अभ्यास दौऱ्यांची मी अनुभवलेली सूत्रे

 

अभ्यास दौऱ्यांची मी अनुभवलेली सूत्रे 

दोन आठवड्यांपूर्वी आबा दादांचा फोन आला होता आणि वैचारिक आहे तुमच पुणे केंद्रात असे त्यांनी सांगितलं. पुढच्या आठवड्यात संचालक निगडित आले होते. ते म्हणाले गप्पा मारायला ये रे पुण्यात.  गप्पा शब्द ऐकल्यावर हुश्श वाटल. पण पुणे केंद्राला गप्पा मारायला, ऐकायला आवडतात का असा एक प्रश्न मनात घेऊनच तुमच्या समोर उभा आहे. त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे की  तुम्ही सगळ्यांनी गप्पा ऐकण्याच्या मनस्थितीत बसाव. देशप्रश्न सोडवण्याची जबाबदारी आपल्यावर नक्की आहे  पण ती चेहऱ्यावर दिसलीच पाहिजे असा काही नियम नाहीये.

विषय ठरला आहे अभ्यास दौऱ्यातील मला सापडलेली सूत्रे. ढोबळ विषय मला समजल्यानंतर मीच हा विषय नेमका केला. पण तरी जसा विचार करत गेलो तस विषयाच्या शीर्षकात काही बदल मला करावेसे वाटले.  एक तर अभ्यास दौरा हा शब्द माझ्या  व्यक्तिमत्वाला जाणारा नाही अस मला वाटलं.  भटकंती शब्द अधिक योग्य राहील आणि सापडलेली सूत्रे म्हणण्यापेक्षा अनुभवलेली सूत्रे असा शब्द अधिक योग्य राहील असही वाटलं.

मंडळी मुळात भटकंतीची हौस असावी लागते. ती मला भरपूर आहे. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा ती मी भागवून घेत असतो. गेल्यावर्षीचा विचार करायचा म्हटला तर सात राज्यांमध्ये प्रवास झाला. संशोधन परिषदेत सहभागी होण्याच्या निमित्ताने दोन राज्यांमध्ये, कुटुंबीय आणि मित्रमंडळी सोबत दोन राज्यांमध्ये, अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने दोन राज्यांमध्ये आणि समूह गायन स्पर्धा घेण्याच्या निमित्ताने एका राज्यामध्ये. अर्थात हे काही कप्पे नाहीयेत मी केवळ निमित्त सांगत आहे तुम्हाला.

तर सुरुवात करूयात...

    पहिलं सूत्र असं मांडायच आहे की आपल्या प्रवासातून आपल्या रोजच्या, दैनंदिन कामाशी काहीतरी जोडता यायला पाहिजे. म्हणजे थेट कामात बदल, भर असं प्रत्येक वेळी होईल असं नाही. पण किमान विचाराच्या पातळीवर तरी काही संबंध आपल्याला लावता यायला पाहिजेत.

    यंदाच्या मे महिन्यात आसाम आणि मणिपूर राज्याचा दौरा केला. ईशान्य भारतात महाराष्ट्रातले जे लोक जाऊन वीस-पंचवीस वर्षे काम करतायेत. ज्यांनी स्वतंत्र संस्था स्थापन केली आहे, त्यांना भेटणं, त्यांच्या संस्था बघण आणि त्यांच्यावर लेख लिहिणं असा माझा एक हौशी प्रकल्प सुरू आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये जडणघडण दिवाळी अंकातून PSVP आणि रिवॉच या संस्थांचे लेख छापून आलेत. याच प्रकल्पाचा पुढचा टप्पा म्हणून मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आसाम आणि मणिपूर राज्यांमध्ये गेलो होतो. १३ दिवसांचा दौरा होता.

दौऱ्याची सुरुवात केली आसाममधून. दिब्रुगडच्या विमानतळावर उतरलो. रवी सावदेकर स्वतः तिथे घ्यायला आले होते. रविजी विवेकानंद केंद्राचं काम करतात. तेही मूळचे महाराष्ट्रातले आहेत. त्यांच्यासोबत आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. आमच्या विद्यालयातील क्रीडाकुल विभागाची एक विद्यार्थिनी आश्लेषा चिपाडे सैन्यात मेजर पदावर आहे.  तिथल्या एफ एस डी युनिटवर तिच पोस्टिंग होतं. तिला भेटण्यासाठी म्हणून आम्ही गेलो. विमानतळापासून  अगदीच अर्ध्या तासाच्या अंतरावर हे ठिकाण होतं. एफएसडी म्हणजे फीड सप्लाय डेपो. ईशान्य भारतात जितकी सैन्याची ठाणी आहेत, त्यात जितके सैनिक आहेत त्यांना जितकं अन्नधान्य लागतं ते सगळं प्रथम इथं मागवलं जातं, साठवलं जातं आणि मग इथून वितरित केलं जातं. त्यामुळे मोठा पसारा आहे. हजारो टनांच गोदाम आहे. मदर डेपो असचं म्हंटलं जातं. काही आकडे मुद्दामच ढोबळ सांगतोय तुम्हाला. सगळं अन्नधान्य तिथं एकत्रित करणं, त्यांचं वर्गीकरण करणं, ते सुरक्षित ठेवणं, ते वितरित करण्याचं मोठं जिकिरीचं काम असतं. भरपूर ताण-तणाव असतात या कामामध्ये असं तिनं सांगितलं. तिच्या गाडीतून सगळा परिसर तिनं फिरून दाखवला. दुपारचं जेवण तिच्यासोबतच झालं. अर्थातच भरपूर गप्पा झाल्या तिच्याशी. गप्पा मारताना ती असं म्हणाली की आम्हाला सातत्यानं स्वतःला सिद्ध करावं लागत. म्हणजे काय विचारलं तर म्हणाली पाच किलोमीटर अंतर सहज पळता याव लागतं. त्याचा रोजचा सराव ठेवावा लागतो. त्यात काही फार विशेष मानलं जातं नाही सैन्यामध्ये. त्यामुळे विशिष्ट वजन (सुमारे ३ किलो) घेऊन आणि तुमची ५ किलोची तुमची शस्त्रं घेऊन तुम्हाला पळता यायलाच पाहिजे. साधारणपणे २७ मिनिटात पाच किलोमीटर.  ‘वयानुसार काही सवलत मिळते की नाही? तिला विचारलं. ‘मिळते’ म्हणाली.  ‘किती मिळते’ असं विचारल्यावर म्हणाली दर पाच वर्षांनी दीड मिनिट वाढीव मिळतो. म्हणजे ३० व्या वर्षी २७ मिनिटात पळायचे असेल तर ३५व्या वर्षी २७.५ मिनिटात! इतकी मोठी सवलत कशाला देतात असं मला वाटून गेलं. तेव्हाच एक विचार मनामध्ये येऊन गेला की यांना कायम स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि व्यवस्थित त्याची परीक्षा द्यावी लागते.  मी निगडीतील अध्यापकांसमोर पण हा प्रसंग सांगितलला आणि म्हटलं आपलं बरं आहे. एकदा लागलो की लागलो. स्वतःहून कोणी कुठली परीक्षा देणं वेगळं पण रचनेचा भाग म्हणून आपली गुणवत्ता ठरावीक अंतरानं सिद्ध करण्याची, तपासण्याची काही यंत्रणा शिक्षण क्षेत्रात नाही.  अनुदानित शिक्षकांना बारा वर्षे झाली की एक पदोन्नती मिळते. २४ वर्ष झाली की दुसरी पदोन्नती मिळते. अनुभवांच्या वर्षांचा सगळा खेळ. पण जो विषय मी शिकवतोय त्यातली माझी तज्ञता ठरावीक अंतराने तपासणीची काही पद्धती असायला हवी का?

फार मोठ काही नाही पण समजा  विज्ञान विषय शिकवणारा शिक्षक आहे; तर बाबा यावर्षी तू तुझ्या विषयाशी संबंधित वाचलेल्या दोन अवांतर पुस्तकांचं  करून एक पानी टिपण सादर कर. इतकं साधंसोपं पण ठेवता येऊ शकेल. पण ते रचनेचा भाग म्हणून आणि सगळ्यांसाठी अनिवार्य म्हणून करता येऊ शकेल का?

गंमत म्हणजे मागच्या महिन्यात शासनाचं परिपत्रक आलंय. सेवेत असणाऱ्या सर्व शिक्षकांना TET परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झाला नाही तर तुम्हाला कोणतीही पदोन्नती मिळणार नाही. संस्था पातळीवर काही धोरण ठरवायला हव अस वाटून गेलं. पदोन्नतीपेक्षा गुणवत्ता वाढीसाठीच्या काही पद्धती संस्था पातळीवर ठरवता येतील का असा माझा मुद्दा आहे.

याच दौऱ्यात अशोक व अलका वर्णेकर यांनी आसाम आणि अरुणाचलच्या सीमेवरील पार्वतीपुर नावाच्या गावात एक संस्था स्थापन केली आहे. संस्थेतर्फे चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी शाळा चालवण्यात येते. तसेच अर्धनिवासी संस्कार शिबिर गेली अनेक वर्ष ते घेत आहेत. अर्धनिवासी असं म्हणताना पाचवी ते पदवीपर्यंतचे वेगवेगळ्या वर्गाचे शाळा कॉलेजचे विद्यार्थी संध्याकाळी केंद्रावर येतात. साधारणपणे पाच वाजता आपापले जेवणाचे डबे सोबत घेऊनच येतात. आल्यावर एक तास खेळ, अर्धा तास पाठांतर प्रार्थना मग त्यांनीच स्थापन केलेल्या मंदिरात आरती होते. नंतर दोन तास स्वतःचा अभ्यास आणि मग एकत्रित डबा खाणं. पुन्हा ज्याची जितकी क्षमता असेल तो दहा-अकरा पर्यंत अभ्यास करतो. सकाळी साडेचार वाजता सगळे उठतात. सूर्य आणि हनुमानाची प्रार्थना होते. व्यायाम होतो. परत एक तास अभ्यास करतात. तिथेच सगळ्यांच्या आंघोळी होतात. ठरवून दिलेल्या गटानुसार मंदिरात मुले पूजा करतात. आणि मग आठ वाजता सगळे आपापल्या घरी जातात. दिवसभर शाळा कॉलेज, घरची कामं करून परत संध्याकाळी केंद्रावर येतात. हा सर्व कार्यक्रम केंद्रामध्ये मोठे झालेले विद्यार्थ्यां सांभाळतात. म्हणजे एक प्रकारे केंद्राचे काही माजी विद्यार्थी हे आनंद शिबिर चालवतात.  तर वर्णेकर यांच्या कामाचा परिचय तुम्हाला यावा म्हणून थोडक्यात हे सांगितलं.

तिथे जेव्हा सकाळी काही मुलांना देवपूजा करताना बघितलं तेव्हा खूप छान वाटलं. त्यांच्यासाठी ४\५भारतीय पोशाख खास शिवून घेतले आहेत. ते वेगवेगळ्या मापाचे आहेत.  म्हणजे ३२,३४,३६,३८. ज्या मुलाचा जेव्हा वार असेल तेव्हा त्यानं आपल्या मापाचा तो भारतीय पोशाख घालून मग पूजा करायची. खूप मनापासून  दैनंदिन पूजा होते असं लक्षात आलं. मग वाटलं की निगडीच्या गुरुकुलामध्ये अस एखाद मंदिर असावं आणि कदाचित गणपतीचं करता येऊ शकेल कारण गणेशोत्सव आपण साजरा करतो. श्रद्धा हा एक भाग झाला पण त्या पलीकडे जाऊन  एकही दिवस खंड न  पडता एखादी कृती झाली पाहिजे हा संस्कार या माध्यमातून घडवता येऊ शकेल. एखादी गोष्ट एकही दिवस न चुकता करण्याचं भारतीय संस्कृतीमध्ये जे महत्त्व आहे ते कदाचित या देवपूजेतून बिंबवता येऊ शकेल का असा एक विचार येऊन गेला. कै. भाऊ म्हणजे वामनराव यांनी जेव्हा विपश्यना शिबिर केलं त्यानंतर त्यांनी शाळेत देहपरिचयाच्या तासिका सुरु केल्या. मा. मनोजराव आणि मिलिदराव यांनी जेव्हा देशभरातील प्रयोगशील शाळा बघण्यासाठी दौरे काढले त्यांनतर मनोजरावांनी शाळेत परिपाठ सुरु केला. 

अर्थात सुचलं म्हणजे लगेच सगळं होईलच असं नाही. पण जे आपण बघत आहोत त्याचा कुठे ना कुठे आपल्या कामाशी मनामध्ये तरी संदर्भ जोडता यायला पाहिजे असं पहिलं सूत्र मला वाटतं.

..............................................

दुसरं एक सूत्र असं वाटतं की दौऱ्यातून आपल्याला व्यक्ती वाचता यायला पाहिजेत. त्यांची स्वभाववैशिष्ट्यं टिपता यायला पाहिजेत. आणि विशेषत: जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या संस्थेच्या मुख्य पदावर कार्यरत असते तेव्हा तिची स्वभाववैशिष्टं नकळतपणे त्या संस्थेमध्ये प्रतिबिंब झालेली असतात. या दोन गोष्टी अशा फारशा वेगळ्या करता येत नाहीत. त्यामुळे व्यक्ती वाचायला आपण दौऱ्यामध्ये शिकलं पाहिजे. आता या अशोक वर्णीकर यांच्या विषयी सांगितले आहे तर दोन अगदी छोटे प्रसंग त्यांचेच सांगतो.

त्यांच्या केंद्रावरच्या एका मुलीचा कुठल्यातरी परीक्षेचा फॉर्म भरण्यात काही चूक झाली का तिचा फॉर्म वेळेत भरला गेला नाही आणि त्यामुळे तिला ती परीक्षा देता आली नाही. तर ती या दोघांकडे तिची तक्रार घेऊन आली होती. आम्ही तेव्हा तिथेच होतो. सकाळचा चहा त्यांच्यासोबत चालू होता. अलकाताई त्या मुलीला म्हणाल्या, ‘मी ताबडतोब चौकशी करते.’ त्यावर लगेच वर्णेकर सर म्हणाले, ‘अहो घाई करू नका. थेट आरोप करू नका. आधी चौकशी करा आणि मग आवश्यकतेप्रमाने  समज द्या.’ छोटाच प्रसंग आहे पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू हा प्रसंग दर्शवून जातो.

संस्थेची माहिती देताना माहिती देताना चुकून एखाद्या व्यक्तीचं नाव सांगायचं राहिल आणि नंतर त्यांना ते आठवलं तर आवर्जून ते नाव सांगत होते. ३-४ वेळा घडलं असं. या व्यक्तीचाही सहभाग होता आमच्यासोबत अस सांगत होते. त्यामुळे ज्यांचं योगदान आहे त्याला न वगळण्याची त्यांची वृत्ती अगदी सहज लक्षात येत होती. 

दोन वर्षांपूर्वी अरुणाचलमधील विजय स्वामी यांच्या riwatch संस्थेमध्ये गेलो होतो. पहिल्या दिवशीचा सगळा आमचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री विजयजी आमच्या खोलीत आले आणि म्हणाले,

शिवराज, उद्या एक रात्र तुम्ही माझ्या खोलीत रहायला या. उद्या तुमच्या खोलीमध्ये सिंफु जमातीचे लोक दोन दिवसांसाठी येणार आहेत.”

चालेल की सर. पण काय विशेष म्हंटलं?”

आपण त्यांच्या भाषेतील काही पुस्तकं प्रकाशित करत आहोत. तर त्या सगळ्या पुस्तकांचं प्रमाणिकीकरण करण्यासाठी त्यांना आपण बोलावलं आहे.”

छान वाटलं आम्हाला. म्हणजे रीवॉचच्या आणखी एका कामाचे प्रत्यक्ष साक्षीदार त्यामुळे होणार होतो आम्ही. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सात जणांची टीम आली. दोन दिवस त्यांचं काम चाललं. काही काळ तिथं थांबून त्या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला.

रात्री सगळे एकत्र जेवायला बसल्यावर सिंफू लोकांसाठी वेगळ्या भांड्यातून पदार्थ आणल्याचं लक्षात आलं. चौकशी केल्यावर समजलं की त्यांना आवडतं म्हणून डुकराचं मटण त्यांच्यासाठी बाहेरून विजयजी यांनी मागवलं होतं. स्वतः पूर्ण शाकाहारी असले तरी सिंफू लोकांची आवड विजयजींनी जपली होती. खरंतर ईशान्य भारतात इतकी वर्ष राहूनही विजयजी मिश्राहारी झाले नाहीत ही एक आश्चर्याचीच गोष्ट मला वाटली! असे व्यक्तिविशेष आपल्याला टिपता यायला हवेत.

फक्त एकच हळहळ त्या रात्री वाटून गेली की एकदाही विजयजींनी विचारलं नाही की तुम्हाला त्या भांड्यातील पदार्थ चाखायला आवडेल का म्हणून? त्यामुळे आयुष्यातील एका अनुभवाला मुकलो त्या रात्री मी. असो.

तर दौऱ्यामध्ये असताना आजूबाजूला घडणाऱ्या अशा प्रसंगातून व्यक्ती निरीक्षण सुरू असल पाहिजे आपलं. आणि दौऱ्यातून संपर्क झालेल्या व्यक्ती नंतरही जोडून ठेवल्या पाहिजेत. जोडून ठेवणं जरा मोठा भाग झाला किमान पक्षी वर्षातून एकदा तरी त्यांना संपर्क केला पाहिजे. पण अशा दौऱ्यातून मैत्री किती गाढ होऊ शकते तर साधारणपणे २० वर्षांपूर्वी पंजाबमध्ये मातृभूमी परिचय शिबिराच्या निमित्तानं गेलो होतो. अहलुवालिया या नावाच्या गृहस्थांनी सगळी व्यवस्था केली होती. वय सत्तरीच्या आसपास असेल त्याचं. खूप छान मैत्री झाली आमची. इतकी छान की त्यानंतर साधारण वर्षभरानंतर माझं लग्न होतं तर त्यासाठी हा बाबाजी खास विमान प्रवास करून लग्नासाठी दोन दिवस वेळ काढून घरी आला होता. वेगवेगळ्या व्यक्तींबाबतचे असे खूप प्रसंग मला सांगता येतील. त्यामुळे दौऱ्यात ओळखी होणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहणं, त्यांच्याशी मैत्री करणं, आपल्या कामाशी त्यांना जोडता येणं या दिशेन हा प्रवास व्हायला हवा.

........................

आपण दौरे करतो त्या पाठीमागे एक सूत्र असतं की कळतनकळत काही ना काही प्रेरणा आपल्याला मिळावी. असलेली वाढावी. पण याबाबतीत मी दोन प्रकार अनुभवतो. पहिला प्रकार सांगतो. एकदा आमच्या शिक्षकांना घेऊन एक अत्यंत प्रयोगशील शाळा बघायला गेलो होतो आणि खूपच छान वाटलं मला. अतिशय मनापासून अध्यापक वर्ग काम करत होता. अनेक नावीन्यपूर्ण कल्पना त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये राबवल्या होत्या. आणि माझ्या मनात चालू होतं हे करून बघता येईलआपल्या या उपक्रमात हा छोटासा बदल करता येऊ शकेल...

पुण्यात परत आल्यानंतर दोन-चार दिवसांनी सगळ्यांशी एकत्रित चर्चा त्या शाळेच्या भेटीविषयी सुरू होती. आमच्यातले काही लोक म्हणाले ‘काही विशेष वाटलं नाही शाळा बघून.’ मला आश्चर्य वाटल. म्हटलं ‘म्हणजे? ‘त्यांनी सांगितलेले अनेक उपक्रम करतोस की आपण शाळेत.’ मी तिथल्या दोन उपक्रमांची नाव सांगून विचारलं ‘हे कधी झाले होते आपल्याकडे? ‘त्या नाही का त्या मुख्याध्यापिका आपल्याकडे होत्या तेव्हा त्यांनी केलं होतं विभागात असं.’ म्हटलं ‘कधी?’ ‘झाले त्याला सात आठ वर्ष.’ म्हणाले. जो उपक्रम स्वतः कधी केला नाही, जो विभागाच्या नित्य कामकाजाचा भाग नाही, जो गेल्या दोन वर्षात झाला नाही असा उपक्रमही जर आपल्याकडे होतो असं वाटत असेल तर तर कसं काय नवीन सापडणार आणि काय प्रेरणा वाढणार अशा व्यक्तीची?

हे तर करतोच आपण आपल्या विभागात, हे तर होतच प्रबोधिनीमध्ये असा दृष्टिकोन न ठेवता मन मोकळं ठेवून गोष्टी बघता यायला पाहिजेत. तर हा एक प्रकार झाला.

दुसरा एक प्रकार असतो. आमच्या एक अध्यापिका मध्यप्रदेशमध्ये आदरणीय भारतीताई जी शाळा चालतात तिथे गेल्या होत्या.  ५/६ दिवस मुक्कामी होत्या. आणि मग  त्या इतक्या भारावून आल्या की काही विचारू नका.  त्या शाळेचं कौतुक चालू होतं काही दिवस. ‘काय तिथली मुलं, काय त्यांची शिस्तकाय त्याचं संस्कृत पाठांतर, मोठ्यांशी वागण्याची काय त्यांची आदराची पद्धत...’ इत्यादी इत्यादी. त्यांचं कौतुक इथपर्यंतही एक वेळ ठीक आहे हो.  पण नंतर... ‘काय आपली मुलं, कितीही सांगून काही  उपयोग नाही, किती तो बेशिस्तपणा...’ असं पालुपद सुरू झालं. इतके भारावून जातात, इतके भारावून जातात की आपलंच काम नगन्य वाटायला लागतं, कधी कधी अगदी तुच्छ वाटायला लागतं. हाही दृष्टिकोन अत्यंत चुकीचाच. आपणही अत्यंत महत्त्वाचं काम करत आहोत, देशाचं रूप पालटण्यामध्ये आमचाही काही वाटा आहे असं मनात ठेवून गोष्टी बघितल्या तर कदाचित या प्रकारचे नकारात्मक भाव निर्माण होणार नाहीत अस वाटत. उलट आपली प्रेरणा अधिकाधिक खोल होत आहे असा अनुभव मिळेल. एक उदाहरण देतो. विजय स्वामी यांचंच देतो.

अरुणाचल मधील riwatch संस्थेच्या विजय स्वामी यांची मुलाखत घेत होतो. खूप मोठ काम केलंय विजय स्वामी यांनी. विजयजी इतकं कर्तृत्व केल्यावर आता धन्यता अनुभवत असाल ना आपण?” माझ्यासोबत दौऱ्यात सहभागी असणाऱ्या मित्रवर्य रामभाऊंनी मुलाखतीतील जणू शेवटचा प्रश्न विचारला. त्यावर विजयजी म्हणाले, त्याचं अस आहे रामभाऊ मला रीवॉचला विद्यापीठाचा दर्जा मिळवून द्यायचा आहे. मगच शांती लाभेल मला.”

सत्तरीच्या जवळ पोहचलेल्या विजयजींनी त्यांचं पुढचं स्वप्न मोठ्या निश्चयानं व्यक्त केलं होतं. अशावेळी आपणही प्रेरणेची एक वेगळी पातळी अनुभवत असतो.

.................................................

दौऱ्यात भेटलेल्या व्यक्ती, अनुभवलेले प्रसंग, पाहिलेल्या संस्था यामुळे काही वेळा स्वतःमध्ये काही बदल करावा असं आपल्याला वाटायला लागतं. हे बदल आपल्या दिनाचर्यतले असू शकतात, आपल्या सवयींमधले असू शकतात, आपल्या स्वभावामधले असू शकतात. इथपासून ते पूर्ण आयुष्याचं उद्दिष्ट सुद्धा कदाचित एखाद्या दौऱ्यामध्ये सापडू शकतं. आपल्याला आयुष्याचं उद्दिष्ट वगैरे सापडणं अपेक्षित नाहीये कारण ते सापडलंय आपल्याला. म्हणून तर आपण प्रबोधिनीमध्ये आहोत. पण याच एक उदाहरण देतो मी. अशोक वर्णेकर यांच्या संस्थेमध्ये सुश्रुत करवंदे या युवकाची भेट झाली. मूळचा पुण्यातील आहे हा. ईशान्य भारतात काम करावं अशी उर्मी त्याला होती. पण उर्मीच संकल्पात आणि संकल्पाचं कृतीत रूपांतर व्हायला ज्ञानसेतू मार्फत केलेला दौरा कारणीभूत ठरला. २०१८ च्या मे महिन्यात तो ज्ञानसेतू प्रकल्पांतर्गत वर्णेकर यांच्या संस्थेत गेला होता. तिथे काम करण्याची गरज त्याला लक्षात आली. वर्णेकर यांच वय आणि त्यांची प्राथमिकची शाळा किंवा संस्कार केंद्रात येणारे छोटे विद्यार्थी यांच्या मध्ये दुवा साधणारं कोणी तरी मधल्या वयाचं हवं असं त्याला तीव्रतेनं वाटलं. इथे कामाची गरज आहे तुमच्यापैकी कोणीतरी यायला हवं अस अशोकजींनी केललं आवाहन त्याच्यापर्यंत पोहोचल आणि लगेच जून महिन्यात तो त्यांच्या केंद्रात रुजूही झाला. आज सहा वर्ष तो तिथे दटून आहे. छान काम करतोय.  पुढे तो तिथेच टिकेल, का आणखी काही करेल ते काही माहीत नाही. पण आयुष्यातील उमेदीची सहा वर्ष एखाद्या दौऱ्यामुळे द्यावीशी वाटणं हे काही कमी महत्त्वाचं नाही. तर इथपर्यंतचा परिणाम एखादा दौरा घडवू शकतो इतकंच यातून आपणं लक्षात घेऊया. आणि आपण विचार करताना मगाशी म्हटलं तसं  दिनक्रम, स्वभाव, सवयी, आपल्या कामाच्या पद्धती यातल्या छोट्या मोठ्या बदलांचा विचार दौऱ्यामध्ये नक्की मनात येऊ शकतो. तसा तो करत राहुयात.

......................................................

    

    पाचवं सूत्र मांडण्यापूर्वी दोन अनुभव सांगतो. छत्तीसगडमधील भोरमदेव अभयारण्यात गेलो होतो. तितली संमेलन होतं. फुलपाखरांचं वैविध्य आहे त्या भागात. तर त्यांची नोंद करणं, मोजणी करणं अशा प्रकारचं काम होतं. पाच राज्यातून ५८ जण आले होते. मी पण त्यातला एक होतो. दोन दिवसांच संमेलन होतं. आमचे पाच गट करून वेगवेगळ्या मार्गांवर पहिल्या दिवशी त्यांनी आम्हाला पाठवलं. सुमारे दहा किलोमीटर  चाललो आम्ही जंगलात. ढीग फुलपाखरं बघितली. वेगवेगळ्या प्रकारची. आयुष्यात पहिल्यांदाच इतकी फुलपाखरं बघितली आणि नुसती बघितली नाही तर काही हातावर पायावर पण येऊन  बसली होती.  संध्याकाळी सगळे गट एकत्र आल्यानंतर एकमेकांना सांगत होते की काय काय बघितलं म्हणून. तर तिथलं जे एक वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरू आहे ते फक्त एकाच गटाला बघायला मिळालं होतं. मग बाकीचे गटातले काही लोक म्हणाले की ‘आम्हाला पण ते बघायचंय. तर उद्या आमची व्यवस्था करा.’ अर्थात मीही होतो या गटात. मग अशा इच्छुक लोकांसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी एक गाडी तयार ठेवण्यात आली. त्या गाडीतून थोडा प्रवास झाल्यावर एके ठिकाणी आम्हाला उतरवण्यात आलं. तिथून साधारण दोन किलोमीटर चालायचं होतं. कालच्या दहा किलोमीटरच्या प्रवासानं पाय बोलायला लागले होते, त्यामुळे जीवावर आलं होतं खूप चालणं. पण एकीकडे ते फुलपाखरू बघण्याची ओढही होती. अर्ध्या तासानं एका ठिकाणी पोचलो आम्ही. सोबत जो गाईड होता तो म्हणाला काल इथेच बघायला मिळालं होतं. सगळ्यांच्या नजरा आसपासच्या झाडावर भिरभिरू लागल्या. एका झाडावर गाईडला ते दिसलं. हे बघा ऑरेंज ओक्लिफ.  त्यांन ज्याला फुलपाखरू म्हणून जे दाखवलं ते फुलपाखरू आहे यावर विश्वास ठेवणं खूपच अवघड होतं. वाळलेल्या पानाचा आकार आणि वाळलेल्या पानासारखाच रंग. हुबेहूब वाळकं पान. पंखांच एक टोक पानाच्या टोकासारखं आणि दुसरं टोक पानाच्या देठासारखं. इतकंच नाही तर पंखांवर बुरशी सारखे ठिपकेही  होते. अनुकूलन ज्याला म्हणतात त्याच एक अप्रतिम उदाहरण आम्ही बघत होतो. लगेच सगळ्यांच्या कॅमेऱ्यांनी क्लिक क्लिक केलं. मोबाईलमध्ये त्याला पकडण्याची धडपड सुरू  झाली. त्यात एकाचा पाय घसरला आणि ते धडपडलं. या सगळ्या हालचालींमुळे ते फुलपाखरू उडालं. ते उडालं तेव्हा सगळे जण केवळ डोळे विस्फारून समोरचं दृश्य बघत होते. बाहेरून वाळकं पान वाटणार त्या फुलपाखराच्या पंखांचे आतले रंग कसे होते, तर पंखांची टोके काळी होती. त्याखाली केशरी छटा होती आणि त्याखाली गडद निळा रंग होता. कमाल दृश्य होतं ते. स्वतःला एकदोन क्षण विसरण्याचा अनुभव घेतला मी. त्या फुलपाखराशी एकरूप होण्याचा अनुभव घेतला मी.

आणखी एक प्रसंग सांगतो. साधारण दहा वर्षांपूर्वी हिमालयात ट्रेकिंगचा योग आला. बिलकुल इच्छा नव्हती कारण हिमालयात ट्रेकिंग करण्याची माझी शारीरिक क्षमता नाही याची मला पक्की खात्री होती. पण केंद्रप्रमुख मनोजराव यांनी मला घेऊन जायचा चंगच बांधला होता. पाठीवरून घेऊन जाईल तुला पण यावचं लागेल तुला अस म्हंटल्यावर काय करणार होतो मी बापडा. मग दीड महिना कसून सराव केला आणि सहा दिवसांची ती मोहीम केली. सह्याद्री आणि हिमालयातील ट्रेकमध्ये जमीन असमानाचा फरक आहे. बर्फातून चालणं सोपं काम नाही. एकेक पावूल जपून टाकावं लागतं. काही वेळा अचानक पाय गुढग्यापर्यंत खोल जातो. त्यात पाठीवर ७-८ किलोचं साहित्य असतं. काही ठिकाणी पाय घसरला तर आधी खाली आणि मग थेट वर जाऊ शकतो आपण. कधी रात्री असा वारा सुटतो की तंबूसकट आपणही उडून जाऊ की काय वाटायला लागतं. हिमायातील निसर्ग एकदम बेभरवशाचा. क्षणात रंग बदलतो निसर्ग इथे. घडीत ऊन, तर घडीत पाऊस, घडीत हिमवृष्टी सुरु होते. पाण्यात हात घालवत नाही इतकं थंड पाणी. पाण्याशी संबंधीत कोणतीही क्रिया करणं जीवावर येतं अक्षरश:! हे थंड पाणी २\३ दिवसांनी तुमच्या शरीराला मानवेनासं होतं. असं बरंच काही असतं हिमालयाच्या ट्रेकमध्ये. पण आमच्या मोहिमेच्या चौथ्या दिवशी जेव्हा आम्ही साडेबारा हजार फुटावरच्या आमच्या शेवटच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा सगळीकडे पसरलेला बर्फ, वरून होणारी हिमवृष्टी, मधूनच सूर्यप्रकाशात झळाळून येणारे बर्फाच्छादित डोंगर... विलक्षण अनुभव होता. परमेश्वराच्या या रूपाला मनःपूर्वक वंदन केलं आणि कोपरापासून नमस्कारही केला. परत तुझ्याकडे येणं नको बाबा म्हणालो. पण क्षमता असणाऱ्यांनी आयुष्यात हिमालयात एक तरी ट्रेक केला पाहिजे, हिमालयाचं रूप डोळे भरून पाहिलं पाहिजे.

तेव्हा सूत्र आहे आपल्या दौऱ्यात निसर्ग अनुभवण्यासाठी आवर्जून वेळ ठेवा. मन व्यापक होण्यासाठी समृद्ध निसर्गाचं दर्शन आवश्यक आहे असं मला वाटतं. केवळ निसर्गाच दर्शन घ्यायला गेलोय, त्यासाठीच केवळ प्रवास केलाय असं मी फार क्वचित केलंय मी. पण जिथे कुठे दौऱ्यासाठी जातो तिथे एकदोन दिवस आवर्जून तिथली निसर्गाची विविधता अनुभवण्यासाठी ठेवतो. आपण सिमेंटच्या जंगलात राहतो; या जंगलातून बाहेर पडून खरोखरच जंगल अनुभवण्याची संधी जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा मी ती घेत असतो. 

भगवद्गीतेतील दहावा अध्याय यासाठी नक्की बघा. खुद्द परमेश्वरानं म्हणून ठेवलंय की ही ही माझीच रूपे आहेत. आता विनोबांनी म्हटलंय सागरात जो परमेश्वर आहे तोच पाण्याच्या एका थेंबातही आहे. पण पाण्याच्या थेंबातला समजायला आधी सागरामध्ये तर पाहता यायला हवा.

थोडक्यात काय तर संधी मिळेल तेव्हा निसर्गातील परमेश्वराच्या अनंत रूपांचं दर्शन घ्यायला विसरू नका. ते दर्शन घेत असताना आधी स्वतः तो क्षण अनुभवा, स्वतःला विसरण्याचा, समोरच्या दृश्याशी एकरूप होण्याचा अनुभव घेता येतो का बघा. आणि मग इतरांना फोटोद्वारे पाठवण्याची घाई करा. बराच वेळा समोरचं दृश्य आपल्याला बघायचं असतं का तिथे नसलेल्या इतरांना पाठवण्याची आपल्याला घाई असते  असा प्रश्न मला पडतो. मला काय म्हणायचंय ते तुम्हाला कळत असेल.

...........................................

    गेल्या दहा वर्षात अनेक सहली काढल्या मुलांच्या मी आणि अभ्यास सहली असंच म्हणतो मी त्यांना. सहाध्याय दिन वगैरे म्हणत नाही. आपल्याला समजतील आणि इतरांना समजतील असे शब्द वापरलेले बरे असतात. विनोबांनी एके ठिकाणी लिहून ठेवलंय की अश्व म्हणजे घोडा नव्हे. घोडा हा आश्व शब्दाचा समानार्थी शब्द आहे. अश्व शब्दाचा खरा अर्थ तबेल्यामध्ये बघायला मिळेल. पुस्तकात अर्थ राहत नाही अर्थ सृष्टीमध्ये राहतो. या वाक्याचा माझ्यावर जबरदस्त पगडा आहे. आपल्यापैकी एक मोठा गट विद्यार्थ्यांवर काम करणारा आहे. तेव्हा मुलांच्या सहली काढताना कोणत्या पाच गोष्टी लक्षात ठेवाव्यात अस अगदी थोडक्यात मांडतो.

पहिलं सूत्र हे तर कुठल्याही  शिक्षणाचं मूलभूत सूत्र आहे. कोणतीही गोष्ट शिकण्याची इच्छा विद्यार्थ्यांच्या मनात तयार झाली पाहिजे. त्यामुळे सहलीपूर्वी सहल ज्या ठिकाणी जाणार आहे त्याच्याशी संबंधित तज्ञ व्यक्तींचा  संवाद आम्ही योजतो. म्हणजे समजा भिगवणला पक्षी बघायला जायचे तर पक्षीतज्ञ येतो. पक्षी म्हणजे काय, त्यांची वैशिष्ट्यं, त्यांचे प्रकार सांगतो. स्थानिक पक्ष्यांचे फोटो, भिगवणला जे स्थलांतरित पक्षी बघायला मिळतील त्यांचे फोटो तो दाखवतो. त्यातून हे पक्षी उद्या आपल्याला बघायला जायचंय असं म्हटलं की जबरदस्त उत्सुकता निर्माण झालेली असते मुलांच्या मनात. 

दुसरी गोष्ट जे बघायला चाललो आहोत ते बघण्यासाठी जे काही आवश्यक साहित्य असेल ते आपल्या सोबत असलं पाहिजे. म्हणजे पक्षी बघायला जात आहोत आणि दुर्बिण सोबत नसेल तर फार काही चांगलं निरीक्षण करता येणार नाही. 

तिसरी गोष्ट सहलीतही पक्षीतज्ञ सोबत असला पाहिजे. सगळ्या गोष्टी शिक्षकालाच माहिती असल्या पाहिजे असं मला काही वाटत नाही. समाजात अनेक तज्ञ आहेत. त्यांना शाळेशी या निमित्ताने आपल्याला जोडता यायला पाहिजे. फक्त यातली सांभाळण्याची गोष्ट इतकीच असते की तज्ञ व्यक्ती सोबत असला तरी त्यांनी थेट माहिती  देण्यास सुरुवात करण्यापूर्वी मुलांना निरीक्षण करण्याची संधी, केलेलं निरीक्षण मांडण्याची संधी आणि निरीक्षण करताना पडलेले प्रश्न विचारण्याची संधी आधी आपण मुलांना दिली पाहिजे. आणि मग तज्ञ व्यक्तीचा संवाद ठेवायचा. त्याच्याकडून परिसराची माहिती समजून घ्यायची. 

चौथी गोष्ट बऱ्याच वेळा आपण मुलांना सहलीमध्ये म्हणतो की निरीक्षण करा, टिपणं काढा, नोंदी करा पण म्हणजे नेमकं काय करायचं हे मुलाला समजतं असं नाही. त्यामुळे एखादी  निरीक्षण सूची आपण देऊ शकलो तर नक्की उपयोग होतो. म्हणजे एखादा पक्ष्याची नोंद करायची आहे; तर कोणत्या वेळी दिसला, कुठे दिसला, काय करत होता, त्या प्रकारचे एकावेळी किती पक्षी दिसले आणि मग दुर्बिणीतून बघताना त्याच्या वेगवेगळ्या अवयवांचा रंग कसे होते; अशी एक छोटी सूची करून दिली तर नेमकं काय नोंदवायचं ते विद्यार्थ्याला कळतं. पक्षी बघायचा म्हणजे नेमकं काय बघायचं हे त्याला यातून समजत जातं.

आणि पाचवी गोष्ट म्हणजे चारभिंतींच्या बाहेर मुलांसोबत आपण असताना मुलांची निरीक्षण करणं, त्यांच्याशी मनमोकळा संवाद करणं, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात  डोकावण्याचा प्रयत्न करणं असं शिक्षकानं केलं पाहिजे. शिक्षकानं पक्षी बघण्यात गुंग होणं अपेक्षित नाहीये.

पूर्व माध्यमिकची तीन वर्ष म्हणजे सहावी ते आठवी आणि माध्यमिकची दोन वर्ष म्हणजे नववी-दहावी. या पाच वर्षात प्रबोधिनीतल्या विद्यार्थ्यांना पाच प्रकारच्या गोष्टी अनुभवण्याची संधी आपण नक्की दिली पाहिजे. तो आपल्या रचनेचा भाग असायला पाहिजे.

एक म्हणजे निसर्गामधील एखादी गोष्ट अनुभवण्याची योजना केली पाहिजे. जसे की देवराई, स्थलांतरित पक्षी, रानफुले, अभयारण्य, समुद्रकिनारा, भुरुपे यापैकी एखादी गोष्ट. 

तसेच इतिहास विषयातील एखादी गोष्ट पाहण्याची योजना असली पाहिजे. जसं की विरगळ, लेणी, मंदिर, संग्रहालय यापैकी एखादी गोष्ट.

निसर्ग आणि इतिहास यासाठी की नंतर जे पर्यटन आपण करतो त्यावेळी यातल्याच गोष्टी आपण प्रामुख्याने बघत असतो.

तिसरी गोष्ट म्हणजे एखादा तरी ट्रेकिंगचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. ट्रेकिंगचा उल्लेख निघाला म्हणून एका मोहिमेविषयी सांगतो. २०१९ मध्ये दुर्ग जागर मोहीम काढली होती. पुणे जिल्ह्यात २९ किल्ले येतात. तर दहा महिन्यातील रविवार वापरून हे किल्ले सातवी ते नववीतील निवडक ४० मुलांच्या गटासोबत सर केले होते. या मोहिमेत राजगड ते तोरणा असा ट्रेक आम्ही केला होता. पहिल्या दिवशी राजगड चढून, सगळा गड फिरून बघितला. रात्री गडावरच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी तोरण्याच्या दिशेने चढाई करायची असं नियोजन ठरलं होतं. पण आमच्यातील एका थोर व्यक्तीनं कल्पना काढली की रात्रीच तीन चार डोंगर पार करू  म्हणजे दुपारी  ऊन चढायच्या आत आपण तोरण्यावर पोहोचलेलो असू. आणि एका ठिकाणी मुलांची राहण्याची व्यवस्था होईल, असं आश्वासनही त्यानं दिलं. जेवण वगैरे झाल्यावर आम्ही निघालो. खरे तर दिवसभर राजगडने सगळ्यांना दमवलं होतं. पण एकमेकांना प्रोत्साहन देत चालणं सुरू केलं. साधारणपणे तीन तास काही डोंगर वर खाली केल्यानंतर एक झोपडीवजा घर दिसलं एकदाचं. आणि आम्ही तिथे पोहोचल्यावर त्या घराच्या मालकानं मध्यरात्री एक वाजता त्याच्या  गोठ्यातल्या गाई म्हशी बाहेर काढायला सुरुवात केली. आम्हाला काही समजेना. मग तो म्हणाला तुमच्या मुलींची राहण्याची व्यवस्था इथे आहे. आता मुलींची तिथे तर मुलांची कुठे असेल हे मी लगेच ओळखलं आणि आहे त्या जागी पथारी पसरली माझी. माझ्या कृतीतून योग्य तो संदेश घेतला आमच्या पोरांनी. पंधरा मिनिटात त्यातल्या त्यात सपाटीचा भाग शोधून प्रत्येक जण आडवा झाला. कोणत्याही प्रकारची भीती मनात निर्माण होण्याआधीच सगळे गाढ झोपले. कारण शरीर तेवढं दमलं होतं. तर असे रात्री ट्रेकिंग करण्याचे, चुलीवर एखादा पदार्थ करण्याचे, माळरानावर झोपण्याचे अनुभव एकदा तरी शालेय, महाविद्यालयीन जीवनात मुलांनी घेतले पाहिजेत की.

चौथी गोष्ट म्हणजे शहरी मुलांना ग्रामीण जीवनाचा परिचय करून देण्याची काहीतरी व्यवस्था आपली हवी.

आणि पाचवी गोष्ट निवडक विद्यार्थ्यांना का होईना पण अन्य राज्यातील प्रवास आपण घडवला पाहिजे.

निगडीमध्ये घरकुलातील विद्यार्थ्यांसाठी यातील ८०% गोष्टी घडवणं आम्हाला जमलं आहे.

..........................

     आपल्या विभागाचे दौरे होतील का ते मला माहीत नाही. पण आपण सगळे जण वर्षातून किमान एकदा कौटुंबिक सहलीला जात असतो. त्यावेळी काय लक्षात ठेवावं की ज्यातून त्या सहली पण अधिक अर्थपूर्ण होऊ शकतील अशी पाच सूत्रं सांगतो. मला खात्री आहे की आपण वापरतही असाल ती. एकदा उजळणी करू फक्त.

पहिलं सूत्र त्यातलं असं की जरी कौटुंबिक सहल असली तरी जिथे जाणार आहोत त्या ठिकाणांचा पुरेसा आधी अभ्यास करून जावा.  मोबाईलमध्ये आपल्याला सगळं उपलब्ध आहे. आधी जाऊन आलेल्यांनी लिहिलेले लेख असतात. युट्युब वर अनेक व्हिडिओ उपलब्ध असतात. त्यातून काय महत्त्वाचंकाय नक्की बघायचं, काय सुटलं तरी चालेल, कुठल्या गोष्टीसाठी किती वेळ द्यायचा असं सगळ ठरवता येतं. तर पूर्व अभ्यास नक्की करावा.

दुसरी गोष्ट म्हणजे कितीही पूर्व अभ्यास केला आणि संबंधित ठिकाणी जर गाईड उपलब्ध असेल तर जरूर गाईड करावा. व्हिडिओ मध्ये वाचलेलं, पाहिलेलं सगळं तिथं आपल्याला सापडेलच असं होत नाही. महत्त्वाचं म्हणजे तो परिसर बोलका करण्याची ताकद गाईड मध्ये असते. तर उगाच कशाला पैसे वाया घालवा असा विचार न करता गाईड नक्की करावा. 

तिसरी गोष्ट संबंधित ठिकाणी विविध प्रकारच्या लोकांशी भरपूर गप्पा माराव्यात. त्यातून खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळत जाते. म्हणजे कधी कोणत्या मंदिरात गेला तर आवर्जून तिथल्या पुजाऱ्याशी बोला. बाहेरच्या विक्रेत्यांशी बोला. कधी किल्ल्यावर गेला तर पायथ्याला असणाऱ्या गावातील लोकांशी बोला. जंगलात गेला तर तुम्ही सफारी करत असलेल्या गाडीतल्या ड्रायव्हरशी बोला. परिसराचे, तिथल्या लोकजीवनाचे वेगळे पैलू या सगळ्यातून समोर येतात. या मे महिन्यात घरच्यांसोबत माथेरानला गेलो होतो. पहिल्या दिवशी भरपूर पायपीट केली. तिथे फिरण्यासाठी कुठलीच गाडी नाहीये. त्यामुळे चालत किंवा घोड्यावरून फिरणं असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. दुसऱ्या दिवशी घरच्यांची चालण्याची इच्छा नव्हती. घोडे करायचं ठरलं. घोड्यावरून जात असताना त्या घोडेवाल्याला मी फक्त एक प्रश्न विचारला. ‘माथेरानमध्ये साधारण किती घोडे असतील रे?’ याचं त्यानं जे उत्तर दिलं त्यानंतर बायको आणि मुलगी दोघेही अर्धा तास गप्पा मारत होते त्याच्याशी. त्यामुळे पिल्लू सोडायला मी यशस्वी झालो होतो.  मी जर लेकीला असं म्हणालो असतो की जरा त्या घोडेवाल्याची मुलाखत घे तर लगेच ती म्हणाली असती, ‘बाबा ही काय तुमची अभ्यास सहल नाहीये.’ अभ्यास सहल आणि कौटुंबिक सहल या दोन वेगळ्या गोष्टी नाहीयेत. पण माझ्या घरच्यांपर्यंत मी ते पोहचवू शकलेलो नाही; हे शिक्षक म्हणून माझ अपयश समजतो मी. 

पुढचं सूत्र म्हणजे आपल्यासोबत आपली शाळकरी वयाची मुले असतील किंवा नातवंड असतील तर  त्यांच्यामध्ये या सहलीची काही छोटी मोठी जबाबदारी नक्की द्या. बऱ्याच वेळा कौटुंबिक सहलीचं नेतृत्व आई बाबा करत असतात आणि मुलांनी फक्त मजा करायची असते अस काहीसं आपल्या डोक्यात असतं. ‘रोज इतके पैसे देऊन ठेवतो. दिवसभर तूच सगळा खर्च कर आणि संध्याकाळी हिशोब दे.’ ‘आ]अन कुठल्या हॉटेलमध्ये आपण नाश्ता जेवण करायचं हे तू ठरव.’ अशा य गोष्टी आपण मुलांना सांगू शकतो आणि या करण्यात त्यांनाही मजा येऊ शकते.

पाचवं सूत्र म्हणजे काहीतरी खरडा की कागदावर सहलीनंतर. निवेदन, वृत्त असं नाही म्हणतय मी. पण पाच दहा ओळींमध्ये आपलं स्वगत नक्की लिहावं असं वाटतं. मनात काही तरी उमटलेलं असतं ते कागदावर उतरवावं.

 ................................

    आत्तापर्यंत अभ्यास दौऱ्याची, मुलांच्या अभ्यास सहलीची, कौटुंबिक सहलीची मांडलेली ही १५ सूत्रे आपण पाहिली. सूत्रे समजली आणि लगेच वापरायला लागलो असं होऊ नाही शकणार. त्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वात काही गुण असावे लागतील. दौऱ्यासाठी मला महत्त्वाचे वाटलेले पाच गुण सांगतो. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रथमभाषी असायला पाहिजे. हे तर प्रबोधिनीमध्ये आपण मुलांनाही सांगतो. त्यामुळे आपण ते सगळे असाल असं गृहीत धरतो. स्वतःहून संवाद सुरू करता यायला हवा.  समोरच्या व्यक्तीच्या पद, अधिकार निरपेक्ष आपल्याला छान गप्पा मारता यायला पाहिजेत.

दुसरं म्हणजे आपलं निरीक्षण आणि प्रश्न कौशल्य आपण जाणीवपूर्वक स्वतःमध्ये जोपासलं पाहिजे. सहज गोष्टी टिपता यायला पाहिजेत. प्रश्न पडले पाहिजेत, पडलेले प्रश्न बिनधास्त विचारता यायला पाहिजेत. 

तिसरी गोष्ट दौऱ्याला जाताना आपण मोकळ्या मनान गेलं पाहिजे. मोकळ मन म्हणताना कुठल्याही प्रकारचे पूर्वग्रह नसावेत, भीतीची भावना नसावी, खूप चिंता घेऊन प्रवास करू नये आणि मीपणाची भावना कमीत कमी असावी. या गोष्टी कमी असल्या की मनामध्ये थोडी जागा तयार होईल आणि मग अनेक गोष्टी मनामध्ये दौऱ्यामध्ये आपण भरून घेऊ शकू. अशा मोकळ्या मनाने सहज मैत्री आपल्याला करता येऊ शकेल.

पुढील गोष्ट म्हणजे आपल्या रोजच्या सवयी बाजूला ठेवून, अत्यंत कमीत कमी सुविधांमध्ये प्रसन्नपणे आपल्याला राहता यायला पाहिजे. नाक मुरडत गैरसोई सहन करण्यात काही मजा नाही. सहज जमायला हवं हे.

आणि पाचवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळे अनुभव घेण्याची आपली हौस जिवंत ठेवली पाहिजे. ‘अनुभव समृद्ध व्हा!’ हा केवळ मुलांना करण्यचा उपदेश नव्हे तो आपल्याही जगण्याचा मंत्र व्हायला हवा.

................................

गटासोबत दौऱ्याला जाणं, विद्यार्थ्यांना सोबत घेऊन प्रवास करणं हा जसा एक भाग तसं एकट्यानं दौरा करणं हाही एक प्रकार आहे. याचाही कधीतरी अनुभव घ्यायला हवा. अशा दौऱ्यात काही वेळा आपला कस लागू शकतो, काही वेळा स्वतःचीच स्वतःला नवीन ओळख होऊ शकते. कैलासवासी भाऊंनी म्हणजे वामनरावांनी अज्ञातवास या नावाने वैयक्तिक दौरे केले. अज्ञातवास म्हणजे ते कुठे जाणार आहेत हे त्यांचं त्यांनाही फार माहिती नसायचं. बसस्थानकावर  जायचं, जी कुठली बस लागली असेल तिच्यात चढायचं, शेवटच्या स्थानकावर उतरायचं, तिथली आपली परिचित व्यक्ती शोधायची आणि तिच्या घरी जाऊन धडकायचं. एखादा दिवस मुक्काम करायचा आणि परत पुढच्या दिवशी याच पद्धतीन पुढचा प्रवास सुरू करायचा. एकदा ते घेऊन गेले होते मला त्यांच्यासोबत. बहुतेक अकरावी किंवा बारावीमध्ये असेल मी. या प्रकारच्या प्रवासात एक वेगळीच मजा आहे असं जाणवलं मला. विशेषतः भाऊ घरी आलेत, तेही न सांगता अचानक याने लोक भारावून जायचे. भरपूर बडदास्त ठेवली जायची भाऊंची. तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ घरी तयार केले जायचे.  भाऊ अत्यंत अल्प आहार घेणारे होते. मग ते माझा परिचय करून देताना म्हणायचे ‘हे आमचं खाणार तोंड आहे.’ पहिल्याच दिवशी मला कळलं की मस्त चंगळ होणार आहे आपली खाण्यापिण्याची. अशा प्रकारचा प्रवास करण्यामागे भाऊंचा एक भाव होता ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...’ असा जो अभंग आहे; तर एकदा तपासलं पण पाहिजे की ‘तो’ आहे की नाही सोबत, असं भाऊ म्हणायचे.

माझ्या आयुष्यातील पहिला वैयक्तिक प्रवास मी बारावीमध्ये केला. अविनाश धर्माधिकारी यांच्या एका पुस्तकातील एक छोटासा भाग धडा म्हणून मराठीच्या पाठ्यपुस्तकात होता. आणि त्यांच्या सायकल प्रवासाचं वर्णन त्यात होतं. फारच आवडल ते वर्णन, ती लेखनशैली, त्यांनी घेतलेला अनुभव. मग बऱ्याच वेळा वाचन झालं त्या लेखाचं आणि असं वाटून गेलं की नुसतं काय वाचतोय आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मग सायकलवर सज्जनगडला जायचं ठरवलं. साताऱ्यामध्ये माझे काका आहेत. त्यांच्याकडे मुक्काम करता येईल. दुसऱ्या दिवशी गडावर जाऊन दर्शन घेऊन परतीचा प्रवास करता येईल; असं मनात होत. चार मित्र पण तयार केले सोबत करायला. पण जाण्याचा दिवस जसा जवळ आला तसा एकेकानं काढता पाय घेतला आणि आदल्या दिवशी मला कळलं की उद्या जाणारा मी एकटा आहे. आता माझ्या घरचेही नाही म्हणायला लागले. ‘सोबत मित्र होते तेव्हा परवानगी दिली होती. आता आमची परवानगी नाही म्हणाले.’ गेलो भाऊंकडे म्हटलं, ‘मला जायचंय.’ ‘कुणी अडवलंय मग म्हटले. बिनधास्त जा.’ घरी आलो आणि सांगितलं की ‘भाऊंनी बिनधास्त जायला सांगितलंय. तर उद्या चाललोय. आता तुम्ही हसून निरोप देणार का चिडून निरोप देणार ते तुमच्यावर आहे’, असं म्हणून दुसऱ्या दिवशी सायकलवर टांग मारून सज्जनगड करून आलो. हा माझ्या आयुष्यातील पहिला वैयक्तिक प्रवास आणि  ही गोष्ट आहे तरी तीस वर्षांपूर्वीची. त्याकाळचा  रस्ता, दुहेरी वाहतूक असलेला खंबाटकी घाट, मोबाईलही नव्हते तेव्हा. अजूनही मला आठवतं खंबाटकी घाट चढतानाची माझी दशा आणि तोच घाट  उतरतानाची आलेली मजा. ब्रेक न लावता, सुसाट सायकल त्या घाटामध्ये सोडली होती. अनेक वाहनांना ओव्हरटेक करत पुढे चाललो होतो....जणू मोठा कोणता विजय मिळवल्याची भावना चेहऱ्यावरून ओसंडून वहात होती. काही गोष्टींचं वर्णन करता येत नाही. त्या केवळ अनुभवायच्या असतात. माझ्या या प्रवासानंतर गुरुकुलातल्या सायकल सहली सुरू झाल्या. आपल्या प्रवासाचा असाही एक परिणाम असू शकतो अस तेव्हा अनुभवलं. पुढची १० वर्ष भरपूर सायकल सहली केल्या मग मुलांसोबत.

भाऊंनी गुरुकुलात एक पद्धत सुरू केली होती. एखाद्या अध्यापकाची कामाची तीन वर्ष झाली की त्या अध्यापकानं साधारण महिनाभर बाहेर कुठेतरी दौऱ्याला जायचं. एखाद्या ठिकाणी जाऊन महिनाभर अभ्यास केला तरी चालणार होता. आणि त्या वर्षी त्या अध्यापकाचं जितकं मासिक वेतन असेल तितके पैसे त्याला प्रवास खर्च म्हणून दिले जायचे. मला गुरुकुलात तीन वर्ष झाल्यानंतर २१ दिवस मी एकट्यानं राजस्थानमध्ये प्रवास केला होता. मला प्रवास खर्च म्हणून मिळाले होते पाच हजार रुपये; कारण दोन हजार रुपये मानधनावर काम सुरू केलं होतं आणि प्रतिवर्षी तब्बल १००० रू.ची वाढ होत होती. पण पुरले हे पैसे. काही संपर्क भाऊंनी दिले होते आणि बाकीचे आपण आपले तिथे गेल्यावर निर्माण करायचे होते. 

तर जरूर असा एकट्यानं कधीतरी प्रवास करून बघा. एकट्यानं प्रवास करण्याची  ही सवय अधूनमधून ताजी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो मी. गुरुकुलाचा विभागप्रमुख म्हणून असताना मी जेव्हा असा दौऱ्यावर जात होतो तेव्हा उगीच असं वाटायचं की आपण नाहीतर विभागाचं कसं व्हायचं. पण लक्षात आलं की आपल्या शिवाय पण विभाग  उत्तम काम करतोय की. काही वेळा उगाचच विभाग प्रमुखांना काही गैरसमज असतात. तर विभाग प्रमुखांनी जरूर तीन-चार वर्षातून असा महिनाभराचा अनुभव घ्यायला हरकत नाही.

........................................

 

एक तरी परदेश प्रवास करावा अस मी या विषयाच्या निमित्ताने सुचवेन. एक तरी म्हणतोय कारण माझा स्वतःचा एकच झालाय. तोही स्टुडन्ट एक्सचेंज प्रोग्रॅम अंतर्गत झालाय. आमचा सगळा खर्च फिनलंड सरकारनं केला होता. विद्यापीठमध्ये M Ed  करताना ही संधी मिळाली होती. तुम्ही फिरायला जाताना देश निवडताना समूहजीवनाचे काही आदर्श बघायला मिळतील असा देश निवडता आला तर जरूर निवडावा अस मी सुचवेन. 

फिनलंडमध्ये मी अशी बरीच उदाहरणं अनुभवली. अगदी नमुना दाखल दोन सांगतो. नोरा नावाची एक फिनिश विद्यार्थीनी होती. तिनं तिच्या घरी आम्हाला बोलवलं होतं. फिनिश घर, कुटुंब बघण्याची संधी मिळणार होती त्यामुळे लगेचच आम्ही होकार दिला. छान स्वागत झालं तिच्या घरी आमचं.  तिच्या घरी पियानो होता. आमच्या सोबत पुणे विद्यापीठातील जे प्राध्यापक आले होते त्यांना काही मोह आवरला नाही आणि ते पियानो वाजवायला म्हणून बसले. ही नोरा लगेच धावत आली आणि अत्यंत नम्रपणे तिनं आमच्या सरांना विनंती केली की, ‘सर रात्रीचे दहा वाजून गेलेत तर कृपया पियानो वाजवू नका. शेजारच्यांना त्रास होईल.’ हे एक वेळ उदाहरण ठीक आहे. 

मी दुसर उदाहरण देतो. एका शाळेमध्ये आमची भेट योजली  होती. तिथे गटचर्चा सुरू होती आमची. आमच्या सोबत बांगलादेशातील एक विद्यार्थी पण आला होता आणि त्या चर्चेच्यावेळी त्याला त्याचा मुद्दा समजावून देण्यासाठी फळ्यावर काही लिहावसं वाटलं. पण फळ्यावर अगोदरच त्या शाळेच्या शिक्षकांनी काही लिहून ठेवलं होतं. त्यामुळे तो जेव्हा फळा पुसायला उठला तेव्हा बाकी फिनिश मंडळींनी आरडाओरडा केला. आम्हाला काही कळलं नाही सुरुवातीला. मग लक्षात आलं की त्या शाळेतील शिक्षकांनी फळ्यावर काही लिहिलंय ते त्यांच्या कामाचं असू शकतं. त्यांना न विचारता ते पुसणं योग्य होणार नाही. या टोकाचे आदर्श बघायला मिळाले फिनलंडमध्ये. बाकी अत्याधुनिकता, कायद्याच्या धाकातून येणारी शिस्त बघणंही मनोरंजक असतं.

...........................................

अभ्यास दौऱ्याची, सहलीची, भटकंतीची मला समजलेली, मी अनुभवलेली, मी वापरलेली  पंचपदी इथे मी पुरी करतो. आणि विषयाचा समारोप करताना एक गोष्ट सुचवून थांबतो. 

अभ्यास दौरे जरूर करा पण त्या आधी प्रबोधिनीची सर्व केंद्रे आवर्जून बघा. प्रबोधिनीची केंद्रे बघण्यासाठी आवर्जून दौरे करा. ही केंद्रे बघताना अगदी सुरुवातीला मी जी पंचसूत्रे सांगितली होती ती तुम्हाला नक्की अनुभवता येतील असा मला विश्वास आहे.

 

शिवराज पिंपुडेज्ञान प्रबोधिनी, निगडी

         (पुणे केंद्रात दिलेले वैचारिक. २७ जून २०२६)

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

#लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास भाग - ३