1 गरज आणि महत्त्व

१ सध्या अध्ययन-अध्यापन प्रक्रिया ही खूपच तंत्रस्नेही झाली आहे. अनेक अध्यापक उत्तम पीपीटी तयार करून पाठ घेताना दिसतात. तसेच विद्यार्थीही तंत्रज्ञानाची अनेक साधने वापरण्यात वाकबगार झाली आहेत. परंतु केवळ फोटो, व्हिडिओ यातच शिक्षण प्रक्रिया अडकून पडली तर ते धोक्याचे होईल, आभासी (व्हर्च्युअल) ते प्रत्यक्ष (रियल) हा प्रवास होण्यासाठी क्षेत्रभेटी महत्त्वाच्या ठरतात. करोनाचा काळ ही आत मागे पडला आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. शिक्षण प्रक्रिया ही यास अपवाद नाही. त्यामुळे पूर्वी प्रमाणे अनेक शाळांनी क्षेत्रभेटी योजण्यासही सुरुवात केली आहे.

२ इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी आहे. यात अर्थातच मराठ्यांच्या इतिहासावर भर आहे. मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित अनेक ऐतिहासिक ठिकाणी पुणे जिल्ह्यात आहेत. उदाहरण घ्यायचे झाले तर एका पुणे जिल्ह्यात तब्बल २९ किल्ले तर सुमारे २५ ऐतिहासिक संग्रहालये आहेत. त्यामुळे या प्रकारच्या क्षेत्रभेटी योजणे सहजच शक्य आहे.

३ बहुतांश शाळेतून विद्यार्थ्यांना इतिहास हा विषय फारसा आवडत नाही. क्षेत्रभेटींच्या माध्यमातून विद्यार्थी जेव्हा प्रत्यक्ष वेगवेगळ्या वास्तू व वस्तू बघतील त्यातून या विषयाची आवड निर्माण होण्यास मदत होईल.

४ क्षेत्रभेटींच्या माध्यमातून आपल्या परिसराचा समृद्ध ऐतिहासिक वारसा मुलांच्या लक्षात येऊ शकेल. आपण कोणती ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या भागात राहत आहोत हे लक्षात आल्याने परिसराशी मुलांची जवळीक वाढू शकेल. त्यातून या वारसा स्थळांचे संवर्धन केले पाहिजे, किमानपक्षी यांची नासधूस होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ही जाणीव विद्यार्थ्यांना होईल.

सहलीच्या नियोजनाचे तीन टप्पे पडतात. सहली पूर्वी, प्रत्यक्ष सहलीत आणि सहली नंतर करावयाची कामे. या तीनही टप्प्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.

अभ्यास सहलींची पूर्वतयारी

 

अध्यापकाने सहलीचे  ठिकाण स्वतः आधी पाहून यावे. याला 'रेकी' म्हणतात. प्रवासाला लागणारा वेळ, न्याहारी-जेवणासाठी थांबायच्या जागा, स्थानिक संपर्क इ. गोष्टी स्पष्टपणे नोंदवाव्यात. रेकीमुळे दिवसभराचे एकूण नियोजनच डोळ्यासमोर उभे राहते. त्यातून अडचणी कमी येतात आणि आल्या तरी उपायांचा काही तरी विचार आधीच नकळत झालेला असतो.

२ शासन परवानगीसाठीचे सहल संमती पत्र संबंधित अधिकाऱ्यांना पाठवावे.

सहलीचे लेखी नियोजन पालकांपर्यंत पोहोचवावे. त्यामुळे पालकांपर्यंत क्षेत्रभेटींची उद्दिष्ट्ये, भूमिका योग्य व प्रभावीपद्धतीने पोहोचतात. आवश्यकतेनुसार पालक बैठक घ्यावी. आपलं नियोजन पक्कं आहे याचा जितका विश्वास पालकांना येतो तितका तो स्वतःच्या मुलाला सहलीस पाठवण्यास तयार होतो. शुल्कामुळे एखादा विद्यार्थी सहभागी होऊ शकत नसेल तर त्याची तात्कालिक गरज पूर्णही करावी. पैसे कमी आहेत किंवा नाहीत म्हणून विद्यार्थी एखादा शैक्षणिक अनुभव घेऊ शकत नाही असे शक्यतो घडू नये.

सहलीचे ठिकाण बघण्याची मुलांना उत्सुकता वाटली पाहिजे. त्यासाठी काही वेळा एखादे व्याख्यान योजावे, काही वेळा स्वतःच एखादे ppt तयार करून दाखवावे.

५ सहलीपूर्वीचा विद्यार्थी संवाद महत्त्वाचा असतो. यात केवळ तांत्रिक सूचना न देता आपण केवळ मजामस्ती करण्यासाठी जात नसून काही तरी नवीन शिकण्यासाठी जात आहोत हे आवर्जून मुलांपर्यंत पोहोचवले पाहिजे. संवादासाठीचे काही मुद्दे -

तहान-भूक सहन करणे.

गैरसोयी सहन करणे.

सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर करणे.

उत्तम निरीक्षण करणे. प्रवासात निरीक्षण करणे.

उत्तम नोंदी करणे.

भरपूर प्रश्न विचारणे.

६ सहल यशस्वी होण्यासाठी निरीक्षण सूची महत्त्वाची असते. नेमके काय बघायचे आणि काय नोंदवायचे या दोन गोष्टी निरीक्षण सुचीमुळे स्पष्ट होतात. निरीक्षण सूची स्वतःच्या अनुभवातून, अभ्यासातून तयार करावी. पण त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींकडून तपासूनही घ्यावी. सूचीच्या विद्यार्थी संख्येइतक्या प्रती सोबत ठेवाव्यात. या सूचीची गरज, उपयुक्तता, तिच्यातील नोंदी करायची पद्धत इ. आधीच स्पष्ट कराव्यात.

७ सहलीस जाताना आवश्यक ती साधने सोबत घ्यावी. एक पेटीच तयार करावी. त्यात भिंग, दुर्बीण, मेजरिंग टेप, तापमापक, होकायंत्र अशा गोष्टी ठेवाव्यात. यातील प्रत्येकच गोष्ट प्रत्येकच सहलीत लागेल असे नाही. पण या गोष्टी सोबत असल्याचा नक्की उपयोग होतो. तसेच पाण्याचा जार ही घ्यावा. मुलांकडील पाणी संपले की यातील पाणी लगेच देता येते.

संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती सोबत असावी. एक अध्यापक म्हणून सर्वच गोष्टी आपल्याला माहिती असतातच असे नाही. यासाठी एक अध्यापक म्हणून विविध क्षेत्रातील जाणकार व्यक्तींशी आपला चांगला परिचय नक्की असला पाहिजे.

९ किमान एक पुरुष आणि महिला पालक प्रतिनिधी सोबत असावेत.

१० सहलीस येणाऱ्या अध्यापक आणि पालकांची एकत्रित बैठक घेऊन त्यांना त्यांची भूमिका, जबाबदारी समजून सांगावी.

११ सहलीचा एक प्रमुख असावा. सहलीच्या दिवशी आयत्या वेळी काही निर्णय घेण्याचे प्रसंग आल्यास सर्वांनी आपली मते द्यावीत आणि त्यानंतर सहल प्रमुख देईल तो निर्णय मान्य करावा.

१२ विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र भरून घ्यावे. (लेखाच्या शेवटी नमुना दिला आहे.)

१३ सहल ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांना देण्यासाठी शाळेच्या पत्रमुद्रेवर सहलीची थोडक्यात माहिती देणारे पत्र सोबत असावे. यात सहलीची उद्दिष्ट्ये, विद्यार्थी संख्या, शिक्षक्न-पालक संख्या यांचा उल्लेख असावा. ज्या ठिकाणी शुल्क असते तेथे सवलत मिळण्यासाठीही या पत्राचा उपयोग होतो.

१४ सहलीचे शुल्क आकारताना प्रवास खर्च + न्याहरी, भोजन देणार असल्यास तो खर्च + टोल + तज्ज्ञ, चालक यांचे भोजन + रेकी खर्च + सहल अहवाल बक्षीस खर्च + व्यवस्थापन खर्च गृहीत धरावा.

१५ क्षेत्रभेटीच्या दृष्टीने उपयुक्त पडताळा सूची (चेक लिस्ट):

 

·      विद्यार्थी नावाचा व संपर्क क्रमांकाचा कागद

·      गाडीचे आरक्षण. आदल्या दिवशी गाडी मालकास आठवण. शक्य असल्यास प्रत्यक्ष चालकाशी संवाद.

·      प्रथमोपचार पेटी( मलम, आयोडेक्स, उलटी, ताप, पोट बिघडण्यावरील गोळ्या, एनर्जी पावडर इ.)

·      पत्र मुद्रेवरील पत्र

·      सोबत येणाऱ्या तज्ञ व्यक्तीचे मानधन \ तिला देण्यासाठी भेटवस्तू

·      शाळेचे \ संस्थेचे वार्षिक वृत्त (३-४ प्रती)

·      सहल विषयाशी \ ठिकाणाशी संबंधित पुस्तके

·      आवश्यक तितके पैसे

·      गाडीला लावण्यासाठी फलक \ कागद. यावर शाळेचे नाव, शैक्षणिक सहल इतके लिहिलेले असावे.

·      गाडीसाठी छोटा हार

 

१६ विद्यार्थ्यांना सहलीपूर्वी द्यायच्या तांत्रिक सूचना:

किती वाजता शाळेत यायचे आहे? शाळेत परतायला किती वाजतील?

गाड्या वेळेत निघतील. वेळेत न येणाऱ्यांची वाट बघितली जाणार नाही.

कोणता गणवेश घालायचा आहे?

सोबत कोणते साहित्य घ्यायचे आहे?  ( वही, पेन, पॅड, डबा, बाटली, टोपी, वर्तमान पत्र, बूट इ. )

प्लास्टिक पिशवी मधील विकतचे पदार्थ आणू नयेत. (उदा. कुरकुरे)

अध्यापकांच्या मोबाईलवर चौकशी करण्यासाठी फोन करू नये. पालकांसाठी WhatsApp  Group वर update टाकले जाईल.

कॅमेरा, मोबाईल बरोबर घेऊ नये.

दागिने घालू नयेत.

उलटीचा त्रास होणार्यांनी सोबत आवश्यक ती औषधे तसेच एक प्लास्टिक पिशवी ठेवावी.

 

१७ सहलीच्या दिवशी विद्यार्थ्यांना द्यायच्या सूचना:

गाडीत एकदा जागा ठरवून दिल्यानंतर नंतर जागा बदलू नये.

गाडीत बसल्यावर शेजारचा मुलगा, मुलगी आली की नाही हे पाहावे.

खिडकीतून हात, डोके बाहेर काढू नये.

शिटी वाजली की पूर्ण शांत बसावे.

एकट्याने न सांगता कुठे जाऊ नये.  चुकलात तर घरी, शिक्षकांना फोन करावा.

गाडीत कचरा करू नये.

एकत्र खावे. कमी खावे. उलटी वैगेरे त्रास होत असल्यास लगेचच सांगावे.

 १८ क्षेत्रभेटीच्या दिवशी अध्यापकांची भूमिका

१)   क्षेत्रभेटीच्या प्रवासाचे update WhatsApp Group वर देत राहावे. सहलीचे फोटो पालकांच्या WhatsApp Group वर पोस्ट करत राहावेत.

२)   सहल ठिकाणी पोहचण्यास जितका वेळ लागतो त्यापेक्षा परतीच्या प्रवासास रहदारीमुळे काही वेळ अधिक लागतो हे गृहीत धरून परतीचा प्रवास सुरु करावा. GPS आधारे शाळेत पोहचण्याची वेळ समजू शकते. त्या वेळेपूर्वी १५ मिनिटे आधीच पालकांना शाळेत पाल्यांना घेण्यासाठी बोलवावे. तसा निरोप whatsapp ग्रुप वर द्यावा.

३)   परतीच्या प्रवासात एक गोष्ट आवर्जून करावी. मुलांचे दोन गट करून दिवसभर पाहिलेल्या, अभ्यासलेल्या गोष्टींवर प्रश्नमंजुषा घ्यावी. मस्त उजळणी तर होतेच. पण परतीच्या प्रवासात आलेला थकवा, शीणही जाणवत नाही. सोबत गोळ्या-चॉकलेटचा एखादा पुडा ठेवला तर बरोबर उत्तर देणाऱ्याला लगेच बक्षीसही देता येते.

४)   सहलीत अध्यापकांनी लगेच माहिती द्यायला जाऊ नये. सुरुवातीला मुलांना निरीक्षण करण्यास, केलेली निरीक्षणे मांडण्यास, निरीक्षण करताना पडलेले प्रश्न विचारण्यास संधी द्यावी. 

५)   सहलीच्या विषयाप्रमाणे निसर्गाला हानी पोहचणार नाही अशा गोष्टींचे संकलन करण्यास सांगावे. जसे की किल्य्यावरील टाक्यातील पाणी, वैशिष्ट्यपूर्ण दगड इ.

६)   मोकळ्या वातावरणात अध्यापक विद्यार्थी नातेही चौकटीच्या बाहेर पडू शकते. त्यासाठी निवडक मुलांशी का होईना पण वैयक्तिक संवाद करण्याचा नक्की प्रयत्न करावा.

७)   सहलीच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची गटकार्य घेता येतात. जसे की किल्यावर गेल्यावर -

·      गडाची स्वच्छता करणे.

·      गडावरील विविध गोष्टींचे संकलन करणे.

·      विविध गोष्टींची मोजमापे घेणे.

·      पायथ्याच्या गावातील लोकांशी संवाद साधणे.

मंदिरात गेल्यावर –

·      मंदिराचा नकाशा तयार करणे.

·      पुजारी काकांची मुलाखत घेणे.

·      मंदिर परिसरातील विक्रेत्यांशी संवाद साधणे.

·      मंदिरात आलेल्या भाविकांशी संवाद साधणे.

८)   काही व्यक्तिगत कार्ये सुद्धा देता येतात. उदा. ज्यांची चित्रकला चांगली आहे अशा विद्यार्थ्यांना चित्रे काढण्यास सुचवता येते. अर्थात त्यासाठी अशा विद्यार्थ्यांना चित्रकलेचे साहित्य सोबत ठेवा अशी सूचना करावी लागते.

९)   सर्व विद्यार्थ्यांना मौनसंवाद करण्यास सुचवता येईल. मौनसंवाद म्हणजे कोणत्याही सजीव अथवा निर्जीव घटकाशी मनातून संवाद साधने. प्रश्न विचारणारे आपण आणि उत्तर देणारेही आपणच. पण उत्तर देताना आंपण ज्याच्याशी संवाद करत आहोत ती व्यक्ती किंवा वस्तू आपणच आहे असे मानून उत्तर द्यायचे.

१०)         सहलीच्या ठिकाणी शाळेची प्रार्थना \ उपासना आवर्जून करावी.

११)         वेळोवेळी मुलांची गिणती करत राहावी.

१२)         अध्यापकांनी विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून उत्तम निरीक्षकाची भूमिका पार पाडावी. विद्यार्थ्याचे प्रश्न कौशल्य, निरीक्षण कौशल्य, त्याची वर्तणूक, निरीक्षण सूचीतील त्याने केलेल्या नोंदी या आधारे निरीक्षणे नोंदवता येतील.

 

१९ सहलीनंतर करावयाच्या गोष्टी:

   १ क्षेत्रभेटीपूर्वीच्या संवाद इतकाच क्षेत्रभेटीनंतरचा संवादही महत्त्वाचा असतो. अहवाल लेखनही तितकेच महत्त्वाचे. सहलीतील अभ्यास मुरायला याचा नक्कीच उपयोग होतो.

   २ सहलीनंतर सहल विषयाशी संबंधित पुस्तके मुलांना वाचण्यास सुचवावीत.

३ सहलीसाठी ज्यांचे सहकार्य झाले असेल, सहल ठिकाणी ज्या नवीन व्यक्तींचा परिचय झाला असेल अशा सर्वाना नंतर दूरभाष करावा. त्यांचे आभार मानावेत.

      सहलीचा हिशोब कार्यालयात जमा करावा.

      सहल प्रमुख अध्यापकाने सहलीचे वृत्त लिहून ते संबंधित धारिणीला लावावे.

      शक्य झाल्यास पालक बैठक घेऊन मुलांना सहलीचे निवेदन करण्यास सांगावे.

             

२० सहल वृतांत लिहिताना...           

प्रवासवर्णन लिहिणे ही खरोखर एक कला आहे. आपण प्रवासाहून आलो की घरच्यांना जेजसे सुचेल ते सांगत राहतो; तेही प्रवासवर्णनच असते. पण लेखी स्वरूप द्यायचे म्हटले की अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. सहल ठिकाणाची  माहितीअनुभव आणि सल्ला अशा तीन ठळक भागात लेखन करता येते. त्यासाठी सहलीत वेळोवेळी टिपणे काढावी लागतात. त्यामुळे प्रवास वर्णनात माहिती चोख देता येते.

            नुसतेच माहितीपूर्ण असलेले लेखन रंजक होत नाही. अनुभवांचे वर्णन करताना, निसर्ग सौंदर्याचे वर्णन, भेटलेल्या व्यक्तीतिथे दिसलेले काही वेगळे वृक्ष, एखादे वैशिष्ट्य, प्रवासात किंवा ऐतिहासिक कथेतून शिकायला मिळालेले काही अशा सगळ्या मुद्द्यांनी लेखनाची रंजकता सहज वाढवता येऊ शकते.

आपल्या अनुभवातून पुढे त्या ठिकाणी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना मार्गदर्शन मिळावे हा देखील प्रवासवर्णन लिहिण्यामागचा महत्वाचा उद्देश असतो. बस किंवा अन्य वाहन कुठेकसे मिळतेकिती थांबावे लागते, खाण्याचीपाण्याचीराहण्याची सोय काय आहेवेळ किती लागतोकाय साहित्य न्यावे लागते यासारख्या गोष्टींनी प्रवासवर्णन जितके खुलते तितकेच ते उपयुक्तही होते.

 

 

पालक संमती पत्र नमुना

शालेय सहलीसाठी अनुमती पत्र

प्रति मा. मुख्याध्यापिका,

.............. विद्यालय,

निगडी, पुणे 44

 

विषय - शालेय सहलीसाठी अनुमती

 

माझा पाल्य चि.\कु............................. यास\हिस शाळेने आयोजित केलेल्या सहलीसाठी जाण्याची परवानगी मी देत आहे. आपण त्याची\तिची योग्य ती काळजी घ्यालच. परंतु सहली दरम्यान माझ्या पाल्यावर आलेल्या आपत्तीस किंवा त्याला झालेला अपघातास मी शालेय व्यवस्थापनास जबाबदार धरणार नाही.

विद्यार्थ्याचे नाव

इयत्ता

तुकडी

पालकाचे नाव

पालकांची स्वाक्षरी

 

 

                

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog