आणि बुद्ध प्रसन्न झाले...!

 

"रोहित, अरे उठ पटकन." एकदम दबक्या आवाजात मी रोहितला आवाज दिला. मध्यरात्रीचा दोनचा सुमार होता. रोहितचा डोळा लागला होता. माझा आवाज ऐकून हातानेच काय झाल असं त्यानं विचारलं. "पाणवठ्याच्या पलीकडच्या बाजूला काळा ठिपका दिसतोय बघ."

ताडकन उठून रोहितनं मचाणाच्या झरोक्याला तोंड लावलं.

"नाही ओ. काही नाहीये. झाडाची सावली आहे ती." 

"अरे बघ ना नीट हालतोय की थोडासा ठिपका तो." असं मी म्हणेपर्यंत ते काहीतरी हालणारं पाणवठ्याच्या त्या बाजूवरून काठाकाठाने चक्क आमच्या बाजूला आलं. चंद्रावर ढग आले होते. त्यामुळे प्रकाश मंदावला होता. डोळे फाडफाडून आमच्या समोर नेमकं काय आहे ते बघण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो.

"अरे हे तर सिवेट ( civet ) आहे सर." रोहित कुजबुजला.

"म्हणजे उदमांजर ना?"

"होय होय."

उदमांजर आमच्यावर उदार झालं होतं. आता ते चक्क आमच्या मचाणाच्या दिशेनं येऊ लागलं. मचाणाच्या शिडीपाशी येऊन ते थांबलं. आमच्याकडे रोखून बघू लागलं. एकदम काळकुळकुळीत होतं. शेपटी लांब आणि झुपकेदार होती. ३-४ फुट लांबीचं असेल हे उदमांजर. आमच्याकडे रोखून बघताना चंद्रप्रकाशात त्याचे डोळे चमकत होते. फारच उत्कंठावर्धक क्षण होता तो. त्या क्षणानं आजच्या रात्रीचं सार्थक झालं होतं जणू.

सांगतो. सगळं तपशीलात सांगतो. ती रात्र होती १२ मेची. बुद्ध पौर्णिमेची रात्र! ठिकाण होतं अमरावतीतील गाविलगड रेंजमधील क्रमांक एकचं मचाण. महाराष्ट्रातील अभयारण्यात वर्षातून केवळ एकदाच म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलात मचाणावर राहता येतं. यावर्षी बुकिंग करून टाकू असा विचार मी केला होता. नागझिरा अभयारण्याची  बुकिंगची लिंक मिळाली. लिंक ओपन झाल्यापासून दहा मिनिटातच ती बंद करण्यात आली; इतका उदंड प्रतिसाद पर्यावरणप्रेमींनी दिला होता. मचाण मिळवणं आव्हानात्मक आहे हे लक्षात आलं. माझा जंगलप्रेमी मित्र वरद बनसोड याला सांगितलं, ‘तुला ज्या ज्या अभयारण्याच्या लिंक मिळतील त्या मला पाठव रे नक्की.’ मग ताडोबा, राधानगरी, मेळघाटसाठी फॉर्म भरणं सुरूच राहीलं. बुद्ध पौर्णिमेपूर्वी साधारण एक महिना आधी हे फॉर्म अभयारण्यांच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरण्यासाठी उपलब्ध होतात. बुद्ध पौर्णिमेला १० दिवस बाकी असताना माझा फोन वाजला.

“शिवराज बोलत आहेत का?

“होय. आपण?

“चिखलदर्‍याला एक जागा खाली झाली आहे. तुम्ही येणार का? येणार असाल तर लगेच शुल्क भरून बुकिंग करा.

हा फेक कॉल असेल का असली शंकाही मनाला शिवली नाही. ताबडतोब शुल्क भरून बुकिंग करून टाकलं. गौतम बुद्ध आपल्यावर प्रसन्न झाल्याचीच भावना त्या क्षणी माझी होती. पहिला आनंदाचा भर ओसरल्यावर पुण्यातून चिखलदरा गाठायचं नियोजन करायला लागेल हे लक्षात आलं. तोवर शाळेतील अनेकांपर्यंत ही बातमी पोहोचली होती. (म्हणजे मीच दिसेल त्याला सांगत सुटलो होतो.) यावर्षी शाळेत नव्यानंच रुजू झालेल्या सिद्धालीताई संगई मला भेटायला आल्या.

"दादा, तुम्ही चिखलदर्‍याला जाताय असं समजलं.

“होय होय. बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीचं मचाण मिळालं आहे मला सिद्धालीताई.

"कुठली रेंज मिळाली आहे दादा?"

 "गाविलगड रेंज."

"कसे जाणार आहात? कुठे उतरणार आहात?"

"हे प्रश्न मलाही आहेत सिद्धालीताई. अजून काहीच विचार केला नाहीये."

"करूही नका. केवळ बॅग भरा."

"म्हणजे?"

"माझं सासर आणि माहेर दोन्ही अंजनगाव सुर्जी हे गाव आहे. तिथून चिखलदरा जेमतेम ५० किलोमीटरवर. तुमचं रात्रीच्या ट्रॅव्हल्सचं बुकिंग करून देते. सकाळी आमच्या घरी या. आवरून दुपारी जंगलात जा. त्यासाठी गाडीचीही व्यवस्थाही करून ठेवते."

“अरे व्वा. माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर घेऊनच आल्या आहात की तुम्ही सिद्धालीताई."

"लागा तयारीला दादा."

जंगल भेटीसोबत मे महिन्याच्या सुट्टीत खूप लांबवरच्या एका अध्यापक सदस्याची गृहभेट करून आलो हेही मिरवायला मिळणार होतं तर मला.

१२ मेच्या सकाळी सिद्धालीताई यांचे यजमान अंजनगाव सुर्जीच्या नाक्यावर मला घ्यायला आले होते. सिद्धालीताईंनी जी जी आश्वासने दिली ती ती सर्व तंतोतंत पाळली. खूपच छान स्वागत झालं माझ त्यांच्या सासुरवाडीत. त्यांच्या सासुरवाडीतून सकाळी ११ वाजता गाविलगड रेंजसाठी मी प्रवास सुरू केला. मागच्या दोन-तीन दिवस इथे काही प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे उन्हाचा तडाका एकदमच खाली आला होता. भर दुपारचा माझा प्रवास त्यामुळे  सुखकर झाला. सापन नदीचं कोरडठाक पडलेलं विस्तीर्ण पात्र वाटेत लागलं. चिखलदऱ्याच्या घाट रस्त्यावरील डोंगर रखरखीत झाले होते. एखाद दुसरी गुलमोहराची, बहाव्याची झाडं आपल्या लाल पिवळ्या ठिपक्यांनी त्या रुक्षपणात रंग भरण्याचा आटापिटा करत होती. अचानक आमच्या गाडी समोरून घोरपड गेली. ‘जंगलात प्रवेश झालाय तुमचा,’ असाच जणू तिनं आम्हाला संदेश दिला. साडेबाराच्या सुमारास रेंज ऑफिसवर पोहोचलो. बाकीचे लोक येण्यास सुरुवात झाली होती. एकूण दहा जणांनी बुकिंग केलं होतं. चिखलदरा, अमरावती, भंडारा, नाशिकमधून बाकीचे लोक आले होते. पुण्याचा शहाणा मी एकटाच होतो.

नाव नोंदणी, indemnity फॉर्म (स्वतःच्या जीवितास काहीही झाल्यास कोणालाही जबाबदार धरता येणार नाही या आशयाचा.) भरणे असे सोपस्कार पार पडले. भंडाऱ्याच्या रोहित बोरकर सोबत माझी चांगली गट्टी जमली. त्याच्यासोबत परिसरात फेरफटका मारला. खरंतर नियोजनानुसार आम्हाला केवळ रात्रीचं जेवण मिळणार होतं. पण वनपालांनी दुपारचंही जेवण सगळ्यांना दिलं. साधारण तीनच्या सुमारास मचाणासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. मला बशी क्रमांक दोनचं तर रोहितला त्याच भागातील क्रमांक एकचं मचाण मिळालं. आमच्या गटात दोन महिला होत्या. त्या दोघींनी एकत्र एका मचाणावर राहता येईल का? अशी विचारणा केली. अधिकाऱ्यांनी ती मान्य केली. मी आणि रोहितनंही आम्हाला एकच मचाण मिळालं तर बरं होईल असं सांगितलं. हीही मागणी मान्य झाली. बाकी सगळे एकेकटेच वन कर्मचाऱ्यांसोबत मचाणावर राहणार होते. आता आम्हा सगळ्यांना निरीक्षण सूची देण्यात आली. त्यात मचाणावरून दिसलेल्या प्राण्यांची नोंद करायची होती. प्राण्याचे नाव, वेळ, नर /मादी/पिल्लू, एकूण संख्या इत्यादी. ‘ही सगळी सूची भरली तर काय मज्जा येईल ना...’ आमच्यातील एकानं सगळ्यांच्याच मनातील भावना बोलून दाखवली. अभयारण्याच्या गाडीतून पाचच्या सुमारास आम्हाला संबंधित मचाणाच्या ठिकाणी सोडण्यात आलं. आमच्या सोबत वन कर्मचारी अनिलभाऊ असणार होते. आमचं मचाण पाणवठ्यापासून केवळ २५ पावलांवर होतं. (होय, मी पावलं मोजून सांगत आहे.)

मचाण झोपडीसारखं होतं. गवतानं शाकारालेलं छप्परही होतं त्याला. मचाणाच्या तीन बाजूंना तीन झरोके निरीक्षणासाठी करण्यात आले होते. "सर मचाण तीन झाडांवर बांधलयं. खालून केवळ एकाच बांबूचा आधार आहे.” रोहितनं त्याचं निरीक्षण नोंदवलं.  दोन गाद्या आणि पिण्याच्या पाण्याचा जारही होता मचाणात. आमच्या मचाणाचं तोंड पश्चिमेकडे होतं. त्यामुळे तासभर सूर्यापासून तोंड लपवून राहायला लागलं आम्हाला. फारच भारी वाटत होतं पण. वातावरण मात्र थोडं ढगाळ झालं होतं. 'देवा आज पाऊस नको रे.' मनातून विनवणी सुरू होती आमची. मचाणावर येऊन जेमतेम अर्धा तास झाला असेल आणि मला पायाला काहीतरी चावल्यासारखं झालं. सॉक्स काढून बघितलं तर दोन मुंग्या पायाला चिकटून बसल्या होत्या. मचाणात मुंग्या, मुंगळे यांचा वावर होता. 'बायांनो जागणार आहे मी. मला जागतं ठेवण्याची जबाबदारी तुम्ही घेऊ नका.' मी पुटपुटलो

दीड दोन तास होऊन गेले होते. आजूबाजूला कसली म्हणजे कसलीच हालचाल नव्हती. ही रात्र म्हणजे संयमाची परीक्षा आहे याची जाणीव झाली. साडेसहाच्या सुमारास एक मोर पाणवठ्यावर आला. जंगलात अनेकदा मोर बघितलाय. पण पण मचाणावरून पाणवठ्यावर आलेला मोर बघणं काही वेगळंच होतं. पाणी पिऊन आला तसा शांतपणे निघून गेला तो. थोड्याच वेळात आमच्यासाठी पॅकबंद जेवण मचाणावर आलं. एकदम नियोजनबद्ध कारभार होता वन विभागाचा.

सूर्य मावळला होता. पूर्वेकडून चंद्र उगवत होता. किड्यांच्या आवाजांनी आसमंत भरून गेला होता. चहुदिशांनी एकमेकांना साद प्रतिसाद सुरू झाले होते. आकाश स्वच्छ झालं होतं. त्यामुळे चंद्राच्या प्रकाशात पाणवठा उजळून निघाला होता. जणू पाणवठ्यावर रस्त्यावरील एखादा दिवा लावला की काय असं वाटावं इतका लख्ख उजेड दिसत होता. 'म्हणून बुद्ध पौर्णिमेची रात्र असते तर!' माझं स्वगत.

दोन तास बसून पाठ अवघडली होती. मग जरा झोपून निरीक्षण करावं असं वाटलं. पण झोपल्यावर झरोका वर राहिल्यानं पाणवठा दिसेनासा झाला. मग झोपल्यावर, मचाणाला टेकून बसल्यावर पाणवठा दिसला पाहिजे या हेतूने आणखी तीन-चार झरोके आम्ही करून घेतले. (तिथल्या गवताच्या काड्या काढून टाकल्या.) सोबत असलेल्या अनिलभाऊंनी, ‘फार झरोके करू नका मध्यरात्री थंडी वाजेल.’ असा इशारा दिला.

दहाच्या सुमारास एकदम एक मोठ्ठा आवाज ऐकू आला. जणू एखाद्या मोठ्या गाडीचा हॉर्न वाजल्यासारखा किंवा कोणी तरी किंचाळल्यासारखा. दोघेही दचकलो त्या आवाजानं.

“रोहित हा कसला रे आवाज?   

“काही माहित नाही सर.”

“सांबरचा आवाज आहे हा.” अनिलभाऊ शांतपणे म्हणाले.

"सर, एखादा साप झाडावर चढून आला तर काय करायचं ओ?" आधीच दचकलेलो असताना रोहितनं ही शंका विचारली.

"आपण काही नाही करू शकणार बाबा. काय ते तोच करेल."

दोघेही हलकेच हसलो. तसं तर मचाणासाठी बांधलेल्या शिडीवरून कुठला प्राणीही चढून वर येऊ शकणार होता. या सगळ्या शंकांना सोबत असलेले वन कर्मचारी आणि त्यांच्या कुऱ्हाडीचाच काय तो आधार होता. मध्यरात्रीच्या सुमारास परत आभाळ भरून आलं. चंद्र झाकोळला गेला. पाणवठा धूसर दिसू लागला. नंतरचा काही काळ शांततेत गेला. साधारण मध्यरात्री १२ वाजता पाण्यात एक मोठा पक्षी गेला आणि लगेच बाहेर आला. (गरुड असेल तो असं सकाळी वन अधिकाऱ्यांनी सांगितलं.) रात्री एकच्या सुमारास पाणवठ्यावर परत एकदा हालचाल जाणवली. कुणीतरी पाणी पितय इतकं नक्की जाणवलं. याही वेळी चंद्र प्रकाश पुरेसा नव्हता. ते पाणी पिणारं जनावर परत जाताना पाठमोर दिसलं. रानडुक्कर असावं असा आमचा अंदाज. मध्यरात्री दोन नंतर चांगलाच वारा सुटला. मचाणाच्या भिंती डुगुडूगु हलायला लागल्या. जणू झोक्यात बसल्यासारखं वाटायला लागलं होतं. आता चांगलीच थंडी जाणवायला लागली. रातकिडेही ओरडून ओरडून दमून झोपले होते बहुधा. आणि याच वेळी त्या उदमांजरानं दर्शन दिलं आंम्हाला.

तीनच्या सुमारास अचानक गाडीचा आवाज ऐकू आला. इतक्या रात्री कोणाची गाडी म्हटलं? वन अधिकाऱ्यांची गस्त सुरू होती. आमचं सगळं ठीकठाक आहे ना असं विचारायला आले होते ते. चार नंतर पाणवठ्यावर काही हालचाल जाणवली नाही. आमचाही डोळा लागला थोडा वेळ मग. आम्ही तिघेही जण व्यवस्थित आडवे होऊ शकलो इतकं मचाण प्रशस्त होतं. थोड्याच वेळात प्राण्यांचं कॉलिंग सुरु झालं. जंगलचा राजा जवळपास असल्याची ती खूण होती ती. परत एकदा डोळे मोट्ठे करून पाणवठा व आजूबाजूचा परिसर न्याहाळणं सुरु झालं आमचं. पण साहेबांचं दर्शन काही होऊ शकलं नाही.

          सहाच्या सुमारास वन अधिकारी आले. ते थेट पाणवठ्यावर गेले. तिथे वाकून त्यांनी काही निरीक्षण केलं.

“सिवेट, सांबर दिसलंय वाटतं तुम्हाला.” त्यांनी विचारणा केली.

आम्हाला फार आश्चर्य वाटलं. यांनी कसं ओळखलं म्हणून?

“सर सांबर नाही पण सिवेट आणि बहुधा रानडुक्कर आलं होतं.”

“अहो सांबरचे पायांचे ठसे स्पष्ट आहेत इथे.”

नेमका डोळा लागला होता वाटतं आमचा तेव्हा. मनातून स्वतःलाच शिव्याशाप देऊन झाले. एक प्राणी आमच्या नजरेतून निसटला होता तर...

पण काहीही म्हणा मंडळी जंगलप्रेमींनी एकदा तरी हा अनुभव घेतलाच पाहिजे. रात्रीचं जंगल काही वेगळंच असतं. ते स्पष्ट ऐकू येतं पण अंधुक दिसतं. आणि पंचेद्रियांइतकंच मनात ठसतं! 

 

शिवराज पिंपुडे

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

कीटक??? ही तर रंगांची दुनिया...