गोष्ट एका राष्ट्रीय उद्यानाच्या भेटीची!
गोष्ट एका राष्ट्रीय उद्यानाच्या भेटीची!
मणिपूर दौऱ्यातील (मे २०२६)
पहिल्याच दिवशी जगात एकमेवाद्वितीय असणाऱ्या एका राष्ट्रीय उद्यानास भेट
देण्याचे माझे नियोजन होते. IGAR
South या सैन्याच्या कॅम्पमधून सकाळी ९.३० च्या सुमारास प्रवासात सुरुवात केली.
सध्या या ठिकाणी पोस्टिंग असणारा आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी कॅप्टन पृथ्वीराज
निघोट (21 para Special Forces) यानेच गाडी आणि चालक
ठरवून दिला होता. (पृथ्वीराज याची शाळेतील
batch २०१६ ची. नंतर NDA मधून ट्रेनींग
पूर्ण करून साधणार ३ वर्षे तो ईशान्य भारतात सेवेत रुजू आहे.) माझ्या
गाडीचा चालक होता मुश्ताक. "येथील नागा, कुकी, मैतयी जनजातींमधील दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुसलमान चालक असणं सेफ आहे
तुमच्यासाठी,"
इति पृथ्वीराज. (मे महिन्यात याची भेट झाली आणि ऑगस्ट
महिन्यात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या whatsapp गटावर एक बातमी
आली – पृथ्वीराज निघोट याला ईशान्य भारतातील शौर्यपूर्ण
कामगिरीसाठी सेना पदक (Gallantry) जाहीर! असा ऊर
अभिमानाने भरून आला ना; काय सांगू.!!
आज मणिपूरमध्ये सगळं सुरळीत
होतं. बस आजचा दिवस मिळाला होता तर आम्हाला. अशीच परिस्थिती आहे मणिपूरची. इथे काम
करणारे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते गमतीने मणिपूरला ‘बंदपूर’ म्हणतात. कधी
कुठे खुट्ट होईल आणि पुढच्या मिनिटात सगळं बंद होईल काहीच सांगता येत नाही.
प्रदीर्घ दंगलीनंतर नुकतच
मणिपूर शांत झालं होतं. पण दंगलीच्या खाणाखुणा या प्रवासात
जागोजागी दिसत होत्या. पूर्णच्या पूर्ण जळून काळेठिक्कर पडलेले ट्रक, टॅंकर रस्त्याच्या बाजूला लावलेले दिसले.
जागोजागी जवान पहारा देत सज्ज असलेले दिसले. थोड्याच वेळात
आम्ही बिष्णुपूर जिल्ह्यात प्रवेश केला. गाडीत पेट्रोल भरायचं होतं आमच्या.
अमेरिका इराण युद्धामुळे इंधनाची टंचाई निर्माण झाली होती काही भागात. मणिपूरमधील पेट्रोल
पंप इंधना अभावी ओस पडले होते. पण अनेक पेट्रोल पंपांच्या बाहेर डोक्यावर छत्री
घेऊन कॅनमधून लोक पेट्रोल विकताना दिसले. अशा एका विक्रेत्यापासून
केवळ ५० पावलांवर पोलीस स्टेशन होतं. पण त्या विक्रेत्याला त्याची फिकीर नव्हती. अनेक
वेळा या शहराचे स्वतःचेच कायदेकानून असल्याचं जाणवतं राहतं आपल्याला. बाकी वातावरण अल्हाददायक होतं. रस्त्याच्या दुतर्फा शेती होती.
सूर्यफूल शेतीच प्रमाणही बरच जाणवल. जिल्हा न्यायालयही वाटेत दिसलं. सात-आठ
इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे बोर्ड बघायला मिळाले.
साधारण सव्वा तासानंतर
मोईरांग शहरात प्रवेश केला आम्ही. तिथून आठ किलोमीटरवर माझं भेटीचं ठिकाण होतं. १०-१५
मिनिटांनी आमची गाडी एका वळणावर वळाली आणि ‘लोकताक’ दिसलं. ईशान्य भारतातील सर्वात
मोठं गोड्या पाण्याचं सरोवर. केशरी, जांभळ्या रंगाच्या कुमुदिनीच्या फुलांनी; आम्ही बघत असलेल्या तळ्याचा एक भाग गच्च
भरला होता; जणू केशरी जांभळ्या रंगांच्या फुलांची चादर अंथरली आहे असं वाटावं इतका
गच्च. नावाला तलाव होता, वाटायला लाटांशिवायचा
समुद्र होता.
थोड्याच वेळात उद्यानाच्या
प्रवेशद्वारापाशी आम्ही पोहोचलो. घराच्या आकाराच्या लाकडी प्रवेशद्वारावर पाटी
लावली होती - keibul lamjao
National Park. Only Floating National Park In The World. होय जगातील एकमेव तरंगत्या राष्ट्रीय उद्यानाच्या दारात मी उभा होतो. आता मात्र उद्यानात
जाण्याची घाई झाली होती मला. पटकन् तिकीट काढलं. तीस रुपये प्रत्येकी आणि गाडीचे
शंभर रुपये. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अरुंद रस्ता लागला. रस्त्याच्या दुतर्फा
गर्द झाडी होती. झाडांच्या सावल्यांनी रस्ता झाकाळून गेला होता. चढणीच्या
रस्त्याने एका छोट्या टेकडीवर आम्ही आलो आणि रस्ता संपला. तिथे गाडी लावून
रस्त्याच्या बाजूला प्राणी निरीक्षणासाठी बांधलेल्या शेडमध्ये आम्ही पळतच चढलो. मुश्ताकही
सोबत होता. तिथला गाईड रतन यानं हसून आमचं स्वागत केलं. रतन काही सांगत होता पण
माझं लक्ष तिकडे नव्हतं. नजर समोर स्थिरावली होती. ज्याला या राष्ट्रीय
उद्यानाविषयी काहीच माहिती नसेल त्याला काय दिसेल... तर समोर लांबच्या लांब हिरव्या-पिवळ्या
रंगाच्या (गवत वाळल्याने रंग पिवळा) गवताचं कुरण पसरलंय आणि भरपूर पाऊस झाल्यानं
कदाचित मध्येमध्ये पाणी साठलंय. पण प्रत्यक्षात काय होतं... तर त्या हिरव्या-पिवळ्या
कुरणाच्या खाली पाणी होतं आणि जिथे पाणी दिसत होतं तिथे काही उगवलेलं नव्हतं तो लोकताक
तलावाचा भाग होता. थोडक्यात ते कुरण तलावावर तरंगत होतं. विश्वास बसणार नाही अशा
दृश्याचा साक्षीदार झालो होतो मी.
उत्सुकता थोडीफार शमल्यावर
रतनचे शब्द माझ्या कानात पडू लागले. "सर जी यह जो आप देख रहे है वो जमीन नही
है| यह एक तेरनेवाला व्हेजिटेशन है| मणिपुरी
भाषा मे इसे फुंदि कहते है| और मणिपूर का स्टेट ऍनिमल सांगाई
डियर इसी पे रहता है..."
मला अजून एक वैशिष्ट्यपूर्ण
जाणवलेली गोष्ट म्हणजे अधेमधे क्रिकेटच्या पीच सारखे काही भाग दिसत होते.
त्याविषयी रतनकडे चौकशी केल्यावर समजले की तेथील वाळलेलं गवत काढलं आहे. त्यामुळे
चुकून आग लागली तर या गवत काढलेल्या भागाच्या पुढे ती पसरत नाही. थोडक्यात ते भाग
या उद्यानाची ‘फायर लाईन’ होते.
माहिती देता देता रतन तिथल्या
स्पॉटिंग स्कोपला नजर लावून काही दिसतंय का शोधू लागला. (पर्यटकांच्या सोयीसाठी
तिथे दुर्बिणी होत्या आणि चक्क स्पॉटिंग स्कोपही होता.) आम्हाला काहीतरी दिसावं
अशी त्याची मनापासूनची इच्छा आहे असं वाटलं. बराच वेळ स्पॉटिंग स्कोप सर्व
अॅंगलमधून फिरवला रतनने. आणि मग अचानक “सर वहा पे देखो|” असं म्हणून स्पॉटिंग स्कोपला
लावलेल स्वतःच डोकं त्यानं बाजूला केलं आणि मला हाताने डोकं लावण्याचा निर्देश
केला. एखाद्या अधाशी माणसासारखा मी माझा डोळा त्या स्कोपला चिकटवला. पण त्यानं जिथं
स्कोप ऍडजेस्ट केला होता तिथं मला काहीही म्हणजे काहीही दिसत नव्हतं. मग परत एकदा रतनने
स्कोपमधून बघितलं. “अरे सर वही है नाI बैठा हुंआ
हैl उसके दो सिंग दिख रहे हैl” सगळी
आशा एकवटून परत एकदा डोळा लावला मी. पण गवताशिवाय माझ्या उजव्या डोळ्याला काहीच
दिसलं नाही. केवळ चिडचिड होत होती माझी. अजून किती डोळे फाडून बघू बाबा... मनात
म्हटलं. परत एकदा रतनने स्कोप स्वतःच्या ताब्यात घेतला. “अरे नही सर शायद हिल गया
है वहा सेl” मग परत एकदा चिकाटीने शोधशोध करून त्याने स्पॉटिंग
स्कोप सेट केला आणि म्हटला “सर अभी देखोl” यावेळी मात्र त्या
गवतामध्ये बसलेलं संगाई हरीण मला दिसलं. हरणाचा रंग त्या गवतात बेमालूम मिसळून
गेला होता. तो नर होता. स्पष्टपणे त्याची शिंगं स्कोपमधून बघता येत होती. शिंगे वेगळ्या
प्रकारची होती. लहान मुलांना दोन्ही हातांनी उमलेल फुल कसं दाखवू तसा काहीसा आकार
होता. शिंगे दोनच असली तरी त्यांची रचना अशी होती की चार शिंगे असल्यासारखे वाटत
होते. शिंगांची पुढची दांडी मागच्या दांडी पेक्षा छोटी आणि टोकदार होती. तर मागची
दांडी सरळ न वाढता मागच्या बाजूला झुकलेली आणि वक्राकार होती. मुख्य म्हणजे मागच्या
दांडीला वरच्या टोकांना फांदिसारखे फाटेही फुटले होते. जणू हरणाने शिंग मुकुट
परिधान गेला होता. (नका; ताण नका घेऊ. फोटो बघा सरळ.) जगातल्या एकमेव तरंगत्या
अभयारण्यावर मी मणिपूरचा राज्यप्राणी – संगाई हरीण बघत होतो. एक मोठं स्मितहास्य
चेहऱ्यावर पसरलं होतं माझ्या.
या हरणाला डान्सिंग डियर असंही म्हटलं जातं म्हणे. कारण ते जेव्हा याच्यावरती पळत जातं तेव्हा या तरंगत्या व्हेजिटेशनचा भाग हालतो त्यामुळे जणू काही ते लचकत पळतंय असं बघणाऱ्याला वाटतं म्हणे. हे भाग्य काही आम्हाला मिळालं नाही. पण हे ऐकल्यावर या तरंगत्या व्हेजीटेशनचा अनुभव घेता येईल का असं मात्र मनात आलं. केवळ मनात कशाला ठेवा म्हणून लगेच रतनला विचारलं. त्याची प्रतिक्रिया होती “क्यू नही सरजी| चलो मेरे साथl” असं म्हणून त्या तलावाच्या दिशेनं आम्ही खाली उतरायला लागलो. साधारण पन्नास एक पायऱ्या खाली आलो असू आम्ही. तिथे एक छोटी ‘पाणवाट’ होती. होय बरोबर आहे शब्द. पायवाटे सारखी वाटणारी ही पाण्यातली वाट तितकीच अरुंद आणि दोन्ही बाजूंना गवत असलेली होती. तिथे दोन होड्या लावल्या होत्या. निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या. आपण कागदी होड्या पाण्यात सोडतो अगदी तशाच होत्या त्या. एखाद्या चित्रकारालाही काढता येणार नाही अस दृश्य होतं ते. “बैठो इस मे|” असं म्हणून त्यानं त्या होडीत आम्हाला बसायला सांगितलं. मग एक लांबलचक बांबू रतनने हातात घेतला आणि त्या तलावाच्या तळाशी तो एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे टेकवून होडी ढकलायला लागला. वरून बघताना उंचीला छोट वाटणारं गवत होडीत बसल्यावर मात्र चांगलं दहा-बारा फूट उंच आहे असं लक्षात आलं. (त्यामुळेच वरच्या भागात असताना दुर्बिणीतून हरीण शोधणं महाकठीण काम होतं.) रतनने या छोटुश्या नौका प्रवासात आणखी काही इंटरेस्टिंग माहिती दिली आम्हाला. या बेटावर जंगली रानडुक्करं पण आहेत आणि या रानडुकरांचा नि हरणांचं वेगळ्या प्रकारचं सहजीवन इथे बघायला मिळतं. रानडुक्करं आपल्या पिलांसाठी या गवतापासून इग्लुसारखी घरं बांधतात आणि पिल्ले मोठे झाले की घर सोडून देतात. तेच घर नंतर ही हरणं त्यांच्या पिलांसाठी वापरतात. आणि या रानडुकरांना खायला काही मिळालं नाही कमजोर संगाईची शिकार ही रानडुकरे करतात. एक काळ होता की इथली हरणं नामशेष झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. पण १९५३ मध्ये काही हरणं सापडली आणि मग मात्र त्यांच्या संवर्धनाचे जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले. परिणामस्वरूप आज सुमारे २५० हरणं या बेटावर बघायला मिळतात. १९७७ पासून इथला सुमारे ४० चौरस किलोमीटरचा भाग राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आला. त्यामुळे संवर्धनाच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळाली.
साधारण दीडशे-दोनशे फूट आम्ही बोटीतून गेलो असू. रतनने होडी थांबवली. शेजारी एक सपाट भाग होता. त्यावर मला उतरायला सांगितलं. म्हटलं ‘बाबा बुडणार नाही ना मी खाली?’ ‘बिनधास्त उतरा,’ म्हणाला रतन. (सगळा संवाद अर्थात हिंदीतून.) तिथ पाय टेकवल्यावर काही वेगळं विशेष वाटलं नाही. मग रतनने मला उड्या मारायला सांगितल्या. लहान मूल काय उड्या मारेल अशा उड्या मारल्या मी आणि मग कसं वाटलं मला? समजा जमिनीवर उड्या मारताना जणू trampoline वर उड्या मारतोय असं तुम्हाला जाणवलं तर कसं वाटेल; तसं काही तरी वाटलं. माझ्या प्रत्येक उडीला पायाखालून काही तरी प्रतिसाद मिळत आहे असं काही तरी वाटलं. संगाई हरणाला डान्सिंग डियर का म्हणतात याचा जणू प्रत्यय आला मला. माझ्या मागे एक छोटं झाड होतं. रतनने मला त्या झाडाकडे बघत उड्या मारायला सांगितल्या. मग पीछे मूड करून परत उड्या मारायला लागलो तर चक्क ते झाडही हलायला लागलं. पायाखाली जणू जिवंतपणा अनुभवत होतो मी. तरंगत उद्यान बघितलं, त्यावर प्रत्यक्ष पाय ठेवून ते अनुभवलं, संगाई हरीण बघितलं. ‘और क्या चाहिये भाई’ असं वाटणारे काही क्षण आयुष्यात येतात. माझ्यासाठी हा क्षण अगदी तस्साच होता. उड्या मारून दमल्यावर परत होडीत बसलो. परतीचा प्रवास सुरु केला रतनने. अत्यंत संथपणे होडी काठाच्या दिशेनं जात होती. तृप्तता अनुभवत असल्याने मनही तितकंच संथ झालं होतं आता. सकाळचे मणिपूरमधील अशांतते विषयीचे तरंग कधीच मागे पडले होते...






Comments
Post a Comment