जय श्रीराम
Majuli
दर्शन

७ मे चा दिवस. सकाळी साडेदहाची वेळ. सामानसुमान घेऊन हॉटेल सोडलं आणि हायवेवर येऊन थांबलो. दहा मिनिटात एक गाडी येताना दिसली. हात दाखवताच गाडी थांबली. “जोराहट? इतकाच प्रश्नार्थक शब्द उच्चारला. “आ जाओ|” आतून प्रतिसाद आला. एसी गाडी होती. बसायला जागा होती. और क्या चाहिये भाई! काझीरंगा ते जोराहट हे अंतर होतं सुमारे शंभर किलोमीटर. दोन तासांचा प्रवास होता. साधारण साडेबाराच्या सुमारास एके ठिकाणी ड्रायव्हरनं उतरायला सांगितलं मला. तिथून निमाटी घाट सुमारे दहा किलोमीटरवर होता. टमटम करून अर्ध्या तासात पोहोचलो. फेरीबोट सुटायलाच आली होती. पळत जाऊन तिकीट काढलं. घाईघाईत फेरीमध्ये चढलो. चारचाकी, दुचाकी वाहने फेरीवर आधीच चढवण्यात आली होती. मी पण गाड्यांच्या इथेच जाऊन थांबलो. ”अंदर जाओ|” एकानं सुचवलं. ‘अंदर’ म्हणजे कुठे मला समजेना. बोटीच्या तळाकडे जाणारा एक छोटा दरवाजा दिसला. चार-पाच पायऱ्या उतरून त्या दरवाज्यातून आत गेलो. तर ५०-६० माणसं बाकड्यावर बसलेली दिसली. आत्ता रचना लक्षात आली. बोटीचे दोन टप्पे होते. एक वरचा टप्पा एक खालचा. खालचा भाग झोपडी सारखा बांधला होता. या खोलीच्या छताच्या एका बाजूला फळ्या ठोकून त्यावर दुचाक्या लावल्या होत्या. तर खोलीच्या दरवाजाच्या बाजूला चारचाकी गाड्या लावण्याची व्यवस्था होती. गाड्यांच्या मागे पुढे नायलॉन दोरी बांधली होती. कोणताही लाकडी किंवा लोखंडी कठडा नव्हता तिथे. गाडीच्या चाकांना दगड लावले होते. पण तरी चारचाकी गाड्यातून लोक निवांत बसून होते. फेरीबोटीच्या इंजिनाचा आवाज फारसा नव्हता. अत्यंत शांतपणे ब्रह्मपुत्रेतून आमचा प्रवास सुरू होता. ब्रह्मपुत्रा... समुद्र वाटावा अशी नदी. समुद्राच अथांग हे विशेषण हिलाही अगदीच लागू पडतं. थोडा वेळ त्या तळ्यातल्या भागात बसलो. पण उत्सुकता होती बोटीच्या वरच्या भागात येऊन बाहेरचं दृश्य बघण्याची. त्यामुळे लगेचच बाहेर आलो. वातावरण ढगाळ होतं. सूर्यावर ढग आले की बरं वाटायचं. ते बाजूला झाले की मात्र चटका लागत होता. एक जण सर्वांची तिकिटे गोळा करायला आला. मनात काय आलं कोणास ठाऊक पण तिकिटाचा फोटो काढून मग त्याला तिकीट दिलं. नंतर फोटो झूम केला तर बरीच माहिती दिली तिकीटानं. फेरीचे नाव होतं ‘राजलखी’. माझं नाव पण तिकीटावर होतं. फेरीची वेळ, बोर्डिंग पॉईंट, ड्रॉपिंग पॉईंट सगळं होतं. भाडे होते फक्त 30 रुपये प्रत्येकी. सुमारे पाऊण तासाच्या प्रवासानंतर आम्ही माजुलीवर पोहोचलो. घाटाचं नाव होतं कमलाबरी. नदीतील जगातील सर्वात मोठ्या बेटावर पाऊल ठेवताना उत्सुकता होती खूप. फेरीबोटीवर असतानाच हमिंगबर्ड स्कूलच्या कृष्णाजींचा फोन आला होता. “सर आपको लेने आ रहे है|” अरे वा म्हटलं मनातून. “कृष्णाजी खाना नही हुआ है|” “हा सर पहिले खाना खिलायेंगे आपको| व्हेज या नॉनव्हेज सर?” ‘अरे बाबा जगातील सर्वात मोठ्या बेटावर येतोय. जरा स्थानिक मासे खायला घाल की.’ (या आशयाचे हिंदीतून बोललो.) कमलाबारी घाटावर उतरलो. सांगितल्याप्रमाणे कृष्णा घ्यायला आला होता. गाडीतून माजुली बेटाची सफर सुरू झाली आमची. रस्ता छोटासा आणि सिमेंट ब्लॉकचा होता. ही काय भानगड म्हटले. “अरे सर ये सरकार की कमाल है| दस साल पहले एकदम कच्चा रस्ता था| अभी ५ साल पहेले ये ब्लॉक बिठाये है| पहले बहुत तकलीफ होती थी यहा पे बारिश के समय| अभी जिंदगी थोडी आसान हुई है|” प्रवासात आजूबाजूला जनजातींची घरे दिसली. काळानुसार त्यांच्यातही बरेच बदल झालेले दिसले. या प्रवासातलं एक निरीक्षण म्हणजे घरे पूर्वी लाकडी बांबूच्या जोतावर बांधली जायची. आता सिमेंट पिलरच्या जोतांवर आहेत. पण भिंती मात्र अजूनही बांबूच्या पट्ट्यांच्याच आहेत. गावात पोहचल्यावर कृष्णाने Majulis Kitchnen खानावळीत नेलं. एक महिला चालवत होती ही खानावळ. कृष्णाने त्याच्या भाषेत ऑर्डर दिली. थोड्याच वेळात भाताची मुद आणि बाजूला ३ वाट्यातून पत्तेदार भाज्या तसेच आमटी, बटाट्याची भाजी आणि माश्याची करी आली. भूक लागल्याच्या निरपेक्ष जेवण टेस्टी होतं. तृप्त वाटलं.
कृष्णा इथल्या मिसिंग जनजातीचा. या जनजातीचा प्राबल्य आहे बेटावर.

.........................................

संध्याकाळी कृष्णासोबत गावात फेरफटका मारायला गेलो. सुरुवातीला त्यांन त्याच्याच घरी नेलं. अंगणात चूल पेटली होती. तिच्यावर एका मोठ्या कढईत भात ठेवला होता. मी काही विचारायच्या आतच कृष्णा म्हणाला “अपांग बनाने का काम चल रहा है|” त्या कढईच्या बाजूला एका पत्र्यावर भाताची तुसे जाळत बसली होती त्याची मुलगी. नंतर ती जाळलेली तुसे त्या कढईतील भातावर टाकली तिने. अंगणात बसलेली आजी वारा घालून चुलीचा अग्नी धगधगता ठेवत होती. (टेस्ट घेतली का अपांगची हा प्रश्न विचारू नका. काही प्रश्न विचारायचे नसतात.) लाल चहा पाजला कृष्णाच्या आईने.

मग नदीकाठी गेलो दोघे. संथ वाहत होती नदी. दोघीजणी बोटीची वाट बघत बसल्या होत्या. एका बाजूला गुरे चरत होती. लांबवर मुले व्हॉलीबॉल खेळत होती. बसून राहिलो काठावर. काहीच संवाद केला नाही थोडा वेळ आम्ही दोघांनी. होडी येताना दिसली. खरे तर त्या दोन होड्या होत्या. वरून बांबूचे तट्टे टाकून एकमेकांना बांधल्या होत्या. त्या तत्त्यांमुळे प्रवाशांना बसण्याची, उभे राहण्याचीही व्यवस्था झाली होती. एका होडीच्या दोन्ही टोकांना एकेक जण हातात मोठा बांबू घेऊन ती होडी हाकत होते. बांबू तळापर्यंत टेकवायचा आणि मग तळाला जोर लावून होडी पुढे ढकलत होते. ही कृती दोघे एकाच वेळी न करता एकाड एक करत होते. काठ जवळ आल्यावर एक जण होडीतून उतरला आणि सावकाश हाताने होडी काठाला लावली.  त्या दोघींना घेऊन होडी गेली. नदीच्या पलीकडच्या काठावर मोठं जाळ घेऊन सहा जण नदीमध्ये उतरले. दोन्ही बाजूला तीन तीन जणांनी पकडलं होतं जाळं. काही अंतर नदीतून ओढलं त्यांनी जाळं आणि मग बाहेर काढलं. आमच्या काठावरून त्यांच्या जाळ्यात काय काय अडकल हे समजणं अवघड होतं. ‘हे मासे खाण्यासाठी पकडतात की विकण्यासाठी? खूप सापडले तर विकतात. चारशे रुपये किलो दर चालू आहे.’ कृष्णाने माहिती पुरवली. अंधार पडायला लागला होता. चला म्हटलं कृष्णाला. तितक्यात एक जण छोटे जाळ घेऊन येताना दिसला. थांबावं म्हटलं मग. हा काय करतोय ते बघूया म्हंटलं. त्यानं जाळं उघडलं आणि पसरून टाकलं नदीत आणि मिनिटभराने लगेच ओढून घेतलं. चिखल, गवताशिवाय त्याच्या हाताला (जाळ्यात) काहीच लागलं नव्हतं. आणखी थोडं पुढे जाऊन त्यांन जाळं टाकलं. आता काय अडकलंय हे बघायला आम्ही थांबलो नाही. रस्त्यान चालताना “कृष्णा गावातील एखाद पारंपरिक घर दाखव की,” मी इच्छा व्यक्त केली. काहीच वेळ न दवडता एका घरात कृष्णाने हाक दिली आणि थेट आतच शिरलो आम्ही. सिमेंटच्या पिलरवरील जोतावर घर बांधले होते. भिंती मात्र बांबूच्या तत्त्याच्या होत्या. आगगाडीच्या डब्यासारखे आडवे लांबलचक होते घर. जोताच्या पार्किंग मध्ये गुरेढोरे बांधली होती. जोतावरील घरात वर चढण्यासाठी लाकडी पायऱ्या होत्या. दार उघडलं की एक कॉरिडॉर होता. तो थेट स्वयंपाक घरात जात होता. या पॅसेजच्या उजव्या बाजूला दोन बेडरूम होते. घराची फरशी बांबूचीच होती. मला वाटलं प्रत्येक घराची रचना अशीच असेल; पण तसं नव्हतं. “अलग अलग होता है हर घर|” कृष्णा म्हणाला. मग अजून एका घरात घेऊन गेला कृष्णा. पायऱ्या चढताना आधार घेण्यासाठी एक बांबू छतापासून जमिनीत रोवला होता. या घरात आधी हॉल कम बेडरूम होते आणि डाव्या बाजूला वाढल्यावर स्वयंपाकघर होतं.

................................

दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक साडेसात वाजता कृष्णासोबत माजुलीतील ‘सत्रे” बघायला बाहेर पडलो. शाळेची गाडी होती. चालकाचं नाव होतं मनोज. आधी दक्षिणपत सत्रला जाऊया असं ठरलं. “यहा पे थंडी के मौसम मे बहुत मायग्रेटेड बर्ड्स आते है|” अरे वा काहीतरी दिसलेच की मग. नशिबाने दुर्बिण सोबत ठेवली होती. पाऊणएक तासाने पोहोचलो. सत्रला मोठे प्रवेशद्वार होते. त्याचं वर्णन.... मोठं सभागृह होते.  पूजा चालू होती. देवासमोरचा पडदा लावलेला होता. दर्शन होईल का म्हणून एका पुजाऱ्याला विचारल. असामी भाषेत तो काहीतरी पुटपुटला. मी कृष्णाकडे बघितलं.  चढावा द्याल का विचारतोय तो.’ ‘होय’ म्हणालो मी. पुजाऱ्यानं दार उघडलं. समोर तीन मुर्त्या होत्या. शेषाने डोक्यावर फणा धरलेल्या विष्णूच्या दोन आणि मध्यभागी गोविंदाची. छान वाटलं दर्शन घेऊन. सत्राला मोठे सभामंडप होते. मध्यभागी मातीची जमीन आणि वर पत्र्याच्या छताखाली कापडी रंगीत छत. या सत्राला जोडून संग्रहालयही होते. नऊ वाजता उघडणार होते ते. सव्वा नऊ पर्यंत उघडले नाही मग आम्हीही वाट बघितली नाही. संग्रहालयाच्या बाहेर प्रदक्षिणा मार्ग सारखा मार्ग होता. त्यावर विविध देवतांचे मुखवटे होते. बांबूच्या चौकटीवर लावलेले. भिंतीवर बहुदा शंकर देव संप्रदायाशी संबंधित चित्रे कोरली होती. या सत्राला लागून तलाव आहे मोठा. हिवाळ्यात बरेच स्थलांतरित पक्षी येतात म्हणे. आम्हाला काही स्थानिक पक्षी बघायला मिळाले.

इथून कृष्णाने आम्हाला ,,,,,,,,या गावात नेलं. हे गाव पॉटरीसाठी प्रसिद्ध आहे. ठिकठिकाणी मातीची मडकी छान पद्धतीनं रचून ठेवलेली दिसली. एक जण तर दुचाकीच्या दोन्ही बाजूला आणि मागे भरपूर मडकी (सुमारे ३०-४०) घेऊन बाजारात विकायला चालला होता. मातीची गोष्ट या प्रकारे नेण्याच्या त्याच्या हिमतीला दाद द्यावीशी वाटली. या गावात कृष्णाने त्यांच्या परिचितांकडे नेलं. सगळीच घरे जोतावर बांधली होती. घरांना बांबूचे कुंपण होते. सर्वत्र हिरेवागर होते. घराच्या समोरून मातीची पायवाट जात होती. अगदी चित्रकार काढतात असं दृश्य होतं. घरे जोतावर असली तरी सुद्धा ‘पूर आला की जोताच्यावर अगदी घरात घोटाभर पाणी येतं. दोन-तीन दिवस राहतं मग ओसरतं.’ अगदी सहज सांगितलं घरातल्या लोकांनी. पूर हा त्यांच्या आयुष्यातील जणू एक भाग झाला आहे. या घरात चहा झाला. चहा देण्यासाठी घरातील काकू गुढघ्यावर बसल्या आणि मग दोन्ही हाताने ट्रे पुढे केला आमच्या. बापरे ही काय पद्धत. पटकन चहाचा कप उचलला मी. ‘चहा झाला असेलच,’ असं विचारणारे आम्ही पुणेकर या पार्श्वभूमीवर अतिथीला आदर देण्याची ही पद्धत अंगावर आली माझ्या.

तिथून ..,,,,.या सत्रमध्ये गेलो. याच्या शेजारी मुखवटे तयार करण्याच केंद्र आहे. आम्ही पोहचलो तेव्हा तिथे दोघेजण मुखवटे तयार करत होते. बहुतांश प्रक्रिया प्रत्यक्ष बघता आली. आधी बांबूचा सांगाडा तयार केला जातो. त्यावर कॉटनचे कपडे मातीत लिंबून पसरवले जाते. ही माती ब्रह्मपुत्रातील ३०-४० फुटांवरील असते म्हणे. मग गाईच्या शेणाने आकार दिला जातो. शेण वाळले की रंग दिला जातो. तोंडातील दात, सुळे वगैरे लाकडी असतात. एका फुटापासून ते सात-आठ फुटी मुखवटे बघितले. तीनशे रुपयांपासून ते लाखापर्यंतची किंमत असलेले. प्राण्यांचे, देवांचे मुखवटे. रासलीलेत वापरले जातात. छोट्या छोट्या गोष्टी सजावटीसाठी वापरल्या जातात

पुढच्या सत्राकडे प्रवास सुरू झाला. कृष्णाला इथली सगळी गल्लीबोळं माहिती होती. एकदाही त्यानं कोणालाही कुठे वळू, कसे जाऊ असं विचारलं नाही. ज्या गावातून जात होतो तिथे रस्त्यावर सिलेंडर ठेवलेले दिसले. ‘ही काय भानगड,’ विचारले. प्रत्येक गावातून सिलेंडरची गाडी कोणत्या दिवशी येणार हे ठरलेलं असतं. त्या दिवशी ज्याचं सिलेंडर संपला असेल त्यांन तो बाहेर आणून ठेवायचा. काही घरांच्या बाहेर बाटल्यांमधून पेट्रोल, डिझेल पण विकायला ठेवल्याच आढळलं.

Comments

Popular posts from this blog

#लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास भाग - ३