दुर्गजागर

२०१९ मध्ये १० महिन्यात पुणे जिल्ह्यातील २९ किल्ले सर करण्याचा पराक्रम ज्ञान प्रबोधिनीतील शालेय विद्यार्थ्यांनी केला. ही कल्पना होती विद्यालयाचे इतिहास विषयाचे अध्यापक व पूर्व माध्यमिक विभागाचे प्रमुख श्री. शिवराज पिंपुडे यांची. वाचूयात तर मग त्यांच्याच शब्दात या मोहिमेचे वर्णन...

 

मोहिमेची घोषणा

इयत्ता सातवीला मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ वर्गात बसून शिकवता-शिकता येत नाही. त्यासाठी एक तरी किल्ला अनुभवावा लागतो. म्हणून दरवर्षी सातवीच्या मुलांना घेऊन कुठल्यातरी किल्ल्याचा माथा आम्ही गाठतोच. ऑक्टोबर २०१८ मध्ये मुलांना घेऊन कोरीगडावर गेलो होतो. किल्ला उतरताना मित्रवर्य निलेशजी गावडे यांना विचारले “गावडे सर पुणे जिल्ह्यात एकूण किती किल्ले येतात ओ?” “२९!” गावडे सरांचा तत्पर प्रतिसाद. “काय म्हणताय!” (धक्का होता मला हा.)  ‘आपण ज्या जिल्ह्यात राहतो तो जिल्हा तरी आपण नीट बघितला पाहिजे; मुलांना दाखवला पाहिजे...’ माझं स्वगत!

मार्च महिना उजाडला. कोरीगडावरील स्वगत विसरलो नव्हतो मी. ‘मंडळी आज संध्याकाळी भेटूया,’ असा निरोप धाडला निलेशजींना व रघुराजदादांना. संध्याकाळी माझ्याच घरी खल सुरू झाला. विषय होता दहा महिन्यात मुलांना घेऊन पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले सर करण्याचा! “दादा करूच आपण ही मोहीम,” दोघांच्याही सुरात इतकी जबरदस्त आश्वासकता होती की त्यामुळे करावे की न करावे ही माझी साशंकता पार विरून गेली. आजवर कोणत्याही शाळेने न केलेली अशी एक मोहीम आम्ही करणार होतो. निर्णय झाला होता. याच बैठकीत मोहिमेचं नामकरण झालं – ‘दुर्गजागर!’

आमच्या तिघांच्या बैठकांवर बैठका सुरू झाल्या. रोज संध्याकाळी कुणाच्या ना कुणाच्यातरी घरी भेटीगाठी होऊ लागल्या. चहाचे कपच्या कप रिते होऊ लागले. जेवणाचे वेळापत्रक बदलले. ‘मोहीम होईपर्यंत तिघांनी वेगळी खोली करून राहा ना,’ आमच्या घरच्यांकडून प्रेमळ सूचना आली. खूप गोष्टी सुरू होत्या डोक्यात. पालक परवानगी देतील का? मुले तयार होतील का? त्यांना झेपेल का? एक वेळ मुलांना झेपेल, माझे काय? २९ किल्ल्यांसाठी २९ दिवस शाळा बुडवायची का? पूर्वतयारी काय काय करून घ्यावी लागेल? प्रश्नांची मालिका संपता संपत नव्हती. अखेर मार्च महिन्याच्या अखेर एक संदेश तयार करून तो सहावी, सातवी, आठवीच्या वर्गांवर पाठवला. संदेश होता – ‘शिवरायांचे आठवावे रूपI शिवरायांचा आठवावा प्रतापII छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान! महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास आपण लहानपणापासून ऐकतो, पाठ्यपुस्तकातून अभ्यासतो. महाराजांची राजनीती, त्यांची रणनीती, त्यांचा पराक्रम, स्वराज्य स्थापनेपासून ते स्वराज्य वैभवाप्रत नेणारे त्यांचे नरवीर या सर्वांचा अभ्यास प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन केला तर... पुणे जिल्ह्यात तब्बल २९ किल्ले येतात. आपण ज्या जिल्ह्यात राहतो तेथील शिव इतिहास या दुर्गांवर जाऊन अभ्यासूया. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत ही मोहीम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. इतिहासाचा अभ्यास तर आहेच; पण मुलांच्या क्षमतांचा कस लागेल. गटात काम करण्याची संधी मिळेल. गटकार्याचं उत्तम शिक्षण होईल. अनेक तज्ञ व्यक्तींचा सहवास लाभेल. या योजनेतून मुले इतिहास शिकतील. निसर्गाच्या जवळ जातील. साहस अनुभवतील आणि एका पराक्रमाचे साक्षीदार होतील. मग पाठवणार ना आपल्या पाल्यांना “जय भवानी जय शिवाजीचा” उद्घोष पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ल्यांवर करण्यासाठी???’

मोहिमेची नावनोंदणी ग्रंथालयात जाऊन करायची होती. पाच दिवस दिले होते नोंदणीसाठी. प्रतिसादाची धाकधुकच होती. रोज ग्रंथालयात जाऊन ‘आकडा’ विचारत होतो. शेवटच्या दिवशीचा आकडा होता तब्बल ७२! पालकांनी, आमच्या मुलांनी कल्पना उचलून धरली होती तर. रघुदादा व गावडेसरांना व्हाट्सअॅपच्या ग्रुपवर लगेच संदेश पाठवला – ‘मंडळी मोहीम होणार.’ पुढील आठवड्यातच नोंदणी केलेल्या सर्व मुलांच्या पालकांची बैठक घेतली. मोहिमेचा उद्देश स्पष्ट करून सांगितला. मोहिमेचे ढोबळ नियोजन सांगितलं. मोहीम फारशी सोपी नाही हेही बजावलं. पण कोणीही माघार घेतली नाही. दुसऱ्याच दिवशी मुलांची शारीरिक क्षमतांची चाचणी क्रीडा अध्यापकांच्या मदतीने घेतली. पुलप्स, सीटअप्स, सलग नऊ मिनिटे धावणे इत्यादी प्रकारांचा त्यात समावेश होता. चाचणीचा निकाल धक्कादायक होता. खूपच कमी मुले आपल्या शारीरिक क्षमता सिद्ध करू शकली होती. पुन्हा एकदा खलबते सुरू झाली; ‘आता काय’ याचे उत्तर शोधण्यासाठी. ‘दादा तुम्ही दरवर्षी मुलांना एका किल्ल्यावर घेऊन जाता; तेव्हा असली चाचणी वगैरे काही घेता का ओ? चढतात ना मुले छान किल्ला. चाचणी बाजूला ठेवा ती.’ गावडे सरांनी निर्णयच जाहीर केला. सगळ्यांनीच माना डोलावल्या. चर्चेअंती मोहिमेचे तीन टप्पे ठरवले आम्ही. पहिल्या टप्प्यात सोप्या श्रेणीचे किल्ले निवडले की ज्यावर सगळ्या मुलांना घेऊन जाणे सहज शक्य होते. वार्षिक परीक्षा संपल्यासंपल्या मोहीम लगेचच सुरू होणार होती.

 

मोहिमेचे शिलेदार

दोन जणांच्या जीवावर ही मोहीम बेतली होती.

श्री. निलेशजी गावडे शाळेचे पालक, गडकिल्ल्यांचे अभ्यासक, गडकिल्ले सेवा संस्थेचे सदस्य, एका वाक्यात सांगायचं तर इतिहास जगणारा माणूस, महिन्यातून एकदा तरी कोणत्या तरी किल्ल्याचा माथा हे गाठणारच. एकटे नाही तर अनेकांना घेऊन. यांचा स्वतःचा कोणताही किल्ला सर करायचा बहुधा शिल्लक नाही. त्यामुळे किल्ला पहावा तर गावडें सरांसोबतच...

श्री. रघुराज एरंडे हेही शाळेचे पालक, गावडे सरांमुळेच हे माझ्या संपर्कात आले. गावडेंची सर्व विशेषणे यांनाही लागू होतात. पण एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे गेली १० वर्षे चिंचवड गावात दर दिवाळीत एखाद्या तरी किल्ल्याची भव्य प्रतिकृती रघुदादा तयार करतात. यांची सगळी दिवाळी इतरांना तो किल्ला दाखवण्यातच साजरी होते.

 

 

मोहिमेची कार्यवाही

एप्रिल महिन्यात मोहिमेला सुरुवात झाली. भोरगिरी किल्ला मोहिमेचा श्रीगणेशा करणारा किल्ला ठरला. एप्रिल मे महिन्यात भोरगिरी, मल्हारगड, दौलतमंगळ, नारायणगड हे किल्ले सर करण्यात आले. त्यावर्षी उन्हाळा थोडा अधिकच कडक वाटला. त्यामुळे सोप्या श्रेणीतील हे किल्ले आमचं पाणी पाणी करणारे ठरले.

प्रत्येक वेळी ट्रेकमध्ये चार/पाच पालकांनी तरी सहभागी व्हावं असं आवाहन करत होतो. या आवाहनातूनच आम्हाला मोहिमेचे सेनापती मिळाले. सहा पालकांनी विद्यार्थ्यासोबत मोहीम पूर्ण करण्याचा संकल्प केला. हेच पालक मोहिमेचे सेनापती झाले. या सेनापातींकडे दोन प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आम्ही. एक म्हणजे प्रत्येकाकडे विद्यार्थ्यांचा एकेक गट सोपवला. त्या गटातील सर्व मुलांची काळजी सेनापतींनी घेणे अपेक्षित होते. (केवळ काळजी घेण्यापुरते हे काम मर्यादित राहिले नाही. मोहीम संपेपर्यंत गटातील अनेक मुलेमुली सेनापतींचे मानसपुत्र-मानसकन्या झाले होते.) याशिवाय प्रत्येकाकडे एक विशिष्ट जबाबदारी सोपवली. श्री. सोमशंकर डाके यांनी संपूर्ण मोहिमेचा चोख हिशोब ठेवला. ट्रेकवरून आम्ही शाळेत पोहचायच्या आधी दिवसभराचा हिशोब गटावर पोस्ट झालेला असायचा. याशिवाय डाके सरांनी मोहीम कॅमेरात बंद करण्याची कामगिरीही उत्तम पार पाडली. श्री. अरुण मरळ यांनी प्रत्येक ट्रेकसाठी पाण्याचे जार पुरवून मोठेच काम केले. श्री. सचिन शिंदे यांनी गाडी आरक्षणाचे किचकट काम बघितले. श्री. सतीश पवार हे या मोहिमेचा कणा होते. लॉजीस्टीक  नावाचा जो विषय असतो तो सतीश पवार यांनी उत्तम सांभाळला. श्री. राम तरस, सौ. शीतल शिंदे यांनीही कमी तिथे आम्ही ही भूमिका उत्तम निभावली. या सगळ्या पालकांविषयी मनात केवळ कृतज्ञता आहे.

कोणाताही किल्ला चढताना आम्हाला बराच वेळ लागायचा. कारण वाटेतील प्रत्येक गोष्ट रघुदादा व निलेशदादा बोलती करायचे. एक नमुना बघा - ‘...मुलांनो या पाण्याच्या टाक्या खोदताना जो दगड निघतो तोच किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला जातो. आता या टाकीच्या अलीकडच्या दोन्ही बाजूच्या दगडांना मोठी छिद्र दिसत आहेत याचा अर्थ पूर्वी या टाक्या झाकायची व्यवस्था होती. इथे अडसर लावला जात होता. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, शेवाळ होऊ नये म्हणून टाक्या झाकून ठेवल्या जायच्या...

या मोहिमेसाठी खास तयार केलेले टी-शर्ट तयार करून घेऊयात अशी कल्पना सेनापतींनी मांडली. त्यांनीच या कल्पनेवर काम केलं. सुरुवातीचे ३/४ ट्रेक पूर्ण झाल्यावर सर्वांना टी शर्ट देण्यात आले; ज्यावर मोहिमेचे नाव, विद्यालयाचे नाव, ट्रेकिंग करणारा युवक असं सगळं प्रिंट केलेलं होतं.

पावसाळ्यात चावंड, रोहिडा, कोरीगड, संग्रामदुर्ग, लोहगड, तिकोना या किल्ल्यांवर आम्ही जाऊन आलो. पावसाळ्यातील निसर्ग दर्शन साऱ्यांचेच मन प्रसन्न करून गेले. मात्र त्यावर्षीचा पाऊसही जोरदार होता. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती, रस्ते पाण्याखाली जाणे यामुळे दोन वेळा आयत्या वेळी ट्रेक रद्द करण्याची वेळ आमच्यावर आली.

नोव्हेंबर महिन्यापर्यंत बघता बघता १४ किल्ले पूर्ण झाले. आता वेळ झाली होती मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु करण्याची; त्यासाठी विद्यार्थी निवडण्याची! निवडीचा निकष सोपा होता. ज्यांनी आजवर एकही ट्रेक चुकवला नाही असे विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र होते. अशा विद्यार्थ्यांची संख्या होती ४०! या सर्व मुलांना शिवनेरी किल्ल्यावर मोहिमेचं व विद्यार्थ्यांचे नाव लिहिलेला कप बक्षीस म्हणून दिला. मुलांचा उत्साह वाढता ठेवणं महत्त्वाचं होतं.

मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यावर काही गोष्टींची भर घातली आम्ही. मुलांचे गट आधीपासूनच होते. आता प्रत्येक गटाला आम्ही एकेक जबाबदारी द्यायला सुरुवात केली. न्याहारी वाटप, गडाची शक्य तितकी स्वच्छता करणे, गडावरील विविध गोष्टींची मोजमापे घेणे, गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातील गावकऱ्यांच्या मुलाखती घेणे, गडाचा ढोबळ नकाशा तयार करणे, गडावरील टाक्यातील पाण्याचे नमुने संकलित करणे इ. इ. परतीच्या प्रवासात गाडीत बसल्यावर प्रत्येक गटप्रमुख त्याच्या कामाचे निवेदन करत असे. याशिवाय दुर्ग अभ्यासक, शिवचरित्र अभ्यासक अशा तज्ञ मंडळीना आम्ही आवर्जून मोहिमेत सहभागी करून घ्यायला लागलो. श्री. ब. हि. चिंचवडे, श्री, विनायक खोत, श्री. सागर कदम, श्री. प्रशांत पवार, श्री. रमेश खरमाळे, श्री. उमेश वाघेला, श्री. विश्वास दौंडकर, श्री. अनिल दुधाने, सौ. मंजिरी भालेराव, श्री. विशाल सावंत अशा अनेक दिग्गजांनी त्यांच्या सोयीनुसार मुलांसोबत किल्ल्यांवर हजेरी लावली. सगळ्यांनीच आपले अनुभव, ज्ञान मुक्त हस्ताने मुलांसमोर रिते केले. 

प्रशिक्षणे व कार्यशाळा

केवळ गिर्यारोहण हा मोहिमेचा उद्देश कधीच नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध प्रकारच्या कार्यशाळा मुलांसाठी योजल्या. मोहीम सुरू होण्यापूर्वी किल्ला कसा बघावा, किल्ल्याचे घटक कोणते याविषयी विद्यालयाचेच दुर्गप्रेमी पालक श्री. विनीत दाते यांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानानंतर घेरा, तटबंदी, बुरुज, महाद्वार, दिंडी दरवाजा असे किल्ला निरीक्षणाचे सुमारे २५ घटक मुलांना समजले. किल्ल्यावर जाण्यापूर्वी करायचा अभ्यास, प्रत्यक्ष किल्ला पाहताना केलेल्या नोंदी, पडलेले प्रश्न आणि नंतर त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा केलेला प्रयत्न असे किल्ला अभ्यासाचे तीन टप्पे दाते सरांनी छान सांगितले.

दुर्ग अभ्यासक श्री. संदीप तापकीर यांचं ‘पुणे जिल्ह्यातील किल्ले’ असं पुस्तकच प्रकाशित झालं आहे. त्यामुळे त्यांना पुणे जिल्ह्यातल्या किल्ल्यांची वैशिष्ट्ये सांगण्यास बोलावले होते. त्यांच्या पुस्तकाची एकेक प्रत प्रत्येक विद्यार्थ्याला दिली. मोहीम संपेपर्यंत हे पुस्तक म्हणजे आमची भगवद्गीताच झाले होते. या पुस्तकातील संबंधित किल्ल्याविषयीच्या माहितीचे वाचन केल्याशिवाय आमचे गिर्यारोहण सुरु होत नसे.

प्रवास वर्णन कसे लिहायचे, ते कसे खुलावायचे याविषयी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी मृणाल मायदेव हिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परिणाम स्वरूप मुलांच्या लेखनात लक्षणीय फरक अनुभवता आला.

प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यावर शिवाजी महाराजांवरील काही पद्य, पोवाडे मुलांना शिकवली. गटात कसे काम करायचे, गटप्रमुखांनी त्याची भूमिका कशी निभवायची याविषयी आणखी एक माजी विद्यार्थी सौगंध देशमुख याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोबाईल फोटोग्राफी विषयी झालेले श्री. विशाल सावंत यांचे सत्र मुलांना चांगलेच आवडले.

प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात स्वयंपाक घरातील पिंजण काकूंनी चुलीवर मसालेभात करायला शिकवला. यानिमित्ताने चूल लावायची कशी? पेटवायची कशी? भांड्याला खालून माती का लावायची? अशा अनेक गोष्टी मुलांना समजल्या, त्यांनी करून बघितल्या. याशिवाय ट्रेकिंगसाठी जी विविध साधने वापरली जातात त्यांचा परिचय पुणे व्हेंचर्सच्या सदस्यांनी मुलांना करून दिला. तसेच वन्य पशुपक्षी कीटक यांच्यापासून कसे संरक्षण करायचे याविषयी सर्पमित्र शुभम पांडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. थोडक्यात काय एकेका ट्रेकगणिक मुलांचीही जोरदार तयारी होत होती.

केवळ प्रशिक्षण करून विषय सोडून दिले नाहीत; तर अनेक गोष्टींचा पाठपुरावाही आम्ही केला. प्रशिक्षणाच्या उपयोजनाची संधी उपलब्ध करून दिली. १० किल्ले झाल्यावर प्रवासवर्णन लेखनाची स्पर्धा आयोजित केली. उत्तम लेखांना बक्षिसे दिली. सिंहगडावर मोबाईल फोटोग्राफीची स्पर्धा घेण्यात आली. (केवळ याच ट्रेकसाठी मुलांना मोबाईल सोबत घ्यायची परवानगी देण्यात आली होती.) ज्यांचा या स्पर्धेत क्रमांक आला त्यांना त्यांनी काढलेल्या फोटोची फ्रेम करून पुढील ट्रेकमध्ये बक्षीस म्हणून दिली. राजगड ते तोरणा ट्रेकमध्ये मुलांनी दुपारी मॅगी / मसालेभात चुलीवर गटागटातून बनवला आणि हो खाल्लाही.

 

काही किस्से

स्मरणात राहतील असे अनेक प्रसंग घडले. त्यातील केवळ राजगड ते तोरणा ट्रेकमधील काही निवडक प्रसंग सांगतो.

राजगड दर्शन सुरू होते. काही मुले पुढे गेली होती. काही मागे पडली हती. अर्थातच मागे पडलेल्या गटामध्ये मी होतो. हास्यविनोद सुरू होते. इतक्यात एक जण ओरडला, “दादा मधमाश्या.” त्याचे शब्द हवेत वीरण्यापूर्वीच आमचा आसमंत असंख्य मधमाश्यांनी व्यापला. काही सेकंदातच सगळे जमिनीवर आडवे झाले. कसलाच आरडाओरडा नाही. आडवे होण्याची तर इतकी घाई की एक जण पार माझ्या अंगावर कोसळला. माझा मोबाईल शब्दशः धुळीस मिळाला. मधमाशा आल्या तशा निघून गेल्या. ‘सुटलो!’ या एका शब्दाचे विविध भाव मुलांच्या चेहऱ्यावर वाचायला मिळाले. प्रत्येक ट्रेक सुरू होताना गावडे सर कानीकपाळी ओरडून अनेक सूचना द्यायचे. मुले त्या सूचना ‘ऐकत’ होती हेच या प्रसंगातून माझ्या लक्षात आले.

.....

जेवण वगैरे करून गप्पाटप्पा करून रात्री साडेनऊच्या सुमारास तोरणा किल्ल्याच्या दिशेने सर्वांनी प्रस्थान केले. खरंतर राजगड चढून, बघून सर्व जण पुरेसे दमले होते. तासाभरात एक घर लागेल तिथे मुक्कामाची व्यवस्था केली असल्याचे रघुदादांनी सांगितले. घरातील एक छोटा सदस्य वाट दाखवायला आमच्या सोबत होता. तासाभराने मुलांनी विचारायला सुरुवात केली, ‘किती वेळ लागेल अजून?’ ‘हे काय हाकेच्या अंतरावर,’ त्या छोट्याचे उत्तर. आणखी तासाभराने सेनापतींनी विचारायला सुरुवात केली, ‘अरे बाबा कधी येतय तुझं घर?’ उत्तर तेच, ‘हे काय हाकेच्या अंतरावर.’ आणखी तासाभराने मी विचारलं, ‘रघुदादा ही हाकामारी कधी थांबणार आहे?’ सुमारे साडेतीन तासांनी एक झोपडी वजा घर दिसले एकदाचे. हुश्श झाले सगळ्यांनाच. आम्हाला येताना बघून घरातील पुरुष मंडळींनी गोठ्यातून गाई म्हशी बाहेर काढायला सुरुवात केली. ‘मुलींनो तुमची व्यवस्था या खोलीत. (गोठ्यात!)’ राघुदादा हळू आवाजात म्हणाले. मुलींचे चेहरे बघण्यासारखे झाले असतील. (अंधार असल्याने चेहरे दिसले नाहीत.) मुलींची ही व्यवस्था बघून आमची व्यवस्था काय असणार हे लागलीच ओळखले मी. आहे त्या जागी पथारी पसरली मी. माझ्या या कृतीतून योग्य तो संदेश घेतला आमच्या पोरांनी. पंधरा मिनिटात त्यातल्या त्यात सपाटीचा भाग शोधून प्रत्येक जण आडवा झाला. “आकाशाचं पांघरूण की काय म्हणतात ते हेच रे पोरांनो,” क्षीण आवाजात मी परिस्थिती हलकीफुलकी करण्याचा प्रयत्न केला.

.....

सकाळी उठल्याउठल्या मुली तरस काकांना भेटायला धावल्या. त्यांना एक गंमत सांगायची होती. पहाटे (खराखुरा) कोंबडा आरवायला लागला तर तर तरसकाकू म्हणाल्या, “बंद कर ग तो अलार्म. झोपू दे जरा.” आता हा अलार्म बंद करण्याचं बटण कोणाकडेच नव्हतं. हसून हसून पुरेवाट झाली मुलींची.

.....

एके संध्याकाळी सेनापती सचिन शिंदे भेटायला आले; चेहरा बारीक करून.

“काय हो शिंदे साहेब काय झाले?”

“दादा एक विनंती आहे.”

“बोला की.”

“अमुक तारखेचा ट्रेक रद्द करा ना दादा.”

“अहो काय म्हणताय शिंदे साहेब. बरेच किल्ले बाकी आहेत आपले. एकही रविवार वाया घालवून चालणार नाही.”

“अहो दादा आमची परदेशवारी ठरलीये. तीन महिन्यापूर्वीच बुकिंग केलं होतं. बुकिंगच्या वेळी त्या आठवड्यात ट्रेकचे नियोजन नसल्याने आम्ही या तारखा ठरवल्या. आता तुम्ही त्या आठवड्यातील रविवारी ट्रेक जाहीर केलाय. आता शितल म्हणतीये की नाही येणार सहलीला. ट्रेकला जाणार.”

“त्यांना सांगा हा ट्रेक स्वतंत्रपणे त्यांचा त्यांचा करा म्हणाव.”

“सांगून झाले दादा. नाही ऐकत आहे ती. इतके कराच आमच्यासाठी.”

ट्रेक न चुकण्यासाठी परदेशवारी चुकवायला निघालेल्या मोहिमेतील सहभागी एकमेव महिला रणरागिणीसाठी इतके करणे तर मी लागत होतोच.

दिग्गजांच्या उपस्थितील झालेले मुलांचे कौतुक

२०१६ पासून ‘दुर्ग जागर’ या नावेच महाराष्ट्रातील दुर्गप्रेमींचा मेळावा भरत आहे. २०२० मधील मेळावा जानेवारी रोजी पुण्यातच संपन्न झाला. या कार्यक्रमात आम्हाला निमंत्रित करण्यात आलं होतं. मोहिमेत सहभागी सर्व विद्यार्थी, अध्यापक व सेनापतींचा या मेळाव्यात सत्कार करण्यात आला. त्यावेळी सभागृहातील तमाम दुर्गप्रेमींनी उभे राहून टाळ्यांचा केलेला कडकडाट, शेकडो मोबाईल मधील कॅमेरांचा झालेला क्लिकक्लीकाट आणि ‘जय शिवराय’च्या दिलेल्या दमदार घोषणा आमच्या कायम स्मरणात राहतील. दुर्ग अभ्यासक श्री. गिरीश टकले, श्री. भगवान चिले यांनाही यानिमित्ताने  मुलांना भेटता आलं.

मोहिमेची सांगता

बघता बघता जानेवारी महिना उजाडला. २२ ट्रेक पूर्ण झाले होते. तरी अद्याप ७ ट्रेक बाकी होते. आणि हाती शिल्लक राहिलेले रविवार होते केवळ दोन. रविवारी किंवा शालेय सुट्ट्यांच्या दिवशीच ट्रेक काढण्याचा आमचा संकल्प होता. आजवर तो पाळला होता. पण २६ जानेवारी पूर्वी मोहीम पूर्ण करायची तर काही शालेय दिवस वापरणे आता भाग होते. निगडी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मनोजराव देवळेकर यांनी यास आनंदाने मान्यता दिली आणि मग जानेवारी या एकाच महिन्यात ७ ट्रेक पूर्ण करून मोहिमेची यशस्वी सांगता करण्यात आली. पण खरे सांगायचे तर सगळ्यांनाच ‘फिटनेस’ इतका आला होता की या ७ ट्रेकचा कोणताच शारीरिक ताण कोणालाच आला नाही.

अनघाई किल्ल्याने मोहिमेची सांगता झाली. या किल्ल्याची वाट थोडी आव्हानात्मकच. त्यामुळे सागरमाथा संस्थेचे पट्टीचे गिर्यारोहक सोबत असणार होते. निसरड्या वाटेवर जागा हेरून रोपचे खुंटे ठोकून त्यांनी मुलांची वाट सुरक्षित करून दिली. किल्ल्यावर पोहचल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला दुर्गजागरचा गमछा देऊन छोटेखानी कौतुक करण्यात आले. शेवटचा किल्ला असल्याने प्रत्येकाच्याच डब्यात आई पालकांनी काही ना काही गोड पदार्थ दिले होते. (आणि सेनापतींना देण्यासाठी गोडाचा वेगळा डबाही अनेकांनी आणला होता.) गोडाचे भरपेट जेवण करून विश्रांती घेऊन सावकाश सगळे गडउतार झालो. किल्ला उतरल्यावर मुलांनी उत्स्फूर्तपणे रघुदादा व गावडेदादा यांनी खांद्यावर घेऊन खोटी मिरवणूकच काढली म्हणा ना. सर्वच जण खूप खुश होतो. ठरवलेली गोष्ट पूर्ण केल्याचे समाधान सर्वांच्याच चेहऱ्यावर होते. परतीच्या प्रवासात उन्हेरे येथील गरम पाण्याच्या कुंडाचा सर्वांनी अनुभव घेतला. या गंधकयुक्त कडकडीत पाण्याने दिवसभराचा शीण कुठच्या कुठे पळून गेला. शरीर जणू पूर्ववत झाले. शाळेत परतायला रात्रीचे बारा वाजून गेले. पण तरीही सगळे पालक उत्सुकतेने आमची वाट बघत होते. आम्हाला सुगावा लागू न देता आमच्या स्वागताची पालकांनी जय्यत तयारी केली होती. सुंदर रांगोळी, पणत्यांची आरास अन् प्रत्येक विद्यार्थ्याला, सेनापतीला केलेले औक्षण... अनेकांनी आपल्या भावना अश्रुंवाटे मोकळ्या केल्या.

दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मोहीम पूर्ण केलेल्या ४० मुलांचं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसमोर कौतुक झालं. शाळेने दिलेली ही शाबासकीची थाप कालच्या ट्रेकचा थकवा घालवायला पुरेशी होती. सर्वांच्याच मनात आज अपार समाधान होतं.

मोहिमेची अन्य काही वैशिष्ट्ये 

सुमारे ८० पालक या मोहिमेत कोणत्या ना कोणत्या किल्ल्यावर येऊन गेले. यातल्या काही जणांनी ट्रेकिंग हा विषय त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवला.

मोहिमेतील अनेक विद्यार्थ्यांचे, सेनापतींचे वाढदिवस गडावर साजरे झाले. सगळ्यांना न्याहरी देऊन वाढदिवस साजरा करण्याची जणू पद्धतच पडली. त्यामुळे आई पालकांची ट्रेकिंगच्या दिवशी भल्या सकाळी कराव्या लागणाऱ्या तीन तीन डब्यांपैकी एका डब्यातून तरी सुटका झाली.

मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व मुलांना नोंदी करण्यासाठी एक हस्तपुस्तिका देण्यात आली. त्यामध्ये त्या त्या किल्ल्याचे कोणते घटक काय स्थितीमध्ये दिसले अशा नोंदी करायच्या होत्या. शिवाय प्रवास वर्णनही लिहिणे अपेक्षित होते. अनेक मुलांनी उत्तम नोंदी ठेवण्याचा प्रयत्न केला.

मोहीम चालू असतानाच ‘फतेशिकस्त’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मोहिमेतील सहभागी सगळ्या मुलांनी त्यांच्या पालकांनी मिळून चित्रपट बघण्याचा आनंद घेतला.

काही ट्रेक झाल्यावर आमच्या भाऊंनी (आ. वा. ना. अभ्यंकर सरांनी) मला एक प्रश्न विचारला, “तू अजून ट्रेकला जातोयस का?” सुरुवातीला मला या प्रश्नाचा अर्थच समजला नाही. पण नंतर भाऊंचा रोख समजला. मोहिमेचं नेतृत्व आता नववीतील विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. मनात थोडी धाकधूक असतानाही शेवटच्या काही ट्रेकचं नेतृत्व मी मुलांवर सोपवलं. प्रत्येक ट्रेकसाठी एक टीम जाहीर केली. त्यांच्यामध्ये सेनापतींप्रमाणे खातेवाटप केलं. मुलांनी भाऊंचा विश्वास सार्थ ठरवला. ट्रेक तर यशस्वी केलेच पण काही ना काही नवीन करण्याचाही मुलांनी प्रयत्न केला. जसे की एका ट्रेकमध्ये मुलांनी सेनापतींना पत्र लिहिली आणि त्यांचं वाचन किल्ल्यावर करण्यात आलं. मोठाच भावस्पर्शी प्रसंग होता हा.

 

शिक्षण म्हणजे वर्तन परिवर्तन

मोहिमेमुळे मुलांनी त्यांच्यात कोणते बदल अनुभवले हे वाचूया त्यांच्यात शब्दात –

आर्या लिहिते, मला गटप्रमुख केल्याने नेतृत्व करण्याची छान संधी मिळाली. आपल्यावर एखादी जबाबदारी कोणी विश्वासाने टाकली की किती निष्ठेने, प्रामाणिकपणे ती पूर्ण करावी लागते हे समजले.

शार्दुल लिहितो, मोहिमेसोबत अभ्यास, चित्रकला या गोष्टीही चालू ठेवणे तितकंच महत्त्वाचं होतं. सुरुवातीला थोडी धांदल उडाली पण नंतर वेळेचे नियोजन जमू लागले. या सगळ्यातून माझ्यातील चिकाटी वाढली.

आभा लिहिते, अरे पूर्वीची ती मीच का असा प्रश्न मला कधी कधी पडतो. मोहिमेमुळे माझा बुजरेपणा कमी झाला. अनेक पालकांची छान मैत्री झाली. मी स्वतःहून त्यांच्याशी गप्पा मारू लागले. माझ्या भावना व्यक्त करू लागले. थोडक्यात काय तर मला ' बोलता ' येऊ लागले.

 

कौतुक समारंभ

मुलांच्या पराक्रमाला साजेसं त्यांचं कौतुक झालं पाहिजे अशी सर्वच सेनापतींची इच्छा होती. कौतुक समारंभासाठी कल्पनांवर कल्पना काढण्यात आल्या. काही कल्पनांचा सुगावा तर सेनापतींनाही लागणार नाही याची खबरदारी सतीश पवार यांनी घेतली. सेनापतींना सरप्राईज मिळायला हवं होतं ना. अनेक वैशिष्ट्यांनी हा समारंभ देखणा झाला. ज्या सभागृहात कार्यक्रम होता त्याच्या दरवाज्याला दिलेला किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचा लुक, पाहुण्यांचे आगमन होताच तोफांच्या प्रतिकृतीतून झालेले (फटाक्यांचे) बार, त्यावेळी त्या तोफातून पाहुण्यांवर झालेला पुष्पवर्षाव, सभागृहात जाण्याच्या मार्गावर भिंतीच्या बाजूने लावलेली मोहिमेतील निवडक छायाचित्रे, व्यासपीठावर उभा केलेला राजवाड्याचार ‘सेटअप’, ऐतिहासिक काळाला शोभेल अशी बैठक रचना, पाहुण्यांच्या बाजूला भालदार-चोपदारांच्या पोशाखात उभे असलेले आमचे छोटे मावळे, सभागृहाच्या मागे मुलांनी किल्ल्यांवर संकलन केलेल्या विविध गोष्टीची केलेली मांडणी, व्यासपीठाच्या मध्यभागी महाराजांचा सुंदर पुतळा... कशा कशाचे वर्णन करायचे. .....

‘जय देव जय देव जय शिवराया’ या आरतीने झालेली कार्यक्रमाची सुरुवात नंतर मुलांनी जोशपूर्ण म्हंटलेले ‘रणी फडकती लाखो झेंडे’ हे पद्य, मोहिमेवर तयार केलेली १८ मिनिटांची ध्वनीचित्रफीत, मोहिमेविषयी मुलांनी लिहिलेल्या लेख-कवितांच्या निवडक भागाचे केलेले अभिवाचन, मुलांचे कौतुक करताना भेट दिलेली ‘शरभा’ची प्रतिकृती या साऱ्या गोष्टींनी कार्यक्रम रंगत गेला.  कार्यक्रमाला लाभलेले पाहुणेही तोलामोलाचे होते. जणू सह्याद्री आणि हिमालयाचे प्रतिनिधीच व्यासपीठावर होते. एक होते ज्येष्ठ इतिहासकार, दुर्गतज्ञ प्र. के. घाणेकर आणि दुसरे होते एव्हरेस्ट वीर श्रीहरी तापकीर. दोघांनीही मोहिमेचं, मुलांचं भरपूर कौतुक केलं. भटकंती सुरु ठेवा, असं सांगायला ते विसरले नाहीत.

आकाशवाणी केंद्राच्या बालोद्यान कार्यक्रमातही मोहिमेची दखल घेण्यात आली. आमच्या छोट्या मावळ्यांची मुलाखत वेदांगी ताईने घेतली. यानिमित्ताने तन्मय, हर्षवर्धन, सिद्धी, अदिती यांना स्टुडीओ बघता आला. रेकॉर्डिंगचा अमुभव घेता आला.

 

सहली – अनुभव शिक्षणाचे महत्त्वाचे साधन!

मंडळी अशा प्रकारच्या (किल्ले, प्राचीन मंदिरे, संग्रहालय भेटी) सहली आयोजित करणं हे विद्यार्थ्यांच्या अनुभव शिक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. सध्याच्या काळात अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही खूपच तंत्रस्नेही झाली आहे. अध्यापक, विद्यार्थी तंत्रज्ञानाची अनेक साधने वापरण्यात वाकबगार झाली आहेत. परंतु केवळ फोटो, व्हिडिओ यातच शिक्षण प्रक्रिया अडकून पडली तर ते धोक्याचे होईल. व्हर्च्युअल ते रियल हा प्रवास होण्यासाठी अशा सहली महत्त्वाच्या ठरतात. याबाबत थोर शिक्षण तज्ञ विनोबा भावे यांचे मत लक्षात घेण्यासारखे आहे. आपल्या मधुकर या पुस्तकात विनोबांनी म्हटले आहे, अश्व म्हणजे घोडा असे कोशात लिहिले असते. मुलांना वाटते अश्व शब्दाचा अर्थ कोशात दिला आहे. पण ते खरे नाही. अश्व म्हणजे घोडा हे इतकेच सांगते की अश्व शब्दाचा तोच अर्थ आहे जो घोडा शब्दाचा आहे. तो कोणता तर तबेल्यात जाऊन बघा. कोशात केवळ पर्यायी शब्द दिलेला असतो. पुस्तकात अर्थ राहत नाही अर्थ सृष्टीत राहतो. हे जेव्हा समजेल तेव्हा खऱ्या ज्ञानाची चव समजेल.

इतिहास विषयाशी संबंधित सहलींना तर अधिक महत्त्व आहे कारण बहुतांश शाळातून विद्यार्थ्यांना इतिहास विषय फारसा आवडत नाही. पण अशा सहलीतून विद्यार्थी वेगवेगळ्या वस्तू वास्तू प्रत्यक्ष बघतात; त्यातून या विषयाची आवड निर्माण होण्यास मदत होते. तसेच अशा सहलीतून आपल्या परिसराचा समृद्ध ऐतिहासिक वारसा मुलांच्या लक्षात येतो. आपण कोणत्या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या परिसरात राहतो हे समजून परिसराशी मुलांची जवळीक वाढते.

इयत्ता सातवीच्या महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इतिहास विषयाच्या पाठ्यपुस्तकात क्षमता विधाने दिली आहेत. त्या अंतर्गत ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे प्रयत्न करणे, ऐतिहासिक वारशाच्या जतनाचे प्रयत्न करणे, किल्ले-ऐतिहासिक वास्तू यांना भेट देऊन माहिती गोळा करणे अशा काही गोष्टी नमूद केल्या आहेत. या सर्वांसाठी सुद्धा अशा प्रकारच्या सहली योजणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे असे अनुभव शिक्षक किंवा पालक या नात्याने मुलांना देत राहूया.

या लेखाचा समारोप इ. ९ वीतील शांभवीने मोहिमेवर लिहिलेल्या कवितेतील शेवटच्या कडव्याने करतो. शांभवी लिहिते,

‘स्वराज्याचे सुराज्य कराया

तव तेजातील किरण दे

तव शौर्याचा एक अंश दे

तव धैर्याचा जरा स्पर्श दे...

 

शिवराज पिंपुडे

केंद्र प्रशासक

ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र

 ..............................................................................................................

(चौकट क्रमांक १)

मोहिमेची काही सांख्यिकी माहिती

मोहिमेची सुरुवात २२ एप्रिल २०१९

मोहिमेची सांगता २५ जानेवारी २०२०

सुरुवातीस सहभागी विद्यार्थी ७२

संपूर्ण मोहीम पूर्ण केलेल्या मुलांची संख्या ४०

त्यापैकी १४ मुली तर २६ मुले

४० पैकी सातवीतील ३ ते आठवीतील १३ नववीतील २४ जणांचा सहभाग

सर्व किल्ल्यांवर आलेल्या सेनापतींची संख्या २

२९ पैकी २४ ट्रेक रविवार किंवा अन्य शालेय सुट्ट्यांच्या दिवशी

 

(चौकट क्रमांक २)

मौनसंवाद

अनेक किल्य्यांवर आम्ही मौनसंवाद घेतला. – दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून स्वतःच्याच मनाशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विचार करण्याचं तंत्र! प्रत्येकाने आपला संवगडी निवडला. कोणी बुरुजाशी, कोणी मंदिरासमोरील दीपमाळेशी, कोणी तोफेशी तर कुणी चक्क गवताच्या पात्याशी संवाद करायला बसलं. आता कुणाचाच आवाज नव्हता. शांतता होती. स्तब्धता होती.  (एका मौनसंवादाचा निवडक भाग चौकटीत दिला आहे.)

 

मी – तुझ्यावर उभे राहिल्यावर किती मोठ्ठा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो ना! तुला तर रोजच खूप काही बघायला मिळत असेल नाही का या उंचीवरून?

बुरुज – हो तर. निसर्गाची विविध रूपे अनुभवताना मला छान वाटतं. ऋतूनुसार पडत जाणारा फरक अनुभवणं हा माझा छंदच झालाय.

मी – हे इतके मोठे भगदाड कसे पडले रे तुला?

बुरुज – अग एकदा शत्रूचा गोळा येऊन लागला. त्याच्या स्फोटानेच हे घडले.

मी – खूप वाईट वाटले असेल न तेव्हा तुला?

बुरुज – छे ग. उलट शत्रूचा वार मी माझ्या छातीवर झेलला याचा अभिमान वाटला. माझं कामच आहे ना ते.

मी – युद्धांच्या खूपच आठवणी असतील ना तुझ्याकडे?

बुरुज – खूप. तलवारींचा खणखणाट, तोफांचा गडगडाट, ‘जय भवानी’च्या घोषणा, प्राणांची पर्वा न करता लढणारे मावळे सगळ लख्ख आठवत बघ.

मी – तुझा सर्वात अभिमानाचा क्षण कोणता रे?

बुरुज – जेव्हा माझ्यावर ध्वज स्थंभ उभा करून भगवा ध्वज फडकवण्यात आला ना तेव्हा प्रचंड अभिमान वाटला स्वतःचा.

Comments

Popular posts from this blog

#लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास भाग - ३