

“ताई... ताई मी सांगतो. एन्टाडा... एन्टाडा ऱ्हीडी.”

ताई चकित. अपेक्षाच नव्हती त्यांना या उत्तराची पाचवीतील विद्यार्थ्याकडून. उत्तर देणाऱ्या ओमला टाळी देऊन ताईंनी त्यांचा आनंद व्यक्त केला.

“शिवराज दादा, देवराईच्या रुपात  जंगल वाचनाचा पहिला धडा उत्तम गिरवला आहे मुलांनी,” रेवतीताई समाधानाने म्हणाल्या.

रेवतीताई - मूळच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर. आवड म्हणून निसर्गात रमल्या. रमणे केवळ छंद पातळीवर न ठेवता; त्याला शास्त्रीय अभ्यासाची जोड दिली. आघारकर संस्था, इकॉलॉजिकल सोसायटी, निसर्ग सेवक अशा संस्थांचे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले. विविध प्रकल्पात काम करत स्वतःला समृद्ध केले. आज त्यांनी त्यांचा खजिना मुलांसमोर रिता केला होता.

पाठ्यपुस्तकात १० ओळीत माहिती असणाऱ्या देवराईचा पसारा इतका असेल अशी मुलांनीच काय आम्हीही कल्पना केली नव्हती. परतीचा प्रवास सुरु झाला होता. एकीकडे केशवसुतांची देवराईवरील सुंदर कविता आठवत होती...

जागोजागहि दाटल्या निबिड कि त्या राहट्या रानटी

ते आईनहि, खैर, किंदळ तसे पाईरही वाढती

वेली थोर इतस्तत: पसरुनी जातात गुंतून रे

चेष्टा त्यामधुनी यथेष्ट करिती नानापरी वानरे

तर दुसरीकडे देवराईत उभ्या केल्या जाणाऱ्या मोठ्या मंदिरांमुळे, स्थानिक लोकांच्या बदललेल्या मानसिकतेमुळे देवारायांना निर्माण झालेला धोका मन अस्वस्थ करत होता.

संदर्भ पुस्तके

देवराया – डॉ. विनया घाटे

देवराई – डॉ. उमेश मुंडल्ये

 

निरीक्षण सूची

Ø देवराईचे नाव

Ø गाव, तालुका

Ø देवराईतील देवाचे नाव

Ø मूर्ती प्रकार – तांदळा / मूर्तीरूप

Ø देव उघड्यावर की मंदिरात

Ø पूजेचा प्रकार – दररोज / प्रासंगिक / यात्रेच्या वेळी

Ø यात्रा होते का? कधी?

Ø देवराई कुठे आहे – डोंगर माथा/ डोंगर उतार / सपाटी / शेतात

Ø कोणते कीटक, त्यांची घरे दिसली?

Ø कोणते पक्षी दिसले? त्यांचे आवाज ऐकले?

Ø कोणते प्राणी, त्यांच्या खाणाखुणा आढळल्या का?

Ø देवराईत असणारी वृक्षसंपदा -

o   मोठे वृक्ष

o   इतर वृक्ष

o   वेली

o   झुडुपे

o   इतर वनस्पती 

Ø देवराईचा वापर होतो का? कशासाठी?

Ø अन्य जाणवलेले विशेष 

 शिवराज पिंपुडे

विभाग प्रमुख,
पूर्व माध्यमिक विभाग, 
ज्ञान प्रबोधिनी, निगडी 

Comments

Popular posts from this blog

मंतरलेली रात्र...!