किनारा...

दिवस पहिला

पाणी एकदम संथ होतं. हवेत छान गारवा होता. त्या भाट्याच्या खाडीत आमची सोडून दुसऱ्या कुण्णाची होडी आमच्या नजरेत तरी नव्हती. आमची होडी नव्हती; सांगड होती. त्यामुळे शरीराला कुठेही हेलकावे नव्हते आणि म्हणूनच की काय मन आजूबाजूच्या दृश्यावर स्थिर झालं होतं. दोन्ही बाजूंनी झाडांची दाटी, त्या हिरव्या रंगांच्या विविध छटा, पाण्यात उतरलेली ती हिरवाई, आकाशात नानाविध पक्ष्यांची निवासस्थानाकडे जायची सुरु असलेली लगबग, मधूनच पाण्यातून उड्या मारणारे मासे... एका अत्यंत विलोभनीय अशा दृश्याचे साक्षीदार झालो होतो आम्ही.

"आधी आपण या जुवे गावात उतरू. इथे एक वेगळी गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल." सुरेंद्रदादाच्या आवाजाने सगळेच भानावर आले.

"जुवे शब्दाचा अर्थ होतो बेट. हे बेटच आहे; खाडीतील बेट! कोकणातल्या प्रत्येक खाडीत जुवे नावाचं गाव आहे. पूर्वी घरातून बाहेर पडलं की आधी होडीत बसल्यावर मगच कुठल्यातरी जमिनीला लागता येत होतं. आता मात्र बांध घातले आहेत; रस्ते झाले आहेत." सुरेंद्रदादा माहिती सांगत होता.

सांगड किनाऱ्याला लागली होती. काठीच्या सहाय्यानं सांगड पार्क करणं हेही मोठ्या कौशल्याचं काम आहे हे लक्षात आलं आमच्या. गावात उतरल्यानंतर शिपल्यांचे ढीगच्या ढीग बघायला मिळाले. या सांगड फेरीचे संयोजक कौस्तुभ लिमये यांनी एका गोलाकार खड्ड्यापाशी आम्हाला नेलं आणि त्यांनी माहिती देण्यास सुरुवात केली.

हा खड्डा म्हणजे चुन्याची भट्टी आहे मुलींनो. यात लाकूड, शिंपले यांचे एकावर एक थर रचले जातात. मग आग पेटवली जाते. त्या आगीत दोन दिवस शिंपले चांगले भाजले जातात. शिंपले गार झाले की ते बाहेर काढून कुटतात. त्यांची राखाडी रंगाची पावडर तयार होते. मग त्यावर गार पाणी टाकलं जातं. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन हा पांढरा चुना तयार होतो. तो चाळून विकण्यासाठी पोत्यात भरला जातो.

"हा खायला वापरतात का?" काव्याचा प्रश्न.

"नाही नाही. हा खूप तेज असतो." सुरेंद्रदादाचे उत्तर.

"तेज?" शुभ्राचा प्रश्न.

"यांनं खूप चुरचुरतं जिभेला. त्यामुळे दर्दी लोकच हा खायला वापरतात. राजापूर सारख्या ठिकाणी लोण्याच्या गोळ्यासारखा हा चुन्याचा गोळा घेऊन लोक विकायला बसतात. आणि वडाच्या पानावरच तो विकतात." 

"मग आत्ता कशासाठी वापरला जातो हा?" समृद्धीचा प्रश्न.

"पूर्वीच्या काळी हा चुना घर, किल्ले बांधकामात वापरला जायचा. हे एक प्रकारचं लोकल सिमेंटच आहे. सध्या याचा उपयोग दोन कारणांसाठी केला जातो. जे शिंपलेधारी किंवा कवचधारी प्राणी आहेत त्यांना कॅल्शियम खूप लागतं. त्यामुळे कोळंबीच्या शेतीसाठी हा वापरला जातो. कोळंबीच्या पिल्लांना वाढण्यासाठी याचा उपयोग होतो. दुसरा उपयोग म्हणजे कोकणातील जमीन आम्लधर्मी आहे. तिचा पीएच कमी आहे. त्यामुळे ती लागवडी योग्य करण्यासाठी जमीन नांगरून हा चुना त्यात मिसळला जातो. रीडक्शन रिएक्शन होऊन पीएच वर जातो आणि जमीन लागवड योग्य होते..."

माहिती खूप झाली. एक बोट घाला त्या ढिगात आणि बोटाला लागलेला चुना चाखून बघा. सुरेंद्रदादानं आदेशच काढला.

हो-नाही करत मुलींनी थोडा चुना चाखला.

मिनिटभरानं " मला चुरचुरत आहे.

माझं तर जीभेचं सेन्सेशनच गेल्यासारखं वाटतंय," असे प्रतिसाद सुरू झाले मुलींचे.

"होईल, थोड्या वेळाने ठीक होईल." सुरेंद्रदादानं आश्वस्त केलं.

परत एकदा सांगडमध्ये बसून प्रवास सुरू झाला. परत एकदा त्या विलोभनीय दृश्याची मोहिनी सर्वांवर पडली. थोड्यावेळानं चिंचखरी गावात उतरलो आम्ही. थोडं चालत गेल्यावर एके ठिकाणी थांबून सुरेंद्रदादानं माहिती द्यायला सुरुवात केली.

"मुलींनो ही भाट्याची खाडी. जे गाव खाडीच्या मुखाशी असतं त्या गावावरून खाडी ओळखली जाते. या खाडीच्या मुखाशी भाटे नावाचा गाव; म्हणून ही भाट्येची खाडी. ही जी नदी वाहतीये तिचं नाव काजळी. छोटी आहे नदी. सुमारे ६० किलोमीटरची.

खाडीच्या आजूबाजूला जी झाडं दिसत आहेत त्यांना खारफुटी असं म्हटलं जातं. खाऱ्या पाण्यात फुटतात म्हणून खारफुटी. क्षारप्रेमी अशी ही झाडं असतात. खाडीच्या काठावर गाळ येऊन साठत जातो. त्यात ही झाडं, वनस्पती वाढतात. भरतीमध्ये इथे साधारण सात फूट पाणी वर चढतं. ओहोटीला खाली उतरतं. त्यामुळे या झाडांमध्ये बुडली तरी जगण्याची क्षमता असावी लागते. त्यासाठी यांच्या मुळांची विशिष्ट प्रकारची रचना झालेली असते. हा पाण्याच्या वर आलेला झाडांचा जो भाग दिसतोय ती मूळं आहेत. 

मूळं? दोघीतिघींनी एकत्रितच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

जेव्हा पाणी भरतं तेव्हा या झाडांच्या मुळांना हवा मिळत नाही; तेव्हा ही पाण्यावरची श्वसनमुळं उपयोगी पडतात. आता तिकडच्या बाजूला बघा. तिथे तुम्हाला पारंब्यासारखी रचना दिसतिये ना; ती आधारमुळं. झाडाला चिखलात उभ राहायला ती मदत करतात.”

सुरेंद्रदादा एका मागे एक धक्के देत होता.

 

मुलींनो अजून एक विशेष म्हणजे सगळी मासेमारी या खारफुटीच्या जगण्यावर अवलंबून आहे.” 

म्हणजे?माझा प्रश्न.

पावसाळ्यात सगळे मासे अंडी घालायला खारफुटीच्या किनारी येतात. पाऊस संपला की मासे आणि त्यांची पिल्लं समुद्रात जातात. खारफुटी वनस्पती संपल्या तर माशांची अंडी घालण्याची जागाच नष्ट होईल. त्यामुळेच शासनानं खारफुटीची जंगलं अतिसंरक्षित म्हणून घोषित केली आहेत.

ही ढेकळं कसली इतकी?” मुलींसोबत आलेल्या अध्यापिका राजश्रीताई मराठे यांनी विचारलं.

इथल्या जमिनीत खेकडे, साप यासारखे असंख्य बिळात राहणारे प्राणी आहेत. बिळे करताना त्यांनी ही वर टाकलेली माती आहे. अजून एक गंमत सांगतो तुम्हाला; जेव्हा पूर येतो तेव्हा इथं खूप पाणी भरतं. त्यामुळे बिळातले सगळे प्राणी या झाडांचा आसरा घेतात. असं खेकड्यांनी गच्च भरलेलं झाड मी पाहिलंय.”

सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव फोटोत टिपण्यासारखे झाले होते.

थोडं पुढे गेल्यावर सुरेंद्रदादानं एक वनस्पती दाखवली. नाव सांगितलंमिसवाक.

म्हणजे टूथपेस्ट करण्यासाठी हिचा वापर करतात का?” पाची मुलींचा आश्रर्यचकित स्वरातील प्रतिसाद.

होय हीच ती वनस्पती.”

दादा या खारफुटी वनस्पतींना खालून एका विशिष्ट उंचीवरच पानं फुटली आहेत ना?” समृद्धीनं निरीक्षण नोंदवलं.

खूपच छान आहे तुझं निरीक्षण. भरतीच्या वेळीही पाणी या सर्वात खालच्या पानांच्या पातळी पर्यंतच असतं. म्हणजे हा खालचा पर्णसांभार खाडीतील सर्वोच्च पाण्याची पातळी दर्शवतो.”

    काही वनस्पतींना शेंगा लागल्या होत्या. मग खारफुटी जंगलातील काही वनस्पतींच्या फळातील बिया कशा झाडावरच अंकुरतात आणि झाडावर तयार झालेलं ते रोप खाली पडून कसं रुजतं याचीही सुरस कथा ऐकायला मिळाली.

किती गुपितं असतात ना निसर्गाची! उलगडेल त्याला उलगडली; बाकीच्यांसाठी केवळ एक देखावा. इथली वेळ संपली होती. सगळे जण परत एकदा सांगडमध्ये बसलो. परतीच्या या प्रवासात अंधारून आलं होतं. आकाश चांदण्यांनी भरायला सुरुवात झाली होती. केवळ विलक्षण होता हा अनुभव. संथ पाण्यावर पुढे जाणारी सांगड, वर चमचमणारं आकाश आणि खाली अथांग पाणी.

जरा मुखाशी जाता येईल का हो?सुरेंद्रदादांनं नावाड्याला विचारलं.

भरती सुरू झालीये. पण जास्तीत जास्त जवळ जायचा प्रयत्न करू.” नावाडी जरा नाखुशीनंच उत्तरला.

प्रवास सुरू झाला होता; मुखाशी जाण्याचा. जसजशी होडी पुढे चालली होती तसतसा तिचा स्थिरपणा जात चालला होता. संथ पाणी हळूहळू डचमळायला सुरुवात झाली होती. होडीचे हेलकावे वाढत होते. पोटाशी थोडी भीती दाटून आली होती. हेलकावे आणखी वाढल्याचे लक्षात येताच नावाड्यानं सांगड मागे फिरवली. अजून थोडासा प्रवास केला असता तर खाडीतून समुद्रात जाण्याचा अनुभव घेता आला असता. पण पुढील भेटीसाठी काही राखून ठेवलंच पाहिजे की.

 

दिवस दुसरा

रत्नदुर्ग किल्ल्यावर जायच्या वाटेवर अलीकडंच काही अंतरावर थांबून सुरेंद्रदादाकडून माहिती घेणं सुरू होतं. किनाऱ्यावर सपाट झालेला खडक दिसत होता. बराच मोठा होता तो. त्यावर कड्यावरून आलेले गोटे पडले होते.

"मुलींनो तुम्ही पाठ्यपुस्तकात शिकलेला हाच तो तरंग घर्षित मंच. तरंग म्हणजे लाटा; घर्षित म्हणजे घासलेला. हे गोटे लाटांमध्ये सापडले की मागेपुढे होतात. त्यामुळे खालच्या दगडाला ते गुळगुळीत करतात आणि स्वतःही झिजतात. यातूनच तो घर्षित शब्द आला. लाटांची ताकद किती, खडक किती मऊ यावर मंचाची लांबी ठरते. आता हा मंच आणि तो समुद्र कडा जिथे जुळतोय तिथे खाच दिसतीये बघा. येणाऱ्या लाटा तिथे धडकतायेत आणि त्यामुळे तिथला खडक झिजून ती खाच तयार झाली आहे..."

त्या एकाच ठिकाणी तरंग घर्षित मंच, समुद्र कडा, समुद्र गुहा, खाच अशी सागरी खननाची भूरूपं बघायला मिळाली.

"इथे दोन प्रकारचे खडक आहेत का?" वेदांतीनं प्रश्न केला.

प्रश्नाच्या उत्तरादाखल सह्याद्री कसा तयार झाला आहे,मग बेसाल्ट पासून  जांभा खडकाची निर्मिती कशी होतेभित्तिखडक म्हणजे काय, त्याचे दोन प्रकार, त्यांची उदाहरणे कुठे कुठे बघायला मिळतात असं सगळं समजून घेता आलं.

या ठिकाणी समुद्रकिनारा अभ्यास सहलीचं 'सागरी भूरूपे' हे प्रकरण निम्म संपलं होतं. तिथून निघताना एकदम शुभ्रानं विचारलं, ते त्या खडकांना पांढरं पांढरं दिसतंय ते काल बघितलेले शिंपले ना?

अगदी बरोबर. सुरेंद्रदादाचा प्रतिसाद. 

कालच्या अभ्यासाची उजळणीही झाली होती तर.

आता किल्ल्यावर पोहोचलो होतो आम्ही. एका ठिकाणी उभे राहून दादाला ऐकणं सुरू होतं.

"आता आपण जिथे उभे आहोत तो डोंगराचा एक असा भाग आहे की जो समुद्रात घुसलाय. समोर एक टेकडी दिसतीये बघा. ती पण समुद्रात घुसलीये. या दोघांच्यामध्ये समुद्र जमिनीकडे गेलाय. याला उपसागर असं म्हणता येईल आणि जमिनीचा समुद्रात घुसलेला हा भाग म्हणजे भूशीर...

मग टोंबोलो हा भूरूपाचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार, आम्ही जिथे उभे होतो तिथून दिसणारं मासेमारीचं मिरकरवाडा बंदर, मालवाहतुकीचं भगवती बंदर, या बंदराच्या संरक्षणासाठी बांधलेली ब्रेक वॉटर वॉल, ती अर्धवट बांधल्यानं झालेले दुष्परिणाम असं सगळं दादा सांगत होता. आम्ही साठवत होतो.

दादा हा किनारी दुर्ग ना?वैष्णवीनं विचारलं.

बरोबर आहे तुझं. जलदुर्गांचे तीन प्रकार पडतात. ज्याच्या तीन बाजूंनी पाणी आहे, ज्याच्या चारी बाजूंनी पाणी आहे आणि ओहोटीला जमिनीवरून ज्याच्याकडे चालत जाता येतं पण भरतीला मात्र पाण्यामुळे तो जमिनीपासून तुटतो...

मग या प्रत्येक प्रकाराची उदाहरणं, या प्रकारचे किल्ले कशासाठी बांधले गेले, हे जलदुर्ग बांधण्याची सुरुवात कोणी केली, शिवरायांनी कोणते जलदुर्ग बांधले, संरक्षण आणि अर्थकारण याच्याशी यांचा कसा संबंध होता... अशी बरीच चर्चा रंगली. अभ्यास सहलीचं जलदुर्ग आणि बंदर हे प्रकरण इथं संपलं होतं.

सुरेंद्रदादाला कॉलेजमध्ये थोड काम असल्यानं आम्हाला थोडी मोकळीक दिली त्यानं. जेवण करून दुपारी भेटायचं ठरलं. ठरल्याप्रमाणे चारच्या सुमारास सगळे  गणेशगुळे पुळणीच्या दिशेनं निघालो. काही अंतर चालतच गेलो. अजून समुद्र दृष्टीस पडला नव्हता. पण त्याच्या अस्तित्वाचा आवाज सुरु झाला होता.

आली का गाज ऐकू?” दादानं विचारलं.

शब्द परिचित नव्हता मुलीना.

आधी समुद्र ऐकू येतो; मग दिसतो मुलींनो.” मी गाज शब्द उलगडून सांगितला.

किनाऱ्यावर पोचल्यापोचल्या, “मॅग्नेट आणला आहे ना तुम्ही?” सुरेंद्रदादांनं विचारल. किनाऱ्यावर मॅग्नेट घेऊन जायचा आमच्या सर्वांच्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग होता. मुलींनी मॅग्नेट बाहेर काढलं.

तिथे थोडी काळया रंगाची वाळू दिसतीये ना; तिथे फिरवा मॅग्नेट.” दादाची सूचना.

मॅग्नेटला ती काळी वाळू चिकटली होती. पण बाकी मुलींनी हे आधीच चिकटलेलं होतं त्याला. आत्ता काही चिकटलं नाही असं ठासून सांगितलं. मग चुंबक स्वच्छ करण्यात आला. परत एकदा वाळूत फिरवण्यात आला. परत एकदा त्याला वाळूचे कण लागलेले होते. त्यांची विशिष्ट रचनाही तयार झाली होती.

हे  इल्मीनाईट खनिज आहे मुलींनो. भारत याचा खूप मोठा निर्यातदार आहे. यात टिटॅनियम असतं. ते सेमी कंडक्टर तयार करण्याकरता वापरलं जातं. रत्नागिरीच्या एका भागात सगळी काळीच वाळू आहे. त्याला काळा समुद्र असं म्हटलं जातं. भरपूर किंमत आहे याला बाजारात. आणि हो बाकी किनाऱ्यावरही नजर फिरवा. वाळू चमकताना दिसतीये बघा. ती चकाकी आहे कारण त्यात झिरकॉन नावाचं खनिज आहे. भर उन्हात वाळूकडे सलग बघता येत नाही इतकी ती चमकत असते.”

खरंच की.

तिकडे तर बघ किती चमचम सुरु आहे.

    मुलींचा किलबिलाट सुरु असला तरी माझी नजर किनाऱ्यावर लांबच्या लांब दिसणाऱ्या वाळूच्या रेषांकडे गेली होती.

अरे दादा, किडे चालत गेल्यामुळे झाल्या आहेत या रेषा. काव्यानं माहिती पुरवली.

काही किडे-बिडे चालत गेले नाहीत. हे समुद्राचं संचयनाचं काम आहे.” सुरेंद्रदादानं काव्याला टोकलं.

सगळ्यांचेच चेहरे प्रश्नार्थक.

समुद्राची एक लाट इथपर्यंत आली; तिने वाहून आणलेली वाळू इथे सोडली आणि लाट मागे गेली. त्या वाळूची ही रेषा तयार झाली. मायक्रोस्कोप आणि वर्नियर कॅलिपरच्या साह्याने या वाळूची जाडी मोजली जाते, मग लांबी मोजली जाते म्हणजे एका लाटेने किती वाळूचे कण आणले ते समजते.”

म्हणजे इतकी इतकी वाळू आणून ही पुळणं तयार झाली आहेत का?वेदांती जवळजवळ किंचाळलीच.

पण खरोखरच ही माहिती मिळाल्यावर ही पुळणं म्हणजे निसर्गाचे चमत्कारच वाटायला लागली होती आम्हाला.

हे वाळूतील फुगवटे कसले आहेत रे दादा?” पुळनीला मध्येमध्ये जणू काही फोडी आल्याप्रमाणे दिसणाऱ्या फुगवट्याकडे बोट दाखवत वैष्णवीनं विचारलं.   

यात प्राणी असतो ना.” जरा हळू आवाजातच काव्या उत्तरली.

बरोबर आहे यावेळी तुझं. यात एक किडा बीळ करून राहतो. आणि हवेच्या दाबाने वरची वाळू उचलली गेल्यानं असे फुगवटे तयार होतात.”

बोटांनी दाब त्या त्यांच्यावर.”

दादाची सूचना लगेच अमलात आणली मुलींनी. लगेच तिथली वर आलेली वाळू बसकन खाली बसली.

मग पुळणीच्या थोड्या वरच्या भागात नेलं दादानं आम्हा सगळ्यांना. तिथे पडलेला एक दगड हातात घेतला. आणि सांगू लागला...

हा स्तरित खडकाचा नमुना. यात काही जीवाश्म असतात. त्यांचं कार्बन डेटिंग केलं की याच्या काळाचा अंदाज वर्तवता येतो....”

    मग हा खडक कसा तयार होतो, तो कोणत्या भागात कुठे सापडला यावर शेकडो वर्षांपूर्वीची किनाऱ्याची स्थिती कशी होते ते कसे समजते असं बरंच काही सांगितलं दादानं.

बघा एखादा दगड फोडून त्यात काही सापडतंय का?”

लगेच कार्यवाही केली मुलींनी आणि सापडला की दगडाच्या आतल्या भागातला जीवाश्मशिंपल्याचा तुकडा! जाम खुश झालो सगळे.

बरं आता मला सांगा मुलींनो एखादा किनारा आपल्यासाठी सुरक्षित आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं?

कसं?आमच्या भुवयांनीच हा प्रश्न दादाला विचारला होता.

लाट कुठे फुटते ते बघायचं. लाट फुटली की फेसाची पांढरी रेषा दिसते आणि मग ती लाट कोसळते. लाट अशी फुटत नाही याचा अर्थ तिची जितकी उंची आहे त्याच्या सुमारे सातपट खाली पाणी आहे. खालचं पाणी उथळ... उथळ होत ते दोन अडीच फुटापर्यंत आल की लाट फुटते. म्हणजे मी इथे बसून तुम्हाला सांगू शकतो की त्या ठिकाणी लाट फुटते तिथे तीन साडेतीन फूट पाणी आहे. बेसिक भूमिती आहे हे.”

सगळे आवाक झालो होतो आम्ही.

बरे जा आता समुद्रात. अर्धा तास वेळ आहे तुमच्याकडे. कुठवर आत जाणार पण?

लाट फुटतीये त्याच्या अलीकडेच थांबणार दादा आम्ही. सगळ्या मुली एकसुरात.

मुलीच्या सुरक्षिततेची काळजी नव्हती आता मला. अनवाणी पायांनी मस्त चाललो त्या किनाऱ्यावर. इकडे मुली मनसोक्त डुंबल्या समुद्रात.

थोड्या वेळानं आजच्या दिवसाच्या शेवटच्या पडावाच्या दिशेनं गावखडी गावाकडे प्रवास सुरू झाला होता आमचा. तिथे भेटले प्रदीप डिंगणकर. हे आमच्या पुण्याचेच निघाले; तळेगावचे. गेली दहा वर्ष या किनाऱ्यावर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून कासवांच्या पिलांचे संरक्षणाचे काम करत आहेत. त्यामुळेकासव प्रकरणउलगडल गेलं गावखडीच्या किनाऱ्यावर. भारतात आढळणारे कासवाचे प्रकार, त्यांची नावं, ती नावं पडण्याची कारणं, प्रत्येक प्रकारच्या कासवाचं वजन, लांबी, कासव अंडी कुठे घालतात, कधी घालतात, एकाच वेळी किती अंडी घालतात, कासवांच्या पिल्लांना कोणापासून धोका असतो, अंड्यांचं संरक्षण कसं केलं जातं, त्यातून पिल्ले बाहेर आले आहेत हे कसं कळतं, त्यांना परत समुद्रात कसं सोडलं जातं... ढीग माहिती मिळाली.

या माहितीतील एकदम छोटासा भाग - अंड्यातून बाहेर आलेल्या कासवाच्या पिल्लांच्या पोटाशी हरभऱ्याच्या डाळीइतका उंचावटा असतो. त्यात तीन दिवस भागेल इतका अन्नसाठा असतो. त्यामुळे या पिल्लांकडे तीन दिवसांचा कालावधी असतो; समुद्रात जाऊन स्वतःचं अन्न स्वतः शोधण्यासाठी सक्षम होण्यासाठीचा... केवळ अजब आहे निसर्ग. केवळ अजब. पण आज कासवांची पिल्लं बघण्याचा योग नव्हता आमच्या पत्रिकेत.

 

दिवस तिसरा

 

सहलीचा आजचा शेवटचा दिवस होता. सकाळी सकाळी देवघळी किनारा गाठला आम्ही. कनकादित्य मंदिरात ठेवलेली सूर्यनारायणाची मूर्ती इथल्या गुहेत सापडली म्हणून नाव पडलं देवघळी. या किनाऱ्यावरही दोन दिवसात बघायला मिळालेल्या अनेक गोष्टी दिसल्या. चुकलं की क्रियापद; गोष्टी दाखवल्या गेल्या. स्तंभ खडक, जिओचा नमुना, प्रस्तरभंगामुळे बदललेली भूरूपे, सागरी स्तंभाचा अवशेष, लाव्हा बबलने तयार झालेली गुहा असं खूप काही दाखवल सुरेंद्रदादानं. आमच्या पिंपरी-चिंचवड पासून जवळ असणाऱ्या घोराडेश्वरच्या दोन गुहाही लाव्हा बबलने तयार झाल्या असल्याचं समजलं. (बराच वेळा गेलो आहे या गुहांमध्ये. आता परत एकदा जावं लागेल.) ‘सागरी भूरूपे हे प्रकरण इथं समाप्त झालं होतं. सागरी भूरूपेखूपच पुस्तकी नाव झालं. समुद्र नावाच्या कारागीरानं निर्मिलेली ती देखणी पाषाण शिल्पं होती सगळी. मन तृप्त झालं होत त्यांना पाहून.   

देवघळी किनाऱ्यावरून निघताना वेदांतीला काही दगडांवर पांढरट पांढरट दिसलं. 

ते काय आहे?” तिचा प्रश्न.

काय वाटते तुम्हाला?” दादाचा प्रतिप्रश्न. 

पण उत्तर देता आलं नाही आम्हा कुणाला. मग समजलं लाटांचे जे तुषार खडकावर पडत होते त्यातील पाण्याचं बाष्पीभवन झालं की तिथे क्षार साठत होते.

ओह मीठ आहे तर ते.” वैष्णवी उत्तरली.

गणेशगुळेमध्ये तर नैसर्गिक मिठागरे आहेत. त्या गावातील लोकांना मीठ विकत घ्याव लागत नाही. गरज लागली की किनाऱ्यावर जायचं आणि मीठ उचलून आणायचं.” सुरेंद्रदादानं माहिती पुरवली.

आणखी एका दगडावर मला पांढरे पांढरे शिंपले दिसले

ही काल बघितलेली कर्प आहेत का?

नाही नाही. यांना बारनॅकल्स् म्हणतात. आणि या दगडावर ती थोडीच आहेत. पण काही वेळा पूर्ण दगड बारनॅकल्सने भरतो; तेव्हा तो एखाद्या प्रवाळ सारखा दिसतो. पण ते खरे प्रवाळ नसते म्हणून त्याला छद्म प्रवाळ असं म्हटलं जातं.”

जाता जाता आणखी दोन गोष्टींची भर पडली होती आमच्या ज्ञानात.

तिथून निघताना सुरेंद्रदादा म्हणाला, “शिवराज, इथला एकदिड किलोमीटर किनाऱ्याचा तुकडा पायी फिरायचा राहिला आहे माझा. बाकी अलिबाग ते किरणपाणी  पर्यंत सगळ्या किनाऱ्याचा पायी फिरून अभ्यास केला आहे मी.”

अपार आदर, आश्चर्य मनात दाटून आलं.

    सुरेंद्रदादा पुणे ज्ञान प्रबोधिनीचा माजी विद्यार्थी. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात भूगोल विभागाचा प्रमुख म्हणून गेली ३० वर्षे काम करतोय. काही काळ उपप्राचार्य म्हणूनही काम बघितलं आहे त्यानं. पण हा झाला सगळा औपचारिक परिचय. अध्यापकाला आपल्या विषयाबाबत विद्यार्थ्यांच्या १००० पट अधिक माहिती असली पाहिजे असं एकदा प्रबोधिनीचे संचालक . गिरीशराव बापट म्हणाले होते. म्हणजे नेमकं काय असतं ते सुरेंद्रदादाला भेटून समजतं. त्यामुळे  ‘चालता बोलता भूगोलहाच दादाचा खरा परिचय.

    दहावीची परीक्षा दिलेल्या या पाच मुलींच्या आणि माझ्याही स्मरणात ही सहल कायम राहील.

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog