मंतरलेली रात्र...!

 मंतरलेली रात्र...!

गाडीतून अजून उतरलो पण नव्हतो तोच "ए तो बघा तारा पडतोय." एक जण जवळजवळ किंचाळलाच. तो कुठे काय दाखवत आहे हे समजेपर्यंत ती गोष्ट लुप्तही झाली होती. काही सेकंदाचा खेळ केवळ! पण आजची रात्र भन्नाट असणार याची चुणूक मुलांना मिळाली होती. "अरे यार विश धरलीच नाही मनात," प्रथमेशने खंत बोलून दाखवली. 'टुटता तारा' हिंदी चित्रपटातील एक परवलीचा शब्द. त्याला बघून मनात धरलेली इच्छा पूर्ण होते हाही (गैर)समज चित्रपटांनी जनसामान्यात चांगलाच रुजवला आहे.

१३ डिसेंबरची ती रात्र होती. साडेआठच्या सुमारास तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी जवण गावात आम्ही पोहोचलो होतो. आम्ही म्हणजे मी, अमेय, सुप्रियाताई, सूरज आणि शाळेतील सहावी-सातवीतील पंधरा विद्यार्थी. दहा मुलगे आणि पाच मुली. या पंधरा जणांपैकी पैकी दहा जण होमी भाभाच्या दुसऱ्या राउंडसाठी निवडली गेली होती; तर पाच जण राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रकल्प स्पर्धेत जिल्हा पातळीवरील विजेती होती. मुलांना बक्षीस काय द्यायचं हा विचार विभागात सुरू असतानाच मयुरेशदादाचे उल्का वर्षाव निरीक्षणाचे फ्लायर एका गटावर बघायला मिळाले. आकाश दर्शनाची सहल हेच या मुलांचे बक्षीस असं एकदम वाटून गेलं. लागलीच वेगवेगळ्या वर्गातून संबंधित मुलांना एकत्र केलं आणि बक्षिसाची कल्पना मांडली. अजून एकही तारा बघितला नव्हता पण मुलांचे डोळे दिपलेले दिसले.

आमच्या आधीच मयुरेशदादाच्या ‘संशोधन’ संस्थेची टीम गावात पोहोचली होती आणि टेलिस्कोप सेट करण्यात मग्न होती. बाकीचे लोक अजून पोहोचत होते. माझा मागचा अनुभव लक्षात घेऊन मी मुलांना लगेचच टेलिस्कोपच्यामागे रांग करण्यास सांगितले. "टेलिस्कोपला धक्का तर सोडाच हातही लावू नका. सेटिंग करण्यात परत खूप वेळ जातो. केवळ डोळ्यांचेच काम आहे," कडक आवाजात मी सूचना केली. टेलिस्कोप सेट झाला होता. पहिल्या मुलाने टेलिस्कोपला डोळा लावला... "आईशप्पथ सॅटर्नची कडीही स्पष्ट दिसतायेत." त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते. दुसऱ्या मुलाने त्याचा नंबर लावण्याआधीच मी मध्ये घुसलो. शिक्षक असल्याचे काही (बरेच) फायदे असतात. खरोखरच दृश्य विस्मयकारक होतं. आजवर फोटोतून बघितलेला शनी अस्सा समोर दिसत होता. इतका स्पष्ट की जणू त्याचं चित्रच त्या टेलिस्कोपला चिकटवले असावे की काय असे एखाद्याला वाटावे. आमच्या आकाश दर्शनाची सुरुवात ज्योतिषशास्त्राने अशुभ मानलेल्या ग्रहाने झाली होती. पण त्या रात्री त्या क्षणा इतका शुभ क्षण आमच्यासाठी दुसरा नव्हता. थोड्याच वेळात आमच्या मुलांचं शनी दर्शन पूर्ण झालं. तोवर मागे रांग बरीच वाढली होती. सुमारे सव्वाशे ते दीडशे लोक आकाश दर्शन आणि उल्का वर्षावाचा आनंद घेण्यासाठी पोहचली होती.

इकडे मयुरेशदादाच्या टीमने दुसऱ्या टेलिस्कोपवर ज्युपिटर सेट केला होता. यावेळी आमच्या पोरांनी न सांगताच तिकडे पटकन रांग लावली. हेही दृश्य विलक्षण होतं. गुरु ग्रहावरचे दोन बँडही अगदी स्पष्ट दिसले टेलिस्कोपमधून. गुरुला ६३ चंद्र आहेत म्हणे. त्यातील चार चंद्र (डावीकडे तीन त्यांनतर गुरु ग्रह आणि उजवीकडे आणखी एक चंद्र) टेलिस्कोपमधून बघता आले. 

एव्हाना दहा वाजून गेले होते. सर्वांनाच भूक लागली होती. एका झाडाखाली बसून सर्वांनी पोटोबा शांत केला. थंडीचा कडाका जाणवायला लागला होता. मुलांनी स्वेटर, कानटोप्या, शाली अंगावर चढवल्या. आता वेळ झाली होती स्लाईड शोच्या माध्यमातून आकाश जाणून घेण्याची. जवळच असणाऱ्या खंडोबा मंदिरात सगळ्यांनी पथार्‍या टाकल्या. मी मंदिरातील नंदीच्या चौथ्यऱ्याला टेकून बसलो. तेवढाच पाठीला (नंदीचा) आधार म्हटल. मयुरेशदादाने एक स्लाईड दाखवून प्रश्न विचारला, "आकाश आणि अवकाश यातील फरक काय?" कोणीच उत्तरले नाही. "अवकाशाचा जो भाग पृथ्वीवरून दिसतो ते आकाश..." पुढचा तासभर मयुरेश बोलत होता... आम्ही ऐकत होतो. नक्षत्रे, राशी, त्यांना नावे ठेवण्याची पद्धत, एकेका ग्रहाची वैशिष्ट्ये इथपासून टेलिस्कोपचे प्रकार, त्यांचे कार्य, लाईट पोल्युशन असे खूप विषय मयुरेशने उलगडले. व्याख्यान संपेपर्यंत आमच्या तीन पोरांची विकेट पडली होती. बैठ्या स्थितीतून ते हळूहळू शयन स्थितीत पोहचले होते. त्यांना हलवून हलवून उठवावं लागलं. व्याख्यान संपल्यावर मयुरेशने कॉफीचा ब्रेक घेऊ असं सांगितलं. कॉफीचं नाव ऐकूनच ऊब वाटली. तिथेही आम्ही पहिला नंबर लावला. त्या कडाक्याच्या थंडीत कॉफीने दिलेली तरतरी तगवून गेली.

आता वेळ झाली होती खुल्या आकाशात मयुरेशदादाकडून राशी, नक्षत्रे समजून घेण्याची. जवळच असलेल्या मैदानात सगळे एकत्र झालो. मयुरेश बोलू लागला, “आज योग चांगला आहे मंडळी. आकाश निरभ्र आहे आणि अमावस्याही आहे. छान आकाश पाहता येईल आज” असं म्हणून त्याने लेझरचा झोत ध्रुव ताऱ्यावर टाकला. तो इतका प्रखर होता की जणू ध्रुव तार्‍याला स्पर्श करत होता. मयुरेश पुढे काही बोलणार इतक्यात एक उल्का चमकून गेली. सगळ्यांचे लक्ष आकाशात असल्याने एकाच वेळी सगळ्यांना ती दिसली. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्या रात्री दिसलेल्या पहिल्या उल्केचं स्वागत केलं.

शर्मिष्ठा व सप्तर्षी वरून ध्रुवतारा कसा ओळखायचा याचं प्रात्यक्षिक दादाने दाखवलं. मग एकेक constellation दाखवण्यास सुरुवात केली. पाश्चात्त्य पद्धतीत काय म्हणतात, भारतीय पद्धतीनुसार काय नावे व आकार आहेत असं सगळं सांगणं, दाखवणं सुरु झालं. जसं की ययातीमध्ये जास्वंदीचं फूल दाखवलं. सारथीमध्ये मेंढपाळ कसा इमॅजिन केलाय ते दाखवलं. खांद्यावरती काठी घेतलेला, सोबत कोकरू असलेला मेंढपाळ! पाश्चात्त्य पद्धतीनुसार ओरायन म्हणजे बैलाला रोखणारा योद्धा; आपल्या पद्धतीनुसार मृग नक्षत्र!! हरणाला व्याधाने मारलेला बाण – त्या योध्या मध्येच हरीण, बाण, व्याध सगळं दाखवलं. मयुरेश जे जे दाखवत होता ते ते आम्हाला दिसत होतं. मग मयुरेशने स्वर्गाचं दार दाखवलं. एका बाजूला दोन तारे दुसऱ्या बाजूला दोन तारे मध्ये मोकळा भाग. या भागातून सगळे ग्रह प्रवास करतात म्हणून स्वर्गाचे दार! हे सत्रही तासभर चाललं. मयुरेशने आकाश जणू बोलतं केलं होतं.

आता त्या रात्रीतील सर्वात उत्कंठावर्धक प्रहराची वेळ झाली होती. मध्यरात्री दोन ते चारमध्ये उल्का मोठ्या प्रमाणावर दिसणार होत्या. "आपापल्या पथार्‍या पसरा लोकहो आणि आडवे होऊन आकाशाकडे बघत रहा,” इति मयुरेशदादा. त्यातल्या त्यात सपाटीच्या जागा बघून मंडळी जमिनीवर आडवी झाली. मिट्ट काळोखात गच्च भरलेल्या आकाशाचे निरीक्षण करण्याचा तास सुरू झाला होता. आमच्या पोरांनीही जागा निवडून अंगावर पांघरूनं घेतली. पण... तितक्यात एक दादा आला. "तुम्ही ज्ञान प्रबोधिनीतून आला आहात ना?" त्यानं विचारलं. हो म्हणताच “हे कागद तुम्हाला भरायला दिले आहेत.” असे म्हणून कागदांचा एक गठ्ठा माझ्याकडे सोपवला. "उठा रे. इतक्यात आडव होणं तुमच्या नशिबात नाहीये. अभ्यास सहल आहे आपली. पॅड, पेन्सिल बाहेर काढा." जरा कुरकुरतच मुलांनी सूचनांचे पालन केले. एका कागदावर गोल काढलेले होते. त्यात टेलिस्कोप व्ह्यू काढायचा होता म्हणजे टेलिस्कोपमधून ज्या गोष्टी जशा बघितल्या तसे चित्र काढायचे होते. टॉर्चच्या प्रकाशात मुलांनी काम करायला सुरुवात केली. कोणी शनी तर कुणी गुरु काढला. काहींनी कृतिका नक्षत्रही बघितलं होतं; त्याचं चित्र काढलं. दुसऱ्या पानावर आत्ता मयुरेशने जी जी constellation दाखवली होती त्यातील कोणतीही दोन constellation काढायची होती. चित्रे काढताना स्वाती अडखळली तर रिया म्हणाली, “अग वर आकाशात बघ की इतका का ताण देत आहेस डोक्याला.” वर आकाशात बघायचं आणि खाली चित्र काढायचं. किती मजा ना!


तोवर आमच्या चहू बाजूंनी आवाज सुरू झाले होते. ‘ए ते बघ तिकडे!’ ‘अरे काय ब्राईट होती रे ही उल्का!!’ "दादा आमचं काम झालं आहे. आता होऊ का आडवे?” पोरांनी जरा नाराजीनंच विचारलं. “होय होय व्हा आता मस्त आडवे.” माझं वाक्य हवेत वीरत नाही तोवर तो दादा पुन्हा आला. यावेळी वेगळे कागद होते त्याच्या हातात. टॉर्चच्या प्रकाशात पोरांच्या कपाळावरील आठ्या स्पष्ट दिसल्या मला. “चला आता दोघादोघांचे गट करा आणि उल्का दिसल्यावर यात नोंद करा. मगाशी दादांनी त्यांचे दोन प्रकार सांगितले तर त्यातल्या कुठल्या प्रकारची दिसली आणि कोणत्या वेळी दिसली? याच्या नोंदी करा.” हे काम आवडीचं काम होतं मुलांना. पटकन दोघात एक कागद घेतला गेला आणि निरीक्षण करत नोंदीना सुरुवात झाली. उल्का दिसण्याचे प्रमाण खरोखरच वाढलं होतं. मुलं आता भलतीच उत्साहात आली होती. मयुरेशदादाने विशद केलेल्या प्रकारानुसार उल्का दिसतात मुलं shower किंवा sporadic अशी ओरडायला लागली होती. हा गलका मोठ्यांच्या दृष्टीने कौतुकाचा तर आलेल्या युवकांच्या दृष्टीने चेष्टेचा झाला होता. पण आम्हाला त्याची फिकीर नव्हती. आमच्या पोरांमध्ये दोन-तीन गट तट झाले होते. एका गटाचे नोंदीचे पहिले पान लवकर भरले त्यावर दुसऱ्या गटाने, "या फेक्यांचा कागद भरला रे," अशी प्रतिक्रिया दिली. हसून पुरेवाट झाली आमची. किमान दोघांना उल्का दिसली तरच नोंदवायची असा एक नियम मुलांनीच तयार केला. तरीही पहिल्या तासात सुमारे ४०-४५ उल्कांची वेळेनुसार नोंद केली मुलांनी. केवळ अविस्मरणीय अनुभव होता!


 



 

इकडे मुलं उल्का वर्षावाच्या नोंदी करत होती पण मला मात्र थंडी सहन होत नव्हती. आणखी दोघे थंडीने कुडकुडत होते. त्यांना म्हटलं चला जरा पळून येऊ. मग कोण काय म्हणेल याची पर्वा न करता पाच-सात मिनिटे मस्त धावलो त्या मोकळ्या मैदानावर. लागलीच अंगात उब आली. आमची अवस्था बघून की काय पण परत एकदा गॅस पेटवण्यात आला आणि हुश्श वाटलं. “आपण तिघेच कॉफी घेऊ आधी मग बाकीच्यांना बोलवा,” मी त्या दोघांना सुचवले. कॉफी पिताना दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. त्यातला स्वराज म्हणाला, “आजपर्यंत मी फक्त दीड पर्यंत जागलो होतो. पूर्ण रात्र जागण्याचा हा माझा पहिलाच अनुभव!” “मी घरी जागलोय पण असं बाहेर पहिल्यांदाच जागत आहे,” ओम म्हणाला. पूर्ण रात्र जागणे, कडाक्याची थंडी सहन करणे, उघड्या मैदानावर खुल्या आकाशाखाली सहज आडवं होता येणे हेही अनुभव अभ्यासक्रमात असले पाहिजेत की? सुप्रियाताईंनी (मयुरेशदादाची बायको) सर्वाना कॉफी दिली. थोड्या निवांत दिसल्या. मग त्यांच्याशी गप्पा मारायला गेलो. 'मयुरेशचा काही परिचय आहे मला; तुम्ही थोडा सविस्तर सांगा म्हणालो.' खूपच भरभरून बोलल्या सुप्रियाताई. त्यातून मला मयुरेशची झालेली ओळख म्हणजे-

*गेली १६ वर्षे अनेक वृत्तपत्रातून लेखन करणारा विज्ञान पत्रकार 
*खगोलशास्त्रअवकाशशास्त्रहवामानशास्त्र या विषयांचा तसेच भारताच्या चांद्रयान एकदोन तसेच मंगळयान या मोहिमेचा सविस्तर अभ्यासक 
*खगोल विश्व या संस्थेच्या माध्यमातून गेली २५ वर्षे आकाश निरीक्षण आणि खगोलशास्त्राचा शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये प्रसार करणारा खगोलप्रेमी  
*मान्सूनच्या सर्वांकष अभ्यासासाठी प्रोजेक्ट या प्रकल्पांतर्गत २०११ पासून भारतातील विविध भौगोलिक प्रदेश आणि मानसून यातील परस्पर संबंधांवर संशोधन करणारा संशोधक... फारच भारी वाटलं.

पहाटेचे साडेचार वाजले होते. दोन तास अनेक टुटते तारे बघून झाले होते. थोडी झोप आता सगळ्यांच्याच डोळ्यांवर होती. तेवढ्यात मयुरेशदादा त्याच उत्साहात प्रकटला. लेझरच्या साह्याने परत एकदा त्याने पहाटेचे आकाश दाखवायला सुरुवात केली. काही गोष्टी नव्याने उगवल्या होत्या काही अस्ताला चालल्या होत्या. स्वाती, चित्रा, हस्त नक्षत्र दाखवलं. कर्क, सिंह रास दाखवली. तोपर्यंत इकडे टेलिस्कोपवर शुक्र सेट करून ठेवण्यात आला होता. अत्यंत तेजस्वी असा ग्रह टेलिस्कोपमधून निळसर लालसर प्रकाशाचा जाणवला. शुक्र दर्शनाने आकाश दर्शनाची इतिश्री करण्यात आली. मयुरेशचे आभार मानून परतीचा प्रवास सुरु केला. गाडीत बसताच पोरे एकमेकांच्या अंगावर आडवी झाली.

माझ्या मनात मयुरेशचे एक वाक्य वाजत होते. आपल्या आकाशगंगेत दोनशे अब्ज तारे आहेत म्हणे. आपल्या सूर्यापेक्षा शेकडोपट मोठे असेही तारे आहेत. किती लहान आहोत ना आपण...

 

शिवराज पिंपुडे

केंद्र प्रशासक
ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र

 


 

Comments

  1. जबरदस्त अनुभव शब्द मांडणी अप्रतिम

    ReplyDelete
  2. दादा तुमच्यामुळे मंतरलेली रात्र आम्ही तुमच्या शब्दातून अनुभवली धन्यवाद दादा🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog