सात्विक कर्ता

वा. ना. अभ्यंकर तथा भाऊ

जन्म – १ मे १९४१, मृत्यू – १६ फेब्रुवारी २०२१

भाऊ मूळचे कोकणातले, देवगड तालुक्यातल्या नारिंग्रे या गावचे. वडिलांच्या करारी, निश्चयी वृत्तीचा भाऊंच्या मनावर खोल ठसा उमटला होता. अकरावी पर्यंतचे शिक्षण देवगडला झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी भाऊ पुण्यात आले. सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून B. A. चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. 

'तुमची नियुक्ती झाली आहे. ताबडतोब निघा.' अशी नियुक्तीची तार देवगड हायस्कूलमधून भाऊंना प्राप्त झाली. पुन्हा एकदा जन्मगावच्या जवळ जाण्याची संधी भाऊंना मिळाली. त्या शाळेत त्यांनी अकरावीचे संस्कृत आणि गणित हे विषय शिकवले. पांढरे शुभ्र धोतर, पांढरा सदरा आणि त्यावर पांढरी टोपी असा भाऊंचा पेहराव असायचा. या त्यांच्या पेहरावात त्यांच्या तोंडून अस्खलित संस्कृत आणि इंग्रजी ऐकताना अनेकांना मोठे अप्रूप वाटे. दोन वर्षांनी बी.एड.च्या शिक्षणासाठी भाऊ पुन्हा पुण्यात आले. बी. एड. करत असतानाच 'नूमवि'त शिकवायला त्यांनी सुरुवात केली. याच काळात भाऊंचा विवाह रत्नागिरीतील सुधा करमरकर यांच्याशी झाला. सुधाताईंचे सासरचं नाव 'इंदिरा' असं ठेवण्यात आलं. शि. प्र. मंडळीत आजीव सदस्य म्हणून भाऊंना घेण्याबाबतचा प्रस्ताव होता. परंतु भाऊंनी नम्रपणे नकार दिला आणि ज्ञान प्रबोधिनीमध्ये काम करण्याचे निश्चित केले.

ज्ञान प्रबोधिनीच्या पहिल्या पन्नास वर्षांमधील कामाच्या उभारणीमध्ये संस्थापक कै. आप्पासाहेब पेंडसे यांना ज्या व्यक्तींनी मोलाची साथ दिली त्यातील एक अग्रगण्य नाव म्हणजे आ. भाऊ. ज्ञान प्रबोधिनीतील त्यांची कारकीर्द १९६९ ते २०२१ अशी सुमारे ५० वर्षांची प्रदीर्घ स्वरूपाची राहिली आहे. यातील नऊ वर्षे पुणे प्रशालेचे प्राचार्य, सात वर्षे ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे कार्यवाह तर सुमारे ३५ वर्षे ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून ते कार्यरत होते.

निगडीत दाखल झाल्यावर सुरुवातीला एकाच खोलीत कार्यालय आणि त्याच खोलीत निवास या शून्यातून त्यांनी केलेली नवनिर्मिती केवळ विलक्षण आहे. नवनगरात प्रबोधिनी रुजावी यासाठी भाऊंनी हरेक प्रयत्न केले. शिक्षकांमधून कार्यकर्त्यांचा उत्तम संच बांधला. कै. आर. डी. आगा. कै. नवलमलजी फिरोदिया या सारख्या अनेक उद्योजकांना जाऊन भेटले. त्यांचा विश्वास संपादन केला. श्री. नितीनभाई कारिया यांच्या संपूर्ण कुटुंबाचे भाऊंशी नाते जडले. त्यातून स्वतंत्र तंत्रशिक्षण भवन विद्यालयाच्या परिसरात उभे राहीले. श्री. कांतीलालजी खिंवसरा यांच्या सहकार्याने १९८८ मध्ये मातृमंदिर विश्वस्त संस्थेची त्यांनी उभारणी केली. संस्थेतर्फे शिक्षण परिषदा, मुख्याध्यापक प्रशिक्षण वर्ग, समूह गायन स्पर्धा, संत साहित्य पुरस्कार, अध्यापक व विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा, पोवाडा प्रशिक्षण वर्ग अशी उपक्रमांची मालिकाच भाऊंनी सुरू केली. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा राज्यभर प्रवास केला. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये गुरुकुल संकल्पनेची भाऊंनी घातलेली भर मौलिक आहे. महाराष्ट्रातील दहा शाळांनी या संकल्पनेचा स्वीकार केला आहे.

व्यक्तींनी स्वत:च्या पायावर उभे राहावे म्हणून अनेकांना भाऊंनी छोटे मोठे उद्योग सुरु करून दिले. आपल्यासोबत वाटचाल करणाऱ्या सहकाऱ्यांची निवासाची सोय व्हावी म्हणून त्यांनी प्रबोधन सहकारी गृह रचनेची उभारणी केली. पुढे कर्मचारी सदस्यांची सहकारी पतपेढी उभी करून देऊन त्यांनी सदस्यांना आत्मसन्मानाचा मार्गही उपलब्ध करून दिला.

याशिवाय आ. भाऊंनी सुमारे सात-आठ पुस्तकातून त्यांचे शिक्षण विषयक चिंतन मांडले आहे. पंचकोश विकसनातून शिक्षण, २१ व्या शतकासाठी शिक्षण, चिंतनिका, सस्नेह नमस्कार, शिक्षणाचा पंचाधार, शिक्षण विवेक ही काही महत्त्वाची पुस्तके. आ. भाऊंच्या प्रचंड लोकसंग्रहाचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे त्यांनी लिहिलेली पत्रे. आपल्या सहकाऱ्यांना, हितचिंतकांना, माजी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या निमित्ताने त्यांनी शेकडो पत्रे लिहिली. या पत्रातून त्यांच्या विचार व भावविश्वाचे मनोहारी दर्शन घडते.

भाऊंच्या या कार्याची दखल समाजाने विविध पुरस्कार देऊन घेतली. साने गुरुजी पुरस्कार, दधीची पुरस्कार हे त्यातील काही प्रमुख पुरस्कार! याशिवाय टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सन २०१७ मध्ये त्यांना डी. लीट् पदवीने सन्मानित केले.

एक उत्तम अध्यापक, एक उत्तम मुख्याध्यापक, एक उत्तम प्रशासक, एक उत्तम लेखक, एक उत्तम वक्ता, एक उत्तम पुरोहित, एक उत्तम प्रवचनकार अशी कितीतरी रूपे भाऊंची सांगता येतील. कार्यकर्ता कोणत्या का राजकीय विचारसरणीचा असो त्याला विधायक कामामध्ये गुंतवणूक घेण्याचे मोठेच कसब भाऊंना साध्य होते. समाजातील मोठ्या धुरीणांपासून ते एखाद्या सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच भाऊ आपले आशास्थान वाटत होते. दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ रोजी भाऊंचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या श्रद्धांजली सभेत एका ताईंनी वर्णन केल्याप्रमाणे भाऊ शब्द उलट वाचला तर ऊ (उ)भा होतो. माणसाला उभा करतो; अडचणीच्या वेळी पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तो भाऊ! या एका वाक्यात भाऊंच्या सार्‍या व्यक्तित्वाचे सार आले आहे असे वाटते.

 

शिवराज पिंपुडे

केंद्र प्रशासक

ज्ञान प्रबोधिनी, निगडी.

Comments

Popular posts from this blog

मंतरलेली रात्र...!