माजुली दर्शन...!
माजुली दर्शन...!
७ मे चा दिवस होता. सकाळी साडेदहाची वेळ. सामानसुमान घेऊन काझीरंगा मधील हॉटेल
सोडलं आणि हायवेवर येऊन थांबलो. दहा मिनिटात एक गाडी येताना दिसली. हात दाखवताच गाडी थांबली. “जोराहट?” इतकाच
प्रश्नार्थक शब्द उच्चारला. “आ जाओ|” आतून प्रतिसाद आला. एसी गाडी
होती आणि बसायला जागा मिळाली. धन्यच वाटले अगदी. काझीरंगा ते जोराहट हे अंतर होतं
सुमारे शंभर किलोमीटर. दोन तासांचा प्रवास होता. साधारण साडेबाराच्या सुमारास जोरहाट
लागल्यावर एके ठिकाणी ड्रायव्हरनं उतरायला सांगितलं मला. ज्या चौकात मला ड्रायव्हरनं
उतरवलं तिथून निमाटी घाट सुमारे दहा किलोमीटरवर होता. टमटम करून अर्ध्या तासात
पोहोचलो. फेरीबोट सुटायलाच आली होती. पळत जाऊन तिकीट काढलं. घाईघाईतच’ बोटीमध्ये चढलो. चारचाकी, दुचाकी वाहने बोटीवर आधीच चढवण्यात आली होती. मी गाड्यांच्या
इथेच जाऊन थांबलो. ”अंदर जाओ|” मझ्या जवळ
उभ्या असणाऱ्या एकानं सुचवलं. पण ‘अंदर’ म्हणजे कुठे मला समजलं नाही. मग बोटीच्या तळाकडे
जाणारा एक छोटा दरवाजा दिसला. चार-पाच पायऱ्या उतरून त्या दरवाज्यातून
आत गेलो. तर चक्क ५०-६० माणसं
बाकड्यावर बसलेली दिसली. आत्ता रचना लक्षात आली. बोटीचे दोन टप्पे होते. एक वरचा
टप्पा एक खालचा. खालचा भाग झोपडी सारखा बांधला होता. या खोलीच्या छताला फळ्या
ठोकून त्यावरही दुचाक्या लावल्या होत्या. जुगाड चा उत्तम नमुना वाटला हा. या
खोलीच्या दरवाजाच्या बाजूला चारचाकी गाड्या लावण्याची व्यवस्था होती. गाड्यांच्या
मागे पुढे नायलॉन दोरी बांधली होती. कोणताही लाकडी किंवा लोखंडी कठडा नव्हता तिथे.
गाडीच्या चाकांना दगड लावले होते. पण तरी चारचाकी गाड्यातून लोक निवांत बसून होते.
त्यांच्या हिमतीला दाद द्यावी वाटली. फेरीबोटीच्या इंजिनाचा आवाज फारसा नव्हता.
अत्यंत शांतपणे ब्रह्मपुत्रेतून आमचा प्रवास सुरू होता. पण उत्सुकता होती बोटीच्या
वरच्या भागात येऊन बाहेरचं दृश्य बघण्याची. त्यामुळे तळातल्या त्या खोलीतून लगेचच
बाहेर आलो. ब्रह्मपुत्रा... समुद्र वाटावा अशी नदी. चुकला शब्द. ब्राह्पुत्रेला ‘नद’
म्हंटले जाते. कारण समुद्राचं अथांग हे विशेषण ब्रह्मपुत्रेला अगदीच लागू पडतं. वातावरण
ढगाळ होतं. सूर्यावर ढग आले की बरं वाटायचं. ते बाजूला झाले की मात्र चटका लागत
होता. तितक्यात एक जण सर्वांची तिकिटे गोळा करायला आला. मनात काय आलं कोणास ठाऊक
पण तिकिटाचा फोटो काढून मग त्याला तिकीट दिलं. नंतर फोटो झूम केला तर बरीच माहिती
दिली तिकीटानं. बोटीचे नाव होतं ‘राजलखी’. माझं नाव पण तिकीटावर होतं. फेरीची वेळ, बोर्डिंग
पॉईंट, ड्रॉपिंग पॉईंट असं सगळं होतं. भाडे होते फक्त ३० रुपये प्रत्येकी. सुमारे पाऊण तासाच्या प्रवासानंतर आम्ही माजुलीवर पोहोचलो. या
घाटाचं नाव होतं कमलाबरी. नदीपत्रातील जगातील सर्वात मोठ्या बेटावर पाऊल ठेवताना
उत्सुकता होती खूप. फेरीबोटीवर असतानाच हमिंगबर्ड स्कूलच्या कृष्णाजींचा फोन आला
होता. “सर आपको लेने आ रहे है|” अरे वा म्हटलं मनातून. “कृष्णाजी खाना नही हुआ है|” “हा सर पहिले
खाना खिलायेंगे आपको| व्हेज या नॉनव्हेज सर?” ‘अरे बाबा जगातील सर्वात मोठ्या बेटावर येतोय. जरा स्थानिक मासे खायला घाल की.’
(या आशयाचे हिंदीतून बोललो.) कमलाबारी घाटावर उतरलो. सांगितल्याप्रमाणे कृष्णा
घ्यायला आला होता. गाडीतून माजुली बेटाची सफर सुरू झाली आमची. रस्ता छोटासा आणि
सिमेंट ब्लॉकचा होता. ही काय भानगड म्हटले. “अरे सर ये सरकार की कमाल है| दस साल पहले
एकदम कच्चा रस्ता था| अभी ५ साल पहेले ये ब्लॉक बिठाये है| पहले बहुत तकलीफ होती थी यहा पे
बारिश के समय| अभी जिंदगी थोडी आसान हुई है|” प्रवासात आजूबाजूला जनजातींची घरे दिसली. काळानुसार
त्यांच्यातही बरेच बदल झालेले दिसले. या प्रवासातलं एक निरीक्षण म्हणजे घरे पूर्वी
लाकडी बांबूच्या जोतावर बांधली जायची. आता सिमेंट पिलरच्या जोतांवर आहेत. पण भिंती
मात्र अजूनही बांबूच्या पट्ट्यांच्याच आहेत. गावात पोहचल्यावर कृष्णाने Majuli’s Kitchnen खानावळीत
नेलं. एक महिला चालवत होती ही खानावळ. कृष्णाने त्याच्या भाषेत ऑर्डर दिली.
थोड्याच वेळात भाताची मुद आणि बाजूला ३ वाट्यातून पत्तेदार भाज्या तसेच आमटी, बटाट्याची
भाजी आणि माश्याची करी आली. भूक लागल्याच्या निरपेक्ष जेवण टेस्टी होतं. तृप्त
वाटलं. हमिंगबर्ड शाळेच्या वसतिगृहात माझा मुक्काम असणार होता.
.........................................
संध्याकाळी कृष्णासोबत गावात फेरफटका मारायला गेलो. सुरुवातीला कृष्णानं त्याच्याच घरी नेलं. अंगणात चूल पेटली होती.
तिच्यावर एका मोठ्या कढईत भात ठेवला होता. मी काही विचारायच्या आतच कृष्णा म्हणाला
“अपांग बनाने का काम चल रहा है|” त्या कढईच्या बाजूला एका पत्र्यावर भाताची तुसे जाळत
बसली होती त्याची मुलगी. थोड्या वेळानं ती जाळलेली तुसे त्या कढईतील भातावर टाकली
तिने. अंगणात बसलेली आजी वारा घालून चुलीचा अग्नी धगधगता ठेवत होती. (अपांग तयार
व्हायला अजून बराच अवधी होता. त्यामुळे मनात कोणत्या इच्छाच निर्माण होऊ नाही
दिल्या.) कृष्णाच्या आईने दिलेला लाल चहाच गोड मानून घेतला.
मग नदीकाठी गेलो दोघे. (होय या बेटातूनही काही प्रवाह वाहतात.) संथ वाहत होती
नदी. दोघीजणी बोटीची वाट बघत बसल्या होत्या. एका बाजूला गुरे चरत होती. लांबवर
मुले व्हॉलीबॉल खेळत होती. बसून राहिलो काठावर. काहीच संवाद केला नाही थोडा वेळ
आम्ही दोघांनी. होडी येताना दिसली. खरे तर त्या दोन होड्या होत्या. वरून बांबूचे
तट्टे टाकून एकमेकांना बांधल्या होत्या त्या. त्या तट्ट्यामुळे प्रवाशांना
बसण्याची, उभे राहण्याचीही व्यवस्था झाली होती. एका होडीच्या दोन्ही टोकांना एकेक जण
हातात मोठा बांबू घेऊन ती होडी हाकत होते. बांबू तळापर्यंत टेकवून तळाला जोर लावून
होडी पुढे ढकलत होते. ही कृती दोघे एकाच वेळी न करता एकाड एक करत होते. काठ जवळ
आल्यावर एक जण होडीतून उतरला आणि सावकाश हाताने होडी काठाला लावली. त्या
दोघींना घेऊन होडी निघून गेली. नदीच्या पलीकडच्या काठावर मोठं जाळं घेऊन सहा जण
नदीमध्ये उतरले. दोन्ही बाजूला तीन तीन जणांनी पकडलं होतं जाळं. काही अंतर नदीतून
ओढलं त्यांनी जाळं आणि मग बाहेर काढलं. आमच्या काठावरून त्यांच्या जाळ्यात काय काय
अडकलं हे समजणं अवघड होतं. ‘हे मासे खाण्यासाठी पकडतात की विकण्यासाठी?’ ‘खूप सापडले
तर विकतात. चारशे रुपये किलो दर चालू आहे.’ कृष्णाने माहिती पुरवली. अंधार पडायला
लागला होता. चला म्हटलं कृष्णाला. तितक्यात समोरून एक जण छोटं जाळं घेऊन येताना
दिसला. थांबावं म्हटलं मग. हा काय करतोय ते बघूया म्हंटलं. त्यानं जाळं उघडलं आणि
पसरून टाकलं नदीत आणि मिनिटभराने लगेच ओढून घेतलं. चिखल, गवताशिवाय
त्याच्या हाताला (जाळ्याला) काहीच लागलं नव्हतं. मग नदीत आणखी थोडं पुढे जाऊन
त्यांन जाळं टाकलं. आता काय अडकलंय हे बघायला आम्ही थांबलो नाही. “कृष्णा गावातील
एखाद पारंपरिक घर दाखव की,” मी इच्छा व्यक्त केली. काहीच वेळ न दवडता एका घरात कृष्णाने हाक दिली आणि थेट
आतच शिरलो आम्ही. सिमेंटच्या पिलरवरील जोतावर घर बांधलं होतं. भिंती मात्र
बांबूच्या तट्ट्याच्या होत्या. आगगाडीच्या डब्यासारखे आडवे लांबलचक होते घर. जोताच्या
पार्किंग मध्ये गुरेढोरे बांधली होती. जोतावरील घरात वर चढण्यासाठी लाकडी पायऱ्या
होत्या. दार उघडलं की एक कॉरिडॉर होता. तो थेट स्वयंपाक घरात जात होता. या
पॅसेजच्या उजव्या बाजूला दोन बेडरूम होते. घराची फरशी बांबूचीच होती. मला वाटलं
प्रत्येक घराची रचना अशीच असेल; पण तसं नव्हतं. “अलग अलग होता है हर घर|” कृष्णा
म्हणाला. मग अजून एका घरात घेऊन गेला कृष्णा. पायऱ्या चढताना आधार घेण्यासाठी एक
बांबू छतापासून जमिनीत रोवला होता. या घरात आधी हॉल कम बेडरूम होते आणि डाव्या
बाजूला वाढल्यावर स्वयंपाकघर होतं. पारंपारिक घरे बघण्याची इच्छा कृष्णानं पूर्ण केली होती. कृष्णा
इथल्या मिसिंग जनजातीचा. या जनजातीचं प्राबल्य आहे बेटावर. पूर्ण
अंधारून आलं होतं. कृशाने त्यच्या गाडीवर होस्टेल वर सोडलं मला.
Comments
Post a Comment