एक विलक्षण अनुभव 

मणिपूर दौऱ्यातील पहिल्याच दिवशी जगात एकमेव असणाऱ्या एका ठिकाणास भेट देण्यास निघालो होतो मी. IGAR South या सैन्याच्या कॅम्पमधून सकाळी ९.३० च्या सुमारास प्रवासात सुरुवात केली. सध्या या ठिकाणी पोस्टिंग असणारा आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी कॅप्टन पृथ्वीराज निघोट (asam 21 para) यानेच गाडी ठरवून दिली होती. चालक होता मुश्ताक. "येथील जनजातींच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुसलमान चालक असण सेफ आहे तुमच्यासाठी," इति पृथ्वीराज.

आज मणिपूरमध्ये सगळं सुरळीत होतं. बस आजचा दिवस मिळाला होता तर आम्हाला. अशीच परिस्थिती आहे मणिपूरची. इथे काम करणारे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते गमतीने मणिपूरला ‘बंदपूर’ म्हणतात. कधी कुठे खुट्ट होईल आणि पुढच्या मिनिटात सगळं बंद होईल काहीच सांगता येत नाही.

प्रदीर्घ दंगलीनंतर नुकतच मणिपूर शांत झाल होत. पण दंगलीच्या खाणाखुणा या प्रवासात जागोजागी दिसत होत्या. पूर्णच्या पूर्ण जळून काळेठिक्कर पडलेले ट्रक, टॅंकर रस्त्याच्या बाजूला लावलेले दिसले. जागोजागी जवान पहारा देत सज्ज असलेले दिसले. थोड्याच वेळात आम्ही भिष्णुपूर जिल्ह्यात प्रवेश केला. गाडीत पेट्रोल भरायचं होतं आमच्या. अमेरिका इराण युद्धामुळे इंधनाची टंचाई निर्माण झाली होती देशात. मणिपूरमधील पेट्रोल पंप इंधना अभावी ओस पडले होते. पण अनेक पेट्रोल पंपांच्या बाहेर डोक्यावर छत्री घेऊन कॅनमधून लोक पेट्रोल विकताना दिसले. अशा एका विक्रेत्यापासून केवळ ५० पावलांवर पोलीस स्टेशन होतं. पण त्या विक्रेत्याला त्याची फिकीर नव्हती. या शहराचे स्वतःचेच कायदेकानून असल्याचं जाणवतं राहतं आपल्याला. बाकी वातावरण अल्हाददायक होतं. रस्त्याच्या दुतर्फा शेती होती. सूर्यफूल शेतीच प्रमाणही बरच जाणवल. जिल्हा न्यायालयही वाटेत दिसलं. सात-आठ इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे बोर्ड बघायला मिळाले.

साधारण सव्वा तासात मोईरांगमध्ये प्रवेश केला आम्ही. तिथून आठ किलोमीटरवर माझ्या भेटीचं ठिकाण होतं. १०-१५ मिनिटांनी आमची गाडी एका वळणावर वळाली आणि ‘लोकतक’ दिसलं. ईशान्य भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर. केशरी, जांभळ्या रंगाच्या कुमुदिनीच्या फुलांनी; आम्ही बघत असलेल्या तळ्याचा भाग गच्च भरला होता; जणू केशरी जांभळ्या रंगांच्या फुलांची चादर तलावावर अंथरली आहे असं वाटावं इतका गच्च. नावाला तलाव होता, वाटायला समुद्र होता.

थोड्याच वेळात इच्छित प्रवेशद्वारापाशी आम्ही पोहोचलो. घराच्या आकाराच्या लाकडी प्रवेशद्वारावर पाटी लावली होती - keibul lamjao National Park. Only Floating National Park In The World. होय जगातील एकमेव तरंगत्या राष्ट्रीय उद्यानाच्या दारात मी उभा होतो. आता मात्र उद्यानात जाण्याची घाई झाली होती मला. पटकन् तिकीट काढलं. तीस रुपये प्रत्येकी आणि गाडीचे शंभर रुपये. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अरुंद रस्ता लागला. रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी होती. झाडांच्या सावल्यांनी रस्ता झाकाळून गेला होता. चढणीच्या रस्त्याने एका छोट्या टेकडीवर आम्ही आलो आणि रस्ता संपला. तिथे गाडी लावून रस्त्याच्या बाजूला प्राणी निरीक्षणासाठी बांधलेल्या शेडमध्ये आम्ही पळतच चढलो. मुश्ताकही सोबत होता. तिथला गाईड रतन यानं हसून आमचं स्वागत केलं. रतन काही सांगत होता पण माझं लक्ष तिकडे नव्हतं. नजर समोर स्थिरावली होती. ज्याला या अभयारण्यविषयी काहीच माहिती नसेल त्याला काय दिसेल... तर समोर लांबच्या लांब हिरव्या-पिवळ्या रंगाच्या गवताचं कुरण पसरलंय आणि भरपूर पाऊस झाल्यानं कदाचित मध्येमध्ये पाणी साठलंय. पण प्रत्यक्षात काय होतं... तर त्या हिरव्या-पिवळ्या कुराणाच्या खाली पाणी होतं आणि जिथे पाणी दिसत होतं तिथे काही उगवलेलं नव्हतं तो तलावाचा भाग होता. थोडक्यात ते कुरण तलावावर तरंगत होतं. विश्वास बसणार नाही अशा दृश्याचा साक्षीदार झालो होतो मी. उत्सुकता थोडीफार शमल्यावर रतनचे शब्द माझ्या कानात पडू लागले. ""सर जी यह जो आप देख रहे है वो जमीन नही है| यह एक तेरनेवाला व्हेजिटेशन है| मणिपुरी भाषा मे इसे फुंदि कहते है| और मणिपूर का स्टेट ऍनिमल सांगाय डियर इसी पे रहता है..."

पर्यटकांच्या सोयीसाठी तिथे दुर्बिणी होत्या आणि चक्क स्पॉटिंग स्कोपही होता. रतन त्या स्पॉटिंग स्कोपला नजर लावून काही दिसतंय का शोधू लागला. आम्हाला काहीतरी दिसावं अशी त्याची मनापासूनची इच्छा आहे असं वाटलं. थोड्याच वेळात त्याची इच्छा फलद्रूप झाली. “सर वहा पे देखो|” असं म्हणून स्पॉटिंग स्कोपला लावलेल स्वतःच डोकं त्यानं बाजूला केलं आणि मला हाताने डोकं लावण्याचा निर्देश केला. एखाद्या अधाशी माणसासारखा मी माझा डोळा त्या स्कोपला चिकटवला. पण त्यान जिथे स्कोप ऍडजेस्ट केला होता तिथं मला काहीही म्हणजे काहीही दिसत नव्हतं. मग परत एकदा रतनने बघितलं. “अरे सर वही हे ना| बैठा हुंआ हैl उसके दो सिंग दिख रहे हैl” सगळी आशा एकवटून परत एकदा डोळा लावला मी. पण गवताशिवाय माझ्या डोळ्यांना काहीच दिसत नव्हतं. केवळ चिडचिड होत होती माझी. अजून किती डोळे फाडून बघू बाबा... मनात म्हटलं. परत एकदा रतनने स्कोप स्वतःच्या ताब्यात घेतला. “अरे नही सर शायद हिल गया वहा सेl” मग परत एकदा त्याने शोधशोध करून स्पॉटिंग स्कोप सेट केला आणि म्हटला “सर अभी देखोl” यावेळी मात्र त्या गवतामध्ये बसलेल संगाई हरीण मला दिसलं. हरणाचा रंग त्या गवतात बेमालूम मिसळून गेला होता. तो नर होता. स्पष्टपणे त्याची शिंगं स्कोप मधून बघता येत होती. एक मोठ स्मितहास्य चेहऱ्यावर पसरलं. जगातल्या एकमेव तरंगत्या अभयारण्यावर मी मणिपूरचा राज्यप्राणी बघत होतो.

या हरीणाला डान्सिंग डियर असंही म्हटलं जातं म्हणे. कारण ते जेव्हा याच्यावरती पळत जात तेव्हा या व्हेजिटेशनचा भाग हालतो त्यामुळे जणू काही ते नाचत पळतंय असं बघणाऱ्याला वाटतं म्हणे. हे भाग्य काही आम्हाला मिळालं नाही. पण हे ऐकल्यावर या हलणाऱ्या व्हेजीटेशनचा अनुभव घेता येईल का असं मात्र मनात आलं. लगेच रतनला विचारलं. त्याची प्रतिक्रिया होती “क्यू नही सरजी| चलो मेरे साथl” असं म्हणून त्या तलावाच्या दिशेनं आम्ही खाली उतरायला लागलो. साधारण पन्नास एक पायऱ्या खाली आलो असू आम्ही. तिथे एक छोटी ‘पाणवाट’ होती. होय बरोबर आहे शब्द. जशी पायवाट असते तसेच ही पाण्यातली वाट होती. तितकीच अरुंद आणि दोन्ही बाजूंना गवत असलेली. तिथे दोन होड्या लावल्या होत्या. निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या. आपण कागदी होड्या पाण्यात सोडतो अगदी तशाच होत्या त्या. एखाद्या चित्रकारालाही काढता येणार नाही अस दृश्य होत ते. “बैठो इस मे|” असं म्हणून त्यानं त्या होडीत आम्हाला बसायला सांगितलं. मग एक लांबलचक बांबू रतनने हातात घेतला आणि त्या तलावाच्या तळाशी तो टेकवून होडी ढकलायला लागला. वरून बघताना उंचीला छोट वाटणार गवत होडीत बसल्यावर मात्र चांगलं दहा-बारा फूट उंच आहे असं लक्षात आलं. रतनने या छोटुश्या नौका प्रवासात आणखी काही इंटरेस्टिंग माहिती दिली आम्हाला. या बेटावर जंगली रानडुक्करं पण आहेत आणि या रानडुकरांचा नि हरणांचं वेगळ्या प्रकारचं सहजीवन इथे बघायला मिळतं. रानडुक्करं आपल्या पिलांसाठी या गवतापासून इग्लुसारखी घरं बांधतात आणि पिल्ले मोठे झाले की घर सोडून देतात. तेच घर नंतर ही हरणं त्यांच्या पिलांसाठी वापरतात. एक काळ होता की ही हरणं नामशेष झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. पण १९५३ मध्ये काही हरणं सापडली आणि मग  त्यांच्या संवर्धनाचे जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले. परिणामस्वरूप आज सुमारे अडीचशे हरणं या बेटावर बघायला मिळतात. १९७७ पासून इथला सुमारे ४० चौरस किलोमीटरचा भाग राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आला.

साधारण दीडशे-दोनशे फूट आम्ही बोटीतून गेलो असू. रतनने होडी थांबवली. शेजारी एक सपाट भाग होता. त्यावर मला उतरायला सांगितलं. म्हटलं ‘बाबा बुडणार नाही ना मी खाली?’ ‘बिनधास्त उतरा,’ म्हणाला रतन. (सगळा संवाद अर्थात हिंदीतून.) तिथ पाय टेकवल्यावर काही वेगळं विशेष वाटलं नाही. मग रतनने मला उड्या मारायला सांगितल्या. लहान मुलं काय उड्या मारतील अशा उड्या मारल्या. मग मात्र सांगई हरणाला डान्सिंग डियर का म्हणतात याचा जणू प्रत्यय आला. माझ्या मागे एक छोटं झाड होतं. रतनने मला त्या झाडाकडे बघत उड्या मारायला सांगितल्या. मग पीछे मूड करून परत उड्या मारायला लागलो तर चक्क ते झाडही हलायला लागलं. पायाखाली जणू जिवंतपणा अनुभवत होतो मी. और क्या चाहिये भाई असं वाटणारे काही क्षण आयुष्यात येतात. माझ्यासाठी हा क्षण अगदी तस्साच होता. कधी मणिपूर मध्ये जायचा योग आलाच तर हे तरंगतं उद्यान बघायला विसरू नका मंडळी.

 

Comments

Popular posts from this blog

#लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास भाग - ३