गोष्ट कर्तृत्वाची... दातृत्वाची!

रतिलाल भगवानदास कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष मा. नितीनभाई कारिआ यांचा नोव्हेंबर महिन्यात अमृत महोत्सव साजरा झाला. कर्तृत्व आणि दातृत्व यांचा अनोखा संगम म्हणजे नितीनभाई कारिआ. अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या औद्योगिक व सामाजिक कार्याचा परिचय करून देणारा हा लेख....

 संस्कारी कुटुंबातील बालपण

कारिआ यांचे मूळ कुटुंब सौराष्ट्रामधील. १९१५ च्या सुमारास नितीनभाई यांचे वडील रतिलालजी हे कल्याणमध्ये आले. हेच नितीनचे जन्मगाव ठरले. घरात तो सर्वात धाकटा. त्याला एकूण पाच भावंडे. घरची श्रीमंती असल्याने बालपण लाडात गेले. वस्तूंची कमतरता बिलकुलच नव्हती. पण आईवडिलांची शिस्तही तितकीच होती. घरात नोकरदार मंडळींचा राबता असला तरी घरातील अनेक कामे मुलांना करायला लागायची. शाळेमध्ये असताना कधीच वर खर्चाला म्हणून पैसे घरच्यांनी दिले नाहीत. किराणा, भाजीपाला खरेदीसाठी पैसे दिले जायचे तेव्हा त्यातील प्रत्येक पै चा हिशोब द्यावा लागायचा. बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यावर कडक निर्बंध होते. नितीनच्या शिक्षणाकडेही आई-वडिलांचे जातीने लक्ष असायचे. रतिलालजी नितीनला पाटी पेन्सिल न घेता तोंडी गणिते करायला सांगायचे. त्यातून त्याची आकडेमोड पक्की होत गेली. आणि त्याकाळी आठवीपासून जरी इंग्रजी असले तरी पाचवीपासूनच नितीनला टाइम्स ऑफ इंडिया ते वाचायला लावायचे. त्यातून त्याचे इंग्रजीही चांगले होत गेले. आई देखील दर शनिवारी घरच्या टिंबर उद्योगातील छोटे छोटे हिशोब नितीनला बघायला लावायची. हिशोबाची, पैसे हाताळण्याची सवय तेव्हापासूनच नितीनची पक्की होत गेली. वडिलांचे विशेष म्हणजे ते मॅट्रिक झाले नसले तरी धडपड करून यशस्वी औद्योगिक बांधकाम व्यावसायिक होण्यापर्यंतची मजल त्यांनी मारली होती. या व्यवसायाच्या निमित्ताने परदेशातील व्यक्तींशी संवाद करण्याची वेळ त्यांच्यावर यायची. त्यासाठी रतीलालजी स्वीडिश, इंग्रजी भाषाही शिकले होते. रतीलालजी हे आर्य समाजाला मानणारे होते. त्यामुळे घरी होमहवन हे नित्याने व्हायचे. स्वामी विशुद्धानंद हे वडिलांचे गुरु. त्यांचेही घरी येणेजाणे असायचे. या आध्यात्मिक वातावरणाचाही काही ना काही परिणाम नितीनवर नक्की झाला असावा.

 शब्द खरा करून दाखवला

    RSGKR या विद्यालयात नितीनचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण झाले. हुशार विद्यार्थी म्हणून नितीनचा लौकिक होता. बुद्धिबळ, कबड्डी, व्हॉलीबॉल हे त्याचे आवडीचे खेळ होते. 'माझ्या घडणीत आई-वडिलांइतकाच शाळेचाही मोठा वाटा आहे,' असे नितीनभाई अभिमानाने सांगतात. एकदा प्राचार्यांनी नितीनला बोलावून घेतले. शाळेतील एक बोर्ड दाखवला. त्या बोर्डावर मॅट्रिकमध्ये प्रथम येणाऱ्या मुलांची नावे होती. "तुझे नाव यात असायला हवे," प्राचार्य म्हणाले. "नक्की येणार सर!" पाचवीतील नितीनने शब्द दिला आणि तो खराही करून दाखवला.

 उद्योग जगतात प्रवेश

दहावीनंतर नितीनने विज्ञान शाखेत फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. सध्याच्या सिम्बॉयसिसचे शां. ब. मुजुमदार सरांसारखी दिग्गज मंडळी त्यांना शिकवायला होती. वडिलांनी नुकतीच एक केमिकल फॅक्टरी उभी केली होती. त्यामुळे नितीनने केमिकल इंजिनियर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. कानपूर विद्यापीठामध्ये नितीनला प्रवेशही मिळाला. पण तिथले वातावरण काही त्याला रुचले नाही आणि तो परत आला. त्यानंतर त्याने B. Sc. पूर्ण केले. M. Sc. साठी प्रवेश घेतला. एक वर्ष पूर्ण झाले असतानाच केमिकल फॅक्टरीत निर्माण झालेल्या आणीबाणीच्या प्रसंगाने वडिलांनी त्याला कंपनीत काम करण्यास बोलावून घेतले. पदव्युत्तर शिक्षण अर्धवटच राहीले. केमिकल फॅक्टरीचे I.D.I. कंपनीशी व्यवहार चालायचे. परूळकर नावाचे गृहस्थ या कंपनीच्या संचालक मंडळावर होते. त्यांच्याकडून नितीनने उद्योग जगतातील नियोजन कौशल्य, कॉस्टिंग अशा अनेक गोष्टी शिकून घेतल्या.

नितीनचा मोठा भाऊ बांधकाम उद्योगात होता. काही कारणांनी मोठ्या भावाला आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले. त्याच्या आजारपणामुळे त्याला मदत करण्यासाठी म्हणून नितीनचा १९७२ मध्ये बांधकाम व्यवसायात प्रवेश झाला. जे शिक्षण घेतलं त्यात काम करता आलं नाही आणि ज्या क्षेत्रातलं औपचारिक शिक्षण घेतलं नाही त्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलं; असं हे आगळंवेगळं उदाहरण म्हणता येईल. औपचारिक शिक्षण जरी नसले तरी नितीनने स्वतःहून शिकणे सुरू ठेवले. बांधकाम क्षेत्राशी संबंधित पुस्तकं खरेदी केली. ती वाचून काढली. काही कोर्सेस पूर्ण केले. अॅनालिसिस करायला शिकला. तसेच बांधकाम प्रकल्पावर असणाऱ्या कन्सल्टंटकडूनही नितीनने बरेच धडे गिरवले. त्यामुळे वडिलांचा वारसा पुढे न्यायला नितीन आता तयार झाला होता. 

 एक प्रामाणिक उद्योजक

उद्योग जगताचे रूढ नियम, पद्धती बाजूला सारून नितीनभाईनी स्वतःचा मार्ग तयार केला. आत्तापर्यंत त्यांच्या कंपनीकडून अंदाजे टेंडर भरले जायचे. या प्रक्रियेला नितीनभाईंनी शास्त्रीय दृष्टी दिली. कामाचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले. दिलेल्या तारखेला प्रकल्प उभे राहतील याची काळजी घेतली. ठरलेल्या किमतीतच प्रकल्प पूर्ण होतील यासाठी पूर्ण प्रयत्न केले. कॉन्ट्रॅक्टर - व्हेंडर यांच्याशी कधी अप्रामाणिकपणा केला नाही. टॅक्स भरायला त्यांनी कधीच उशीर केला नाही. कर्मचाऱ्यांना नेहमीच चांगली वागणूक दिली. (वडिलांनी फार पूर्वीच सांगितले होते की तू या माणसांमुळे आहेस हे विसरू नकोस.) पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन वडिलांचे एक वाक्य प्रमाण मानून त्याप्रमाणे नितीनभाई काम करत राहिले. वाक्य होते - जो कुठला प्रोजेक्ट हाती घेशील त्याला तू देव मान. हे वाक्य नितीनभाईंनी मंत्र म्हणून स्वीकारले आणि शेवटपर्यंत जपले.

एक काळ होता जेव्हा कंपनीच्या माहितीपत्रकाची बंडलं घेऊन काम मिळवावं लागायचं. पण स्वतःची गुणवत्ता सिद्ध केल्यावर परिस्थिती अशी बदलली की एकाच कंपनीची दोनदोन - तीनतीन कामे मिळू लागली. इतकंच नाही तर काही कारणामुळे एखाद्या कंपनीच्या प्रकल्पावर काम करायला वेळ होणार नसेल तर ती कंपनी दोन-तीन महिने थांबून रहायला लागली. सॅंडविक एशिया, भारत फोर्ज महिंद्रा, लार्सन टर्बो, जेबील, पियाजीओ, मॉन्टे यासारख्या अनेक नामवंत कंपन्यांची कामे नितीनभाईंनी पूर्ण केली. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया कडून दरवर्षी एक्सलन्स अवॉर्ड दिले जातात. नितीनभाईंच्या कंपनीने सलग सात-आठ वर्षे हे पुरस्कार पटकावले. मग मात्र इतरांना संधी मिळावी म्हणून त्यांनी स्पर्धेत भाग घेणेच सोडून दिले.

आजमितीला कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे २०० कोटी रुपये असून अडीचशे लोक कंपनीत काम करतात. एकावेळी चार-पाच प्रकल्पांवर काम सुरू असतं; ज्यामुळे साधारण दोन हजार लोकांना तात्पुरत्या स्वरूपाचा रोजगार उपलब्ध होतो. ‘नोकरी करणारे नाही तर देणारे व्हा,’ असं आम्ही आमच्या शाळेतील मुलांना सतत सांगत असतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कारिआ कुटुंब!

ज्ञान प्रबोधिनीशी नाते जडले! 

नितीनभाई यांच्या वडिलांचा प्रबोधिनीशी परिचय होता. श्री. ज्ञानेश्वर सावंतकाका यांच्यामुळे तो झाला होता. १९८५ मध्ये रतीलालजी यांचे निधन झाले. त्यानंतर नितीनभाईंचे प्रबोधिनीमध्ये येणे वाढले. ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचे केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर तथा भाऊ यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने नितीनभाई भारावून गेले. भाऊंची काम करण्याची पद्धत, त्यांच्याकडे असणारा प्रचंड आशावाद, माणसे जोडण्याची त्यांची हातोटी हे सगळच नितीनभाईंना प्रभावित करून गेलं. नितीनभाईंची आई गेल्यानंतर भाऊ त्यांना भेटायला गेले. त्यावेळी झालेल्या गप्पांमध्ये विद्यालयात तंत्रनिकेतन उभे करण्याचा भाऊंचा मानस आहे हे नितीनभाईंना समजले. या कामाला आईच्या नावे साठवलेले पैसे द्यावेत असे नितीनभाई व त्यांच्या पत्नी पुष्पलता या दोघांनाही एकाच वेळी वाटले आणि त्यातूनच १९९० मध्ये उभे राहिले ‘मातोश्री श्रीमती लक्ष्मीबाई रतिलाल कारिआ तंत्रशिक्षण भवन’. यानंतर भाऊंचे आणि नितीनभाईंचे घनिष्ठ नाते तयार झाले.

कुठल्या प्रकल्पासाठी पैसे कमी पडले तर भाऊ नितीनभाईंना हाक मारायचे. 'इतके पैसे कर्ज म्हणून द्या, इतके देणगी म्हणून द्या'; असेही सांगायचे. आणि जे पैसे कर्ज म्हणून घेतले असतील ते दिलेल्या तारखेला परतही करायचे. याचाही मोठा प्रभाव नितीनभाई यांच्यावर पडला. कौटुंबिक प्रश्नावरही मन समाधानी, शांत होईल असे मार्गदर्शन भाऊ करायचे. इतकेच काय पुढे भाऊंनी कर्म सिद्धांताचाही धडा नितीनभाईंना दिला. भाऊंच्या निधनानंतरही नितीनभाईंचे ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय वरील प्रेम कमी झाले नाही. सध्याचे केंद्रप्रमुख मनोजराव देवळेकर यांनी मांडलेल्या अनेक योजनांना नितीनभाईंची अत्यंत मोलाची साथ असते.

 मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या अध्यक्ष पदाचा स्वीकार

शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीचे काही कार्य करावे अशा हेतूने भाऊंच्या नेतृत्वाखाली परिसरातील काही नागरिकांनी एकत्र येऊन १९८८ साली गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मातृमंदिर विश्वस्त संस्थेची स्थापना केली.  भाऊंनी केलेल्या विनंतीचा स्वीकार करून नितीनभाईंनी २०१६ मध्ये या संस्थेचे अध्यक्ष पद स्वीकारले. गेल्या ३५ वर्षात संस्थेने विविध प्रकारचे उपक्रम राबवले. शिक्षण परिषदा, अध्यापक व विद्यार्थी निबंध स्पर्धा, समूह गायन स्पर्धा, संत साहित्य पुरस्कार, समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सत्कार... या सर्वच उपक्रमांना राज्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. नितीनभाईंच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची उत्तम वाटचाल सुरू आहे.

 दातृत्वाचा यज्ञ

दानधर्म करायचा असतो असे वडिलांकडे बघत बघतच नितीनभाई मोठे झाले होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या परीने आजूबाजूच्या लोकांना मदत करणे छोट्या नितीनने सुरु केले होते. नमुना दाखल एक प्रसंग सांगायचा तर -

    नितीनचा एक मित्र होता. त्याची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे नितीनने वडिलांकडून पैसे घेऊन दोन-तीन वर्ष त्याच्या शालेय शिक्षणासाठी मदत केली. पण मग मित्र म्हणाला सारखी मदत मागायला नको वाटत आहे. यावर उपाय म्हणून नितीनने एक शक्कल लढवली आणि त्यांच्या उद्योगातील स्क्रॅपमधील वायरी दोघांनी मिळून जाळल्या. त्यातून भरपूर तांब्याची तार त्यांना मिळाली. ती विकून त्यांनी त्यावर्षीचे मित्राचे शुल्क भरले.

गेली अनेक वर्ष नितीनभाई स्वतःच्या उत्पन्नातील ठराविक टक्के वाटा समाजकार्यासाठी मुक्त हस्ताने देत आहेत. पण यामागे एक विशेष प्रसंगही आहे. नितीनभाईंच्या लग्नाच्यावेळी वडिलांचे गुरु विशुद्धानंद महाराज हे आशीर्वाद देण्यासाठी आले होते. त्यांनी आशीर्वाद तर दिला पण त्यासोबत नितीनभाईंकडून दोन आश्वासनेही घेतली. एक म्हणजे मोठ्यांचा आदर करायचा, सेवा करायची. आणि खूप पैसा मिळवायचा पण त्यातील काही टक्के हा दान करायचा." यावर नितीनने विचारलं, "नेमके किती पैसे दान करू?" "जास्तीत जास्त २५ टक्के आणि कमीत कमी १० टक्के!" विशुद्धानंद महाराजांनी उत्तर दिलं. तेव्हापासून आजतागायत नितीनभाईंनी हा दानयज्ञ सुरू ठेवला आहे.

ज्ञान प्रबोधिनीची निगडी, हरळी, पुणे, साळुंब्रे केंद्रे तसेच इस्कॉन मंदिर, स्वामीनारायण मिशन, बालकल्याण भवन, विद्यार्थी सहाय्यक समिती, रोटरी क्लब, पूनावाला फाऊंडेशन, कल्याणमधील सामाजिक संस्था यांना आजवर भरघोस असे आर्थिक सहाय्य नितीनभाईंनी केले आहे. या साहाय्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. देणगी देण्यापूर्वी संबंधित संस्थेची / व्यक्तीची नितीनभाई सखोल चौकशी करतात आणि पुरेशी खात्री पटल्यावरच देणगी देतात. देणगी दिल्यावरही ज्या कारणासाठी ती दिली होती त्या कारणासाठी ती योग्य पद्धतीने वापरली जात आहे ना याचाही आढावा ते आवर्जून घेतात. गरजेनुसार पाठपुरावाही करतात. "शाळेमध्ये ताळा करायला शिकवलं होतं ते सूत्र मी उद्योगात आणि समाजसेवेतही वापरतो," नितीनभाई मिश्किल हसत सांगतात. सद्य घडीला सगळा उद्योग आपल्या मुलाकडे आनंदकडे सोपवून नितीनभाई अध्यात्माची वाट चालत आहेत.

संस्थेच्या विद्यालयाच्या कामानिमित्त अनेक वेळा नितीनभाईंना भेटण्याचा प्रसंग आला. खूप छान गप्पा होऊ शकतात त्यांच्याशी; कोणत्याही दडपणाशिवाय. एखादी सूचना जरी करायची असेल तर, 'बघा तुम्हाला हे शक्य झालं तर करा,' असाच त्यांचा कायम सूर असतो. भाऊंचे एक लाडके वाक्य होते, 'शिक्षणाची दोन अमृतफळे आहेत - कृतज्ञता आणि विनम्रता!' नितीनभाईंकडे बघितले की या वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. आणि म्हणूनच नितीनभाईंचे जीवन कृतार्थ वाटते. पुनश्च एकदा अमृत महोत्सवानिमित्त नितीनभाईना मनःपूर्वक शुभेच्छा.

 शिवराज पिंपुडे

कोषाध्यक्ष

मातृमंदिर विश्वस्त संस्था

 

 

Comments

Popular posts from this blog