दर्शन... वारसा स्थळांचं!
वेळ सकाळी आठची. ठिकाण पुण्यातील काँग्रेस भवन. निमित्त होतं हेरिटेज
वॉकचं. वारसा स्थळांचं दर्शन घेण्याचं. इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे
सर तळमळीनं मुलांशी बोलत होते, "मुलांनो १९४२ मध्ये महात्मा गांधीनी इंग्रजांविरुद्ध’ 'चले जाव'ची चळवळ सुरु केली आणि भारतीयांना
मंत्र दिला 'करेंगे या
मरेंगे'चा! ‘आता स्वातंत्र्य मिळेपर्यंत माघार
घ्यायची नाही,’ असं गांधीजीनी निक्षून सांगितलं. इंग्रजांनी स्वातंत्र्य लढ्यातील
प्रमुख नेत्यांची लगेच धरपकडक सुरु केली. 'नेते तुरुंगात गेले म्हणून काय झाले
आम्ही लढणार,' असं
भारतीयांनी ठरवलं. सोळा वर्षांचा एक मुलगा नारायण दाभाडे. कसबा पेठेत राहणारा.
महात्मा गांधींविषयी प्रचंड आदर बाळगणारा. आपणही काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं
आपल्या मित्रांना जमवून काँग्रेस भवानाकडे त्यानं एके दिवशी कूच केली. त्याच्या
हातात तिरंगा झेंडा होता. त्यावेळेसचा तिरंगा झेंडा; ज्यात मध्यभागी अशोक चक्र ऐवजी चरखा
होता. हे काँग्रेस भवन इंग्रजांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावर त्यांचा झेंडा
युनियन जॅक फडकत होता. इंग्रजांनी मुलांना हटकलं. माघारी जाण्यास सांगितलं. पण
मुलं घाबरली नाही. ही बाचाबाची सुरू असतानाच पोलिसांचं कडं भेदून नारायण ध्वजाच्या
दिशेनं निघाला. इंग्रजांनी लगेच गोळीबार सुरू केला. गोळी त्याच्या पायाला लागली; पण जखमी अवस्थेतही तो पुढे जात राहिला.
युनियन जॅक काढून त्या जागी आपला तिरंगा झेंडा नारायणने फडकवला. इंग्रजांनी चारी बाजूंनी
निर्दयपणे त्याच्यावर गोळीबार केला. त्याच्या शरीराची अक्षरश: चाळण केली. मुलांनो
आपल्याला अभिमान असला पाहिजे की १९४२ च्या लढ्यातील पहिली आहुती आपल्या पुण्यातील
नारायण दाभाडेची होती.”
मुलं भारावून जाऊन ऐकत होती. शेटे सरांचं बोलणं झाल्यावर काही क्षण स्तब्धता
होती. मग कुणीतरी भानावर येऊन घोषणा दिल्या. वंदे मातरम, भारत माता की जय. समाधान दादांनी सोबत
काही हार आणले होते. त्यातील एक हार दोन विद्यार्थी प्रतिनिधींनी नारायण दाभाडे
यांच्या पुतळ्याला घातला. परत एकदा जोरदार घोषणा झाल्या. आणि त्याच भारावलेल्या
अवस्थेत सगळ्यांनी शनिवार वाड्याच्या दिशेनं कूच केली.
पुढच्या अडीच तीन तासात पुण्यातील बरीच गल्लीबोळं पालथी घातली आम्ही. कधी
चालत तर कधी बसने. खूप गोष्टी दाखवल्या शेटे सरांनी...
१८१८
मध्ये ज्या वाड्यावरील आपला झेंडा काढून इंग्रजांनी त्यांचा युनियन जॅक फडकवला आणि
खऱ्या अर्थानं आपण पारतंत्र्यात गेलो तो शनिवार वाडा...
पुण्यात
पहिला सार्वजनिक गणपती जिथे बसला तो भाऊसाहेब रंगारी वाडा...
इंग्रजांच्या
छळवणुकीमुळे आपल्याकडून गद्दारी होऊ नये म्हणून आत्मार्पण करणाऱ्या भास्कर कर्णिक
यांचे हुतात्मा चौकातील स्मारक...
आद्य क्रांतिकारक
उमाजी नाईक यांना फाशी दिल्यानंतर त्यांचा देह ज्या झाडावर ३ दिवस लटकवण्यात आला
होता; ते
पिंपळाचे झाड...
आद्य
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके राहत होते ते नृसिंहाचे मंदिर...
अनेक
क्रांतिकारकांचे आश्रयस्थान असणारे केसकर विठ्ठल मंदिर...
भगतसिंग, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांची भेट
ज्या मंदिरात झाली ते मुरलीधराचे मंदिर...
खूप ठिकाणांना भेटी झाल्या. भाऊसाहेब रंगारी वाड्याची रचना मुलांना विशेष
भावली. वाड्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मार्गावरून जाणाऱ्या क्रांतिकारकांचा
पाठलाग पोलीस करत असतील तर क्रांतिकारकांना चटकन वाड्यात येता यावं म्हणून वाड्याचं
दार बाहेरूनही उघडता येण्याची सोय होती. शेटे सरांनी दरवाजा उघडण्याची युक्ती केवळ
‘सांगितली’ होती, ‘दाखवली’ नव्हती. त्यामुळे शेटे सर मुलांच्या एका गटाला घेऊन
वाड्याच्या वरच्या मजल्यावर गेल्या गेल्या दारापाशी असणाऱ्या गटांनं दरवाजावर
प्रयोग सुरू केले. एकाला क्रांतिकारक करून वाड्याबाहेर काढलं. दार आतून लावून
घेतलं. त्याला दार बाहेरून उघडायला सांगितलं. थोड्याशा खटपटीनंतर त्याला दार
उघडायला जमलं. मोठं क्रांतिकार्य केल्याच्या आविर्भावात बाहेरील मुलगा आत आला. मग
प्रत्येकानंच क्रांतिकारकाची भूमिका निभावून दरवाजा उघडून बघितला.
अजून एक गंमत बघायला मिळाली. ती म्हणजे स्वा. सावरकर पुण्यात असताना ज्या
सलूनमध्ये केस कापायला जायचे ते दुकान अजूनही आहे. दुकानाच्या मालकानं केलेल्या
विनंतीनुसार सावरकरांनी त्यांना लिहून दिलेला अभिप्राय फ्रेम करून ठेवण्यात आला
आहे. त्यात सावरकरांनी मराठी भाषेच्या शब्दसंपत्तीत टाकलेली भर वाचायला मिळते...
केशकर्तनालय!
काही वास्तू आणि वस्तू बघितल्या नाहीत; पण त्यांच्याविषयी भरभरून ऐकले. जणू
पुढीलवेळी पुण्यात आल्यावर काय बघायचं असंच शेटे सर आम्हाला सुचवू पाहत होते. जसं
की...
रंगो
गुप्ते यांना इंग्रजांनी भेट म्हणून दिलेलं तबक... जे केळकर संग्रहालयात ठेवल आहे.
भगतसिंग
यांचा मूळ फोटो... जो नू. म. वि.च्या ग्रंथालयात ठेवण्यात आला आहे.
अभ्यंकर
वाडा... ज्या वाड्यातून गुप्त रेडिओ केंद्र चालवलं जात होतं.
गणेशखिंड...
ज्या ठिकाणी चापेकर बंधूंनी रँडचा वध केला.
या प्रत्येक गोष्टीची एक स्वतंत्र कथा आहे पण ती ऐकण्यासाठी तुम्हाला
प्रत्यक्ष हेरिटेज वॉकच करायला लागेल.
शेटे सरांना धन्यवाद देताना मुलांनाही भावना व्यक्त करण्यास सुचवले. हर्षदा
म्हणाली, "सर तुम्ही
बोलत असताना जणू त्या त्या ठिकाणी तो तो इतिहास घडत आहे असं वाटत होतं..."
अगदीच प्रातिनिधिक होती ही भावना.
गाडीत इतिहासाचे अध्यापक प्रमोद सर शेजारी बसले होते. "प्रमोद सर तुम्ही
कधी होणार आपल्या शाळेचे मोहन शेटे सर?" मी विचारलं. "दोन-तीन वेळा शेटे
सरांसोबत हा हेरिटेज वॉक मी अनुभवला आहे. आता पुढच्या वेळेस मीच घेऊन येईल आपल्या
मुलांना." प्रमोद सरांनी त्यांचा संकल्प बोलून दाखवा. "भले
शाब्बास!" म्हटल.
मोहन शेटे सर न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे २८ वर्ष अध्यापक म्हणून कार्यरत होते. इतिहासाचे
प्रचंड वेड असणारा हा एक अभ्यासू कार्यकर्ता. इतिहास प्रेमी मंडळाचे संस्थापक
अध्यक्ष. मंडळातर्फे दरवर्षी एका गाजलेल्या इतिहासकालीन लढाईचा मोठा देखावा उभा
करून दृकश्राव्य पद्धतीने शेकडो जणांना दाखवला जातो. क्रांतीसूर्य सावरकर
महानाट्याचे लेखक व दिग्दर्शक. शिवराय, पेशवे, क्रांतिकारक अशा विविध विषयांवर
शेकडो व्याख्यानं. आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित. फेब्रुवारी २०२४ मध्ये सर निवृत्त झाले. तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी पालखीतून त्यांना
सभास्थानी पोचवले. माजी विद्यार्थ्यांच्या या प्रेमापेक्षा एका शिक्षकाला आणखी ते
काय हवे असते...
.....................................................
आर्किटेक्ट बिल्वाताई सोबत प्राचार्य कक्षाच्या नूतनीकरणाची चर्चा सुरू
होती. शाळेचीच माजी विद्यार्थीनी असल्याने कामाचा विषय झाल्यावर निवांत गप्पा सुरू
झाल्या. नुकत्याच झालेल्या पुण्याच्या हेरिटेज वॉकविषयी तिला सांगितलं. त्यावर
तिची प्रतिक्रिया होती...
"बराच दूरवर काढला की हेरिटेज वॉक." "म्हणजे?" मला काहीच अर्थबोध झाला नव्हता. “अरे वीस किलोमीटरवर घेऊन गेलास तू मुलांना." "मग?" "दोन किलोमीटर वरचे चिंचवड गाव दाखवलेस का?" "चापेकर वाडा आणि मोरया गोसावी मंदिर सोडून आणखी काही आहे का चिंचवडमध्ये?" "बरंच काही. तू वेळ काढ; तुला चिंचवडचा हेरिटेज वॉक घडण्याची जबाबदारी माझी."
बिल्वाताईच्या या आश्वासनानंतर दोनच दिवसांनी आम्ही चिंचवडमध्ये भेटलो
होतो. आम्ही म्हणजे शाळेतील सर्व इतिहास अध्यापक आणि बिल्वाताई.
गणेश भक्त
मोरया गोसावी यांचं मंदिर... त्यांनी घेतलेल्या संजीवन समाधीचा इतिहास...
त्यांच्या सात पिढ्यातील वंशजांची मंदिरं...
आलमगीर शाही
मशीद... जिला शेकडो वर्षांपासून इस्लामी राजवटीकडून दर वर्षाला इनाम येत असे.
शिवाजीराजांच्या काळातही ते चालू ठेवलेलं होतं...
टांकसाळ... सध्या त्या जागी फरसाणचं दुकान झालं आहे. एके काळचे तिथले चलन म्हणजे अंकुशी रुपया...
महादेवाचं
प्राचीन मंदिर... साधारण सोळाव्या शतकातील... मंदिरातील दोन शिलालेख मंदिराच्या
प्राचीनत्त्वाची साक्ष देतात.
चिंचवडचं
ग्रामदैवत असणारं दक्षिणमुखी काळभैरवनाथाचं मंदिर...
चिंचवडच्या
पाटीलकीचा निवाडा छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या जागेवरून दिला ते मारुतीचं
मंदिर... (निवाड्याचे २२ फुटी अस्सल मजहर इतिहासाचे अभ्यासक ब. हि. चिंचवडे
यांच्याकडे बघायला मिळते.)
हेरिटेज
वॉकचा शेवट चापेकर वाड्यात झाला. जुन्या वास्तुशैलीचा एक नमुना असणारा वाडा आणि
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी तिघा बंधूना फाशी झालेल्या एकमेव घटनेचा साक्षीदार
असणारा हा वाडा....
खरंच बरंच काही आहे तर चिंचवडमध्येही. नवीनच होता हा अनुभव आम्हा सर्वांना.
“पण तुला कशी ग इतकी माहिती?” “अरे मी चिंचवड मधीलच. मोरया गोसावी यांच्या देव घराण्यातील.” “काय म्हणतेस? त्यांची वंशज आहेस तू त्यांची???”
आम्ही सगळेच अवाक!
त्याच दिवशी आम्ही शिक्षकानी ठरवलं इयत्ता सातवीला चिंचवडचा हेरिटेज वॉक घडवून आणायचा आणि इयत्ता आठवीच्या
विद्यार्थ्यांना पुण्याला घेऊन जायचं. कारण त्यांना ‘आधुनिक भारताचा इतिहास’ आहे.
त्यांच्या अभ्यासक्रमात असणाऱ्या अनेक घटनांचा, व्यक्तींचा संदर्भ त्यांना
पुण्याच्या हेरिटेज वॉकमध्ये लागू शकेल.
चिंचवडमधून निघताना बिल्वाताईने निवडक स्थळांची माहिती देणारे पत्रक आमच्या
हातात ठेवले. पत्रक बघून प्रमोद सरांना कल्पना सुचली, “दादा मुलांचा हेरीटेज वॉक
झाल्यावर त्यांच्याकडून असे पत्रक बनवून घेऊ आपण.” ‘गृहपाठा’ची ही कल्पना छान
वाटली मला.
.....................................
एके दिवशी चिंचवडवरून पुण्याला निघालो होतो. सोबत युवक कार्यकर्ता श्रीराम
इनामदार होता. त्यावेळी खडकीजवळ मेट्रोचं काम सुरु असल्यानं बाह्यवळण घेऊन
पुण्याला जावं लागत होतं. बाह्यवळण घेतल्यावर एक दफनभूमी लागली.
“दादा या जागेचं वैशिष्ट्य माहित आहे का तुला?” “नाही बाबा.” “अरे ही वॉर सिमिट्री आहे दादा. दुसऱ्या महायुद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कबरी इथे आहेत. १५०० च्या आसपास संख्या असेल. आजही एखादा ब्रिटीश अधिकारी भारताच्या दौऱ्यावर येतो तेव्हा इथे आवर्जून भेट देतो म्हणे.”
आज
पुण्याला जायच्या मार्गात बदल झाला म्हणून हे ठिकाण समजलं मला.
थोडक्यात काय कुठेही प्रवास करताना,
नेहमीच्याच ठिकाणी मार्ग बदलून जाताना हेरीटेज वॉकचा अँटीना तयारच ठेवला पाहिजे
मंडळी!
शिवराज पिंपुडे
निरीक्षण सूची
हेरिटेज वॉक
१ वारसा
स्थळाचा प्रकार - घर/ वाडा/ इमारत/ मंदिर/ चौक/ रस्ता
२ वारसा
स्थळाचे नाव
३ वारसा
स्थळाचे वर्णन
४ वारसा
स्थळाशी संबंधित इतिहासकालीन व्यक्ती
५
वारसास्थळी घडलेला इतिहास
६ सध्या
वारसा स्थळाचा वापर कशासाठी होतो?
Comments
Post a Comment