शांततेच्या काळातील मणिपूर दर्शन

एप्रिल २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड मधील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या दोन कार्यकर्त्यांनी - श्री. मनोज देवळेकर (कार्यवाह) श्री. शिवराज पिंपुडे (कोषाध्यक्ष) यांनी संस्थेच्या कामानिमित्त मणिपूरचा सहा दिवसांचा दौरा केला. मणिपूर मधील पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या (PSVP) विलक्षण कार्याची उभारणी कशी झाली हे तर या लेखातून समजेलच पण मणिपूरी समाजजीवनाची अनेक छोटीछोटी वैशिष्ट्येही उलगडली जातील...

भय्याजी काणे   

सकाळी सात वाजता आमचा इंफाळपासून खारासोमसाठीचा प्रवास सुरू झाला. रामकृष्ण मिशनचे कार्यकर्ते सिद्धार्थजी यांच्यासोबत; त्यांच्याच गाडीतून. पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानची पहिली शाळा उखरूल जिल्ह्यातील खारासोममध्ये सुरु झाली होती. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांना भेटण्यास आम्ही खूपच उत्सुक होतो. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते नरेंद्रजी केणी हेही सोबत होते. जागोजागी उखडलेला रस्ता त्यात भर म्हणून ठीकठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे असलेली बाह्य वळणे आणि डोंगराळ भाग त्यामुळे सुमारे १६५ कि. मी. अंतरासाठी सहा तासांचा प्रवास करावा लागला आम्ही पोहोचलो तोवर शाळा सुटली होती. पण सगळे शिक्षक आमची वाट बघत थांबले होते. ओजा शंकर विद्यालय! 'ओजा' या स्थानिक भाषेतील शब्दाचा अर्थ ‘पूजनीय’ असा होतो आणि शंकर म्हणजे कै. शंकर दिनकर काणे उर्फ भय्याजी. विद्यालयाला भय्याजी यांचे केवळ नावच आहे असे नाही तर त्यांचा एक पुतळाही शाळेच्या आवारात आहे.

एव्हाना आमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. नरेंद्रजींनी आमचे चेहरे वाचले अन् मागचा ५० वर्षांचा इतिहास उलगडण्यास त्यांनी सुरुवात केली...

भैय्याजी – ईशान्य भारतात राष्ट्रीय एकात्मतेची बीजे पेरली पाहिजेत, ही परमपूज्य गोळवलकर गुरुजींची इच्छा मनात धरून त्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलेला एक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता. ‘दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवनभर अविचल चलता है’ या ओळी प्रत्यक्षात जगलेला एक संन्यासी! भय्याजींचं सर्वात मोठं योगदान म्हणजे १९७१ ते ९५ या काळात पूर्वांचलातील सुमारे तीनशे ते साडेतीनशे नागा, कुकी, झिलियांग, मैतेयी इत्यादी जनजातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी म्हैसूर, हैदराबाद, पुणे, सांगली, चिंचणी, बेळगाव अशा अनेक ठिकाणी वसतिगृहांची केलेली स्थापना हे होय. शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार या विद्यार्थ्यांवर करण्यात भय्याजी यशस्वी झाले.

याच कामाला संस्थात्मक रूप देण्यासाठी १९८६ मध्ये मुंबईत ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली. स्वतः भय्याजींसह अनेक प्रतिष्ठित लोकांनी या प्रतिष्ठानची जबाबदारी स्वीकारली. अश्रू ईशान्येचे मिशन मणिपूर या आपल्या पुस्तकात भैय्याजींच्या कामाचे वर्णन करताना पुरुषोत्तम रानडे लिहितात, 'निर्जीव पुतळ्यात प्राण फुंकण्यापेक्षाही मिशनऱ्यांच्या प्रभावाखाली असलेल्या दुर्गम मणिपूरी खेड्यातून आलेल्या या मुलांना राष्ट्रनिष्ठा देणे अवघड होतं. ते भय्याजींनी करून दाखवलं.

भय्याजींच्या या सगळ्या प्रवासात त्यांना खंबीर साथ दिली होती ती जयवंत कोंडविलकर या निधड्या छातीच्या तरुणाने. कोण होता हा जयवंत???

सुरुवातीच्या काळात भय्याजी कोकणातील राजापूर तालुक्यातील कोंड्ये या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांच्या शाळेतील एक विद्यार्थी म्हणजे हा जयवंत. दोघांनाही एकमेकांचा चांगलाच लळा लागला होता. ईशान्य भारतातील कार्यासाठी भय्याजींनी ती शाळा सोडली. ते मणिपूरला जायला निघाले. छोट्या जयवंतालाही सोबत घेऊन जायची त्यांची खूप इच्छा होती. पण अर्थातच इतक्या दूर एवढ्या लहान मुलाला पाठवण्यास जयवंताच्या आईवडिलांनी नकार दिला. भय्याजी एकटेच मणिपूरला गेले. पण काही दिवसांनी वडिलांचे मन वळवण्यात स्थानिक कार्यकर्ते आणि जयवंतला यश मिळाले आणि जयवंतही इंफाळमध्ये दाखल झाला. सुरुवातीला मणिपूरमधील उखरूल या भागात भय्याजींनी काही काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्कालीन परिस्थिती इतकी प्रतिकूल होती की भय्याजींना तिथे राहून काम करणे शक्य झाले नाही. मग मणिपूरच्या आणखी काही भागात जाऊन भय्याजींनी काम करण्याचा प्रयत्न केला. काही काळातच त्यांच्या लक्षात आले की इथे राहून इथल्या तरुण मुलांना शिकवून फार काही साध्य होणार नाही त्याऐवजी या मुलांना भारतातल्या वेगवेगळ्या भागात शिक्षणाच्या निमित्ताने पाठवलं तर खऱ्या अर्थाने या मुलांचं मन व मतपरिवर्तन घडवून येऊ शकेल. अर्थातच हजारो किलोमीटर दूरवर पाठवायला इथले पालक तयार होतील का हा प्रश्न होताच. पण भय्याजींनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. सुरुवातीला दोन विद्यार्थ्यांना त्यांनी हेरलं आणि त्यांच्या आई-वडिलांशी बोलून त्यांना आपल्या सोबत घेऊन १९७३ ते सांगलीला परतले. जयवंतही त्यांच्यासोबत परतला. वर्षभराने जेव्हा ही मुले मिरजेच्या एका इंग्रजी शाळेत चौथीच्या वर्गात शिकून परतली तेव्हा त्यांच्यात झालेले बदल पाहून पालकांना आनंद वाटला. परिणाम स्वरूप यावेळी दहा-बारा पालक आपल्या मुलांना पाठवण्यास तयार झाले. पण जसजशी निरोप देण्याची वेळ जवळ येऊ लागली तशी पालकांची मने विचलित व्हायला लागली. आणि या सगळ्या पालकांनी भय्याजींकडे एक वेगळीच मागणी ठेवली. ‘आमची मुलं आम्ही तुमच्या विश्वासावर जरूर पाठवू पण तुम्हीही तुमच्या जयवंतला आमच्याकडे ठेवा. तो सध्या जातोय तसाच इथल्या शाळेत जाईल. त्याची सर्व काळजी आम्ही घेऊ...’ म्हणजे एका अर्थाने हे जयवंतला ओलीस ठेवण्यासारखेच होते. भय्याजींनी जयवंतला न विचारताच तत्काळ होकार दिला. तेरा वर्षाच्या जयवंताला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा अर्थातच त्यांने आकांडतांडव केला. पण भय्याजींनी आपल्या खास शैलीत अनेक उदाहरणे देऊन जयवंताची समजूत काढली अन् जून १९७४ रोजी १२ मुलांच्या तुकडीला घेऊन भय्याजी सांगलीत परतले. इकडे जयवंताचं शिक्षण मणिपूरमध्ये सुरू राहिले. अकरावीत गेल्यावर तो इतर मुलांनाही शिकवू लागला. पदवीपर्यंतचे शिक्षण त्याने मणिपूरमधूनच पूर्ण केलं आणि नंतर रीतसर शिक्षक म्हणून काही वर्षे नोकरीही केली. अनेक वेळा जीवघेणी संकटं आली पण प्रत्येक वेळी जयवंत त्यातून मार्ग काढत गेला; स्थानिकांचा विश्वास संपादित करत राहिला. तिथल्या मुलांना शिकवणं, मुलांची निवड करणं त्यांना भय्याजींकडे पाठवण्याची व्यवस्था करणं या कामात त्यानं स्वतःला अक्षरशः झोकून दिलं.

१९८६ मध्ये जयवंतराव मुंबईत आले. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना नोकरी करणे भाग पडले. बँकेची परीक्षा उत्तीर्ण होऊन डोंबिवलीतील बँकेत ते नोकरीस लागले. पुढची सुमारे पंधरा वर्षे त्यांनी ही नोकरी केली. या १५ वर्षात दर वर्षी काही महिने मणिपूरला जाणे त्यांनी सुरूच ठेवले. ज्यांच्याशी आजवर ओळखी झाल्या होत्या त्यांना भेटत राहिले. संपर्क ताजा ठेवत राहिले. त्यांच्या याच संपर्काचा उपयोग पुढे जेव्हा PSVP ने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी झाला. 

ओजा शंकर विद्यालय

२६ ऑक्टोबर १९९९ मध्ये अल्पशा आजाराने भय्याजींचं निधन झाले. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त जयवंतरावांनी ऑक्टोबर २००० मध्ये उखरूल पासून ८० कि. मी. अंतरावर असणाऱ्या खारासोममध्ये एक सभा घेतली. या सभेला भय्याजींचे माजी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने जमले होते. होय त्याच उखरुलमध्ये की जिथून १९७२ साली भय्याजींना छोट्या जयवंताला घेऊन माघार घ्यावी लागली होती. सभेमध्ये गावच्या प्रमुखाने भैय्याजींना श्रद्धांजली म्हणून प्रतिष्ठानच्या कार्याला एक एकर जागा देण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला असल्याची घोषणा केली. ‘या जागेत भय्याजींच्या स्मृतीनिमित्त एक शाळा सुरू करावी अशी सगळ्या ग्रामस्थांची इच्छा आहे’; असेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्या प्रदेशात सुरुवातीच्या काळात बाहेरून आलेल्या माणसाला पाय ठेवता येणं शक्य नव्हतं तिथे घडलेली ही क्रांती म्हणजे भय्याजींच्या आणि जयवंतरावांच्या कामाची पावतीच म्हणावी लागेल.

दोन वर्षांतच शाळा सुरु झाली. शाळेचा यावर्षीचा पट आहे १२९ विद्यार्थ्यांचा. शिशुवर्ग ते सातवीपर्यंत ही शाळा चालते. एकूण ११ अध्यापक शाळेत काम करतात. शाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूचा समाज नागा असूनही इथला मुख्याध्यापक – बसंतसिंग हे मात्र मैतेयी आहे. (मणिपूरमध्ये एका गावात एकाच जनजातीचे लोक राहतात.) भय्याजी काणे यांचे ते विद्यार्थी असल्याने कुठल्याही प्रकारचा त्रास स्थानिक लोकांकडून यांना होत नाही. बसंतसिंग यांनी सगळ्या शिक्षकांचा परिचय करून दिला. शिक्षकांसोबत छोटी बैठक झाली. दोन्हीकडील शैक्षणिक अनुभवांची देवाणघेवाण झाली. इथली मुले कला-क्रीडा क्षेत्रातही उत्तम कामगिरी करत आहेत असे शिक्षकांच्या बोलण्यातून समजले. शिक्षकांचा गट एकदम उत्साही वाटला.

शाळेला छोटेखानी मैदान आहे. त्याच्या एका बाजूला दरी आहे. तरी त्या बाजूने नेट बांधून मुलांना फुटबॉल खेळण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. मणिपूरी मुलांमध्ये फुटबॉलचे प्रचंड वेड दिसून आलं. मणिपूरच्या आमच्या वास्तव्यात अनेक ठिकाणी मुले फुटबॉल खेळताना दिसली. बसंतसिंग आवर्जुन आम्हाला शाळेच्या गच्चीवर घेऊन गेले. शाळेच्या गच्चीवरून भारत म्यानमार सीमेवरील डोंगररांग अगदी सहज पाहता येते. शाळेतच आमच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवण करून आजूबाजूचा परिसर बघून लगेचच परतीचा प्रवास सुरु केला.

आजूबाजूचा निसर्ग मन प्रसन्न करत होता. डोंगरातील विशिष्ट प्रकारच्या झाडांना लागलेली पांढरी फुले लक्ष वेधून घेत होती. पण तरी नजर मात्र पक्ष्यांना शोधत होती. आजच्या या येण्याजाण्याच्या १२ तासांच्या प्रवासात आजूबाजूला दाट जंगल असूनही मोजून दोन पक्षी दिसले. मोठ्या प्रमाणावर प्राणी-पक्ष्यांची शिकार होते हे ऐकले होते... थोडे अंतर पुढे गेल्यावर एका गावातून तीन-चार युवक बंदुका, गलोल घेऊन जंगलाच्या दिशेने जाताना दिसले... पक्षी न दिसण्याचे कारण नजरेसमोर होते.

गाडीतूनच दिवसभराचा लेखाजोखा विविध whatsapp ग्रुपवर पोस्ट केला. एका युवकाचा वैयक्तिक प्रतिसाद आला. त्याने विचारले, ‘खारासोम येथे रेंज होती का रे?’ त्याला म्हंटले संपूर्ण डोंगराळ प्रवासात रेंज नसलेले ठिकाण शोधूनही सापडले नाही. २०१८ साली तो जेव्हा या भागात गेला होता तेव्हा रेंज अभावी मोबाईल चक्क बंद करून ठेवण्याची वेळ त्याच्यावर आली होती. चार वर्षात परिस्थिती बरीच बदलली आहे तर. रस्त्यांची कामेही जोरदार सुरु आहेत. एकूणच ‘कनेक्टीव्हीटी’वर सरकार जोरात काम करत असल्याचे जाणवले. 

चुराचांदपूरच्या शाळेस भेट

आजची सकाळ थोडी निवांत होती; जाग येईल तेव्हा उठण्याची. जाग आल्यावर कालच्या बारा तासांच्या खड्डे प्रवासानंतर सर्व शरीर जागच्या जागी आहे हे पाहून बरं वाटलं. ठीक दहा वाजता गाडी घ्यायला आली. आज गाठायचे होते. PSVP ची दुसरी शाळा या गावात चालते. वाटेत टपरीवर मस्त पराठे खाल्ले. आजही खूप गप्पा झाल्या नरेंद्रजींशी प्रवासात. त्यांच्या विषयी थोडे जाणून घेता आले. नरेंद्रजी हे आरबीआयचे उपगव्हर्नर यांचे निजी सहाय्यक या पदावरून निवृत्त झाले.  PSVP संस्थेच्या कामाची माहिती त्यांना मुंबईमध्ये झाली. बँकेमध्ये काम करत असल्यापासूनच त्यांनी इथले चार विद्यार्थी दत्तक घेतले होते. म्हणजे या मुलांचा वार्षिक खर्च हा केणी यांच्या कुटुंबियांकडून होत होता. त्यानंतर इथले काम बघण्यासाठी म्हणून एक-दोनदा येणे झाले; तेव्हाच त्यांनी संकल्प केला की निवृत्तीनंतर या संस्थेसाठी काम करायचे. आणि मग २०१९ पासून ते पुढे जवळपास पाच वर्ष, वर्षातले चार ते पाच महिने  इथे आले आहेत. संस्थेच्या कार्यालयाशी संबंधित अनेक गोष्टी ते लक्षपूर्वक बघतात, कोणतेही मानधन न घेता. या कुटुंबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा मुलगा आणि सून हे दोघेही आर्मीमध्ये आहेत. मुलगा मेजर तर सून कॅप्टन...

 नरेंद्रजी चुराचांदपूर विषयी सांगत होते, "इथले लोक एकमेकांना खूप धरून राहतात. गावात कोणाचे लग्न असले किंवा कोणाचा मृत्यू झाला तर सारा गाव लोटतो तिकडे. शाळेला अघोषित सुट्टीच असते त्या दिवशी...", नरेंद्रजी सांगत होते.  बाराच्या सुमारास आम्ही शाळेत पोहोचलो. शाळेत केवळ शुकशुकाट होता. नरेंद्रजीही गडबडले. आम्ही शाळेत येणार आहोत असे कालच त्यांचे बोलणे इथल्या मुख्याध्यापकांशी झाले होते. इतक्यात एक ताई त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. "गावात कोणाची तरी मयत झालीये; त्यामुळे सगळे तिकडे गेलेत," ताईंनी माहिती पुरवली. गाडीत जे ऐकले होते ते प्रत्यक्षात अनुभवले. नरेंद्रजींनी ताईंचा परिचय करून दिला. जयश्रीताई देसाई पुण्याच्या एका शाळेत काम करत असतानाच दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत मणिपूरमध्ये जाऊन PSVP च्या शाळेत शिकवण्याचे काम करू लागल्या. (मणिपूरमध्ये दिवाळी व मे महिन्याची सुट्टी नसते. शाळा सुरू असतात. खूप पावसामुळे जुलैमध्ये तर खूप थंडीमुळे डिसेंबर- जानेवारी महिन्यात शाळांना सुट्ट्या असतात.) २०१७ मध्ये निवृत्त झाल्यानंतर दर वर्षी तीन-चार महिने जाऊन ताई शिकवण्याचे काम करू लागल्या. कौतुक वाटले ताईंचे. ताईंनी मस्त चहा करून दिला. मग शाळेचा परिसर दाखवला. शाळेला प्रशस्त मैदान आहे. संस्थेने नुकतेच अभ्यागत निवास कक्ष बांधले आहेत. आवश्यक सोयींनी हे कक्ष सुसज्ज आहेत. ही शाळाही भैय्याजींच्या नावेच आहे. या शाळेत शिशुवर्ग ते ७ वी पर्यंतच्या वर्गातून सुमारे १८० विद्यार्थी शिकत आहेत.  

तमिंगलॉंग येथील शाळेचा इतिहास

संस्थेची तिसरी शाळा २०१५ मध्ये तमिंगलॉंग येथे सुरु झाली. या शाळेला आम्हाला भेट देता आली नाही. पण या शाळेचा चित्तथरारक इतिहास प्रतिष्ठानची कार्यकर्ती वीणाताई हिच्याकडून समजला. त्याचे असे झाले -  २००९ मध्ये तमिंगलॉंग येथे शाळा सुरू करण्याचे निश्चित झाले. परंतु तिथल्या चर्चकडून या कामात पुष्कळ अडचणी निर्माण केल्या गेल्या. शेवटी जयवंतरावांच्या स्थानिक मित्रांनी त्यांना दहशतवादी गटाच्या प्रमुखाची भेट घेण्याचा सल्ला दिला. शेवटचा उपाय म्हणून धोका पत्करून जयवंतराव संबंधित संघटनेच्या प्रमुखास भेटायला गेले. ‘तुम्ही तर मोकळ्या हातानेच आलात; काहीच घेऊन आला नाही’, असं प्रमुखाने म्हटल्यावर ‘मी तुमच्याकडे काही मागायला आलो नाहीये. तुमच्या समाजात शिक्षणाचं काम सुरू व्हावं यासाठी आम्ही धडपडतोय. तुम्हाला नको वाटत असेल तर नाही करणार;’ असे म्हटल्यावर ‘तुम्ही तिथल्या कोणाला ओळखता?’ असा प्रश्न त्या नेत्याने विचारला. जयवंतरावांनी काही नावे सांगितली. याचा काही विश्वास बसेना. त्यामुळे वायरलेसवर संपर्क करून स्थानिक लोकांशी बोलून त्याने खात्री करून घेतली. स्थानिक लोकांनी त्यांना जी काही माहिती दिली ती ऐकून तर त्या नेत्याने जयवंतरावांना कडकडून मिठीच मारली. ‘तुमच्याविषयी माझा गैरसमज झाला होता. तुम्ही अगदी बिनधास्तपणे शाळेचं काम सुरू करा;’ असं म्हणून पाचशे रुपयांच्या करकरीत नोटांचं एक बंडल  जयवंतरावांच्या हातात ठेवलं. शाळेसाठी मिळालेली ही पहिली देणगी होती. त्यानंतर आजतागायत शाळा चालवण्यात कोणतीही अडचण आलेली नाही.

आजवर या तिन्ही शाळातून सुमारे अडीचशे विद्यार्थी शिकून बाहेर पडले आहेत. तिन्ही शाळेतून सध्या सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तिन्ही शाळांची सुरुवात ‘जन गण...’ या राष्ट्रगीताने होते. तीन पैकी एक शाळा भारत म्यानमार सीमेवरील गावात भरते. आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे शाळेचे चार माजी विद्यार्थी आज IB मध्ये काम करत आहेत. काही माजी विद्यार्थी शासकीय सेवेत कार्यरत आहेत. एकुणात काय तर भैय्याजींचे कष्ट वाया गेले नाहीत. कै. भैय्याजी नक्कीच कृतार्थता अनुभवत असतील. 

महिला प्रधान संस्कृतीचे दर्शन

आज संध्याकाळी शुभान फाऊंडेशनचे डॉ. नंदी व डॉ. वेदमणीताई यांची भेट नियोजित होती. या संस्थेने गरजू महिलांना रोजगार मिळावा म्हणून सुरू केलेल्या कॅफेमध्ये रात्रीचे जेवण झाले. नरेंद्रजीही सोबत होते. यानिमित्ताने या दोन संस्थांच्या कार्यकर्त्यांची झालेली भेट महत्त्वाची वाटली. रात्र बरीच झाली होती. त्यामुळे PSVP च्या कार्यालयात जाण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहन व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यामुळे डॉ. नंदी व डॉ. वेदमणी हे त्यांच्या गाडीतून आम्हाला सोडण्यास निघाले. साडेदहा वाजले होते. पान खाणार का म्हणून नंदीनी विचारले. कोण नाही म्हणणार. थोडी शोधाशोध केल्यावर एक ठेला सापडला. आणि रात्रीच्या १०/३० वाजता पानाच्या ठेल्यावर चक्क एक युवती पान लावत बसली होती. ही एक छोटीशी गोष्ट तिथल्या महिलाप्रधान संस्कृतीची निदर्शक वाटली. पान खाताना, “मनोजजी इथल्या महिलांमध्ये तंबाखू/जर्दा खाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे,” वेदमणीताईंनी माहिती पुरवली.

पानासाठी शोधाशोध करताना अजून एक विशेष गोष्ट आम्हाला जाणवली होती. इतक्या रात्री बऱ्याच घरांच्या बाहेर महिला बसलेल्या दिसल्या. ही काय भानगड आहे; असे वेदमणीताईंना विचारले. त्यांनी दिलेल्या उत्तराने केवळ आवाक् व्हायला झाले. रात्री १० नंतर जेवण वगैरे करून झालं की साधारण तास-दीड तास महिला आपापल्या घराच्या बाहेर बसतात. या महिलांचं काम म्हणजे रात्री उशिरा ज्या कोणी युवती, महिला घरी जात आहेत त्यांना काही अडचण होत नाहीये ना, कुठला मुलगा त्यांच्याशी दांडगाई करत नाहीये ना यावर लक्ष ठेवायचं. आणि चुकून असं काही असं काही वाटलंच तर रस्त्यावरील लाईटच्या पोलवर काठीने आवाज करायचा, मग काही क्षणात मोठा जमाव तिथे एकत्र होतो... पुढचे काही सांगायची गरज नाही. त्यामुळे इथे महिलांच्या वाट्याला जाण्याची हिंमत कोणी करत नाही. “इथे महिला अत्याचारांचे प्रमाण अत्यंत नगण्य  आहे”, ताईंनी आणखी एक माहिती पुरवली. 

मुक्त भटकंतीतील निरीक्षणे

आजचा दिवस मणिपूर भटकण्याचा होता. भल्या सकाळीच मनोजरावांचे परिचित जीवनसिंग घ्यायला आले होते. आधी त्यांनी आग्रहपूर्वक त्यांच्या घरी नेले. घरातील सर्वांनीच खूप प्रेमाने स्वागत केले. काळ्या तांदळाची खीर खाऊ घातली. “सर बरेच प्रेम आहे की तुमच्यावर.” मी न राहवून विचारले. “अरे बाबा याचा भाऊ केशव ६ वर्षे माझ्याकडे राहायला होता. माझ्याकडे राहूनच त्याने शिक्षण पूर्ण केले. आज दिल्लीत एका कंपनीत तो मोठ्या अधिकार पदावर आहे. या घरातील सगळ्यांना मी पूर्वीपासूनच ओळखतो.” (ज्ञान प्रबोधिनी संस्थेद्वारेही पूर्वांचलातील अनेक विद्यार्थी पुण्यात आणून शिकते करण्यात आले होते. श्री. मनोज देवळेकर हे सध्या ज्ञान प्रबोधिनी निगडीचे केंद्रप्रमुख आहेत.) जीवनसिंग यांच्या घराच्या अंगणातही कृत्रिम तळे बघायला मिळाले. बहुतांश घरांसमोर अशी तळी बघायला मिळाली. त्यात मत्स्यपालन केले जाते. पावसाळा सुरु होईपर्यंत या तळ्यात मासेमारी केली जाते. पावसाळ्यात काही महिने माशांच्या प्रजोत्पादनाचा काळ असल्याने मासेमारी बंद असते.

जीवनसिंग यांच्या घरच्यांचा निरोप घेऊन मणिपूर दर्शनसाठी आम्ही बाहेर पडलो. शहरातील संग्रहालय, कांगला किल्ला असे बघून इंफाळ मधील सर्वात मोठे इमा मार्केट बघायला गेलो. प्रचंड मोठे मार्केट! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मार्केट केवळ महिलांद्वारे चालवले जाते. पुरुषांना इथे दुकान चालवण्यास परवानगीच नाही. वैविध्य तर विचारूच नका. सर्व प्रकारची म्हणजे कपड्यापासून ते फळे-भाज्यापर्यंत आणि पूजेच्या साहित्यापासून ते मासेमारीसाठी लागणाऱ्या साहित्यापर्यंत सर्व प्रकारची दुकाने या मार्केटमध्ये आहेत. तोबा गर्दी बघायला मिळाली. अर्थात आम्हीही खरेदीचा आनंद लुटला. दुपारचे जेवण याच मार्केटमधील एका हॉटेलमध्ये झाले. थाळी होती. दौऱ्यात दोन-तीन वेळा थाळी घेण्याचा योग आला होता. इथल्या थाळीमध्ये शाकाहारी आणि मासे अशा दोन्ही गोष्टी असतात. त्यामुळे दोन तीन प्रकारचे मासे आणि पाच-सहा प्रकारच्या भाज्या ताटात असतात. काळया तांदळाची खीर असतेच असते. अर्थात केवळ भात असतो. पण प्रत्येक पदार्थ चविष्ट. आजच्या दिवसभरात मनोजरावांनी एक वेगळीच गोष्ट टिपून ठेवली होती. “शिवराज आज खूप रस्ते भटकलो आपण. पण तुला कोठे भिकारी दिसला का?” खरेच की. आजच नाही गेल्या २/३ दिवसातील वास्तव्यात एखाददुसरा अपवाद वगळता भिकारी नजरेस पडले नव्हते. भरपूर चालणे आणि त्यानंतर झालेले भरपेट जेवण यामुळे निवासस्थानी जाऊन थोडा आराम करण्याची इच्छा निर्माण झाली. 

चिमणीची गोष्ट

पूर्वांचलला जाऊन आल्यापासून एक प्रश्न डोक्यात घोळत होता. कधीतरी जयवंतराव भेटतील तेव्हा त्यांना विचारेन असं ठरवललं होतं. ऑगस्ट महिन्यात जयवंतरावांची पुन्हा एकदा पुण्यात भेट झाली. तेव्हा त्यांना विचारलंच मी, “खूप लहान वयात तुम्हाला एकट्यालाच मणिपूरला सोडून भय्याजी सांगलीला परतले. त्यावेळी त्यांनी तुमची समजूत कशी काढली ओ जयवंतराव?” एक शिक्षक असल्यामुळे (एका विद्यार्थ्याला कसे मनवले?) हा प्रश्न मला पडणे अगदीच स्वाभाविक होते. जयवंतरावांनी सांगितले, “भैय्याजींनी मला शिवाजी महाराज संभाजी राजांची गोष्ट सांगितली. आग्र्यावरून सुटताना संभाजींना मात्र शिवाजी महाराज सोबत घेऊन गेले नाहीत हे सांगितले. मग त्यांनी गुरुगोविंदसिंग यांची गोष्ट सांगितली. त्यांच्या दोन मुलांना भिंतीत चिणून ठार मारतानाही त्यांनी कसे धैर्य सोडले नाही हे सांगितले. पण तरी माझे मन काही तयार होईना. मग आणखी एक गोष्ट त्यांनी सांगितली. ती होती एका चिमणीची. एका डोंगरावर वणवा पेटला. आगीमध्ये लहान मोठी सगळी झाडे जळून खाक व्हायला लागली. सगळे पशुपक्षी जीव वाचवण्यासाठी धावाधाव करू लागले. पण या सगळ्या गडबडीत एक चिमणी मात्र त्या वणव्याच्या दिशेने उडत जाताना एका गिधाडाला दिसली. गिधाडाला आश्चर्य वाटलं. सगळे त्या वणव्यापासून दूर जात असतानाही ही चिमणी त्या आगीच्या दिशेने का जात आहे? गिधाडानं बघितलं की आगीच्या जवळ जाऊन पंख फडफडून चिमणी पुन्हा उलटी फिरली. परत थोड्या वेळानं ती चिमणी आगीच्या दिशेने गेली. आणि हीच कृती ती पुन्हा पुन्हा करत राहिली. शेवटी गिधाडाने तिला न राहून विचारलं, ‘हे काय चाललंय तुझं?’ ‘मी तळ्यावर भिजून येऊन या आगीवर माझ्या पंखांवरचं पाणी शिंपडत आहे.’ ‘तुझा जीव तो केवढा आणि इतक्या मोठ्या आगीवर पाण्याचे चार थेंब शिंपडून असं काय होणार आहे?’ चिमणी उत्तरली, ‘या दुर्घटनेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एका छोट्याशा चिमणीने आग विझवण्यासाठी कसा जिवापाड प्रयत्न केला हे लिहिलं जाईल. मला कोणी भ्याड म्हणून हिणवलेलं मी खपवून घेणार नाही. गिधाडाला एकदम धक्काच बसला. तो चिमणीकडे पाहतच राहीला. आणि काही वेळाने चिमणी जेव्हा परत तळ्याकडे उडाली तेव्हा गिधाडही तिच्या मागे उडालं... तळ्यावर आपले पंख भिजवण्यासाठी. शिवराज, ही गोष्ट मी ऐकली आणि माझं मन एकट्याने मणिपूरात राहायला तयार झालं.” गोष्ट ऐकून मीही काही क्षण स्तब्ध झालो.

जयश्रीताई काय किंवा नरेंद्रजी काय बहुधा त्यांना या चिमणीची गोष्ट जयवंतरावांनी सांगितलेली असू शकेल. पण खूप प्रामाणिकपणे ते आपले पंख फडफडवत आहेत. आपण का मागे रहायचे ना मग?

मे महिन्यापासून मणिपूर अशांत आहे. सप्टेंबर उजाडला तरी जनजीवन पूर्वपदावर आल्याच्या बातम्या माध्यमातून वाचायला/ऐकायला मिळाल्या नाहीत. त्यामुळे PSVP च्या शाळांची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. “तुमच्या शाळांची काय खबरबात जयवंतराव”; या माझ्या प्रश्नावर जयवंतरावांचे उत्तर होते, "शिवराज, १५ ऑगस्ट जोरदार साजरा झाला आमच्या तिन्ही शाळांतून..." मोबाईल मधले फोटो दाखवत जयवंतराव वर्णन करू लागले. अजूनही मणिपूरच्या काही भागात स्वातंत्र्य दिन ‘ब्लॅक डे’ म्हणून साजरा होत असताना, गेले काही महिने मणिपूर अशांत असताना स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्याची किमया PSVP च्या शाळांतून होऊ शकली; यातच सारं काही येऊन जातं.
भैय्याजी, त्यांचे मानसपुत्र जयवंतराव आणि  PSVP असंख्य कार्यकर्त्यांना मनःपूर्वक वंदन.

(अधिक माहितीसाठी संपर्क – श्री. जयवंत कोंडविलकर, पूर्व सीमा विकास प्रतिष्टान, कार्यवाह – ९६१९७२०२१२)

शिवराज पिंपुडे

केंद्र प्रशासक

ज्ञान प्रबोधिनी, निगडी

(जडणघडण मासिकातून...)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog